मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ६३

उपासना खंड - अध्याय ६३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

कृतवीर्य-तात यानें, विधिला पुशिलें महात्म्य दूर्वांचें ।

श्रीमद्गणेश देवा, रुचती दूर्वा किमर्थ हें साचें ॥१॥

एतद्विषयीं आहे, वृत्त मनोरम कथीन मी तुजला ।

सावध करुन चित्ता, ऐकें सखया प्रसंग जो घडला ॥२॥

दक्षिण देशामध्यें, होतें पुर जांभ त्या असे नाम ।

तेथें क्षत्रिय होता, सुलभ असे हें प्रथीत कीं नाम ॥३॥

ज्ञानी गुणी विवेकी, धनिं, बलिं, दातीं, करुन तो युक्त ।

भार्या नाम समुद्रा, साध्वी मन-हारिणी गुणां युक्त ॥४॥

यापरि वर्तन असतां, दंपत्याची विचित्र गति दैवीं ।

कैसें झालें दैवीं, ऐके लिहिलें न टाळवे देवीं ॥५॥

एके दिनीं तयांच्या, सदनाला विप्र एक तो आला ।

मधुसूदन नांवाचा, होता तो देवदास नाणवला ॥६॥

होता परंतु भिक्षुक, भिक्षेसाठीं फिरावया लागे ।

होतें चीर तयाचें, दीगांबर तो परंतु सा वागे ॥७॥

पाहुन त्यातें हंसला, क्षत्रिय तेव्हां द्विजास ये कोप ।

हल ओढण्यास बैलचि, योग्य असा हो असा वदे शाप ॥८॥

अतिथीशापा ऐकुन, वदली तेव्हां तयास ती शाप ।

गर्दभ होई विप्रा, नागिणशी कोप युक्तसा शाप ॥९॥

शापाया नारीला, नाहीं अधिकार तो वदे विप्र ।

चांडाळी तूं होईं, शापी झालीं द्वयें तसा विप्र ॥१०॥

हंसणें झालें क्षुल्लक, झाला परिणाम तो कसा पाहें ।

तीघांना बाधक तो, झाला यास्तव विचार करि तूं हें ॥११॥

सुलभास बैल होणें, मधूसूदन तो तसाच गर्दभ कीं ।

झालि समुद्रा म्हारिण, क्षुत्पीडित होतसे फिरे वनिं कीं ॥१२॥

पर्जन्य शीत-पीडित, फिरतां फिरतां समोर गणपतिच्या ।

देवालयास आश्रय, करिती झाली सवन्हि वळचणिच्या ॥१३॥

ते दिनिं शुद्ध चतुर्थी, नभ मासांतिल गणेशजन्माची ।

होती म्हणून तिजला, घालविती लोक मांदि नगरीची ॥१४॥

तेथेंहि तिला कोणी, ठाव नसे दीधला बसायासी ।

तेथून दूर गेली, वृक्षतळिं ती निवास करण्यासी ॥१५॥

बहु यत्‍नांनीं तेथें, शुष्क अशा इंधनास ती मिळवी ।

प्रज्वालुन वन्हीला, शीतनिवारण चिरासही सुकवी ॥१६॥

अग्नीमध्यें तृण तें, घालित असतां हरीत ती दूर्वा ।

वातप्रभावयोगें, जाउन पडली प्रभूशिरीं दूर्वा ॥१७॥

इतुक्यामध्यें तेथें, शापित गर्दभ तसाच तो बैल ।

शीतनिवारण व्हावें, यासाठीं पातले त्वरें ऐल ॥१८॥

तीघांच्या दैवानें, शापापासून मुक्त होण्याची ।

आली सुवेळ म्हणुनी, बुद्धी झाली तिघांसही साची ॥१९॥

शेकाया आणिलेलें, तृण तें दोघे मिळून ते खाती ।

तेथें परस्परांचें, द्वंदहि झालें तृणामुळें पुढती ॥२०॥

खातां खातां त्यांच्या, वदनांतुनि वातवायुनें उडुनी ।

दूर्वा सत्वर जाती, पडती त्या देवमस्तकीं दोनी ॥२१॥

एणेंपरी तिघांना, पूजा घडली अजाण गणपतिची ।

अवडे तयास पूजा, आनंदें मुदित वृत्ति गणपतिची ॥२२॥

रजनी होतां तेव्हां, देवउपासक समस्त निद्रीत ।

पाहुन काठी घेउन, शापित बाई सुरालयीं शिरत ॥२३॥

खाद्यपदार्थ तियेनें, भक्षण केले पशूनिंहि मग ते ।

प्रभुचें पूजन भक्षिति, यास्तव ताडण करीच ती त्यांतें ॥२४॥

ऐकुन गडबड तेव्हां, जागे झाले समस्त निद्रीत ।

यष्टया घेउन ताडिति, भ्रमती शापित सभोंवतीं फिरत ॥२५॥

मारांनीं व्याकुळ तीं, अर्धी मेलीं अशी दशा झाली ।

पाहुन गजाननातें, स्वमनीं त्यांची बहू दया आली ॥२६॥

तीघांपासुन अपुलें, दूर्वांनीं यजन जाहलें सहज ।

घडली प्रदक्षिणाही, पूजन घडलें तयांस ही आज ॥२७॥

होती शुद्ध चतुर्थी, नभ मासांतिल म्हणून पुर धाडी ।

होयी कृपा प्रभूची, भक्तांना नेतसे लवडसवडी ॥२८॥

इकडे भक्तजनांनीं, भ्रष्टविलें त्या प्रभूस बाईनें ।

स्नानासहीत पूजन, केलें यास्तव द्वितीय पूर्ण मनें ॥२९॥

इतुक्यामध्यें तेथें, सेवक आले विमान घेऊन ।

वैमानिक वाद्यांचा, ऐकुन ध्वनि येति भक्त धाऊन ॥३०॥

ऐसें कौतुक बघतां, तीघांना घालिती विमानांत ।

कुश्चल देह तयांचे, झाले सुंदर त्वरीत ते बघत ॥३१॥

आलेल्या भक्तांनीं, पुशिलें तेव्हां गणेशदूतांस ।

कुश्चल देह असूनी यांच्या पुण्यास सांगणें खास ॥३२॥

आम्हीं बहूत वरुषें, करितों ही नेमयुक्तशी तपसा ।

पावत नाहीं आम्हां, गणपति दैवत अशी कशी तपसा ॥३३॥

सांगा उचीत आम्हां, सत्वर आम्ही करुं तपश्चर्या ।

नेमेंकरुन करुं ती, तोषित करुं प्रार्थुनी प्रभू-वर्या ॥३४॥

सूतांनीं श्रोत्यांना, जें कथिलें तें कथी भृगू भूपा ।

ऐकति शांत मनानें, मंत्री राणी कथानकें अमुपा ॥३५॥

कृतवीर्याच्या जनका, विधि सांगे हें सुवृत्त मधु साचें ।

यापूर्वीच्या भागीं, संभाषण शूरसेन इंद्राचें ॥३६॥

याही पूर्वी आहे, विधि व्यासांचा सुबोध संवाद ।

कथिला भृगू मुनींनीं, राजा जो सोमकांत या विशद ॥३७॥

त्याचि अधारें कवनीं, वर्णियला तो जनांस समजाया ।

झाल सुरम्य मातें, गणपतिचा हा प्रसाद वर्णया ॥३८॥

गुंफुनि कोमल कोमल, धवल अशा त्या प्रभूस दूर्वांनीं ।

मोरेश्वर सुत सेवक, पूजन करि हें सहस्त्र दूर्वांनीं ॥३९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP