अध्याय ९० वा - श्लोक ४६ ते ५०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


शय्यासxxटनालापक्रीडास्नानाशनादिषु । न विदुः सन्तमात्मानं वृष्णयः कृष्णचेतसः ॥४६॥

निरंतर हरिसंगें वर्त्ततां । वृष्णि पावले तन्मयता । नेणवे आपणातें तत्वता । जाहला चित्ता हरिवेध ॥४१५॥
निद्रा करितां शय्येवरी । आसनीं बैसतां निर्द्धारीं । निजलों बैसलों हे स्फूर्ति पुरी । स्पर्शकुसरी विसरले ॥१६॥
त्वगिन्द्रियीं मनोवृत्ति । स्पर्शविषयातें जाणती । ते वृत्ति जाली कृष्णाकृति । ध्यातां पुसती तन्मय ॥१७॥
तैसेंचि फिरणें बोलणें । क्रीडास्थानीं क्रीडा करणें । पान भोजन घेणें देणें । भोग भोगणें नानाविध ॥१८॥
इत्यादि कर्माचिये ठायीं । आपण सर्वदा असतां ही । परि आहों ऐसें सुनिश्चयीं । जाले पाहीं न जाणते ॥१९॥
बोलत असतां मी बोलतों । पहुडलों बैसलों जेवितों । फिरतों क्रीडतों घेतों देतों । विसरले चित्तोपरमें हें ॥४२०॥
कीं कृष्णरूप जयांचीं चित्तें । जालीं केवळ प्रेमोच्छ्रितें । अभेद पावले तन्मयत्वातें । गौणभ्रमातें मूकले ॥२१॥
जैसें जल स्पर्शलें लवण । तें स्वकारणीं होय लीन । तेंवि चित्ता फावल्या आत्मा पूर्ण । घडे उपादान अविकारें ॥२२॥
मग ते योगी अपरोक्षबोधें । सबाह्य भरती ब्रह्मानंदें । तेचि ब्रह्मलीला विनोदें । स्वभक्तछंदें साकार ॥२३॥
तये कृष्णरूपीं स्वकारणीं । वृष्णिगणाची चित्तश्रेणी । तैसी मिळाली अभेदपणीं । नाठवे करणी मायिक ॥२४॥
उगमीं स्थिरावला जो झरा । तो कैं भरितसे केदारा । तेंवि बुद्धि जाली जे कृष्णपरा । श्रवणादिद्वारा न ये ते ॥४२५॥
एवं वृष्णिगणाची स्थिति । जाली कृष्णमयची पुरती । येथ हेतु हाचि गा परीक्षिती । उघड निश्चिती जाणवे ॥२६॥
अलौकिक कृष्णाचें रूप संपन्न । अलौकिक कृष्णाचे सर्व गुण । अलौकिक कृष्णाचें आचरण । स्वकीयरंजन अलौकिक ॥२७॥
अलौकिक कृष्णाचें बोलणें । अलौकिक कृष्णाचें चालणें । अलौकिक कृष्णाचें हांसणें । क्रिया करणें अलौकिक ॥२८॥
अलौकिक कृष्णाचें पाहणें । अलौकिक कृष्णाचें विहरणें । अलौकिक कृष्णाचें क्रीडणें । लीला प्रकटणें अलौकिक ॥२९॥
तेणें यादव जाले विदेहस्थित । कीं सहचरत्वें होते नित्य । यांचा नवलाव न वाटे सत्य । श्रवणें तद्वत जन जाले ॥४३०॥
अद्यापिहि त्रिविध जन । गुणानुवादश्रवणें पूर्ण । वेधूनि होती आनंदघन । ऐसें महिमान अभिनव ॥३१॥
बद्ध विचित्राचरितानुभवें । मुमुक्षु भवघ्नप्रत्ययभावें । मुक्त ब्राह्मीलीलानुभवें । वेधती जीवें सकळिक ॥३२॥
अधिकारी कां अनधिकारी । नाहीं कडसणी कृष्णचरित्रीं । अवचटें येतां वदनीं श्रोत्रीं । कैवल्यनगरीं प्रवेशे ॥३३॥
काय सांगूं बहु नृपाळा । श्रीकृष्णाची अनुपम लीळा । उत्तमोत्तम अवघ्या कळा । वेधजिव्हाळा सर्वांचा ॥३४॥
अद्भुत स्वरूप सौन्दर्यता । अद्भुत लीलानाटकता । अद्भुत नामसंकीर्तनता । जनपावनता अद्भुत ॥४३५॥
सर्वप्रकारें हें सर्वही । श्रीकृष्णाचें अद्भुत पाहीं । या सम अन्य चरित्र नाहीं । देती ग्वाही श्रुति स्मृति ॥३६॥
कृष्णावतारीं अपूर्ण काम । कृष्णीं राहिला अधमोत्तम । हें नायिकिलें कर्णीं विषम । प्रपत सुखदाम सकळांसी ॥३७॥
तीर्थ म्हणिजे प्राप्तिस्थान । पाप क्षाळूनि देतसे पुण्य । तें एकदेशी काळाधीन । अल्प महिमान तयाचें ॥३८॥
कृष्णकीर्ति भलते ठायीं । भलकेव्हाही भलतेणेंही । आठविती भलतीसीही । पावे अक्षयी निजधाम ॥३९॥
व्यभिचार किंवा चौर्यकर्म । बालक्रीडा ते गोपोपम । गोपिकांसीं स्त्रैणासम । क्रीडला उद्दाम तच्छंदें ॥४४०॥
दुष्ट्दैतेयनिबर्हण । शिष्टकौन्तेयपरिवर्धन । इष्टभजनीय प्रतिपालन । कष्टवारण आर्त्ताचें ॥४१॥
किंवा उद्वाह कथानक । आश्रमाचरण निष्टंक । कीं अभिवृद्धि अन्वयात्मक । अथवा सम्यक अवघी ही ॥४२॥
कोण्ही तर्‍ही कोण्ही गावो । सहज अथवा धरूनि भावो । परंतु पावे मोक्षठावो । संसारभेवो विनाशी ॥४३॥
ऐसा सर्वोत्कर्ष इतरांचा । देवां अथवा अवतारांचा । नाहींच निश्चय साचा । प्रत्यय पामुचा बलिष्ठ ॥४४॥
तस्मात् श्रीकृष्णकीर्तीहून । उत्तम न दिसे तीर्थ आन । आणि श्रीकृष्णदेवाहून । उत्तम आन देव नसे ॥४४५॥
कृष्णकीर्तिचि सर्वोत्तम । श्रीकृष्णदेवचि सर्वोत्तम । हेंचि निरूपण सर्वोत्तम । ऐक सर्वोत्तम नृपाळा ॥४६॥

तीर्थं चक्रे नृपोनं यदजनि यदुषु स्वः सरित्पादशौचं विद्विट्स्निग्धाः स्वरूपं ययुरजितपरा श्रीर्यदर्थेन्ययत्नः ।
यन्नामामङ्गलघ्नं श्रुतमथ गदितं यत्कृतो गोत्रधर्मः कृष्णस्यैतन्न चित्रं क्षितिभरहरणं कालचक्रायुधस्य ॥४७॥

पूर्वीं स्वचरणशौचोदका । सरिता गंगाभिधानका । अधिक तीर्थांहूनि अशेखां । केलें तीर्थ कां श्रीधरें ॥४७॥
आतां तरी यदुकुळाच्या ठायीं । जें तीर्थ जालें चित्सौख्यवाही । श्रीकृष्णकीर्तिस्वरूप पाहीं । स्वानंददायी सर्वत्र ॥४८॥
हें पदतीर्थ बहुता गुणें । न्यून करितें उत्कृष्टपणें । जालें ऐसें नृपा जाणें । पावनसुखें करूनियां ॥४९॥
स्वयेंचि सर्व तीर्थांउपरी । शोभे कृष्णकीर्ति त्रिजगत्रीं । सर्वत्र सर्वांतें उद्धरी । रिघोनि अंतरीं प्रियत्वें ॥४५०॥
यास्तव कृष्णकीर्तीचा महिमा । अद्वितीय न सहे उपमा । कीं द्वेष्टे आणि स्नेहाळ समा । स्वरूपधामा पावले ॥५१॥
यशोदा स्नेहाळ माउली । पूतना द्वेषें मारूं आली । सम दोघींतें प्राप्ति झाली । नाहीं केली कडसणी ॥५२॥
गोपिका कामें कृष्ण भजल्या । याज्ञिकी भावें दर्शना आल्या । त्या समत्वें उद्धरिल्या । नाहींच केल्या न्यूनाधिका ॥५३॥
कंस शिशुपाळ विदूरथ । शाल्व पौण्ड्रक काशीनाथ । द्वेषें चिन्तित होते घात । वैरी निश्चित मानूनी ॥५४॥
पाण्डव भीष्मादि सद्भक्त । कृष्णचरणीं सर्वदा निरत । ते हे उभयता समस्त । पावले नित्य तत्सारूप्य ॥४५५॥
एवं अधमोत्तम समग्र । द्वेषें स्नेहें प्रेमें तत्पर । जाले स्त्रिया किंवा नर । कृष्णाकार चिन्मात्र ॥५६॥
तरी हें करणें श्रीकृष्णास । चित्र नोहेचि पैं विशेष । कीं जो परम करुणाधीश । आत्मा अभेद म्हणोनियां ॥५७॥
तैसेंचि हेंही विचित्र नोहे । तें काय म्हणा जरी निश्चयें । तरी अजित परा लक्ष्मी स्वयें । सेवि सद्भावें जयासी ॥५८॥
जे कोण्हीहि न जिंकिली । कधीं कोण्हा न प्राप्त झाली । जीस्तव ब्रह्मादि सुरावळी । यत्नबहळीं निरंतर ॥५९॥
ते सर्वप्रकारें परिपूर्णा । प्राप्त श्रीकृष्णासीच जाणा । कीं स्वानंदबोधें हा योगराणा । तदपेक्षणा न करीच ॥४६०॥
आपणचि जो कल्पद्रुम । तो कैं द्राक्षीचा धरी काम । अमृतोदधि जो निःसीम । तो नदीचा संगम कैं इच्छी ॥६१॥
तेंवि स्वसंविन्मोदें पूर्णकाम । नेच्छी लक्ष्मीसि ऐश्वर्यधाम । ऐसिया कृष्णतेंचि सप्रेम । भजनीयनेम करूनी ॥६२॥
रमा आपुलिया दैवोर्जिता । आश्रयी केवळ सत्यव्रता । हेंहि विचित्र कृष्णीं तत्वता । नाहीं पाहतां कांहींही ॥६३॥
कीं परम मंगळ ज्याचें नाम । अमंगळ नाशूनि दे विश्राम । पापतापादिदुःखविराम । अज्ञानभ्रम दूर करी ॥६४॥
तेंही न होतां अर्थस्मरण । वर्णात्मकचि अतिपावन । उच्चारिलें केलें श्रवण । अमंगळघ्न निश्चयें ॥४६५॥
एवं नामचि ऐकतां स्मरतां । अमंगळ नाशूनि मंगळता । दे आवर्तनमात्रें समस्तां । मा प्रत्यक्ष वेधतां तद्रूपीं ॥६६॥
कवण्या तरी एका योगें । द्वेशें रोषें मोहानुरागें । मानस गुंततां लागवेगें । कैवल्य स्वाङ्गें न दुर्लभ ॥६७॥
हें विशेषणेंचि न लगे राया । सर्व प्रकारें हितोपाया । अवतरे शौरि जगाचिया । ज्याची माया अनकळ हे ॥६८॥
जेंवि निराळें बांधिती माच । कीं उदकावरी सेतु साच । गोत्रधर्म केला विविच्य । प्रकट तैसाच जयानें ॥६९॥
विविध ऋषिवंशांच्या ठायीं । विविधगोत्रोचित धर्म पाहीं । पावावया अपवर्ग निलयीं । जनीं सर्व ही प्रतिपादिला ॥४७०॥
तरीं इत्यादि प्रकारें महिमा । श्रीकृष्णाचा नृपोत्तमा । अद्भुतसामर्थ्य जाणतां । अद्भुतकर्माकर्म ऐसा ॥७१॥
तया कृष्णासी क्षितीचा भार । हरणें हें नोहेचि चित्र । कीं सर्वसंहारक काळचक्र । तें आयुध तीव्र जयाचें ॥७२॥
ज्या नरमेधान्तक्रतुज्ञान । तेणें वैश्वदेव साङ्ग पूर्ण । केला तरी आश्चर्य कोण । कीं शूरें मत्कुण जरी वधिला ॥७३॥
अथवा गरुडें मारिला जंत । कीं सिंहें धरिला वस्त । अनळें जाळीलें तृण निश्चित । तेंवि कृष्णें दैत्य जरी वधिले ॥७४॥
अनंत ब्रह्माण्डांच्या कोडी । सत्तामात्रें घडी मोडी । ते काळचक्राज्ञाहोडीं । वर्ते प्रौढी ज्याचिये ॥४७५॥
तेथ इत्यादिकहें अद्भुत । म्हणणें कायसें सुचरित । यास्तव श्रीकृष्ण एवंभूत । जाण निश्चित सर्वोत्तम ॥७६॥
सर्वपूज्य सर्ववंद्य । सर्व नियंतां सकळैकाद्य । वेदवेदान्तप्रतिपाद्य । विधिहराराध्य परमात्मा ॥७७॥
जगाचिया कल्याणार्थ । अवतार पूर्णत्वें समर्थ । अत्युत्कर्षें जयवान मूर्त । विराजे स्वछंद धर्मवान् ॥७८॥

जयति जननिवासो देवकीजन्मवादो यदुवरपरिषत्स्वैर्दोर्भिरस्यन्नधर्मम् ।
स्थिरचरवृजिनघ्नः सुस्मितश्रीमुखेन व्रजपुरवनितानां वर्द्धयन्कामदेवम् ॥४८॥

वस्तुता केवळ निर्गुण । सर्वव्यापी सनातन । जीवमात्रांचें वसतिस्थान । आश्रय पूर्ण सकळांचा ॥७९॥
अंतर्यामिपणें स्वैर । वसवी सर्वदा तदंतर । ऐसिया ह्मणणें देवकीपुत्र । जन्मला साकार तिजहून ॥४८०॥
हे बोली मात्र ज्या प्रसिद्ध । परंतु वास्तव जो स्वतःसिद्ध । जनानुग्रहार्थ उद्बोध । अयेनिज शुद्ध साकार ॥८१॥
जो यादवनिचयें प्रभुत्वें सेव्य । सभेमाझारी ज्या यदुपुङ्गव । सेवकपणें सेविती सदैव । ईश्वरभाव धरूनियां ॥८२॥
ऐसिया श्रीकृष्णा प्रभुवरासी । ईच्छामात्रें भूभारहरणासी । सामर्थ असतां विशेषीं । लीला बहुसी प्रकटावया ॥८३॥
स्वहस्तें केवळ युद्धप्रसंगें । दुष्टां वधूनियां लागवेगें । अधर्मार्त तें आयुधसंघें । धर्मानुरागें निरसिले ॥८४॥
न होनि अधिकारसापेक्ष । वृन्दावनस्थ तृणलतावृक्ष । श्वापदें पक्षी नरविशेष । स्थिरचर अशेष जे प्राणी ॥४८५॥
तयांचें जन्ममरणदुःख । निरसिता जाला निःशेख । दर्शन स्पर्शनें सम्यक । केले चित्सुखमय सर्व ॥८६॥
तेंविच विलसाचातुर्य नेणा । गोपिका केवळ साधारणा । त्यांचिया कामदेवातें वर्धना । सुस्मितश्रीमुखें पाववित ॥८७॥
तयांच्या जन्मादि दुःखातें । परिहरिलें कृष्णें निरुतें । न्हणाल कामेंचि संसारातें । केंवि पुरतें निरसलें ॥८८॥
तरी हा काम नोहेचि सामान्य । देव ऐसें ज्या विशेषण । जो संसारातें जिंकी पूर्ण । ऐसा सद्गुण ज्यामाजी ॥८९॥
तो भोगद्वारा मोक्षप्रद । व्रजवनितांसि जाला विशद । ऐसिया कामदेवातें मुकुन्द । वर्धित स्वानंदमयकारी ॥४९०॥
जेंवि तृषिता दैवें गंगा । अमृताचीच जोडली पैं गा । ते तृष्णा वाढवीत अंगा । करी अमोघा अमृतची ॥९१॥
तेंवि कृष्णपरमात्मा केवळ । सगुणविग्रही अंबुदनीळ । सकळ सौन्दर्याचें मूळ । ब्रह्म प्राज्जळ साकार ॥९२॥
सहज विचरतां व्रजमंडळीं । कमनीयरूपीं गोपबाळी । वेधल्या प्रत्यय हृदयकमळीं । नसतां समूळीं वास्तव ॥९३॥
न कळत ब्राह्मीकाम । यास्तव कामदेव त्या नाम । त्यातें वाढवीत पुरूषोत्तम । श्रीमुखपद्म दावूनी ॥९४॥
ऐसऐसया प्रसंगीं । स्थिरजनांची संसारधगी । वारूनि विजयोत्कर्पें शार्ङ्गीं । जाला त्रिजगीं विराजित ॥४९५॥
याहूनि पूर्वीं जगत्पाळना । मत्स्यकूर्मादि दैत्यदलना । निमित्तें जे जे अवतार नाना । रमा रमणानें धरिले ॥९६॥
परंतु अंशेंचि प्रभुवर्य । संपादावया निर्ज्जरकार्य । प्रसंगें अवतरला जन आर्य । रक्षणोपायावलंबें ॥९७॥
साधिले तत्कार्यविशेष । तावन्मात्र तच्चरितलेश । कृष्ण तंव पूर्णब्रह्मपरेश । लीलाप्रकाश वैशिष्ट्यें ॥९८॥
मत्स्यें शंखासुरातें वधिलें । कूर्में महीतें पृष्ठीं धरिलें । वराहें हिरण्याक्षा मारिलें । नृसिंहें हरिले तद्वंधु ॥९९॥
वामनें नेला बळि पाताळीं । भार्गवें केली क्षात्रहोळी । राघवें निशाचर मंडळी । पंक्तिमौळीसह वधिली ॥५००॥
इतुकेंचि चरित्य प्रासंगिक । वर्तलें ययाचें निष्टंक । याहूनि कृष्णाचें अलौकिक । अपार सम्यक अद्भुत ॥१॥
वैकुण्ठींहूनि मूर्तिमंत । चतुर्भुजपीताम्बरान्वित । गदाचक्राद्यायुधयुक्त । सूतिकागृहांत प्रकटला ॥२॥
तेथ वसुदेव देवकीसी । कथिलें पूर्विल्या त्रिजन्मासी । त्यां अभय देउनि निश्चयेंसीं । मग तन्मानसीं काय करी ॥३॥
पुढील कथूनियां करणी । तत्काळ वेंठला शिशुपणीं । वसुदेव घेतां बंधनींहूनी । मुक्त तत्क्षणीं जाहला ॥४॥
पुढें चालतां गोकुळोद्देशें । कीलबद्धें द्वारें अशेषें । स्वयेंचि मुक्त जालीं पैसें । रविप्रकाशें कमळवत् ॥५०५॥
अंबुद वर्षतां सूक्ष्म सरी । विस्तीर्ण फणा पसरूनि वरी । शेष अनुगत वारित वारी । प्रकाशकारी जाहला ॥६॥
पुढें यमानुजा पूर्णनीरें । वाहत असतां अत्यंतभरें । द्विभाग जाली वसुदेव त्वरे । नेतां पुढारें श्रीकृष्णा ॥७॥
गोकुळीं प्रवेशतां वसुदेव । महाद्वारादि द्वारें सर्व । मुक्तें केवळ हें अपूर्व । निशीथ भीरव असतां ही ॥८॥
सूतिके यशोदे समीप । ठेवूनियां विधीचा बाप । तत्सुता घेऊनि ससाक्षेप । गेला भूप वसुदेव ॥९॥
एवं आला गेला येथें तेथें । परी कोण न कळे कांहीं तें । पावतां आपुलिया स्नानातें । द्वारें पूर्ववत् लागलीं ॥५१०॥
हे श्रीकृष्णाची अघटित सत्ता । पुढें जन्मोत्सव व्रजीं समस्तां । ऋद्धि सिद्धि मूर्तिमंता । राहिल्या तत्वता गोकुळीं ॥११॥
वृद्धा गाई जाल्या तरुणा । वंध्या पुत्रवती अंगना । मूर्ख लाधले चतुरपणा । अधना धनागम जाले ॥१२॥
हे असो प्रथम दशदिनांत । पूतना विरोचनाची नात । विष प्राशूनि मारिली व्रात्य । पवाडा विस्तृत हा कथिला ॥१३॥
तैसेंच परिवर्तनोत्साहीं । तीं मासांचा शेषशायी । तैं शकट मोडिला पायीं । वाटली नवायी सकळांसी ॥१४॥
षण्मासांचा असतां कृष्ण । गेला तृणावर्त घेऊन । गुरुत्वें पाडिला गगनीहून । पावला मरण तत्काळ तो ॥५१५॥
कौतुकें खेळवितां यशोदा । जृंभणमिसें मुखकुमुदा । विकासूनि ब्रह्माण्डह्रदा । दाविलें वृन्दारकपूज्यें ॥१६॥
रिङ्गणादि स्वक्रीडणें । रुचिर नागर कल भाषणें । समाधिस्थ केले जेणें । तनुमनें पोरां थोरांचीं ॥१७॥
चौर्यकर्मादि कौशल्यलीला । करूनि ठकिल्या गोप - अबळा । यशोदा बांधितां क्रोधशीळा । परि नाकळला तियेसी ॥१८॥
कीं यमलार्जुनप्रपातन । कौबेरांप्रति वरदान । पुन्हा करूनि मृद्भक्षण । दाविलें त्रिभुवन मुखीं माये ॥१९॥
वृन्दावनीं राखितां वत्सें । वत्सासुर पातला द्वेषें । मारियेला तो फिरवून पुसें । कौतुकवशें श्रीकृष्णें ॥५२०॥
तेंविच बकासुर बकरूपें । गिळितां चिरिला तो साटोपें । वत्सां वत्सपां अघरूपसर्पें । गिळिलें कोपें कृष्णाच्या ॥२१॥
ज्याचा भूसंलग्न अधरोष्ठ । ऊर्ध्वोष्ठ मेघसंस्पृष्ट । तद्गळां वाढोनि कंबुकंठ । फोडिलें कपाट दहावें ॥२२॥
निघालें तज्ज्योति तेजःपुञ्ज । सत्यलोकांत फिरूनि सहज । कृष्णींच पावलें सायुज्य । देखिलें चोज ब्रह्मादिकीं ॥२३॥
वत्सां वत्सपां अमृतदृष्टी । पाहूनि पुन्हां जीवविलें मृष्टी । परंतु कांहींच मनःपटीं । स्मयचित्रगोठी नुमटली ॥२४॥
आणि समवयस्कां भीतरी । तत्सम क्रीडता जाला हरी । हे अद्भुत ऐश्वर्याची परी । देखोनि अंतरीं स्मित ब्रह्मा ॥५२५॥
परीक्षावया पूर्णैश्चर्य । भूतळीं येऊनि सविस्तर । वत्सां वत्सपां लपविता होय । भोजनसमय लक्षूनी ॥२६॥
हें ज्ञानें जाणोनि कृष्ण । सर्व रूपें जाहला आपण । वत्सवत्सपरूपें नटून । वत्सर पूर्ण विहरला ॥२७॥
परंतु कोण्हा नकळे वर्म । गोगोवळां दिधलें शर्म । व्हावया विधीचा गर्वोपशम । विजयोगधाम उघडिलें ॥२८॥
तंव वत्सरान्तीं विखनस । लपविल्या वत्सां वत्सपांस । कैसा वर्तला कृष्ण परेश । हें पहावयास पातला ॥२९॥
तंव वत्सां वत्सपां पूर्ववत । देखिलें संपूर्ण सालंकृत । क्रीडती कृष्णेंसीं अद्भुत । देखोनि विस्मित विधाता ॥५३०॥
आपण ठेविलें मायागर्भीं । तें तैसेंचि सुषुप्तिकुंभीं । हे कोठूनि आले तत्सन्निभीं । एवं भ्रमनभीं तो पडिला ॥३१॥
त्याचें करावया भ्रमनिरसन । सर्वरूपें श्रीनारायण । विष्णुव्यक्ति नटला पूर्ण । श्रीवत्सलांछन चतुर्भुज ॥३२॥
प्रति मूर्ति जवळी पृथग्विधि । ससर्वब्रह्माण्डरचनावधि । सुरतत्वगणासह आराधी । देखूनि विधिधी उपरमली ॥३३॥
सवेंचि हा ऐश्वर्ययोग । लोपूनि स्वाङ्गींच अव्यंग । वत्सरूपेंचि रमारंग । ठेला साङ्ग विधीपुढें ॥३४॥
मग तेणें अमोघप्रेमोत्कर्षें । दंडवत प्रणमूनियां शीर्षें । हरिपद सिंचूनि अश्रुवर्षें । स्तविला विशेषें पूर्णत्वें ॥५३५॥
उपक्रोष्टा धेनुकासुर । जंतुमात्रातें क्लेशकर । तालवनीं तो अतिदुर्धर । वधिला समग्र सेनेसह ॥३६॥
कालियडोहीं कबंधपानें । गोगोपाळ पावले मरणें । ते जीववूनि सुधावलोकनें । पुन्हा तत्करुणेस्तव कृष्णें ॥३७॥
काल्यफणारंगणीं नृत्य । करूनि केलें तद्दमनकृत्य । स्तव उरंगींचा ऐकूनियां सत्य । निर्भय जलधींत पाठविला ॥३८॥
ऐसा काढूनियां तो सविष । यमुना केली निर्दोष । तैसा समांचा गोपवेष । पवाडा विशेष प्रकटला ॥३९॥
तये रातींत गोगोपगोपी । श्रमें निद्रित जागृतिलोपीं । असतां दावानळ आटोपी । तो पी प्रतापी श्रीकृष्ण ॥५४०॥
बलरामहस्तें प्रलंबहनन । केलें करितां संक्रीडन । जळतां इषिकावनीं गोगण । सगोप नंदन रक्षिला ॥४१॥
शरत्प्रावृट्क्रीडारोळ । शोभा वृंदावनाची बहळ । लुब्ध वेणुरवें गोमेळ । गोपिका सकळ तन्मय ॥४२॥
कात्यायनीव्रतानीं गोपी । उपहासिल्या अंशुकलोपीं । व्रतसाङ्गता उपहासकल्पीं । करूनि वोपी वरदाना ॥४३॥
पुढें यज्वपत्न्यांचा प्रेमा । तदर्पित भोजनाची गरिमा । हेळिला यज्ञभंगें सुत्रामा । गोवर्द्धननामा प्रशंसिला ॥४४॥
मघवा क्षोभूनि वर्षतां स्वैर । करीं गोवर्द्धनधराधर । धरूनि तळीं व्रज समग्र । रक्षिला विचित्रविंदानें ॥५४५॥
तेणें वासव अतिलज्जित । दुहिणें सुरभि धाडूनि त्वरित । चतुर्दशभुवनराज्याभिषेक । केला समर्थ श्रीकृष्ण ॥४६॥
दिग्पति जाले शरणागत । बल्लव तेणें अतिविस्मित । कीं वरुणें नंद नेला जळांत । तो आणिला श्रान्त स्वजनास्तव ॥४७॥
अद्भुत श्रीकृष्णाची करणी । जाणोनि प्रार्थितां गोपगणीं । वैकुंठ दाविलें तयां नयनीं । जें परेहूनि परतर ॥४८॥
पुढें रासक्रीडा गोपींसह । पाहूनि विधिहरिहर पावले मोह । नभीं दाटले सुरसमूह । स्तब्ध तापापह सऋक्ष ॥४९॥
तये रात्रीचें कवण मान । हें अविदित सर्वथा जाण । शंखचूडाचें निर्बर्हण । उत्तरक्रीडन संपादितां ॥५५०॥
वृषभासुर व्योमासुर । केशिप्रमुख मारिले क्रूर । कंसें प्रेरिला अक्रूर । प्रेमा अपार तयाचा ॥५१॥
तेणें कृष्ण नेतां मथुरेसी । वेध गोपिकांच्या मानसीं । जो दुर्लभ योगियांचा ज्ञानियांसी । अहंममतेसी विसरल्या ॥५२॥
अक्रूर मज्जतां यमुनेंत । त्या स्वरूप दाविलें मूळभूत । केल्या नरनारी स्वरूपस्थित । मथुरापुरस्थ स्वदर्शनें ॥५३॥
धनुष्य भंगूनि विरूप कुब्जा । केली सरळ समान अब्जा । कंसकाया ओढूनि नुब्जा । समल्ल पैजा वधिला तो ॥५४॥
राज्यीं उग्रसेन स्थापिला । क्षुद्रकामें अधर्म न केला । मृत गुरुपुत्र आणिला । गोपिकांला बोधविलें ॥५५५॥
सतरा वेळ असामान्य । तेवीस अक्षौहिणी सैन्य । वधूनि कृष्ण जाला धन्य । मागधा दैत्य वोपिलें ॥५६॥
अजिंक्य यादवां काळयवन । मुचुकुन्ददृष्टी त्या मारून । दिधलें मुचुकुन्दा वरदान । हें कौशल्य गहन कृष्णाचें ॥५७॥
अष्टमहिषींचे उद्वाह । भौमासुराचा वधनिर्वाह । पार्यातहरणीं सुरविग्रह । हा अद्भुत प्रवाह लीलेचा ॥५८॥
षोडशसहस्रवनितालग्नें । एका समयीं पाणिग्रहणें । यदूंसह अनेक रूपें धरणें । हें विचित्र करणें कृष्णाचें ॥५९॥
भीमकीचें विनोदच्छळन । बाणानिमित्त हरनिग्रहण । भीमहस्तें मागधहनन । बंधमोचन नृपांचें ॥५६०॥
सिद्धी नेला युधिष्ठिरयज्ञ । तेथ शिशुपाळशिरःकृन्तन । पौण्ड्रकशाल्वनिबर्हण । अधर्मी जन बहु वधिले ॥६१॥
सुदामाचें पृथुकभक्षण । पुरटपुरीचें तया दान । कुरुक्षेत्रीं गोवळा पूर्ण । गोपिकागण उपदेशिला ॥६२॥
जनक श्रुतदेव भक्तवर्य । समत्वें कृतार्थ केले उभय । धरूनि तत्प्रेमें रूपद्वय । मुनिसमुदायसमवेत ॥६३॥
साष्ट शतोत्तर सोळा सहस्र । सदनीं तावदूपधर । वर्तला वनितामनोनुसार । स्वधर्मपर श्रीकृष्ण ॥६४॥
संतति संपत्ति आत्मसंग । अवघे या समत्वेंचि साङ्ग । देऊनि पूर्णत्वें अव्यंग । रमारंग निःसंग ॥५६५॥
पाण्डवांचें करूनि साह्य । कौतुकें तत्करें वधिल द्रोह्य । वर्थिले धर्मिष्ठ साधुग्राह्य । यदुसमूह स्वकौल्य ही ॥६६॥
इत्यादि अनंत अलौकिक । श्रीकृष्णलीला सकौतुक । संपूर्ण नेणती ब्रह्मादिक । मा मानवी अल्पक काय वदे ॥६७॥
पूर्वावतारीं प्रगल्भ लीला । इतुकी नाहींच ऐश्वर्यशीळा । जगदुधार ही ऐसा न केला । कळे सुज्ञाला तारतम्य ॥६८॥
वैकुण्ठींचें ऐश्वर्य सर्व । दरारिगदादिजलोद्भव । छंदोगामी पक्षिराव । कृष्णींच पूर्ण विराजले ॥६९॥
नवल वस्तुमहिमारोह । श्रीकृष्ण चिन्मात्रविग्रह । जगत्कल्याणसंदोह । निःसंदेह विदेह ॥५७०॥
तेथ कोण्ही कोण्या योगें । जडले पाणी विरागें रागें । संगें पाङ्गें सप्रेमलागें । कीं संभोगें सहज स्थिती ॥७१॥
ते सायुज्य पावले कृष्णीं । त्यांमाजि तृणादि स्थावरश्रेणी । स्पर्शमात्रें स्वानंदघनीं । पावले साधनीं नसतांही ॥७२॥
तैसेच पशुपक्षी श्वापदगण । दर्शनमात्रेंचि तद्रूप पूर्ण । दूरस्थ किंवा यादसजन । वेणुस्वनश्रवणेंचि ॥७३॥
मानवांमाजि तों दोनी कोटि । देव असुर जे जाले सृष्टि । विरोधसप्रेमें परिपाटी । स्वधामतटी पावले ॥७४॥
भयें द्रोहें द्वेषें वैरें । स्नेहें मोहें कामें स्वैरें । सख्यें मैत्र्यें सुहृदाधारें । साक्षात्कारें निजानुभवें ॥५७५॥
ब्रह्मभावें भक्तिप्रेमें । अधिकारपांगेंवीण सुगमें । ऐक्य पावले सद्वेधनेमें । पुरुषोत्तमेंसीं सर्वही ॥७६॥

इत्थं परस्य निजधर्मरिरक्षयातलीलातनोस्तदनुरूपविडम्बनानि ।
कर्माणि कर्मकषणानि यदूत्तमस्य श्रूयादमुष्य पदयोरनुवृत्तिमिच्छन् ॥४९॥

तरी निजधर्मावया कारणें । लीलातनु धरिली जेणें । त्या परात्पर श्रीकृष्णाचीं गहनें । कर्में पूर्णें ऐसीं हीं ॥७७॥
धृतनट्यानुरूपोद्दामें । विडंबनें कृतशंतमें । अविद्याव्रतांच्या कर्मनेमें । नाशक वर्में केवळ ॥७८॥
या यदूत्तमाच्या पादाम्बुजीं । अनुवृत्ति इच्छितसां तां कीं जे । कोण्ही तर्‍ही ऐको सहजीं । सत्समाजीं सप्रेमें ॥७९॥
अनुवृत्तिशब्दें जाणिजे भक्ति । कृष्णाचरणीं इच्छूनि पुरती । सेवी तत्कीर्ति जो शुद्धमति । फळ त्याप्रति मुनि सांगें ॥५८०॥

मर्त्यस्तयाऽनुसवमेध्तया मुकुन्द श्रीमत्कथाश्रवनकीर्तनचिन्तयैति ।
तद्धाम दुस्तरकृतान्तजवापवर्गं ग्रामाद्वनं क्षितिभुजोऽपि ययुर्यदर्थाः ॥५०॥

श्री म्हणिजे माङ्गल्यरूपा । मोक्षादि कल्याणप्रदीपा । जेथ आहे स्वानंदकल्पा । ते श्रीमत्कथा कृष्णाची ॥८१॥
ऐकिली कीर्तिली चिन्तिली प्रीती । प्रवृद्ध भक्ति करूनि महती । तेणें मर्त्त्य पावे तद्धामाप्रति । पुनरावृत्तिविवर्जित ॥८२॥
कैसे प्रकारींचें तें धाम । ऐसें पुसाल जरी उद्दाम । विशेषणार्थें तरी उत्तम । ऐका सुगम कळेसें ॥८३॥
अंतकर्त्ता अनिवार काळ । प्रवाह त्याचा बहुजवशीळ । ज्यामाजि पडिले ब्रह्माण्डगोळ । ब्रह्मादिक सकळ वाहवती ॥८४॥
नामा रूपा जितुकें आलें । तें न थरे ज्यापुढें वहिलें । ऐसा काळजव दुस्तर बळें । त्यासी जें नाकळे कदापिहि ॥५८५॥
जें सत्य शाश्वत अविकार । ज्याचिये प्राप्तीस्तव साचार । साधक श्रमती वैराग्यपर । भयंकर काळभयें ॥८६॥
पृथ्वीपति ही ग्रामांतून । वना गेले अतिनिर्विण्ण । ज्याकारणें विवेकनिपुण । भवसुख पूर्ण सांडूनी ॥८७॥
ललनाललामें लावण्यधामें । विलासविदग्धप्रचुरकामें । रतिसुख ज्यांचे देती उपमे । श्रुतिगण नेमें ब्रह्मसुखा ॥८८॥
ऐसिया अनुरोपा सुन्दरा । अम्या स्वतुल्या मंदिरा । यथेच्छहयगजपरिवारा । ललामनिकरा द्रविणादि ॥८९॥
देशदुर्गें पृतनानुग । सकळ शारीरशर्म साङ्ग । उपेक्षूनि भृभुज धिंग । जाले वनग ज्यासाठीं ॥५९०॥
अनलनिवेशा तुल्य कठिन । प्राणायामादि साधिती पूर्ण । शमदमें जिंकिती गोगण । होऊनि निपुण यासाठीं ॥९१॥
ऐसें दुर्लभ परंधाम । अच्युतस्वरूप सविश्राम । पावती तत्कथासेवनकाम । साधनें सुगम श्रवणादिकें ॥९२॥
राया भगवदनुग्रहप्राप्ता । येथ विस्मय काय प्रज्ञामंता । हें चित्र नोहे कीं सर्वथा । तेंही तत्वता अवधारीं ॥९३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP