स्कंध ९ वा - अध्याय १९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१३९
बहु यागपुण्यें पश्चात्तापदग्ध । ययाति कांतेस पुढती वदे ॥१॥
प्रिये, देवयानी कामातुर जन । पाहूनि सन्मन दु:खी होई ॥२॥
विषयांध एक होऊनियां अज । हिंडतां वनांत कूपामाजी ॥३॥
पाही एक अजा पतन पावली । दैवयोगें झाली शिक्षा तिज ॥४॥
इष्टवस्तु परी पाहूनियां अज । होई आनंदित मनामाजी ॥५॥
वासुदेव म्हणे कामपूर्तीस्तव । योजी बहु मार्ग मूढ नर ॥६॥

१४०
मृत्तिका शृंगांनीं पाडिली अजानें । अजेप्रति तेणें मार्ग होई ॥१॥
बाहेरी ते तदा येऊनि अजासी । म्हणे माझा पति तूंच होईं ॥२॥
संतोषोनि तिज देऊनि रुकार । अजेचा स्वीकार करी अज ॥३॥
पुष्ट तो मिशाही कल्लेदार त्याच्या । भोगनिपुणता बहु त्याची-॥४॥
पाहूनि बहुत अजा लुब्ध होती । वरुनि सेविती विषय बहु ॥५॥
वासुदेव म्हणे गुंग ऐसा अज । जाहला विन्मुख कर्तव्यासी ॥६॥

१४१
प्रिये, कृपमुक्त अजेसम एका । अजेवरी अजा प्रेम बहु ॥१॥
परी तें तियेसी रुचलें न मनीं । कपटी ते मानी अजाप्रति ॥२॥
त्यागूनि तयासी जावया ते सिद्ध । पाहूनियां अज बें बें करी ॥३॥
परी तिरस्कार करुनियां अजा । आश्रय धन्याचा करीतसे ॥४॥
विप्र एक होता धनी त्या अजेचा । ऐकूनि वृत्तान्ता क्रुद्ध होई ॥५॥
वृषण अजाचा छेदिला तयानें । अजही त्यायोगें दु:खी होई ॥६॥
वासुदेव म्हणे पुनरपि विप्र । अजासी समर्थ करीतसे ॥७॥

१४२
प्रिये, देवयानी, तदाप्रभृति तो । विषयांध अज विषयीं रमे ॥१॥
अये, अजासम तैसी माझी स्थिति । मोहित मी चित्तीं त्वद्रूपानें ॥२॥
परमार्थबुद्धि तेणें न सुचेचि । भोगूनि न तृप्ति विषयांधाची ॥३॥
वारंवार भोग सहस्त्र वर्षेही । भोगूनियां तृप्ति शक्य नसे ॥४॥
घृतें जेंवी अग्नि अधिकचि पेटे । तैसी अवस्था हें ध्यानीं घेई ॥५॥
राग-द्वेषशून्य सर्वत्र जो सम । नित्य सौख्य जाण तयासीच ॥६॥
विरुद्ध मनाच्या घडेल तैं दु:ख । समत्वें प्रसंग कदा न तो ॥७॥
वासुदेव म्हणे सुखेच्छाचि जरी । विषय हे तरी त्यजणें योग्य ॥८॥

१४३
पूर्तता न येई वासनांसी कदा । वार्धक्यही येतां सेवितां ते ॥१॥
वय मात्र जाई संपूनियां परी । कदा न अंतरीं समाधान ॥२॥
यास्तव विवेकें त्यागाची वासना । अविवेकी जनां अशक्य हें ॥३॥
सर्व विषयांत ललना घातकी । जनां यास्तवचि शास्त्र कथी ॥४॥
माता भगिनीही एकासनीं वर्ज्य । मोह मानवास रुपें, स्पर्शे ॥५॥
वासुदेव म्हणे कामिनी ते अन्य । मग मोहवी न कां नरासी ॥६॥

१४४
मोहकता स्त्रीची मनांत भरेल । परमार्थ रुचेल कैसा मग ॥१॥
आजवरी बहु भोगिले विषय । परी निर्विषय झालों नाहीं ॥२॥
ऐशा मार्गे तृप्ति अशक्य जाणूनि । विषय त्यागूनि देतों आतां ॥३॥
आजपासूनीच वनांत संचार । करीन साचार मृगासम ॥४॥
दुर्घट विषयत्याग मग केंवी । ब्रह्मबुद्धि व्हावी म्हणसी स्थिर ॥५॥
परी निवेदितों ऐक आतां तुज । कथी वासुदेव पुढती ऐका ॥६॥

१४५
विषयभोगेच्छा जन्मासी कारण । भोगें जरा जन्म-मरण नरा ॥१॥
अपूर्ण वासना बहु फंसविती । पुनर्जन्मप्राप्ति तेणें घडे ॥२॥
यास्तव विषय इहपर तुच्छ । विषयेच्छा मूळ संसारासी ॥३॥
भोगितां हे भोग गेलों मी थकून । लाभ कांहींचि न पदरीं येणें ॥४॥
वासुदेव म्हणे विषयांचा त्याग । ययाति कांतेस केला म्हणे ॥५॥

१४६
देवयानीप्रति कथूनि यापरी । उपदेश करी परमार्थाचा ॥१॥
पुढती पुरुसी अर्पिलें तारुण्य । होई जराजीर्ण देहधारी ॥२॥
आग्नेय दिशेचें राज्य दुह्यूप्रति । तेंवी तें यदूसी दक्षिणेचें ॥३॥
तुर्वसूसी देई पश्चिमेचें राज्य । अनु उत्तरेस योजियेला ॥४॥
सार्वभौम केले लाडक्या पुरूसी । खाण सद्‍गुणांची पुरु होता ॥५॥
पक्षी जैं फुटतां पंख, नीड त्यागी । तसाचि ययाति वनीं जाई ॥६॥
क्षणामाजी सर्व त्यागूनि विषय । जाहला एकाग्र राजश्रेष्ठ ॥७॥
वासुदेव म्हणे वासुदेवरुप । पावला तो श्रेष्ठ भक्तराज ॥८॥

१४७
निवेदिती शुक राया, परीक्षिता । ऐकूनि त्या बोधा देवयानी ॥१॥
चिंतूनि मानसीं मीही म्हणे मूढ । जन्मभरी दंग विषयीं झालें ॥२॥
ईशपराड्मुख होऊनियां हाय । व्यर्थ व्यर्थ वय घालविलें ॥३॥
चिंतूनि यापरी ईशसेवारत । होऊनि कृतार्थ जाहली ते ॥४॥
षडगुणैर्श्वर्य त्या संपन्न हरीसी । बोलूनि वंदिती शुकदेव ॥५॥
वासुदेव म्हणे शुकांचें वैराग्य । होई जरी प्राप्त भाग्य मोठें ॥६॥

अभंग-भागवत सप्ताहाचा तिसरा दिवस समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP