स्कंध ९ वा - अध्याय १८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१२७
यति, ययाति तैं संयाति, आयति । वियति आणि कृति नहुषपुत्र ॥१॥
विरागेंचि यति स्वीकारी न राज्य । ययाति यास्तव राज्य करी ॥२॥
सहाय्य बंधूंचें होतें तयाप्रति । देवयानी त्यांची कांता होई ॥३॥
वृषपर्व्याचीही कन्या ते शर्मिष्ठा । लोभ धरी मोठा नृपावरी ॥४॥
ईशेच्छेनें शुक्रकन्या देवयानी । ययातीची राणी आश्चर्य हें ॥५॥
वासुदेव म्हणे दुराग्रह हट्ट । नव्हताचि तेथ दुष्टहेतु ॥६॥

१२८
दानवाधिपति वृषपर्वाकन्या । एका उपवना गेली होती ॥१॥
उपाध्यायकन्या देवयानी तदा । सन्निध तियेच्या सहज होती ॥२॥
हिंडता हिंडतां सरोवरतीरीं । येतांचि इच्छिली जलक्रीडा ॥३॥
वस्त्रहीन तदा उतरल्या जळीं । क्रीडा आरंभिली बहु तेथें ॥४॥
ऐसा काहीं काळ लोटतां सहज । पार्वतीसमेत दिसती शिव ॥५॥
नंदिवाहनासी पाहूनि लाजल्या । गवसे तें ल्याल्या वस्त्र वेगें ॥६॥
वासुदेव म्हणे घाई घाई ऐसी । होई कलहासी मूळ कदा ॥७॥

१२९
देवयानीवस्त्र नेसली शर्मिष्ठा । तोचि कलहाचा विषय होई ॥१॥
अपमान तेणें मानी देवयानी । हविर्द्रव्य श्वानी हरी म्हणे ॥२॥
पुनरपि बोले पावूनियां क्रोधा । विप्रांची योग्यता जाणसी न ॥३॥
साक्षात्‍ लक्ष्मीकांत मानी विप्रांप्रति । वंश विप्रांतही भृगुचा श्रेष्ठ ॥४॥
वृषपर्वा तोही शिष्य भार्गवाचा । उपमर्द माझा केलासी त्वां ॥५॥
वेदोच्चार शूद्रें करावा त्यापरी । वर्तलीस तरी कैसी सांगें ॥६॥
वासुदेव म्हणे अभिमानसर्प । डिवचितां क्रोध सकलां येई ॥७॥

१३०
लत्ताप्रहारित सर्पिणीसमान । बोलली वचन शर्मिष्ठा तैं ॥१॥
भिक्षुकाचे पोरी, अये भिकारडे । द्वारांत आमुचे तिष्ठसी तूं ॥२॥
अन्नास्तव काकासम काव काव । करुनियां हांव धरिसी मनीं ॥३॥
मग कासयासी व्यर्थ हे प्रतिष्ठा । मर्मभेदी शब्दां वदली ऐशा ॥४॥
गुरुकन्या हें न राहियेलें भान । उन्मत्त वर्तन शर्मिष्ठेचें ॥५॥
वासुदेव म्हणे क्रोधधुंद नर । अज्ञानें अघोर कर्म करी ॥६॥

१३१
ऐश्वर्यमदानें धुंद ती शर्मिष्ठा । करी घोरकृत्या ऐका काय ॥१॥
लज्जारक्षणार्थ गुंडाळिलें होतें । वस्त्र जें तियेचें गुरुकन्येनें ॥२॥
फरफरां क्रोधें नि:शंक ओढून । करीतसे नग्न गुरुकन्येसी ॥३॥
इतुकें करुनि न राही शर्मिष्ठा । लोटी तिज एका कूपामाजी ॥४॥
क्रूरता त्याहूनि ऐकावी तियेची । निघूनि गृहासी जाई सौख्यें ॥५॥
वासुदेव म्हणे विकार ते हीन । लुप्त होती गुण विकारांनीं ॥६॥

१३२
देवयानी कूपामाजी । असतां त्या स्थळीं ययाति ॥१॥
मृगयानिमित्तें हिंडतां । पाही तियेची अवस्था ॥२॥
कूपीं शेला फेंकीयेला । वरी काढिलें तियेला ॥३॥
जेणें संकटांत कर - । धरिला, तोचि मानी वर ॥४॥
म्हणे राया, तूंचि आतां । होईं स्वामी या देहाचा ॥५॥
मज घेईं पदरांत । मानीं ईश्वरीसंकेत ॥६॥
कचाचाही शाप ऐसा । मज लाभ न विप्राचा ॥७॥
वासुदेव म्हणे कन्या । योग जाणें हा सुजाणा ॥८॥

१३३
अधार्मिक राव नव्हता ययाति । चिंतूनियां चित्तीं योग ऐसें ॥१॥
तथास्तु म्हणूनि गेला नगरास । पातली गृहास देवयानी ॥२॥
ऐकूनि तें वृत्त शुक्र होती खिन्न । स्वीकारावें वन योजिलें हें ॥३॥
वृषपर्व्याप्रति कळतां हें सर्व । विघ्नचि हें थोर म्हणे झालें ॥४॥
अनुकूल शुक्र देवांप्रति होतां । निश्चयें दैत्यांचा नाश म्हणे ॥५॥
वासुदेव म्हणे वृषपर्वा ऐसें । चिंतूनि मुनीतें अडवी मार्गी ॥६॥

१३४
सत्वरी मुनींचे धरितांचि पाय । विप्र तो सदय द्रवला मनीं ॥१॥
शरण पातला शिष्य हें पाहूनि । क्रोध आंवरुनि वरिली शांती ॥२॥
लाडल्या कन्येचें पाळावें वचन । करी हेतु पूर्ण म्हणती गुरु ॥३॥
तत्काळ तें मान्य करी दैत्यराज । म्हणे मुनि, कन्येस कथीं हेतु ॥४॥
देवयानी म्हणे सख्यांसवें दासी । व्हावी शर्मिष्ठा ही इच्छा मम ॥५॥
पिता मजलागीं देईल ज्या स्थानीं । तेथें ती येऊनि सेवो मज ॥६॥
वासुदेव म्हणे मानूनि तें सर्व । होऊनि निर्भय सदनीं येई ॥७॥

१३५
शर्मिष्ठेसी राव आपत्ती कथून । म्हणे हें वचन पाळीं माझें ॥१॥
विघ्न तें पित्याचें जाणूनि शर्मिष्ठा । विवेकें मान्यता देई तया ॥२॥
पित्यास्तव क्लेश सोसाया ती सिद्ध । होऊनि जगांत धन्य झाली ॥३॥
पुढती शुक्रांनीं देवयानीप्रति । ययाति नृपासी अर्पियेली ॥४॥
दासीही तियेची जाहली शर्मिष्ठा । अपूर्व विधीचा खेळ परी ॥५॥
शर्मिष्ठेसी कदा मंचकीं न घ्यावें । निक्षूनि कथिलें कविनें तदा ॥६॥
वासुदेव म्हणे यदु तैं तुर्वसु । जाहले हे नातु शुक्राचार्यां ॥७॥

१३६
ऋतुस्नात होती शर्मिष्ठा एकदां । देवयानीपुत्रां अवलोकी तैं ॥१॥
आपणाप्रतीही सौख्य लाभो ऐसें । चिंतूनि रायातें प्रार्थी तेंवी ॥२॥
चिंतूनियां धर्म मानी तें ययाति । अद्यपि शुक्रोक्ति ध्यानीं होती ॥३॥
द्रुह्यु, अनु, पूरु, पुत्र शर्मिष्ठेचे । देवयानी कोपे कळतां वृत्त ॥४॥
विनवितांही ते होऊनि न शांत । पितृसदनास निघूनि जाई ॥५॥
वासुदेव म्हणे वृत्त तें ऐकूनि । पाचारिती मुनि ययातीसी ॥६॥

१३७
आज्ञाभंगदोषें शापिलें तयासी । ‘जराग्रस्त होसी’ स्त्रीलंपटा ॥१॥
ऐकूनि ययाति म्हणे मुनिश्रेष्ठा । अद्यापि न माझा काम शांत ॥२॥
तदा मुनिश्रेष्ठ सदय होऊन । उ:शाप देऊन वदती तया ॥३॥
घेऊनियां जरा तारुण्य अर्पितां । हेतु पूर्ण तुझा नृपा होवो ॥४॥
पुढती ययाती सकल पुत्रांसी । मागे तारुण्यासी परि, न लाभे ॥५॥
शर्मिष्ठेचा पुत्र पूरु जो कनिष्ठ । ययातीचें चित्त शांत करी ॥६॥
वासुदेव म्हणे पित्यास्तव दैन्य । स्वीकारुन धन्य पूरु होई ॥७॥

१३८
पित्याचाही देह जाणूनि पित्यासी । पूरु प्रेमें अर्पी निजयौवन ॥१॥
यथेच्छ विषय भोगी तैं ययाति । सांभाळूनि क्षिति अत्यानंदें ॥२॥
यज्ञही बहुत करुनि तयानें । भावें आराधिलें भगवंतासी ॥३॥
बहुकाळ ऐसा राहिला सुखानें । परी न इंद्रियें तृप्त होती ॥४॥
जैसे जैसे जनीं सेवावे विषय । तैसी तैसी हांव वाढे त्यांची ॥५॥
वासुदेव म्हणे इंद्रियांचें सौख्य । नित्य अशाश्वत समजे ज्ञाता ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP