मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग ८६ ते ९०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


८६.
धन्य त्या गोपिका धन्य त्यांच्या गया । धन्य मही माया ब्रह्मा ह्मणे ॥१॥
विश्वात्मा जो हरी क्रीडे या वनांत । तृणादि समस्त धन्य धन्य ॥२॥
धन्य गोवर्धन धन्य वृंदावन । वृक्षादि पाषाण धन्य धन्य ॥३॥
धन्य हें गोकूळ धन्य हे गोपाळ । व्रजवासी सकाळ धन्य धन्य ॥४॥
धन्य ही यथोदा स्तन दे मुकुंदा । धन्य तूंची नंदा त्रैलोक्यांत ॥५॥
ब्रह्मसनातन वेदासी नकळे । तें गडयां-सवें खेळे अरण्यांत ॥६॥
विश्वाचा जो बाप नंद त्याचा पिता । यथोदेसी माता म्हणतसे ॥७॥
सद्नदित कंठ नेत्रीं जळ वाहे । नामा ह्मणे काय मागतसे ॥८॥

८७.
इतुकें मागतसें तुज । वनीं जन्म देईं मज ॥१॥
सुखें करूनी राहीन । तुझे पाहीन चरण ॥२॥
बहुत शीणलों । आतां तुजपाशीं आलों ॥३॥
न करीं अव्हेर । दास तुझा मी किंकर ॥४॥
ब्रह्मा येतो काकुळती । नामा म्हणे देवाप्रती ॥५॥

८८.
काय देशील यांजला । ब्रह्मा म्हणे न कळे मला ॥१॥
म्हणसी देईन मी मुक्ति । तरी ऐक रमापति ॥२॥
मारायासी आले । त्यांसी स्वरूपीं मिळविलें ॥३॥
येथोनियां नवजासी । मज कळलें मानसीं ॥४॥
आणोनियां देत । गायी गोपाळ समस्त ॥५॥
घाली पोटामध्यें डोई । क्षमा करीं माझे आई ॥६॥
आज्ञा घेवोनियां येला । नामा म्हणे स्वस्थ झाला ॥७॥

८९.
आनंदें खेळत । राम नडी कृष्णनाथ ॥१॥
गडी ह्म-णती रामा । ताडफळें देई आत्मां ॥२॥
सकळ मिळोनि । आले धेनूकांचे वनीं ॥३॥
वृक्ष खालवोनी । फळें पाडिलीं मेदिनीं ॥४॥
येत धांवोनी असुर । करी तयाचा संहार ॥५॥
भक्तांचा अंकित । नामा ह्मणे कृष्णनाथ ॥६॥

९०.
कालिंदीचे डोहीं काळियाची वस्ती । ऐक परीक्षिती चरित्र हें ॥१॥
पक्षीश्वापदांनीं सोडियेलें स्थळा । निघताती ज्वाळा तया डोहीं ॥२॥
विषाचियायोगे झाडें जळताती । जीवन न घेती कोणी त्याचें ॥३॥
वैकुंठनायक तया वनीं आला । गोपाळांचा मेळ बरोबरी ॥४॥
हुहुतु हमामा लपंडाई खेळती । देवासी ह्मणती लपें आतां ॥५॥
तृषाक्रांत गाई झाले ते गोपाळ । पिती तेव्हां जळ कालीयाचें ॥६॥
लहानालीं मुलें नाहीं तया ज्ञान । झाले गतप्राण सकळांचे ॥७॥
नामा ह्मणे तेव्हां कृपादृष्टी पाहात । उठवी समस्त गायी गडी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP