मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय १

उपासना खंड - अध्याय १

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


 (गीति)

नाम जयाचें घेतां, विघ्नाब्धी हा समस्त आटे तो ।

जैसा अगस्ति मुनि कीं सागर प्राशी समस्त तैसा तो ॥१॥

जो प्रभु वेदान्तातें, ज्ञानातें देउनी करी श्रेष्ठ ।

ऐसा गणेशदेवा, नमन असो कार्यसिद्ध हो इष्ट ॥२॥

ऋषिवर्य शौनकांनीं द्वादशवर्षीय सत्र चालविलें ।

त्यामाजी सूतांनीं ऋषिवर्यांच्या मनास रंजविलें ॥३॥

मनरंजनार्थ त्यांनीं बहु ग्रंथांचें महत्त्व वर्णियलें ।

त्यांमध्यें विस्तारें व्यासकृत काव्य त्यांस कथियेलें ॥४॥

गणपति-प्रभूसाह्यानें व्यासें रचिला साग्र इतिहास ।

प्राचिन पंडित वदती, पुराण ग्रंथ प्रथीत हें त्यास ॥५॥

मुख्य पुराणें अठरा असती तैसीं आणिक अठारा हीं ।

त्यांमाजी प्रमुख अशीं तीन पुराणें कथूं सविस्तर हीं ॥६॥

गणेश, नारद आणिक तिसरें आहे पुराण नृसिंह ।

त्यांतिल गणेश नामक, श्रेष्ठ असे ऐकतां बहू मोह ॥७॥

(दिंडी)

वेद तुंडहि वर्णितां बहू श्रांत । परी वर्णन हें पूर्ण नसे होत ।

असे अनुपमही मूर्ति गणेशाची । कथा कथितों मी ऐकणें तयाची ॥८॥

नसे कोणीही वर्णिता जगामाजी । स्वरुप ऐसें हें विश्ववंद्य राजा ।

पूर्ण भावानें भक्ति करी जो तो । म्हणुनि त्यालाची सगुण रुप होतो ॥९॥

करित वर्णन हें सारभूत त्याचें । कथित मुनिंसी सूत मुदित वाचे ।

जया आज्ञेनें वर्तती तीन देव । तयां देवांसी वागवि सदैव ॥१०॥

सृष्टिरचना ही करी ब्रह्मदेव । सृष्टिपालन तें करी विष्णुदेव ।

सृष्टि संहारी सांब सदाशीव । देइ शक्ती ही गणाधीश देव ॥११॥

जया आज्ञेनें पंच-महा-भूतें । कार्य करिती जें नेमिलें असें तें ।

योग्य वेळीं हीं नेमपूर्व ऐशीं । सृष्टिसेवा ही करिति पहा कैशी ॥१२॥

(पृथ्वी)

विधी प्रथम हें कथी चरित तेंचि व्यासांप्रती ।

तसेंच भृगुला कथी सकल व्यास तें मागुती ॥

भृगू कथिति तें पुढें कथन सोमकांताप्रती ॥

पुढें विदित तें करी सकल भूपलोकांप्रती ॥१३॥

(गीति)

श्रीमद्गणेश ऐसें, नाम पुराणाख्य हें तुम्हां सांगे ।

ऐसें सूत वदे त्यां, श्रवण करा चित्त ठेवुनी जागें ॥१४॥

पूर्वी देशामाजी, प्रमुख असे देश एक सौराष्ट्र ।

त्यामध्यें नगर असे, देवनगर नाम हें बहु श्रेष्ठ ॥१५॥

तत्त्वज्ञानी मोठा, होता तो धर्मनिष्ठ भूप असा ।

नाम जयाचें आहे, ऐका हो सोमकांत सोम असा ॥१६॥

हत्ती हजार दशनी, तैसे वाजी हजार वीस मिती ।

संख्या हजार षष्ठ हि, असती रथनी असंख्य पादांतीं ॥१७॥

स्वारीचा थाट असा,निघतां नगरामधून बाहेरी ।

रजनीनाथ जसा हा, तार्‍यांसह भासतो नभीं हेरी ॥१८॥

(शार्दूलविक्रीडित)

बुद्धीनें गुरुला, धनें ध्रुवपती तैसा क्षमेनें धरा ।

गांभीर्यें जलधी, तसा रविशशी जिंकीच तेजें पुरा ॥

ऐसा जो नृपती,बहू गुण-निधी वर्णावया योग्य तो ।

सांगे सुत ऋषींस हें, कथन पैं ऐके मुनी-वृंद तो ॥१९॥

(गीति)

विद्याधीश सुबल हे, क्षेमंकर ज्ञान गम्य रुपवान ।

पंचप्राणांसम हे, सायासी करिति साह्य बलवान ॥२०॥

पंच प्रधान असती, राज्यामाजी सदैव ते दक्ष ।

बुद्धीनें,शौर्यानें, राज्यावर सर्वदा असे लक्ष ॥२१॥

त्या रायाची कांता सुरुप, साध्वी, पतिव्रता सत्य ।

नाम सुधर्मा ऐसें, धर्मानें वागणें असे नित्य ॥२२॥

(दिंडी)

रुप पाहुन तें अप्सरा लाजतील । गूण पाहुन हे योषिता तोषतील ।

पती दैवत हें हेंच असे जीला । ईशपूजन हें रुचत असे जीला ॥२३॥

अतिथिसत्कारा दक्ष असे साची । पट्टराणी ही योग्य भूपतीची ।

पुत्र त्यांचा तो हेमकंठ नामें । जनकजननीला आवडे बहू प्रेमें ॥२४॥

अयुत कुंजर इव शक्ति असे त्याची । बुद्धिमत्ता नी चतुरतायुक्त साची ।

पुत्र, पत्‍नी नी कुशल मंत्रीसंगें । जगीं भूपति तो राज्य करी अंगें ॥२५॥

(गीति)

सर्वांगांनीं सुंदर, राजा करि राज्य फार आनंदें ।

सर्व प्रजाहि त्याचें, कीर्तिस्तव करुनि गाति सानंदें ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP