मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
गोपाळनाथकृत पदें

गोपाळनाथकृत पदें

अनेककविकृत पदें.

पद १ लें
रामा ! तुजला कारभार फार । माझा असो तुजला आठव रे ! ॥ध्रुवपद.॥
अनंत ब्रह्मांडें एक्या रोमीं । अनंत कुटुंब सार रे ! ॥रामा०॥१॥
साधुधर्मरक्षण अवतरणें । करिसी दुष्टसंहार रे ! ॥रामा०॥२॥
गोपाळात्मा सुख पद लक्षी । नमितों वारंवार रे ! ॥रामा०॥३॥

पद २ रें
अजुनि नये रघुराणा । तो सजलजलदतनु जाणा ॥ध्रुवपद.॥
मनबुद्धिवाचे पर ज्याचा पार न शास्त्रपुराआण ।
तो अजराजतनय सुत झाला कौसल्येचा तान्हा ॥अजुनि०॥१॥
बाळलीला अनुजांसह दावितो चाप लघु बाणा ।
करीं धरुनि संधान भेदि जो मानुनि ( मांडुनि? ) सुंदर ठाणा ॥अजुनि०॥२॥
आत्माराम एक अनेकीं रविप्रतिबिंबें नाना ।
घटमठ महदाकाश तसा गोपाळ सकळ घटिं जाणा ॥अजुनि०॥३॥

पद ३ रें
साजणि ! त्वरितगति जा तूं । तया सांगे मम प्रणिपात् ॥ध्रुवपद.॥
जीविंचें गुज मी सांगतसें तुज, प्रगट न करिं हे मातु ।
बलाधिश आनकदुंदुभिसुत आणि धरुनियां हातु ॥साजणी०॥१॥
नूपुर अतिवाचाळ अशाला त्यागुनि होय निवांतु ।
संगतिवर्जित भेट तयाला लक्षुनियां एकांतु ॥साजणी०॥२॥
ओतप्रोत पटतंतून्यायें आत्माराम जना तूं ।
मथुराधिश जो उग्रसेन गोपाळ तयाचा नातू ॥साजणी०॥३॥

पद ४ थें
दासी झाल्यें मी श्रीगुरुची । काया वाचा त्या निजघरची ॥ध्रुवपद.॥
भक्ति साडी नेसविली मज । अनुभव सोनसळी भरजरिची ॥दासी०॥१॥
शांति दया विरक्ती असे जी । लेणीं लेववी मज बहुपरिचीं ॥दासी०॥२॥
आत्माराम धनी मजला तो । गोपाळक छाया करि करींची ॥दासी०॥३॥

पद ५ वें
कुंजवनीं मधुर ध्वनि गाजे । मनमोहक मुरली बरि वाजे ॥ध्रुवपद.॥
संश्रुति स्मृति विस्मृति मनिं ऐकुनि । वेधियेलें सखिये ! मन माझें ॥कुंज०॥१॥
धाम काम मज न सुचे कांहीं । झालीं पिसी, त्यजी लौकिक लाजे ॥कुंज०॥२॥
आत्मारामीं वृत्ति हरिली । गोपाळक चालक यदुराजे ॥कुंज०॥३॥

पद ६ वें
हे तनु जाणा रे ! जाइ जिणें जाणा रे ! ॥ध्रुवपद.॥
साची पंचभूतांची, यांची संगत श्रम देणार ।
भरी भरूं नको, जीविं धरूं नको, मनीं करुनि विचार ॥हे तनु०॥१॥
कर्मवशें संगम क्षणभंगुर गोठली जळगार ।
भरीं भरूं नको, मनीं चळूं नको, हे नव्हे नव्हे साचार ॥हे तनु०॥२॥
अलक्ष तनु करीं, धरिं निजलक्षीं, पावशि साक्षात्कार ।
समान जनांत वनांत व्यापक मनांत तूंचि विचार ॥हे तनु०॥३॥
गोपाळात्मा सुखद समजुनि बुध झाले तदाकार ।
किति तुज सांगूं स्वरुपीं जागूं वागूं वारंवार ॥हे तनु०॥४॥

पद ७ वें
सद्गुरुरायें नवल केलें आज ।
माझ्या मनाचें उन्मन झालें सहज ॥ध्रुवपद.॥
सहजीं सहज देखिलें आजि डोळां ।
चहूंकडे भरला हरि सांवळा ॥सद्गुरु०॥१॥
भरला उरला बोलतां नये वाचे ।
मागें पुढें घनदाट अवघा सांचे ॥सद्गुरु०॥२॥
साचचि परि तें द्यावया नये हातीं ।
ऐसें समजोनी ते योगी गर्क होती ॥सद्गुरु०॥३॥
गर्क परी अखंड अनुसंधानीं ।
निमिषोनिमिषीं पहती प्रीति करुनी ॥सद्गुरु०॥४॥
प्रीति जडली नाथ गोपाळासी ।
उन्मनि संग निःसंग स्वानंदासी ॥सद्गुरु०॥५॥

पद ८ वें
साजणी ग ! मंगल दसरा आम्हांसी झाला बाई ! ॥ध्रुवपद.॥
अक्षय घटाची स्थापना । चिन्मय चित्पदीं दीप जाणा ।
सुमनमाळा लावुनि घना । निजबिज पेरियलें ठायीं ॥साजणी०॥१॥
नवविध भक्ति ते नव दिवस । दशमी अद्वय तो निज कळस ।
सीमा उल्लंघुनि या दशदिशा । वाजवि अनुहत निज घायीं ॥साजणी०॥२॥
आत्मा कांचन घेउनि सुरा । विकल्प मेंढा मारुनि पुरा ।
परतुनि आलों मुळिंच्या घरा । विजयी झालों गुरुपायीं ॥साजणी०॥३॥
अंबर फाडुनि चिदंबर ल्यालों । अंबरस्वारी करुनी आलों ।
निजपदरूप होउनि ठेलों । ओवाळित उन्मनी आई ॥साजणी०॥४॥
अखंड ब्रह्मानंदीं सोहळा । सद्गुरु गोपाळनाथ भोळा ।
जो कीं निजबोधा आगळा । वेदपुराणीं श्रुति गाई ॥साजणी०॥५॥

पद ९ वें
आधीं मन मुंडा बा ! मन मुंडा । मग तुम्ही ब्रह्मचि धुंडा. ॥ध्रुवपद.॥
मनचि हातीं नाहीं । तेह्तें ब्रह्म करिल कायी ? ॥आधीं०॥१॥
मनचि मुंडलें नाहीं । तेथें सद्गुरु करील कायी ? ॥आधीं०॥२॥
गोपाळनाथ सांगतो सोई । लागा तुम्ही सद्गुरुपायीं ? ॥आधीं०॥३॥

पद १० वें
वैद्यें गुण केला बा ! गुण केला । संशय अवघा हरला. ॥ध्रुवपद.॥
भवरोगाचा झाडा । आत्मप्रचीति देऊनि पुढां ॥वैद्यें०॥१॥
तळमल जीवपणाची भारी । औषध देउनि केली दूरी ॥वैद्यें०॥२॥
शांतिसुखाचें पथ्य । मन मारुनि केलें हित ॥वैद्यें०॥३॥
गोपाळनाथ म्हणे मी रोगी । सद्गुरु वैद्य मिळाला वेगीं ॥वैद्यें०॥४॥

पद ११ वें
कोण धन्यला मना करी रे ! । मना मानलें तेंचि करी. ॥ध्रुवपद.॥
वाटिदुधास्तव दे उपमन्या । क्षीरसागर बक्षीस करीं ॥कोण०॥१॥
मुष्टिपृथुस्तव दिधलि दयाळें । सुदामजिस सोन्याची पुरी ॥कोण०॥२॥
वर्तमान रावण लंकेचा । बिभीषणा अभिषेक करी ॥कोण०॥३॥
धणि गोपाळ उदार दयाघन । भावें विरोध्या मुक्त करी ॥कोण०॥४॥

लावणी १ लीं
वदति गोपिका बरी हरीला आवडली कुब्जा ।
अतिवृद्धा वक्रा सरिज्ञवशी (?) दुसरी अब्जा ॥ध्रुवपद.॥
मान चळचळा कांपे नव्वद वर्षे गेलिं तिजला ।
सुकलें मांस त्वचा सुरकुत्या अती देह झिजला ।
निबर दोडकें तेंवि रोडकें तिशीं काय रिझला ।
गोकुळिंच्या सुंदर वनितांचा वृंद कसा त्यजिला ॥
चाल ॥ गे ! कल्पलता सांदुनी जसा धतुरा ।
कीं चिंतामनि टाकुनी घेत गारा ।
कीं मलयागिरि टाकुनी काष्टभारा ॥
उठाव ॥ तेच परी सखयांनो ! आम्हां झाली गाढ लज्जा ।
तुलशीच्या भोक्त्या कासया असावी सबज्या ॥वदति०॥१॥
एक म्हणे तो अक्रूरनामा क्रूर असा दिसला ।
ठकुनि सांवळा नेला परि हा नंद कसा फसला ।
कृष्णेंही मन कठिण करुनियां त्वरित रथीं बसला ।
जाउन दासी ओंगळवाणी तिचे सदनिं घुसला ॥
चाल ॥ गे ! नवल कसें सये बाई ! ये परिसा ।
तें लोह जसें स्पर्शतांच त्या परिसा ।
पालटेल रंग त्याच्या संगासरिसा ॥
उठाव ॥ तद्वत घडलें नेणों तीणें काय पुजिलीं शिवगिरिजा ।
जाली भामिनी प्रेमें प्रियकरा मोरमुकुटशिर जा ॥वदति०॥२॥
दुजी म्हणे तीणें सांवळा भावें अर्चियला ।
सुमन मालती, सुगंध शीतल चंदन चर्चियला ।
भक्तिभुकेला परम तियेच्या भावाशीं भुलला ।
अनंतजन्मार्जित सुकृतें दैवयोग घडला ॥
चाल ॥ गे ! रिद्धिसिद्धि कामार तिच्या दाशी ।
गे ! केंवि म्हणों ये तिजलागुनि दाशी ।
प्रियपात्र जीचे सच्चित्सुखराशी ॥
उठाव ॥ समजुनियां मनिं पुरतें आतां टाकुनि द्या गमजा ।
विश्वीं आत्माराम तोचि गोपाळ असें समजा ॥वदति०॥३॥

पद १२ वें
कर विचार मन रे ! तूं क्या करे गुमान ।
दो दिनके मेजवान आखर जायगा निदान ॥ध्रुवपद.॥
क्या साथ लाया ! लेजायगा नही ।
आया आकेला जब जायगा तुही ॥कर०॥१॥
भाइ बहिन लडके तुज काम न आवेंगे ।
बांध मारे जमके दूत तुजको न छुडावेंगे ॥कर०॥२॥
करसवदा सुकृतका तुज काम आवेगा ।
रामनाम भज भवनदी पार पावेगा ॥कर०॥३॥
जग बिच आत्माराम बिहरि है कृपाल ।
साधुसंग बुझले भरपूर है गोपाल ॥कर०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP