स्कंध ९ वा - अध्याय १३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


९०
निवेदिती शुक राया परीक्षिता । निमि इक्ष्वाकूचा पुत्र एक ॥१॥
संकल्पूनि तेणें यज्ञ, वसिष्ठांसी । पौरोहित्याप्रति आमंत्रिलें ॥२॥
तयांलागीं परी पूर्वीच इंद्रानें । होतें आमंत्रिलें यज्ञास्तव ॥३॥
यास्तव निमीनें वंदितां वसिष्ठ । म्हणती प्रतीक्षस्व कांहीं काळ ॥४॥
कथूनियां मुनि गेले इंद्रलोकीं । चित्तीं निमि चिंती विवेकानें ॥५॥
क्षणभंगुर या संसारीं जीवाचा । नसे भरवंसा क्षणही एक ॥६॥
यास्तव सत्कर्मां न घडो विलंब । म्हणे सत्य सत्य वासुदेव ॥७॥

९१
चिंतूनियां अन्य ऋत्विजांकरवीं । सत्रासी आरंभी निमिराजा ॥१॥
कांहीं काळ जातां वसिष्ठ पातले । कृत्य ते मानिलें अवमानाचें ॥२॥
ज्ञानगर्व यातें मानूनि वसिष्ठ । देती तया शाप ‘पडो देह’ ॥३॥
ऐकूनियां द्रव्यलोभ हा मानूनि । शाप तोचि निमि देई तयां ॥४॥
निमिशापें मुनि उर्वशीच्या ठाईं । अगस्ति ते, पाहीं मित्रावरुणीं ॥५॥
वासुदेव म्हणे तैलामाजी निभि । ठेविला रक्षूनि सत्रामाजी ॥६॥

९२
सत्रान्तीं इंद्रादि देव येतां मुनि । बोलले त्यांलागूनि उठवा यातें ॥१॥
निमीचा तैं सूक्ष्म देह इंद्रादिकां । प्रार्थी जडदेहा इच्छीं न मी ॥२॥
दु:खदाई देह इच्छिती न ज्ञाते । संबंध देहातें न घडो माझा ॥३॥
ऐकूनि तें देव बोलले मुनींसी । राजा विदेहीचि राहूं इच्छी ॥४॥
परी तो जनांच्या नेत्रांत वसेल । हेतु साधतील उभयांचेही ॥५॥
बोलतां यापरी जाहलें तैसेंचि । उघडी आणि झांकी निमि नेत्र ॥६॥
वासुदेव म्हणे निमि नेत्रांमाजी । राहिला, न त्यसी परी देह ॥७॥

९३
अराजकभय वाटूनियां मुनि । रमले मंथनीं निमिदेहाच्या ॥१॥
मातेवीण तदा जाहला तो पुत्र । नाम त्या ‘जनक’ ठेवियेलें ॥२॥
विदेही निमीच्या पुत्रत्वें ‘वैदेही’ । संज्ञा तया येई जनामांजी ॥३॥
मंथनें ‘मिथिल’ अन्य संज्ञा तया । निर्मिली मिथिला नगरीं तेणें ॥४॥
उदावसु नामें पुत्र मिथिलासी । नंदिवर्धनासी सुकेतु तो ॥५॥
देवरात, बृहद्रथ, महावीर्य । सुधृतीचा पुत्र धृष्टकेतु ॥६॥
हर्यक्षाचा मरु, प्रतीपक त्याचा । पुढती कृतिरथा देवमीढ ॥७॥
वासुदेव म्हणे विसृत, महाधृति । कृतिरात पुढती महारोमा ॥८॥

९४
स्वर्णरोमा, र्‍हस्वरोमा, सीरध्वज । नांगरितां त्यास गवसे सीता ॥१॥
कुशध्वज, धर्मध्वज, कृतध्वज । पुढती केशिध्वज, भानुमान्‍ ॥२॥
शतद्युम्न, शुचि तया सनद्वाज । ऊर्ध्वकेतु त्यास पुढती अज ॥३॥
पुरुजित्‍, अरिष्टनेमि तो श्रुतायु । वंश ऐसा बहु विस्तारला ॥४॥
सुपार्श्वक, चित्ररथ, तैं क्षेमर्धि । समरथ होई पुत्र तया ॥५॥
सत्यरथ, उपगुरु, उपगुप्त । तया वस्वनंत, युयुध त्यासी ॥६॥
सुभाषण, श्रुत, जय, त्या विजय । ऋत तया होय शुनक त्यातें ॥७॥
वीतहव्य, धृति, बहुलाश्व, कृति । पुढती महावशी, परीक्षिते ॥८॥
वासुदेव म्हणे याज्ञवल्क्यादींचे । शिष्य महाज्ञाते नृपाळा, हे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP