नानाविध भक्ति - भाग २

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१३९१
( राग-झिंझोटी; ताल-दादरा )
उल्लाळ ताळ जातसे । प्रबंद बंद घन घमंडी होतसे ॥ध्रु०॥
सन्मुख देव देखिले । बहु दाटी भक्तजन थोकले ॥१॥
सुखें सुखचि होतसे । अचाट कट्ट गर्द होउनि जातसे ॥२॥
कथाकल्लोळ माजला । ठायीं ठायीं उदंडचि गाजला ॥३॥
वाद्यें बहुत वाजती । हरिकथा भक्तमंडळया साजती ॥४॥
पुरती  मनकामना । भक्तजनां आनंद होतसे मना ॥५॥
बहु मिळालीं जनें । उदंड अन्नें होति सहस्त्रभोजनें ॥६॥
सांग वैमव दाटलें । देशोदेशींचे जन उदंड थोकले ॥७॥
देवदर्शन होईना । दाटणी खेंटा तेथें मनुष्य जाईना ॥८॥
दुरूनि दर्शन जालें । भक्तजनीं तेथें लक्ष लाविलें ॥९॥
दासें धरिला शेवट । पुढें दुरी पुरी अंतरें निकट ॥१०॥

१३९२
( राग-कामोद; ताल-दादरा )
कथा निरुपणें सार्थक करणें । राघवाच्या गुणें धन्य होतें जिणें ॥ध्रु०॥
गायनाची कळा रंगचि वेगळा । अर्थांतरें वळा अंतरें निवळा ॥१॥
नाना वाद्यें मेळ स्वरांचा कल्लोळ । ताळामागें ताळ नृत्याचे उफाळ ॥२॥
तार मंद्रा घोरें कथारगोद्धारें । अन्वयें विचारें प्रबंदाचीं द्वारें ॥३॥
गाणें पळें पळ होतसे निवळ । आनंदाची वेळ वाहे सर्वकाळ ॥४॥
दास म्हणे भावें कीर्तन करावें । परलोकासी जावें जना उद्धरावें ॥५॥

१३९३
( राग-हमीर; ताल-त्निताल )
धिलांग धतिगण रे । टाळ खणखणाट खणखण रे ॥ध्रु०॥
चळाळ चळचळ रे । विवरत चळवळ चळवळ रे ॥१॥
स्थूळानें स्थूळ वेधिलें । दास म्हणे अंतरें अंतर मेदिलें ॥२॥

१३९४
( राग-केदार; ताल-धुमाळी, चाल-जालें सार्थक० )
तडांग तडांग तडांग हरिणें उडिया घेती । नेमक गायनताळीं मिळोनि जाती । कोल्हाटी ते पटीवरून उडिया साधिती । जाणते जाणती तैसी ताळाची गति ॥ध्रु०॥
तार मंद्र घोर उंच टाकीचें गाणें । टाकीचें गाणें । अचुक चुकेना त्यासी धरावें कोणें । खलप घालणीं पिळपेंच राखणें । सावधानपणें ब्रह्मानंद राखणें ॥१॥
खणखणीत ताल दणदणीत मृदंग । चपेटें लपेटें होतो संगीत रंग । सुखर सुंदर मिळोन गेले उपांग । घन स्वर तंत अवघें पाहिजे सांग ॥२॥
खणखणिती ताळ खुनखुणिती घागरिया । ब्रीदाचा तोडर घळकत जाती वांकिया । घनाचा घमंड तंत लावितो लया । नाना नादें खणखणाटें तता थैया थैया ॥३॥
शब्दाभेद अर्थभेद तानाचे भेद । उडाला तो खेद  अवघा जाला आनंद । कटावरी कट बंदावरी प्रबंद । अनेक छंदें लोकांमध्यें लागल वेध ॥४॥
सूक्षम वळाणें सूक्ष्मानें वळावीं । संकेतवचनें संकेतानें कळावीं । नानामत्तें न्यायप्रचीतीनें गाळावीं । दास म्हणे नाना जन्मदुःखें टाळावीं ॥५॥

१३९५
( राग-बिहारा; ताल-धुमाळी )
कथा करीन आवडी । या राघोबाची ॥ध्रु०॥
टाळाची खणखण । मृदंगाची दणदण ॥१॥
छंदप्रबंध गीत । गाईन संगीत ॥२॥
दासाचें जीवन । परमपावन ॥३॥

१३९६
( राग-सोहनी; ताल-धुमाळी चाल-सद्‌‍गुरुसेवीं रे जना० )
कथा कीर्तन उपाय । सकळ जनां । होय तरणोपाय ॥ध्रु०॥
सांडावी सकळ लाज । देवालागीं व्हावें तेणें निर्लज्ज ॥१॥
लज्जा राखतां देव । करिल काय जीव बापुडे मानव ॥२॥
दास म्हणे लोकांसी । आपुला भार घाला वेगीं देवासी ॥३॥

१३९७
( राग-जयजयवंती; ताल-दादरा )
धन्य जगज्जीवना । चटक लागली मना । कथेविण कंठवेना रजनीचराचे परी ॥ध्रु०॥
ताळमृदंगाच्या ध्वनी । अखंड आठवे मनीं । सुख हें पाहतां जनीं । आणीक नाहीं ॥१॥
सफळ तोचि तो दिन । संगीत कथा कीर्तन । तेथें रिझे तनमन । आनंदरूपें ऐकतां ॥२॥
समर्थ हा रघुवीर । थोर केला उपकार । दास म्हणे निरंतर । वेधु हा लाविला मला ॥३॥

१३९८
( राग-काफी ताल-दादरा )
हरिकथा हरिकथा हरिकथा नेटकी ॥ध्रु०॥
ताळ मृदांग श्रुति उपांग । रंगें रंग होतसे ॥१॥
खण खण टाळ रंग रसाळ । आनंदें काळ जातसे ॥२॥
दास म्हणे मी गायक वेडा । नाहीं  जोडा वेडपणा ॥३॥

१३९९
( राग-कल्याण; ताल-दीपचंदी. )
तेथें मी तिष्ठतु रे नारदा । तेथें० ॥ध्रु०॥
कथा निरूपण श्रवण कीर्तन । अहेतु कीं हेतु रे ॥१॥
निजध्योंस थोर होय साक्षात्कार । तोचि मी अनंतु रे ॥२॥
दास म्हणे भक्ति पाविजेते मुक्ति । नवमीं नाहीं मी तूं रे ॥३॥

१४००
( राग-कानडा; ताल-दीपचंदी )
जप रे मना रामनाम जप जप० ॥ध्रु०॥
जपतां नाम पुरति काम । काळ न पाहे कोपें ॥१॥
संकट वारी दुरित निवारी । जळति महापापें ॥२॥
गिरिकंदरवन अघोर । सिणसि करितां तप ॥३॥
म्हणे दास जन हेंचि हें साधन । बहु गोड बहु सोपें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 16, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP