उपदेशपर पदे - भाग ५

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१४७१
( राग-पहाडी; ताल-दादर; चाल-दर्शनासि जाऊं चला० )
धीक धीक धीक सूख रामाविण मूख रे ॥ध्रु०॥
घोर घोर मांडलासे अनर्थ जाला थोर । श्रीरामेसीं अंतर पडतां देहाचें ठकलें पोर ॥१॥
साहित्य संपत्ति जोंवरि आहे तोंवरि म्हणति बरें रे । दैवादैवीं विपत्ति येतां पळति रांडापोरें रे ॥२॥
दीपक देखुनि पतंग जैसा बळोंचि घाली उडी रे । व्यर्थचि प्राणी मरुनि गेला तैसी विषयगोडी रे ॥३॥
अवेव सावेव जोंबरी आहे तोंवरी वोळे हरी रे । कासया मूर्खा भूललासी तूंचि तुझा वैरी रे ॥४॥
अंतकाळीं सोडवितां नाहीं ऐसा कोणी रे । रामदासा सुखावला सूख राघवचरणीं रे ॥५॥

१४७२
( चाल-नामामध्यें उ० )
शाहण्या माणसानें ऐसें न करावें । जन्मा आलियाचें सार्थक करावें । पिंडा ब्रह्मांड अवघें विवरावें । सार शोधूनियां जीवेंसी धरावें ॥ध्रु०॥
प्राणी सांडुनि अमृत विष घेतो । वय असोनि आपुल जीव देतो । लोकांमध्यें रे संपादूनि घेतो । पुढें आपुला आपण प्रस्तावतो ॥१॥
शत्रु मित्रु रे आपुला आपण । हित करील आपणाविण कोण । संत साधु जाणते विचक्षण । वांया जाऊं नेदिती एक क्षण ॥२॥
दास म्हणे रे कोणासी सांगावें । हित आपुलेंचि आपण करावें । सुख शाश्वत पाहोनियां धरावें । जनांसहित आपणां उद्धरावें ॥३॥

१४७३
घटिका गेली पळें गेलीं तास वाजे झणाणा । आयुष्याचा नाश होतो राम कां रे म्हणाना ॥ध्रु०॥
एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले । चौथा प्रहर संसारांत चावटीनें नेले ॥१॥
रात्न कांहीं झोंप कांहीं स्त्रीसंगें गेली । ऐसी आठा प्रहरांची वासलात जाली ॥२॥
दास म्हणे तास बरा स्मरण सकळा देतो । क्षणोक्षणीं राम म्हणा म्हणुनि खुणावीतो ॥३॥

१४७४
( चाल-धर्म जागो० )
म्हणोनियां सावधान । पुढें नाहीं व्यवधान । परलोक पावन आहे । तेथें लावी अनुसंघान ॥ध्रु०॥
राहिली शक्ति जेव्हां । काय करावें तेव्हां । मना ऐसें होत नाहीं । सर्वकाळ जेव्हां तेव्हां ॥१॥
बाळपण मागें गेलें । पुढें तारुण्य आलें । बोलतां चालतां रे । वृद्ध जाले निमाले ॥२॥
आणिलें काय येतां । काय न्यावें रे जातां । स्वप्र हा संसार । कळों लागे पाहतां ॥३॥
रामदास म्हणे माझें । येथें कांहींच नाहीं । सारासार विचारितां । गेलें ठायींच्या ठायीं ॥४॥

१४७५
( राग-गौड सारंग;  ताल-दादरा )
काळ सारिखाचि नाहीं । विचारूनि पाहीं ॥ध्रु०॥
कांहीं एक सुकाळ दुष्काळ । कांहीं एक पर्वकाळ ॥१॥
कांहीं एक आनंदाचे दीस । कांहीं एक उदास ॥२॥
कांहीं एक दिवस समाग्य । कांहीं एक अमाग्य ॥३॥
कांहीं एक दिवस सबळ । कांहीं एक निर्बळ ॥४॥
कांहीं दिवस आरोग्य । कांहीं एक नाना रोग ॥५॥
कांहीं एक बाळत्व तारुण्य । कांहीं एक वृद्धपण ॥६॥
एके ठायीं उपजतें वाढतें । एके ठायीं मरतें ॥७॥
सकळां सुल्लम दुर्लभ । हानी मृत्यु लाभ ॥८॥
कांहीं एक सत्संग कुसंग । रंग आणि वोरंग ॥९॥
नाहीं दिसाऐसा दीस । म्हणे रामदास ॥१०॥

१४७६
( राग-हिंडोल; ताल-धुमाळी )
कांहीं एक साभिमान चालेना चालेना ॥ होणार तिळमरी हालेना ॥ध्रु०॥
उदंड धांवती करिजेते करिजेते ॥ करिजे तें निर्फळ जातें ॥१॥
वासना वावरे आवरेना ॥ संकट पडतां सांवरेना ॥२॥
दया पाहिजे देवाची देवाची ॥ देवेंविण होते चीची ॥३॥
अगाध महिमा कोण जाणे ॥ भजन बरें दास म्हणे ॥४॥

१४७७
ज्या ज्या वेळीं जें जें होईल तें तें भोगावें । विवेकाला विसरुनि आपण कष्टी कां व्हावें ॥धु०॥
एकदां एक वेळ प्राण्या बहु सुखाची गेली । एकदां एक वेळ जीवा बहु पीडा जाली ॥१॥
एकदां मागूं जातां मिळती षड्र्स पक्कान्नें । एकदां मागूं जातां न मिळे भाजीचें पान ॥२॥
संपत्ति विपत्ति दोन्ही पूर्वदत्तचें फळ । ऐसें प्राणी जाणेना तो मूर्खचि केवळ ॥३॥
सुख दुःख सर्वही आपुल्या प्रारब्धाधीन । उगेचि रुसावें भलत्यावरी तें मूर्खपण ॥४॥
माता पिता वनिता यांनीं उगोंचि पाहावें । बरें वाईट कर्म ज्याचें त्यानेंच भोगावें ॥५॥
देहे सुखदुःख मूळ ऐसें बरवें जाणोन । सुखदुःखाविरहित रामदास आपण ॥६॥

१४७८
( राग-बागेश्री; ताल-धुमाळी )
कोण मानिला भरंवसा ॥ अहा जगदीशा ॥धु०॥
कितीयेक उपजती मरती ॥ सर्वत्र पाह्ती ॥१॥
किती येक वाढती मोडती ॥ तारांबळी होती ॥२॥
सुखदुःखें परोपरी ॥ दुश्चित्त अंतरीं ॥३॥
कितीयेक हांसती रडती ॥ पडती झडती ॥४॥
कितीयेक होतें जातें ॥ द्दष्टीसी पडतें ॥५॥
किती वेळें घात जाला ॥ रडतां जन्म गेला ॥६॥
लोक जिवलगां पाळिती ॥ ते कामा न येती ॥७॥
आशा करुनी बैसती ॥ शेखींच फिरती ॥८॥
दुःख आठवीतां जना ॥ जन्मचि पुरेना ॥९॥
दास म्हणे ऐसें नव्हे ॥ देवाला भजावें ॥१०॥

१४७९
( चाल-धर्म जागो० )
आतां तरी सावधान । अर्थीं घालावें मन । आपुलेसें माने । तेंचि करावें साधन ॥ध्रु०॥
प्रपंच लाथलावें । आधीं विद्यावंत व्हावें । उदंड मेळवावें । मग सुखीं नांदावें ॥१॥
आधीं कष्ट मग फळ । ऐंसें बोलती सकळ। कष्टेना एक पळ । तेणें होय वोंगळ ॥२॥
जिणें हें दों दिसांचें । नेणे माणुस काचें । जाणतसे गुणाचें । ऐसें मिळेल कैंचें ॥३॥
आपण सुखी होती । लोकां सुखी करिती । ऐसी हे शुद्धमती । तेणें पावे गती ॥४॥
इहलोक परलोक । सर्व करावें सार्थक । लोकांमध्यें अलौलिक । ऐसा करावा विवेक ॥५॥
विचाराची बुद्धि ऐसी । सुखी करावें सर्वांसीं । स्त्री पुत्न दारा दासी । अवघीं करावीं विळासी ॥६॥
दास म्हणे ऐसा हेवा । सुखें संसार करावा । कांहींच नाहीं गोवा । पंथ देवाचा घरावा ॥७॥

१४८०
सावाधान सावधान । कांहीं नाहीं व्यवधान ॥ध्रु०॥
दश वर्षें बाळपण । वीसवर्षें तारुण्य । आंगीं जडला अभिमान ।
तेव्हां न घडे समाधान ॥१॥
तिसाची होय भरती । दास पुत्न लाभती । त्यांतचि पडे भ्रांति । न कळे स्वरूपस्थिति ॥२॥
चाळीस वर्षें जालीं । डोळां चाळिशी आली । नेत्रांसी भूल पडली । येतां न दिसे जवळी ॥३॥
पन्नास होय भरती । दंतपंक्ती हालती । शामकेश शुभ्र होती । त्यासा म्हातारें म्हणती ॥४॥
साठीची बुद्धि नाठी । हातीं धरूनि काठी । वसवसां लागे पाठीं । त्यास हांसती पोरटीं ॥५॥
सत्तरींची विवंचना । बैसल्या उठवेना । उठवितां चालवेना । दिसतसे दैन्यवाणा ॥६॥
चारी वीस मिळोनि ऐंशी । मग दिसें जालें पिसी । जळेंवीण मासोळी जैसी । तैसा होय कासावीसी ॥७॥
नवापुढें दिल्हें पुज्य । सुख राहिलें दुजें । म्हणतसे माझें माझें । अंतीं कोण आहे तुज ॥८॥
राजहंस उडोनि गेला । देह कोरड पडला । त्यास म्हणती मेला मेला । ऐसें अनहित करूनि गेला ॥९॥
यालगीं रामदास । सोडीं संसाराची आसा । सांगतों मी सज्जनास । घरा सद्‌‍गुरूची कांस ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP