मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय १४

उपासना खंड - अध्याय १४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


 (ओवी)

भृगू सांगती सोमकांता । विधात्यासी ज्ञान तत्त्वता ।

प्राप्त होतां गर्वसरिता । असंभाव्य उचंबळी ॥१॥

जगोत्पत्ति करुं जात । तों बहू विघ्नें मूर्तिमंत ।

देखोन तेव्हां भयभीत । झाला विधी तेधवां ॥२॥

(गीति)

अद्‌भुत रुपें धरुनी विघ्नें देती असह्य तापातें ।

अभिमानरहित होतां जीवित हें क्षणिक वाटलें त्यातें ॥३॥

तेणेंकरुन त्यासी मूर्च्छा आली तशांत त्या समयीं ।

सावध होउन तेव्हां अनन्यभावें प्रभूस नत होयी ॥४॥

तन-मन अर्पुन विधि हा स्तवन करी त्या प्रभूस सद्‌भावें ।

ऐकुन गणेश देवें, स्व-वचें वदला तपास लागावें ॥५॥

ऐसी विहायवाणी परिसुनि विघ्नें लयास तीं गेलीं ।

विघ्नांपासून सुटला तदुपरी चित्तांत शांतता आली ॥६॥

ब्रह्मा म्हणे गणेशा, मजसी सांगें तपस्य-मंत्रास ।

एकान्तवास व्हावा, मागतसें हें सु-लीनसा दास ॥७॥

उदकामाजी बैसुन व्याकुळसा बोलतो गणेशास ।

इतुकें देईं मजला, कार्यास्तव मी करीं तपस्येस ॥८॥

(शार्दूलविक्रीडित)

रत्‍नीं युक्त असा मुकूट सिरसा कंठीं तशी मालिका ।

रत्‍नीं युक्त अशीं भुजांत कटकें बोटांत त्या मुद्रिका ॥

कंठीं धार्मिक-सूत्र हें कटि-तटीं वेष्टीत नाग्दोरक ।

भालीं चंद्र शरीर लाल वसनें भालीं तसा तीलक ॥९॥

श्रद्धेनें स्मरलें स्वरुप अवघें आकाशवाणी पुन्हां ।

पाहे तो वट-वृक्ष तूं श्रवतसें शंकीत ब्रह्मा पुन्हां ॥

सांगे तो भृगु भूप हो विधि-कथा ऐके अती आदरें ।

भक्तीनें कवनें करुन चरणीं तीं अर्पिलीं सादरें ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP