उपदेशपर पदे - भाग १

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१४२९
( रग-शंकराभरण; ताल-धुमाळी. )
प्रस्तावा अंतीं घडे । संकट येउनी पडे । यमआटाआटी यातना ते मोठी । तेव्हां स्वहित न घेडे जना रे ॥ध्रु०॥
नागविलें वैभवें येणें । संसारीं सुटिजे कोणें । सांडुनी तो राम मनीं धरिला काम । तेणें दुःखें भोगणें जना रे ॥१॥
पराधेन जिणें गेलें । इच्छेचें बंधन जालें । उकळित लागलें देह गाहण केलें । वय काळानें नेलें जना रे ॥२॥
सावधान होईं आतां । आयुष्य न मिळे पाहतां । आले तितुके नेले डोळे कां झांकले । नको राहों दुश्चिता जना रे ॥३॥
तुझें येथें कोण आहे । मुलला आहेसी काय । रामदास म्हणे अंतीं एकलें जाणें । तेव्हां खुंटला उपाय जना रे ॥४॥

१४३०
( राग-काफी; ताल-दीपचंदी. )
सुखदुःखें मिश्रित हा संसार । सवेंचि होईल स्वार ॥ध्रु०॥
कांहीं सुखें कांहीं दुःखें होतसे । सुख दुःख हें अपार ॥१॥
कांहीं संपत्ती कांहीं विपत्ती । लागेचिना परपार ॥२॥
कांहीं सज्जन कांहीं दुर्जन । दास म्हणे परपार ॥३॥

१४३१
( राग व ताल-वरील )
मूर्खाचे संगतीं सुख नाहीं रे । नाहीं रे । क्षणक्षणा विचारुनी पाहीं रे ॥ध्रु०॥
बाष्कळाचा संग मनभंग रे । मनभंग रे । घडी घडी होतसे विरंग रे ॥१॥
वेडयाची संगती कामा नये रे । उपायाचा होतो अपाय रे ॥२॥
भल्याची संगती रात्रंदिवस रे । रात्नंदिवस रे । दास म्हणे करावा अभ्यास रे ॥३॥

१४३२
( रग-मैरव; ताल-धुमाळी )
ऐसें मूर्खाचें जिणें । सर्व प्रकारीं उणें । चेरा करिती पिसुणें । मागें भुंकतें सुणें ॥ध्रु०॥
अवगुण आपुले झांकी । अंगावेगळे टाकी । सुख नाहीं परिपाकीं । कष्टी होतें लोकिकीं ॥१॥
कोणें काय घेतलें । केलें फळासी आलें । अवघें विरोंचि केलें । पुढें काय साधिलें ॥२॥
आळसी कांहींच करीना । सांगितलें धरीना । मानी आपुलिया मना । कोणाचें हि मानेना ॥३॥
दास म्हणे रे न्यायी । न्याय नेणे अन्यायी । शिणे आपुले ठायीं । शब्द लोकांला नाहीं ॥४॥

१४३३
( चाल-धर्म जागो० )
मुख्य पापी तोचि जाणा । ज्यासी देवचि मानेना । वासना ही बरी नाहीं । न्या नीति आवडेना ॥ध्रु०॥
स्नानसंध्या आवडेना । दानधर्महि घडेना । वेदशास्त्र धर्मचर्चा । कदा ह्र्दयीं धरीना ॥१॥
ज्ञान नाहीं ध्यान नाहीं । समाधान तें हि नाहीं । श्रवण नाहीं मनन नाहीं । निजध्यास तोही नाहीं ॥२॥
देवऋणी पितृऋणी । ऐसी जयाची करणी । मनुष्यऋणी सर्वऋणी । सत्य बोलेना वाणी ॥३॥
वरपडा होइल काळा । नाहीं पापाचा कंटाळा । झोडिती यमदूत । धिःकारिती वेळोवेळां ॥४॥  
रामदास्य तें हि नाहीं । सुख संसारीं नाहीं । इहलोक परलोक नाहीं । त्यास कांहींच नाहीं ॥५॥

१४३४
( राग-कल्याण;  ताल-धुमाळी; चाल-अरेनर० )
रे वयसा तोंचि बरी पाहिली ॥ तुज देखतां भली ॥ध्रु०॥
बाळपणीं जननीच पाहिजे ॥ तारुणीं ते राहिली ॥१॥
वृद्धपणीं तनु क्षीणचि जाली ॥ बहु पीडा साहिली ॥२॥
दास म्हणे अंत बहुत भ्रांत ॥ प्रेततनु दाहिली ॥३॥

१४३५
( चाल-धर्म जागो० )
वडिलीं लग्न केलें । पोर तेणें मुललें । दिसंदिस दरिद्र आलें । खाया नाहींसें जालें ॥ध्रु०॥
पोटभरी अन्न नाहीं । वस्त्र धड तेंहि नाहीं । चालेन कोठें कांहीं । धड घर तोंडि नाहीं ॥१॥
अखंड कष्टी राणी । चार अंगुळें वेणी । आंगीं तोंडी सुटे घाणी । नेणों आली कैकाडिणी ॥२॥
सोयरे हांसताती । सेखीं बोंचूनी घेती । कनकोंडेंपणें जिती । थोर जाली फजिती ॥३॥
घरचीं म्हणती त्याला । पोर टोणपा जाला । मागतो भक्षायाला । कोण पोशी रांडेला ॥४॥
दोघेंहि चिंतातुर । कृश जाहलीं शरीरें । हासतीं रांडापोरें । ऐसें केलें अविचारें ॥५॥
लोकांमध्यें कानवसा । लोक पाहती तमाशा । अहा रे जगदीशा । व्यर्थ गेली वयसा ॥६॥
दास म्हणे खबरदार । बरा पहावा विचार । किती सांगों वारंवार । कृष्टी जालें गव्हार ॥७॥

१४३६
( राग-बागेश्री; ताल-धुमाळी; चाल-चंचळ वो माय० )
संसारीं सुख म्हणतां लाज नाहीं । बाया पडिले प्रवाहीं । माझें माझें हेंचि पिसें लागलेंसें । विचारितां नाहीं कांहीं ॥ध्रु०॥
कन्यापुत्रमायबाप आणि बंधु । अवधीं आपुलीं  मानिलीं । ऋणानुबंध संगतीचा तुटोनी गेला । तेणें वृत्ति दुखवली ॥१॥
जितुके आले तितुके गेले एकलेचि । ऐसें तुम्ही हि जाणतां । जाणतचि लालुचेची आस केली । तरि मी काय करू आतां ॥२॥
रामदास म्हणे माझा रामरावो । त्याची संगति घरा रे । अंतीं तरी सोडवितां तोचि एक । राम कैवारी करा रे ॥३॥

१४३७
( राग-भीम;  ताल-धुमाळी )
संसारीं गुंतलें चित्त । जन्मवरी दुश्चित्त । आतां कोणे वेळे हित गेलें रे ॥ध्रु०॥
जें जें कांहीं सांगावें । तें तें तुज सकळ ठावें । कैसेनी पावावें समाधान रे ॥१॥
उपायाचा अपाय । होतसे करूं काय । तुझा तूंचि होय सावधान रे ॥२॥
हित तें तूं  नेणसी । सांगितलें नायकसी  उंपाय करणें यासी काय रे ॥३॥
रामदास म्हणे भावें । हित तेंचि धरावें । कासया करावे अनहित रे ॥४॥

१४३८
( राग-सारंग; ताल-धुमाळी; चाल-धन्य तो साधक० )
जिणें हें दों दिसाचें ॥ पाहतां शाश्चत कैंचे ॥ध्रु०॥
शरीर संपत्ति कांहीं न राहे ॥ सावध होउनि पाहें ॥१॥
कितेक होतें कितेक जातें ॥ येथें कोण राह्तें ॥२॥
दास म्हणे सत्कीर्ति करावी ॥ सृष्टि सुखेंचि भरावी ॥३॥

१४३९
 ( चाल-धर्म जागो० )
संसार दों दिसांचा । याचा भर्वसा कैंचा । चालतें तोंचिवरी । पुढें कोण कोणाचा ॥ध्रु०॥
किती येक आले गेले । लोक लोकीं देखिले । एक ते संपन्न जाले । एक भिके लागले ॥१॥
स्वप्र हें खरें वाटे । जागा होय तंवरी । चेइल्या कळों लागे । आपेंआप अंतरीं ॥२॥
रामदास म्हणे देवा । तुझी घडावी सेवा । सद्‌‍बुद्धि सद्वासना । हा तों पूर्वींचा ठेवा ॥३॥

१४४०
( चाल-घटका गेली पळें० )
प्रपंचाची झांपड पडली राम दिसेन डोळा रे ॥ध्रु०॥
दिवसां झोपी रात्रीं झोंपी झोंपी झोंका दिधला रे ॥१॥
दिवसां निजुं निजुं रात्नीं निजुं निजुं निजीं नीज उडाला रे ॥२॥
रामदास म्हणे व्यर्थचि आलें । सार्थक कांहीं नाहीं केलें रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 16, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP