मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय २१

उपासना खंड - अध्याय २१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

विश्वामित्र कथी जें, भीमाला भीम कथन कथिलें तें ।

व्यासाला विधि कथितो, तें भृगु कथि हेमकंठ ताता तें ॥१॥

दक्षास ध्यास लागे, विसरे वसनास भानही नाहीं ।

तैसाच निघे विपिनीं भटके माता तयासवें तीही ॥२॥

जे जे भेटति त्यांना, दक्ष पुसे होतसे तयां लीन ।

दावा मला विनायक ध्यासें भटके बहूतसा विपिन ॥३॥

दैवगति ती उत्तम, अवचित आले समोर त्या मुनिचे ।

आश्रम पाहुन दक्षें, पुशिलें वृत्तास तेथिलें वाचें ॥४॥

येथें मुद्गल आहे, ऐकुन झाला तयास आनंद ।

कमला सद्गद झाली, दक्षाला लाधलाच स्वानंद ॥५॥

असनीं बसून मुद्गल, पूजित होते विनायका पूर्ण ।

साष्टांग प्रणिपाता करुन कथी आपुली कथा पूर्ण ॥६॥

(कामदा)

मुद्गलासि तो दक्ष बोलिला । आंग वायूनें देह चांगला ।

दर्शनासि या आस लागली । दे दयानिधे बुद्धि चांगली ॥७॥

भेटले मला श्रीगजानन । भक्ति दे मला हेंचि साधन ।

देव ते मला सांगती असें । जाइं रे त्वरें भक्त जो असे ॥८॥

पातलों इथें सांगण्यापरी । शांति ही इथें लाभली खरी ।

तूंच बा असे श्रीगजानन । जाहलें असे साच हें मन ॥९॥

सोमकांत या दक्ष भाषणा । ऐक भूपते ब्रीद रक्षणा ।

मुद्गलासही मोद जाहला । ऐक राजसा श्रेष्ठ तूं मला ॥१०॥

दर्शनीं तुला दीधलें असे । पाप बा तुझें सर्व नाशिलें ।

जाणतोंच मी भीमनंदना । धन्य होसि रे वीरकंदना ॥११॥

(शिखरिणी)

तपश्चर्या केली बहुत वरुषें ईशचरणी ।

नसे दक्षा साची मजवरि कृपा ईशकरणी ॥

नसे वेदांलाही कळत पुरता अंतहि खरें ।

अशा या देवानें तुजसि दिधलें दर्शन बरें ॥१२॥

म्हणोनी दक्षा हे मजपरिस तूं वंद्य अससी ।

मला देईं भेटी कवळित करां दक्ष तनुसी ॥

पुन्हा त्या दक्षासी सतत जपण्या मंत्र दिधला ।

महामंत्राचा तूं जप करित जा नित्य विधिला ॥१३॥

अनुष्ठानें होती सकल मनसा पूर्ण विजयी ।

अनुष्ठानें दक्षा त्यजसि विमुखीं भक्तिविषयीं ॥

जरी अश्रद्धाही धरिसि तरि तूं घातक खरा ।

नको दोहोंमध्यें विपट करुं तूं साधक बरा ॥१४॥

(गीति)

ऐसें वर्तन करितां, इंद्रादिक हे करुन वक्र असे ।

अवलोकिती न किमपी, मुद्गल कमलासुतास बोधितसे ॥१५॥

विश्वामित्र कथी हें, कथन करी चारुहासिनी भीम ।

त्यांचे पूर्वज होते, नामें कमला तिचा पती भीम ॥१६॥

व्यासास विधी यानें, कथिला वृत्तान्त भीम भूपतिचा ।

गणेशमंत्रामाजी, अष्टाक्षरि मंत्र मुख्य हा साचा ॥१७॥

केवळ मंत्र जपाचा, महिमा वर्णावयास हीच कथा ।

च्यवनाच्या तातांनीं, कथिली कीं सोमकांत यास कथा ॥१८॥

पूर्वी यज्ञामाजी, सुतांनीं शौनकादि सकलांतें ।

मनरंजनार्थ कथिली, भूपति जो सोमकांत कथनातें ॥१९॥

गणेशपुराण सारें भृगुनीं कथिलें नृपास उद्धारा ।

त्याच्या अनुवादी हें, योजियलें कार्य रंजन द्वारा ॥२०॥

आतां मयूरसूतें, प्राकृत भाषें करुन कवनाला ।

एकाधिकवीस अशा, दूर्वांनीं हा गणेश पूजियला ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP