मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
अनामकविकृत पदें

अनामकविकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
ब्राह्मण वंदावे वंदावे । कदापि ना निंदावे ॥ध्रुवपद.॥
सहज विनोद केला । राजा परिक्षिति निमाला ॥ब्राह्मण०॥१॥
नहुषें विप्रा छळिलें । त्याचें शरीर अजगर जालें ॥ब्राह्मण०॥२॥
यादव उन्मत्त जाले । सकळां कुळांसहित बुडाले ॥ब्राह्मण०॥३॥

पद २ रें
अर्जुना ! तूं पाहे रे ! । ज्ञेय जें अद्वय रे ! ।
नामरूप भेदें तेंची भूतीं नांदत आहे रे ! ॥ध्रुवपद.॥
सकळां जे माय रे ! सेखीं सर्वहि खाय रे ! ।
चंद्र सूर्यरूपें तेंची विश्व पाळित आहे रे ! ॥अर्जुना०॥१॥
नित्य जें निर्मळ रे ! । स्वानंद निष्कळ रे ।
भेदाभेदातीत जेथें नाहीं काल वेळ रे ! ॥अर्जुना०॥२॥
मीतूंपणावीण रे ! आपणा आपण रे ! ।
तेथें जीवन्मुक्तपण पुसतो कवण रे ! ॥अर्जुना०॥३॥

पद ३ रें
मना रे ! किति शिकवूं तुज । लाग जा गुरुच्या पदा ॥ध्रुवपद.॥
सद्गुरु दाखवि ऐक्यत्वें करुनी । त्वं तत् असि पदा ॥मना०॥१॥
ज्ञानाग्निनें कर्म बीजांकुरातें । करितसे दग्ध सदा ॥मना०॥२॥
सर्वं खल्विदं ब्रह्म एवं श्रुतिवाक्य । हा निजबोध सदा ॥मना०॥३॥
गुरु ब्रह्मविना नान्य म्हणवोनि । गुरुगीतेची या पदा ॥मना०॥४॥
ब्रह्मानंदें जगदानंदोऽयं भवति । हें नाम वाचे वदा ॥मना०॥५॥

पद ४ थें
त्याला हरि दूर हृदयविहारी हो ! ॥ध्रुवपद.॥
श्रवण मनन निजपोटीं बांधुनी । उतरत जो भवजलधींचा पूर ॥त्याला०॥१॥
प्रर्‍हाद प्रभु हरिभजनाचा । पथ न धरि जो मोहें झाला चूर ॥त्याला०॥२॥
देहगेहरत न गणि भलत्यातें । विषयविलासी जाला जो कां शूर ॥त्याला०॥३॥

पद ५ वें
केवल मंगळाची मूर्ति । अग बग नग उद्धरती ।
विटेवरी समपद कटि करिं नटली जलजकमलनल धरती ॥ध्रुवपद.॥
मुग्धवधू उडुगणास विधुसम रासविलास विहरती ।
खगनगमृगद्रवकर वेणुरव ऐकुनि धेनु चरती ॥केवळ०॥१॥
केशरगंधसुगंधित पंकजमराल व्यजन भ्रमयंती ।
गलितमालगोपालबालसह व्याल भाल नट तरती ॥केवळ०॥२॥
रुक्मकमललंबितबनमाल कुंजत भ्रमर विहरती ।
स्वस्त[न?]हस्तकीं कुरवालुनियां ध्वस्त सकळ अघ पुरती ॥केवळ०॥३॥

पद ६ वें
गड्यांनो ! आपल्या कृष्णाला । अक्रुर नेतो मथुरेला ॥ध्रुवपद.॥
दोघे रथावरी बसती । यशोदा नंद गोप रडती ।
अक्रूरासी सर्व नमती । त्याच्या दया नये चित्तीं ।
ह्मणउनि या जाऊं मारूं तयाला ॥अक्रूर०॥१॥
गोपिका फारचि तळमळती । करानें वक्षभाळ पिटती ।
हरिला जाऊं नको ह्मणती । अश्रुनें सर्वांतें भिजती ।
पूर तों गेला यमुनेला ॥अक्रूर०॥२॥
ऐकुनी गोप सर्व भ्याले । धांवुनी हरिजवळी आले ।
मूर्छित रथाजवळ पडले । हरिनें हृदयीं कवळीले ।
देव मग फारच गंहिवरला ॥अक्रूर०॥३॥
तुजविण आम्हा नाहीं कोणी । म्हणुनी सर्व जाउं मरुनी ।
परि ये चिंता ऐक मुनी । कंस तुज नेइल बा ! धरुनी ।
तेथें कोणी नाहीं बा ! तुजला ॥अक्रूर०॥४॥

पद ७ वें
माझी लाज तुला यदुराया रे !  । येईं धांवत साह्य कराया रे ! ॥ध्रुवपद.॥
पडतों मी पायां चुकवीं अपाया । येऊं दे या दीनाची माया रे ! ॥माझी०॥१॥
प्रियसुतजाया मिळति गिळाया । योजिति दुरितासि कराया रे ! ॥माझी०॥२॥
जन्मुनि वायां सिण केलें काया । मांडिला तव गुण गाया रे ! ॥माझी०॥३॥

पद ८ वें
विश्वामित्र सभे आला । मागतो माझ्या रामाला ॥ध्रुवपद.॥
विनवा त्या ऋषिरायाला । नका नेऊं माझ्या बाळाला ।
जरि हा मागिल दुग्धाला । तरि मग कोण देइल त्याला ।
द्यावें पुत्रदान मजला ॥मागतो०॥१॥
त्याविण आम्हा नाहीं कोणी । जैसें मत्स्याला पाणी ।
विनवी जोडुनियां पाणी । भेटावा रघुकुलराजमणी ।
अभय दे वसिष्ठ तिला ॥मागत०॥२॥
कैकयि फोडे हंबरडे । कौसल्याही फार रडे ।
झाले नेत्र अति कोरडे । बोलति वेडेंवांकुडें ।
दुष्ट हा कां नाहीं खपला ॥मागतो०॥३॥
कां रुसलासी जगदीशा । मांडली आमुची दुर्दशा ।
मजल अहोती फार आशा । वाटती उदास दाहि दिशा ।
आतां कधिं भेटेल अपुल्याला ॥मागतो०॥४॥

पद ९ वें
पावन नाम कशाला धरिलें । केव्हांची मी विनवितसें ॥ध्रुवपद.॥
मोथा रागिट दुर्वासा हा भोजन रात्रीं मागतसे ।
न मिळे तरि तो शापिल सत्वर थरथर देवा ! कांपतसें ॥पावन०॥१॥
दीनदयाळा ! येइं कृपाळा ! बहिण तुझी मी म्हणवितसें ।
गोपिजनमनमोहन माधव धांव तुला मी भाकितसें ॥पावन०॥२॥
अंत न पाहावा दीनोद्धारक ऐसें जग तुज बोलतसे ।
संकटहर तूं जनार्दना ! मी लव पल वाट विलोकितसें ॥पावन०॥३॥

पद १० वें
अरे ! मी भक्तीचा भुकेलों रे ! । केलों तैसा झालों रे ! ॥ध्रुवपद.॥
सुयोधनाच्या समाचाराची न धरीं आशा पोटीं रे ! ।
विदुराधरिंच्या पातळ कणिका ब्रह्म मी वाढीं रे ! ॥अरे०॥१॥
धांवुनी आलों द्रौपदीच्या भाजीपानासाठीं रे ! ।
पांडवजनप्रतिपाळक म्हणुनी रक्षिलें संकटीं रे ! ॥अरे०॥२॥
पुंडलिकास्तव उभा राहे चंद्रभागातटीं रे ! ।
ब्रह्मानंदें रंगलों मी कर ठेवुनी कटीं रे ! ॥अरे०॥३॥

पद ११ वें
कंस मारिला मामा मग या कौरवांचें भय काय रे ! ॥ध्रुवपद.॥
पार्था ! बाळपणांत माझें कर्म कसें तूं जाणशी ? ।
वक्रदंत शिशुपाल पूतना मारले अग बग केशी ।
हत्येचें वैर सुटेना कदापि कोणासी ।
महाकालिय फणासि मर्दुनि कसा भ्याले रे ! ॥कंस०॥१॥

पद १२ वें
नको हरि ! आज बाहिर जाऊं । गवळणि तुज धरूं टपल्या रे ! ॥ध्रुवपद.॥
गार्‍हाणें किति ऐकूं तुझें मी । थकली समजुत करतां रे ! ।
बाहिर जाशी आज तूं निश्चय । माराया तूज टपल्या रे ! ॥नको०॥१॥
मालिक तूं या असुनि व्रजाचा । नीचकर्म कां आचरसी रे ! ।
दधि दुध घृत नवनित भरलें । काय गृहीं कमी आपुल्या रे ! ॥नको०॥२॥
चाळे किती करसी व्रजबाळा ! । पाळक अखिल जगाचा रे ! ।
दास तुझा मी तुज प्रार्थीतों । पहातां मुनिवर थकला रे ! ॥नको०॥३॥

पद १३ वें
नको धुंद विषयीं तुंदपणें फुंद धरूं ॥ध्रुवपद.॥
प्रवाहवत् तनू वयासि । उशिर नसे जावयासि ।
करकसदृश झरक निखिल सरक त्वरित नरक चुकविं फुंद धरूं ॥१॥
तत्वमसि महावाक्य विचारुनी सदा चिदैक्य ।
सकलकरणि शरण गुरुसि चरण धरुनि मरण चुकविं फुंद धरूं ॥२॥
अमानित्वादिपदें विवरीं सदैक्यचिद्गदें ।
विगततृष्ण जीव विषय विष्णु करुनि कृष्णमयानंद रमविं ब्रह्मपदविं फुंद धरूं ॥३॥

पद १४ वें
नको नको स्त्रीसंगनामग्रहण सर्वथा ।
शुक म्हणे परिक्षितीस ऐक भारता ! ॥ध्रुवपद.॥
मुक्तीतेसि पाश दोनि द्रव्य योषिता ।
त्यांत हें अनर्थ मूळ स्त्रीच तत्वता ।
स्त्रीमुळें बहुतनाश । लिंगपतन शंकरास ।
शिरःपात ब्रह्मयास । विष्णुला स्मशानवास ॥नको०॥१॥
वासवा भगांक तत्वता ।
मरण त्या विरोचनादि पंडुदशरथा ।
कलंक त्या निशाकरासि । कीर्णलोप भास्करासि ।
नपुसंकत्व अर्जुनाशि । विटंबना जयद्रथासि ।
कुलक्षयो दशाननादि कौरवादि नाशल्या ॥नको०॥२॥

पद १५ वें
कोणि नाहिं मज पाव दिनानाथा ! ।
तुझे पायीं मीं ठेवियला माथा ॥ध्रुवपद.॥
मला टाकोनी स्वामि ! कुठें जातां । तुम्हां वांचुनि मी काय करूं आतां ।
कंट दाटे अपार गुण गातां । तुम्ही माझे गण गोत पिता माता ॥कोणि०॥१॥
धीर नाहीं मज खंति वाटताहे । आज नयनीं काम नीर लोटताहे ।
प्राण माझा घाबरा होत आहे । नको जाऊं क्षण एक उभा राहें ॥कोणि०॥२॥
तुझ्या संगें चित्प्रभा फांकताहे । अंतरंगीं मन समाधान राहे ।
परे परता आनंद भोगिताहे । निजानंदीं बैसोन डुल्लताहे ॥कोणि०॥३॥
जेथें नाहिं आकाश पवन पाणी । निगमपंथें चैतन्य घरा आणी ।
नेति नेति मन मौन वेदवाणी । म्हणे माझें माहेर निरंजनीं ॥कोणि०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP