नानाविध भक्ति - भाग ४

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१४१६
( राग-भीमपलास; ताल-दादरा )
नाम मंगळधाम हरीचें हो । संतसज्जना विश्राम ॥ध्रु०॥
सकळ सकळ धर्म अचळ अर्थ काम । स्मरणें स्वानंदाभिराम ॥१॥
गरळजाळशम शिवमनोरम । दास उदास पूर्ण काम ॥२॥

१४१७
( राग-जिल्हा; ताल-दादरा )
थोर माझा थोर माझा थोर माझा रघुनाथ ॥ध्रु०॥
नाम थोर जगीं तारक ब्रह्म । रूप थोर एका आत्माराम ॥१॥
कीर्ती फार थोर वर्णवेल कोणा । दास थोर महारुद्र जाणा ॥२॥
रामदास म्हणे माझा राघव थोर । हनुमंत समोर शोभतसे ॥३॥

१४१८
( राग-गारा; ताल-दादरा )
श्रीगुरुचें चरणकंज ह्रदयीं स्मरावें ॥ध्रु०॥
निगमनिखिल साधारण । सुलभाहुनि सुलभा बहू । इतर योग याग विषम पथीं कां शिरावें० ॥१॥
नरतनु द्दढ नावेसी । बुडवुनि अति मूढपणें । दुष्ट नष्ट सुकर-कुकर तनू कां फिरावें ॥२॥
रामदास विनवि तुज । अझुनि तरी समज उमज । विषया वीष सेवुनियां फुकट कां मरावें ॥३॥

१४१९
( राग-देस; ताल-धुमाळी )
त्रिविध तापहारक हे गुरुपाय । भवसिंधूसि तारक हे गुरुपाय ॥१॥
स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय । ज्ञानाचें निजगुज हे गुरुपाय ॥२॥
भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय । नयनीं श्रीराम दाविती हे गुरुपाय ॥३॥
सहज शांतीचें आगर हे गुरुपाय । पूर्ण कृपेचे सागर हे गुरुपाय ॥४॥
रामदासाचें जीवन हे गुरुपाय । सकल जीवासी पावन हे गुरुपाय ॥५॥

१४२०
( राग-खमाज; ताल-धुमाळी )
आता तरी जाय जाय जाय । धरिं सद्‌‍गुरुचें पाय ॥ध्रु०॥
संकल्प विकल्प सोडुनि राहें । द्दढ धरुनियां पाय पाय पाय ॥१॥
नामस्मरण ज्या मुखीं नाहीं । त्याणें वांचुनी काय काय काय ॥२॥
मानवतनु ही नये मागुती । बरें विचारुनि पाहें पाहें पाहें ॥३॥
आत्मानात्म विचार न करितां ।
व्यर्थ प्रसवली माय माय माय ॥४॥
सह्स्त्र अन्याय जरी त्वां केले । कृपा  करिल गुरुमाय माया माय ॥५॥
रामदास म्हणे नामस्मरणें । भिक्षा मागुनि खाय खाय खाय ॥६॥

१४२१
( चाल-गडयांनो घ्या हरिच्या नामा० )
जा जा जा जा झटका रे । गुरुपदीं जाउनि हटका रे । रामरसाचा घ्या तुम्ही घुटका । तेव्हांच होईल सुटका रे ॥ध्रु०॥
औटा हाताचा मळा रे । राबती बारा सोळा रे । विधात्यानें बाग लाविला । अमृताची वेळा रे ॥१॥
नऊ दरवाजे खिडकी रे । त्यावरती एक फिरकी रे । तेथें खाऊन गिरकी प्राण्या । चिन्मय स्वरूप ओळखी रे ॥२॥
उलटा मार्ग नीट रे । तसाच होय बा धीट रे । रामदास हा तुला सांगतो मोक्षपदाची वाट रे ॥३॥

१४२२
( राग-मैरवी; ताल-दादरा )
गुरुचरणीं मना लीन होईं रे ॥धु०॥
त्याविण आणीक कोण करी अनन्य । मानधनासी न ध्याईंरे ॥१॥
हा भवसागर दुस्तर जाणुनी । नामामृत तूं घेईं रे ॥२॥
दास उदास आस गुरुची । कांस धरूनी पदीं राहीं रे ॥३॥

१४२३
( राग-कल्याण; ताल-धुमाळी चाल-अरे नर० )
पंकजीं मन मुरे । सद्‌‍गुरुपादपंदकजीं ॥ध्रु०॥
मनीं मनपण सर्व हि आपण । तेणें गुणें हांव पुरे ॥१॥
परब्रह्मीं थार होतां अनिवार । तेणें गुणें माया विरे ॥२॥
निजपदीं मन जडतां अमिन्न । निखळ सुख उरे ॥३॥
हेंचि हें साधन आत्मनिवेदन । मीतूंपण तेंहि नुरे ॥४॥
रामदासीं रामरूप निजधाम । पावतां निःसंग रे ॥५॥

१४२४
( राग-जिल्हा; ताल-धुमाळी )
बाई मी हो मी हो जाहली खरी । खरी गुरुदास । अखिल पदार्थीं उदास ॥ध्रु०॥
इहपर नश्वर जाणुउनि ह्रदयीं । आलासे बहु त्नासा ॥१॥
नित्यानित्य विवेक विचारुनि । सेवित  ब्रह्मरसास ॥२॥
तुर्या उल्लंघुनी उन्मनी सेवुनी । सस्वरूपीं निजवास ॥३॥
निज तृप्तीसी देउनि तृप्ती । केला अनुभवग्रास ॥४॥
रामदासप्रमु नित्य उदास । सच्चरणीं विश्वास ॥५॥

१४२५
( राग-बिहाग; ताल-दादरा )
समर्थपाय सेवितां बहु सुखावलों ॥ध्रु०॥
तत्वमसिवाक्यशोध । करितां मीपणा रोध । सघन आत्मरूप पावलों ॥१॥
जन्ममरण हर्षशोक । टाकुनियां सुखदुःख । बोधबळें बहु उकावलों ॥२॥
जनीं वनीं रामराव । समूळ दासपणा वाव । करुनियां ऐक्य पावलों ॥३॥

१४२६
( चाल-कामदावृत्त; हे दयानिधे वायुनंदना० )
नवमि करा नवमि करा । नवमि करा भक्ति नवमी करा ॥ध्रु०॥
अष्टमी परी नवमी बरी । तये दूसरी न पवे सरी ॥१॥
राम प्रगटे भेद हा तुटे । अमेद उमटे तेचि नवमी ॥२॥
शीघ्र नवमी येतसे उर्मी रामदास मी अर्पिली रामीं ॥३॥

१४२७
( राग-भूप; ताल-धुमाळी )
आनंदरूप राहों  । मुदितवदन पाहों ॥ध्रु०॥
सम विषम दुःख संसारिक । तो ही सकळिक साहों ॥१॥
दास हरिजन आत्मनिवेदन । अमेद भजन लाहों ॥२॥

१४२८
( राग-देशी; ताल-धुमाळी )
धन्य धन्य ते जन आत्मनिवेदन जेथें जालें । सोहं आत्मा हें वचन प्रत्यया आलें । पतितपावन होतां क्षणीं मन तें निवालें । भय जन्मामरणाचें तें खंडोनि गेलें ॥ध्रु०॥
अंतरवेध अमेद निरंजन तो पाहती । नसोनि आपण सर्व गुणागुण जे वाहती । प्रारब्धभोगा संयोग वियोग सुखें साहती । दास म्हणे निज संतखुणें जे राहती ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 16, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP