मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग १४६ ते १५०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१४६.
करिती गायन रामकृष्णहरी । गोकुळींच्या नारी जाती तेथें ॥१॥
शंख नामा तेथें आलासे गुह्यक । नाहीं त्या विवेक पापि-यासी ॥२॥
उपजला काम तयाचिया मना । घालोनी विमाना स्त्रिया नेत ॥३॥
धांव धांव रामा नेतसे हा आह्मां । अगा मेघश्यामा कृष्णनाथा ॥४॥
नेतो स्त्रिया काय न कळेचि देवा । यासी करूं द्यावा अपराध ॥५॥
हातीं वृक्ष दोघे ऐसें पाहोनियां । टाकोनी तो स्त्रिया पळतसे ॥६॥
घालितांचि वृक्ष प्राणासी मुकला । मणी त्याचा दिल्हा बळीभद्रा ॥७॥
भक्तांसाठीं मारी दुष्टां जगजेठी । नामा ह्मणे तुटी विसरेना ॥८॥

१४७.
गोपिकेचा मेळा आला गृहाप्रती । काय त्या ह्मणती नंदालागीं ॥१॥
परब्रह्म साक्षात्‍ क्षीरसागरवासी । त्या कैसा धा-डसी वनामध्यें ॥२॥
ब्रह्मा आणि इंद्र आले गोकुळासी । वर्णिती कृष्णासी तुह्मीं देखा ॥३॥
तेहेतीस कोटी देव जयांतें प्रार्थित । त्यासी अरण्यांत रुपती कांटे ॥४॥
दैत्यांचा हा भार जाहला पृथ्वीसी । कंस वधायासी आला येथें ॥५॥
ज्याजसाठीं फार श्रम-ताती योगी । कैलासाचा योगी ध्यान करी ॥६॥
भ्रांती कांरे तुज पडे वेळोवेळां । पाहातोसी डोळां चरित्रास ॥७॥
नामया सुकृत झालें असे फार । म्हणोनी विचार नाठवेची ॥८॥

१४८.
वृषभाच्या रूपें आला रिठासूर । इंद्रादि सुरवर भीती त्यासी ॥१॥
बहू देतो त्रास गोकुळींच्या जना । धांवधांव कृष्णा मारी याला ॥२॥
जगजेठी तेव्हां धरितसे शिंगें । सारितसे मागें भुजाबळें ॥३॥
पाडोनियां खालीं दिल्हा पाय वर । मारिला असुर नामा म्हणे ॥४॥

१४९.
कंसाचिया घरा आला नारदमुनी । एकांतीं बैसोनी सांगतसे ॥१॥
सातवा जो गर्भ जिराला ह्मणती । रोहिणी प्रस-वती बळीराम ॥२॥
आठवा जो पुत्र देवकीसी झाला । वसुदेवें नेला नंदाघरीं ॥३॥
यशोदेची कन्या घेऊनियां येत । गेली आका-शांत मारीतां जे ॥४॥
तुझिया मानसीं अशंका येईल । होते रक्ष-पाळ माझे तेथें ॥५॥
ईश्वराची माव न कळे कोणाला । कळलें हें मजला त्याच्याकृपें ॥६॥
घेऊनियां शस्त्र उठला त्वरीत । करितों मी अंत वसुदेवावा ॥७॥
तयेवेळीं ह्मणे ब्रह्मयाचा सूत । ऐक तुज मात सांगतों मी ॥८॥
आधीं मारी पुत्र तुझे जे कां वैरी । असे तुझ्याघरीं मग यासी ॥९॥
सांगोनियां ऐसें शांतविलें त्यासी । गेला गोकुळासी नामा ह्मणे ॥१०॥

१५०.
माराया कृष्णासी । कंसें पाठविला केशी ॥१॥
बहु असे तो प्रतापी । आला अश्वाचिये रूपीं ॥२॥
देवा डसाया धांवला । धरूनि पायीं झुगारिला ॥३॥
मुखीं देऊनियां हात । श्वास कोंडी जगन्नाथ ॥४॥
नामा ह्मणे पडलें प्रेत । हर्ष सुरवरां बहुत ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP