अध्याय ९० वा - श्लोक ६६ ते ७०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एतां वक्ष्यत्यसौ सूत ऋषिभ्यो नैभिषालये । दीर्घसत्रे कुरुश्रेष्ठ सम्पृष्टः शौनकादिभिः ॥६६॥

ऐसें परीक्षितीतें शुक । बोलिला अन्वयें सम्यक । तंव सूत देखिला सम्मुख । होता ऐकत भागवत ॥६३॥
तयाकडे दावूनि बोट । म्हणे सूत हा भो कुरुश्रेष्ठ । पुढें नैमिषारण्यीं प्रकट । सांगेल प्रेष्ठ मुनिवरां ॥६४॥
दीर्घसत्रोद्यमें ऋषि । शौनकादिक तपोराशि । राहते होतील नैमिषीं । कलिदोषांसि निवारणा ॥७६५॥
तेथें या पुसतील मोक्षोपाय । कळिकाळभीरु मुनिवर्य । तत्प्रश्नास्तव यथान्वय । परमसदय होत्साता ॥६६॥
हा ये भागवती संहितेतें । तये दीर्घसत्रीं स्वस्थचित्तें । मुनीकारणें कथील निरुतें । देखोनियां ते आर्त्तभूत ॥६७॥
इतुके न हा अध्याय चौथा । द्वादशस्कंधींचा सर्वथा । समाप्ति पावला तत्वता । अग्रवृत्तान्ता अवधारीं ॥६८॥
पारमार्थिक जें कथनीय । तें सर्व कथिलें यथान्वय । तथापि दृढीकरणा प्रत्यय । सारांश अभय नृपा कथी ॥६९॥

त्वं तु राजन्मरिष्येति पशुबुद्धिमिमां जहि । न जातः प्रागभूतोऽद्य देहवत्त्बं न नङ्क्ष्यसि ॥६७॥

शुक म्हणे राया परीक्षिति । तूं हे निःशेष टाकीं पशुमति । ते कैसी पुससी जरि मजप्रति । तरी यथानिगुती अवधारीं ॥७७०॥
तक्षकदंशें करूनि आतां । मी मृत्यु पावेन सर्वथा । हेचि पशुबुद्धि तत्वता । मौर्ख्यें मूढता प्रत्यक्ष ॥७१॥
नव्हे जो आत्मज्ञ अज्ञान । तो नर होत्साता पशुसमान । मी जन्मलों आहें मरेन । हें मानी आपण देहत्वें ॥७२॥
ऐसी पशुबुद्धि केवळ । तूं संपूर्ण टाकीं समूळ । नाशोत्पत्ति देहा निखळ । आत्मा निश्चळ शाश्वत ॥७३॥
तूं देह नव्हसी देहसाक्षी । अलिप्त दैहिकविकारपक्षीं । तत्त्वमस्यादि वाक्यलक्षीं । तूं अविनाशी परब्रह्म ॥७४॥
देह पूर्वीं नसतां आतां झाला । नाश पावे निश्चयें वहिला । तैसा नव्हसी तूं सन्मयशीळा । चैतन्य सगळा तत्साक्षी ॥७७५॥
तूं देह नसतां वर्ततां जातां । सन्मात्रत्वें स्वयें पुरता । अनाद्यनंत तत्वता । उत्पत्तिनाशताविरहित ॥७६॥
अविद्यायोगें अज्ञानत्वें । त्वां देह मी भावूनि सत्यत्वें । अनेक देह धरिले दैवें । भोगगौरवें भ्रमूनी ॥७७॥
तो तूं देह नव्हसी देहधारी । परि अज्ञानत्वें जीवविकारीं । प्रविष्ठ जालासि निर्द्धारीं । तो भ्रम अव्हेरीं स्वबोधें ॥७८॥
सच्चिदानंद स्वयंबोध । शुद्ध आत्मा तूं एवंविध । आपणा जाणूनि भ्रमविरुद्ध । साडीं निषिद्ध मृत्यूचा ॥७९॥
मग वास्तवबोधें अतःपर । बीजाङ्कुरवत् अन्वयपर । होऊनि नव्हसी देहाकार । पुत्रपौत्रादि स्वरूपें ॥७८०॥
आत्मा पुत्रनाम तूं अससी । शरदःशतं वांच ऐसी । श्रुति प्रतिपादितां कैसी । होय आपैसी निवृत्ति ॥८१॥
ऐसें म्हणसी जरि नृपाळा । तरि देहापासूनि देहमाळा । अन्वीयमान होय सकळां । परि आत्मा वेगळा देहाहून ॥८२॥
यास्तव तूं पुत्रादिरूपें । न जन्मसि बोधानुकल्पें । जेंवि काष्ठीं भिन्न अनळकल्पें । तेंवि तूं देहापें देहातीत ॥८३॥
येच विषयीं उपपत्ति । ऐकें राया परीक्षिति । जैसा निन्दित आपणा प्रति । मृत निश्चिती देखतसे ॥८४॥
स्वप्नीं देहाचा शिरच्छेद । जाहला हें पाहे विध । तस्मात् तो पाहता सिद्ध । आत्मा प्रसिद्ध अजरामर ॥७८५॥
या कारणास्तव नरेशा । देहोपाधिक जीवदशा । भ्रमें तादात्म्य पावूनि सहसा । तज्जन्मनाशा स्वीकारी ॥८६॥
ते आत्मज्ञानें भ्रमनिवृत्ति । जालिया होय सत्प्रतीति । तेव्हां देह निमाल्या स्वयंज्योति । जीव तो स्वस्थिति परब्रह्म ॥८७॥
जैसें घटावच्छिन्न घटाकाश । तें घट भंगल्या महदाकाश । यथापूर्व होय अशेष । तेंवि जीव परेश स्वानुभवें ॥८८॥
म्हणसी जीवासी संसार । प्राप्त कैसेन हा सविकार । तरि देह गुणकर्में समग्र । सृजी विचित्र मानस ॥८९॥
त्या मनातें सृजी माया । मायेस्तव संसृति यया । जीवासि होय ऐसिया । जाण अन्वया अनुक्रमें ॥७९०॥
जेंवि स्नेहाधिष्ठावाती । आणि अग्निसंयोग निगुती । तेव्हां दीपासि दीपत्वप्राप्ति । एवं समूहाकृति भव असिका ॥९१॥
त्रिगुणवृत्तीनें अवग्र । होऊनि नाशतसे साकार । तेथ आत्मा अलिप्त अजस्र । व्यक्ताव्यक्त पर स्वयंज्योति ॥९२॥
स्वसत्ते करूनि गगना परी । आधार सकळां ही सर्वत्रीं । ध्रुव अनंत निर्विकारी । अनुपम निर्द्धारीं ज्ञप्तिमात्र ॥९३॥

एवमात्मानमात्मस्थमात्मनैवामृश प्रभो । बुद्ध्यानुमानगर्भिण्या वासुदेवायनुचिंतया ॥६८॥

ऐसा देहामाजि देहातीत । आपुलें न आपणा निश्चित । सयुक्तबुद्धीनें यथार्थ । विचारीं समर्थ प्रभुवर्या ॥९४॥
देहाद्युपाधींचा जाणता । मी ज्ञप्तिमात्र द्रष्टा तत्वता । तें दृश्य मी नव्हें सर्वथा । एवं जाण आत्मता व्यतिरेकें ॥७९५॥
वासुदेवाच्या अनुचिंतनें । स्वरूप बोधतां पूर्णपणें । अज अव्यय अमृतगुणें । अभयलक्षणें आथिसी ॥९६॥

चोदितो विप्रवाक्येन न त्वां धक्ष्यति तक्षकः । मृत्यवो नोपधक्ष्यन्ति मृग्यूनां मृत्युमीश्वरम् ॥६९॥

तरी ऐसा जो तूं चिन्मयरूप । देहातीत ज्ञानप्रदीप । तया तूतें तक्षक सर्प । न दही प्रेरिला द्विजवाक्यें ॥९७॥
मृत्यूचा हे केवळ मृत्यु । काळात्मा जो ईश्वर सत्यु । त्यातें न जाळिती मृत्यु अनित्यु । की अधिष्ठानभूत तो सर्वां ॥९८॥
नभामाझारी अग्नि जैसा । पावे तया जाळी सहसा । परंतु जाळी विहायसा । घडे हा कैसा प्रकार ॥९९॥

अहं ब्रह्म परन्धाम ब्रह्माहं परमं पदम् । एवं समीक्षन्नात्मानमात्मन्याध्याय निष्कले ॥७०॥

म्हणोनि वास्तवबोधें राया । तूं ऐसें चिन्तिसी आपणया । कीं जो मी अहंपणें ये प्रत्यया । तो मी ब्रह्म परंधाम ॥८००॥
जेथ सर्वांचें अवसान । संकल्पांचें अस्तमान । ज्ञानाज्ञानातीत पूर्ण । मी चिद्घन ज्ञप्तिमात्र ॥१॥
आणि उत्कृष्ट पद जें कथनीय । सर्वाद्यबोधीं वेदनीय । तें आपणाहूने परोक्ष होय । ऐसी सोय न भावीं ॥२॥
श्रुतिस्मृतींहीं वाखाणिलें । ब्रह्मादिऋषींहीं ध्यायिलें । तें ब्रह्म मी निर्वाळलें । अनुभवबळें जाण तूं ॥३॥
घटाकाश महदाकाश । पृथक्सामान्यविशेष । घटाभावीं भिन्नत्व त्यास । कैंचा पैस बोलावया ॥४॥
जीव केवळ शोकाभिभूत । अज्ञानयोगें उपाधिग्रस्त । वास्तव मी ब्रह्म कळता स्वस्थ । शोकनिवृत्त स्वयें होय ॥८०५॥
ब्रह्म मी या साक्षात्कारें । परोक्षत्व निवृत्तिनिर्द्धारें । अपरोक्षप्रत्ययें ब्रह्माकारें । भेदनिवारे निःशेष ॥६॥
ऐसिया विचारें राजेन्द्रा । आपणा पाहूनियां धीरा । निष्कळ परब्रह्मीं पुरा । प्रवेशें बरा निरंतर ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP