मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
रंगनाथस्वामिकृत पदें

रंगनाथस्वामिकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
दत्तात्रय दत्तात्रय ऐसी वदतां हे रसना ।
पावन होइल सहजें प्राप्त नोहे दुर्व्यसना ॥ध्रुवपद.॥
दशइंद्रियांत सद्गुरु नांदे निजानंदकंद ।
दयाळ साधक जन अवतरला हाचि स्वच्छंद ।
दंभादिक क्रोधाचा बोध करूनि उच्छेद ।
दत्तात्रय हें नाम विराजित नित्यनिर्द्वंद्व ॥दत्तात्रय०॥१॥
तारक भवसागरीं हें खूण बाणली चित्ता ।
तार्किक ज्ञानें पाहतां याची सर्वही सत्ता ।
तापत्रय दुरकर्ता रिपुसंहरता सुखदाता ।
ताडित अंधतमासि मुखावरि दे सुखचित्सविता ॥दत्तात्रय०॥२॥
त्रयभेदातित ब्रह्म सदोदित चतुराक्षर मंत्र ।
त्रपारक्षक अनाथबंधू शाश्वत स्वतंत्र ।
त्रिभुवनीं असे व्याप्त व्यापक चिन्मात्र ।
त्रयदेवात्मक मूर्ती घडली होउनि एकत्र ॥दत्तात्रय०॥३॥
येकीं अनेक येकीं येक हा दृढ निश्चय ।
येणें जाणें नाहीं तो हा सद्गुरुराव ।
एवं अनिर्वचनीं तेथें वर्णूं मी काय ? ।
यथोक्त हा निजरंगिं रंगला हाचि अभिप्राय ॥दत्तात्रय०॥४॥

पद २ रें
धावें पावें कर्णधारा रे !, निर्विकारा रे !, देवा देशिकराया ।
भवजळीं बुडतों मी ये काळीं, मायामृगजळीं, येईं पार कराया ॥ध्रुवपद.॥
दुस्तर अतिचंचळ जळ तुंबळ, कांहीं केल्या तुटेना ।
मगरी आशा तृष्णा कल्पना, दुर्वासना, याची मीठी सुटेना ।
यांणीं मज बुडवितां पाताळीं, तुजविण बळी सोडविता दिसेना ।
लक्ष चौर्‍यांशीं आवर्त, मिथ्या विवर्त, माजी जळचरें ! नाना ॥धांवें०॥१॥
रजतम हे दोन गुण, महादारुण, वक्र नक्र सदाही ।
काम्क्रोधादिक सर्प रे ! त्याचा दर्प रे ! सोसवेना कदाही ।
परस्पर मदमीन तळपती, लाटा उसळती, स्वर्गपर्यंत पाहीं ।
जन्म जरा आणि मरण, संस्मरण, पंक लागला देहीं ॥धांवें०॥२॥
अनुकंपा नौका घेउनी, वेगीं येउनी, मज काढुनि नेईं ।
नावाडिया गुरुनायका, सुखदायका, यश निर्दोष घेईं ।
मायानदी मृगजळवत, करुनि त्वरित, सुखशाश्वत देईं ।
सहज पूर्ण निजरंगा रे ! निःसंगा ! रे करुणाकर तूं होईं ॥धांवें०॥३॥

पद ३ रें
धांवें पावें सत्वरा दीनबंधु ।
मज तों न तरवे भवसिंधू । राघवा रे ! ॥ध्रुवपद.॥
ममतायोगें चंचल मन निजहित न कळे ।
विषयवियोगें व्याकुल मन इंद्रिय विकळे ।
या क्षयरोगें पारकीं झालीं सकळें ।
दुर्घट हे संसृती न टळे न टळे. ॥धांवें०॥१॥
रजतमसंगें भ्रमतां दिनरजनी गेली ।
साधूसेवा जाणपणें नाहीं केली ।
विद्या वय साधन मानें पडली भूली ।
मति हे परम दोषासि संयुत झाली. ॥धांवें०॥२॥
भाग्यविशेषीं सकलही उपमा न सरे ।
जपतपलेशें फळ आशा अहंमति पसरे ।
तनु उद्देशें मन विधिही शासन विसरे ।
स्वहिताचें पडलें वन उद्वस रे ! ॥धांवें०॥३॥
धनुसुतदारासंसारीं विटलों पाहीं ।
व्यर्थ पसारा, विश्रांति न दिसे कांहीं ।
जगदुद्धारा ! मन वारा जालों पाहीं ।
निकरें छळिती कामादिक वैरी साही. ॥धांवें०॥४॥
त्रिभुवनपाळा ! सकळहि मम दोष न लक्षीं ।
करुणासिंधू ! आपुलें बिरुद नुपेक्षीं ।
दुर्जनकाळां निर्दाळुनि मज संरक्षीं ।
रंगाविण रंगला अंतरसाक्षी ॥धांवें०॥५॥

पद ४ थें
गुरुसी शरण जातें । अगइ ! तरि कैसें होतें ? ।
पावुनि पुनरपि नानायोनी । उपजों उपजों मरतें. ॥ध्रुवपद.॥
कोठुनि येणें ? कोठुनि जाणें ? आहे कोण ? न कळतें ।
देहबुद्धीच्या बंदी पडतें षड्वैर्‍या सांपडतें. ॥गुरुसी०॥१॥
‘ तत्त्वमसी ’ महावाक्य न पडे तें श्रवणीं माझ्या निरुतें ।
‘ ब्रह्माहमस्मि ’ प्रत्ययातें समुळींहुनि आंचवतें ॥गुरुसी०॥२॥
ब्रह्मार्पणबुद्धि सत्कर्में अनंत जन्मीं मातें ।
घडलीं तरि निजरंगा रंगुनि ठेले जरि नसते. ॥गुरुसी०॥३॥

पद ५ वें
नाहीं नाहीं रे ! त्यामाजि मोक्ष. ॥ध्रुवपद.॥
नाहिं नाहिं जन दाहि दिशा मन ठायीं नसुनि सदांहि तगेल्या ॥नाहीं०॥१॥
बुडुनि नित्य जळिं पढत मंत्र मुखीं उडत उडत गति पडतचि गेल्या. ॥नाहीं०॥२॥
देश त्यजुनि, शिरिं केश वाढवुनि वेश धरुनि, तनु, भैषज केल्या. ॥नाहीं०॥३॥
ध्यास धरुनि हव्यासग्रहाप्रति नासुनि धन संन्यास घेतल्या. ॥नाहीं०॥४॥
लक्ष बेल नवलक्ष कमलदल लक्ष चुकुनि नवलक्ष वाहिल्या. ॥नाहीं०॥५॥
नाक धरुनि दिठि लावुनियां जप, लाख करुनि, तनु राख लाविल्या. ॥नाहीं०॥६॥
पवनबंध अनुभवुनि सरसपद, नव नव जोडुनि कवनहि केल्या. ॥नाहीं०॥७॥
भंग पिउनि जगधिंग गळां उरिं लिंग बांधुनी जंगम फिरल्या. ॥नाहीं०॥८॥
संग त्यजुनि निःसंग होउनि निजरंग भजनविण व्यर्थचि गेल्या. ॥नाहीं०॥९॥

पद ६ वें
ऊर्ध्वपथें चाल बाइ ! ब्रह्मगिरी पाहूं ।
देहभावविलय तेथें तेंचि होऊन राहूं ॥ध्रुवपद.॥
निजमुळा जावें हेंचि पडे ठावें ।
मागिल चाळे सांड बाळे ! सावध होउनि भावें ! ॥ऊर्ध्व०॥१॥
नीट वाटे चाल बाई ! चोर बहूसाल ।
जाइल टका उडेल फुका. लोक लाविति बोल. ॥ऊर्ध्व०॥२॥
कल्पनेच्या सैरा दाटी श्वापदांच्या हारी ।
कंटकांचि पिडा बहू शिणविती भारी. ॥ऊर्ध्व०॥३॥
दुर्जनाची रांड हो कां काय धोका त्यांचा ? ।
आपुले हिता सावध व्हावें काया मनें वाचा ॥ऊर्ध्व०॥४॥
सज्जनाचे धरी पाय तरिच लागे सोय ।
सहज रंगीं पूर्णब्रह्म निजानंद होय ॥ऊर्ध्व०॥५॥

पद ७ वें
मृगजळ भावी दृढपाणी । धांवुनि शिणला मृग रानीं ॥ध्रुवपद.॥
तैसें सुख या संसारीं । मानुनि, हित केलें भारी. ॥मृग०॥१॥
पतंग दीपीं सुख मानी । नेणेंचि होइल जीवहानी. ॥मृग०॥२॥
राहों घर अकरि कोळिसला । करूनि आपणचि गुंतला. ॥मृग०॥३॥
आवडि सेवी गळ मासा । तेणें पावे देह वळसा. ॥मृग०॥४॥
ऐसे विषयीं जे भुलले । ते निजरंगीं अंतरले. ॥मृग०॥५॥

पद ८ वें
रविवंशाभरणा ! । यावें ॥ध्रुवपद.॥
सत्यज्ञानानंत परा- । क्रम निगमावंद्या जगदोद्धारा ।
निगमागमसारा ॥यावें०॥१॥
निर्गुण - नित्य - निरामय - धामा । अवाप्तकामा मंगलधामा ।
मुनिजनमानसविश्रामा ॥यावें०॥२॥
विश्वविलासा श्रीजगदीशा । पुराणपुरुषा परमपरेशा ।
निजरंगा अविनाशा ॥यावें०॥३॥

पद ९ वें
तो राजयोगी । पालटल्या पूर्वस्थिति वो ! ॥ध्रुवपद.॥
कृष्णरूपीं जडली प्रीती । कृष्णमय झाल्या वृत्ती ॥तो राज०॥१॥
सहज स्थितिनें चाले । सहज स्थितिनें बोले ॥तो राज०॥२॥
सहज तो हाले डोले । आहे तितुका खेळ खेळे ॥तो राज०॥३॥
रंगिं रंगला तत्त्वमेळे । निजात्मसुखें भोगी सोहळे ॥तो राज०॥४॥

पद १० वें
झाला विठ्ठलसंग । मनिं भरला रंग ॥ध्रुवपद.॥
एकचि तंतु सोहंस्मरणाचा । वाजत जैसा चंग ॥मनिं०॥१॥
चिन्मयमूर्ती परात्पर आहे । पाहुनि झालों दंग ॥मनिं०॥२॥
रंगातीत निजरंगिं रंगुनी । भवभय झालें भंग ॥मनिं०॥३॥

पद ११ वें
नवविध भक्ति घडो । तुझिये स्वरुपीं प्रीत जडो ।
विषयोन्मुख मन होउनि उन्मन । स्वस्वरुपीं मुरडो ॥ध्रुवपद.॥
सत्संगति आवडो । पाउल सन्मार्गींच पडो ।
याविरहित आन मागों जरी तरी जिव्हा समुळ झडो ॥नव०॥१॥
निजसेजे पहुडो । मुख हें सुखसिंधूंत बुडो ।
विश्वपटांतरीं तंतु येकचि दृष्टि असी उघडो ॥नव०॥२॥
पूर्ण रंग जोडो । जगदाभास समुळ मोडो ।
हारपलें जें निजधन माझें वेगीं मज सांपडो ॥नव०॥३॥

पद १२ वें
न भजति कां मातें प्राणी ? । सांडुति कामातें प्राणी ॥ध्रुवपद.॥
शाश्वत निजसुखदायक त्या मज नेणसि श्रीरामातें ।
काम्य निषिद्धें कर्मे करती होती प्राप्त श्रमातें ॥प्राणी०॥१॥
दुःखरूप हा विषय समागमें नेइल अंधतमातें ।
देखत देखत अंध बधिर नर नेणति परिणामातें ॥प्राणी०॥२॥
मी निजरंग अभंग तया मज मुनिमानसविश्रामातें ।
सांडुनि विषयविषानळ सेविती सांगुं किती अधमातें ? ॥प्राणी०॥३॥

पद १३ वें
अतळ सुधातळहि बुडो । वरि हें नभमंडळहि पडो ।
निश्चय कीं निज राम स्मरावा हा सहसा न बुडो ॥ध्रुवपद.॥
शेवटली पाळी । येणें गोड करूं समुळीं ।
आन उपाय नसे ये काळीं ध्यावा वनमाळी ॥अतळ०॥१॥
जन म्हणो वेडे । परि मी न पाहें त्याचिकडे ।
साधन तें साधावें ऐसें परमपद जोडे ॥अतळ०॥२॥
असेल प्रारब्धीं । तरि हें न चुके कर्म कधीं ।
मृगजलास्तव क्लेशी होणें विषम हे बुद्धी ॥अतळ०॥३॥
उरलें असेल करणें । भजनीं लावावें करणें ।
लक्ष चौर्‍यांशीं जन्माचें येथें संकट निस्तरणें ॥अतळ०॥४॥
निजरंगा बापा । मजवरि करिं गा ! अनुकंपा ।
पूर्णकृपें अवलोकुनियां मज पावन पथ सोपा ॥अतळ०॥५॥

पद १४ वें
धांवें कृपावंते माय माझे विठ्ठले ! ।
तुजविण भ्रमणा चित्तालागीं वृत्ति चरणीं लागुं दे ॥ध्रुवपद.॥
कर्म प्रवृत्ति यांचे प्रवाहांत गुंतलों ।
वासनासर्पीण इच्या योगें बहु फसलों ।
कुठवर आतां आवर करुं मी ? तुजविण कवणा सांगूं गे ! ॥धांवें०॥१॥
सत्कर्म पाहु जातां आड येतें कर्म गे ! ।
कर्मींच लीन होतां नेम कैसा खुंटे गे ।
प्रारब्धानें वेष्टियेलें नेईं नेइं पार गे ! ॥धांवें०॥२॥
जन्मयोनी फिरतां फिरतां मोठा झाला शीण गे ! ।
सुकृतानें साह्य म्हणतां अंतर नाहीं शुद्ध गे ! ।
शुद्धमतीचा भाव दावुनी आपुले रंगीं नेईं गे ! ॥धांवें०॥३॥
रंगीं रंगाकारीं देहीं स्फुरण अंतरीं ।
तुझिये नामीं माझी वृत्ती ठसो ही जरी ।
विश्वंभर हा करुणाशब्दें पुष्पमाळा अर्पी गे ! ॥धांवें०॥४॥

पद १५ वें
गेला मान सांवरील । कोण हरिविणें ? ॥ध्रुवपद.॥
भक्तांचा पूर्ण काम । कर्ता निजमूर्ति राम । पडों नेदी सर्वथा उणें ॥गेला०॥१॥
शरण मनोभावें । तयालागीं जावें । मग कैंचें येणें जाणें ? ॥गेला०॥२॥
मागें रक्षिलें जैसें । पुढेंही रक्षावें तैसें । भक्तांसाठीं अवतार घेणें ॥गेला०॥३॥
निजरंगीं रंग भरो । कीर्तनीं हेंचि घडो । सार्थकता तरिच जीणें ॥गेला०॥४॥

पद १६ वें
ब्रह्म सनातन रे ! । तो हा ॥ध्रुवपद.॥
निगमागमनितशास्त्रविशारद । अवलीला तनु रे ! ॥तो हा०॥१॥
हरिहरसुरनर वंदिति ज्याचें । पदरज पावन रे ! ॥तो हा०॥२॥
रंगनाथसुतपालक तूं रे ! । दुःखविनाशन रे ! ॥तो हा०॥३॥

पद १७ वें
आतां रामपायीं मना ! लाग वेवें । सोशिलें बहुत अन्याय मागें ॥ध्रुवपद.॥
जन्मजन्मांतरीं मास नव दाथरीं । निरजसेजेवरी उदरकुहरीं ।
घातलें अघपुरीं शिणविलें यापरी । काय सांगूं तरी दुःखलहरी ? ॥आतां०॥१॥
न निघतां बाहेरी जेंवि वोढे सरी । जन्मद्वारीं करी अटक भारी ।
उपजलियावरी मूढवृत्ती धरी । रडत को‍ऽहंस्वरीं देहधारी ॥आतां०॥२॥
बाळपण खेळतां तरुण उन्मादता । विषयलोलुप्यता चित्त होतें ।
वृद्धपण आलिया गलिततनु झालिया । स्मरणपद गेलिया स्वहित राहातें ॥आतां०॥३॥
श्वानसूकरखरा मार्जरा वानरा । कृमी कीटकधरा पाययोनी ।
त्यांचिया ऊदरीं जन्मलों जेधवां । अभक्ष तें भक्षिलें न समजोनी ॥आतां०॥४॥
पुनरपी सांगणें हेंजि तुज मागणें । निशिदिनीं जागणें श्रीहरीभजनीं ।
निगमागम बरें दाविती तें खरें । तेंचि तूं आचारें विषय त्यजुनी ॥आतां०॥५॥
साधुदर्शन पहा सतत भजनीं रहा । लाविसि जरि देह हा रामकाजीं ।
रंगसी निजपदीं मोहमायानदी । आटली जाण घे भाष माझी ॥आतां०॥६॥

पद १८ वें
तो योगी । विषयीं वितरागी । अंतरीं निःसंगी । शमदमकरुणा आंगीं ।
आपुलें निजसुख भोगी । नित्यानित्यविवेक विचारुनि दृश्य पदार्थहि त्यागी ॥१॥
आघातीं । तो न ढळे कधिं चित्तीं । नच सोडी हरिभक्ति । अनृत नये वचनोक्ती । लाभालाभ स्तुतिनिंदासम केवळ तो निजमूर्ती ॥२॥
तो पाहे । सर्वहि ब्रह्मचि आहे । गर्जन तर्जन साहे । देहाभिमान न वाहे । त्रैलोक्याचें निजपद घेउनि अखंड तन्मय राहे ॥३॥
तो ज्ञानी । सत्ता सुख जो मानी । चिद्रत्नाची खाणी । लावुनि ऐक्यनिशाणी । वेद जया वाखाणी । रंगातीत निजरंगपदीं जो खेळे अचळ विमानीं ॥४॥

पद १९ वें
भवसिंधु बिंदूवत रे ! हो त्याला ॥ध्रुवपद.॥
स्वप्नींचा गज लागे पाठीं । हें तव जागृतिं न दिसे दृष्टी ।
स्वरुपीं निमग्न चित्त रे ! । हो त्याला ॥भवसिंधु०॥१॥
जगनग पाहातां ब्रह्मीं सुख गणी । पाहातेपणही गेलें विरोनी ।
शुद्ध बुद्ध नित्य मुक्त रे ! । हो त्याला ॥भवसिंधु०॥२॥
निजरंगीं रंगले संत । सत्यपूर्णज्ञानानंत ।
विदेही वर्तत रे ! । हो त्याला ॥भवसिंधु०॥३॥

पद २० वें
भगवंत भक्त उभयतां समसाम्य ऐक्यस्वरुपीं ।
निरुपमासि उपमा द्यावी अघटित न घडे कदापी ।
‘ तन्न ’ ‘ तन्न ’ होउनि ठेली श्रुति शास्त्र पूर्णप्रतापी ।
अनुभवी अनुभवती त्या परब्रह्म सर्वही व्यापी ॥भगवंत०॥१॥
सिंधूदक मेघवदनें वरुषलें सहजस्वभावें ।
भागीरथि गंगा कृष्णा पावल्या विविधा नांवें ।
स्वस्वरुपीं मिळुनी मिळुनी पुनरपि मिळत जावें ।
शिव होउनियां शिवभजनीं चालतिल अनुदिनिं भावें ॥भगवंत०॥२॥
लव पल जल स्थीर न राहे चालतसे भजनप्रवाहीं ।
गत्यंतर पाहतां दृष्टी अणुमात्र दुसरें नाहीं ।
देव भक्तसिंधु त्या रीती दोनही एकचि पाहीं ।
दर्शन स्पर्शन पानें पावन जनविजन सदाही ॥भगवंत०॥३॥
जीवजंतु जडमूढ प्राणी वापिका कूप तडागें ।
दैवबुद्धि कोंडुनि केली या मनाच्या पैं संगें ।
ह्मणवुनि ते विभक्त जाले नेणति मी निजांगें ।
भुक्तिमुक्ति जगदुद्धारीं रंगले सहज निजरंगें ॥भगवंत०॥४॥

पद २१ वें
सद्गुरुकृपें कल्याण ऐसें झालें । द्वैताद्वैत निरसोनि अवघें गेलें ॥ध्रुवपद.॥
अनुभवपंथें निरखितां देहभाव । देही नसतां विदेही ह्मणणें वाव ।
लतकें नसतां सत्यासि कैंचा ठाव ? । गेला गेला समुळीं भावाभाव ॥सद्गुरु०॥१॥
कैंचा भाव अभाव उरला आतां ? । देव म्हणणें हा ठाव नाहीं भक्ता ।
समरस होतां तो हेत नाहीं होता । सृष्टी अवघा भरला राम दाता ॥सद्गुरु०॥२॥
ऐशी खूण दावितां सद्गुरुराव । नुरेचि तेथें तत्काळ सोहंभाव ।
सुखदुःखाचें भेदित गेलें नांव । रंगेंवीण रंगला स्वयमेव ॥सद्गुरु०॥३॥

पद २२ वें
गुरुपदीं जडलों मी जडलों मी । द्वैतभया सुटलों मी ॥ध्रुवपद.॥
जें जें भासे दृष्टी । तें तें ब्रह्मचि व्यष्टि समष्टी ॥गुरुपदीं०॥१॥
व्यतिरेकान्वय दोनी । मज मी वांचुनि नाहीं कोणी ॥गुरुपदीं०॥२॥
गुरुमय झालों आतां । अभंगरंगा मिनलों स्मरतां ॥गुरुपदीं०॥३॥

पद २३ वें
अवघा तूंचि हरि रे ! तूंचि हरी । तूं जीवन मी लहरी ॥ध्रुवपद.॥
जननि जनक तूं बंधू । सखा जिवलग करुणासिंधु ॥अवघा०॥१॥
सद्विद्या निजधन तूं । देउनि तोडिशि भवबंधन तूं ॥अवघा०॥२॥
निजरंगा तूं पाहीं । अनघा तूंचि मीतूं नाहीं ॥अवघा०॥३॥

पद २४ वें
मुळींच तें नाहीं तें नाहीं । अनादिसिद्ध मी पाहीं ॥ध्रुवपद.॥
माया साच असावी । मग म्यां विवेकें उगवावी ॥मुळींच०॥१॥
भवयोगी जरि व्हावें । तरि म्यां रामरसायण घ्यावें ॥मुळींच०॥२॥
अभाव असावा गांठीं । मग म्यां भाव धरावा पोटीं ॥मुळींच०॥३॥
निजरंगीं रंगला । त्याचे उगमीं संगम जाहला ॥मुळींच०॥४॥

पद २५ वें
मग ते माया काय करी ? । स्मरतां नित्य हरी ॥ध्रुवपद.॥
नामरुपात्मक सकळहि नाशक । निश्चय हा विवरीं ॥मग ते०॥१॥
शांतिदयापर श्रवणीं सादर । भवभ्रम न उरे उरीं ॥मग ते०॥२॥
सहज पूर्ण निजरंगीं रंगुनी । सद्गुरुपाय धरीं ॥मग ते०॥३॥

पद २६ वें
भक्तांसि भगवद्भजनें । भवसागर मृगजळवत् रे ! ।
चिद्विलास जगनग हेमी । वस्तुत्वें भेदातीत रे ! ।
अस्ति नास्ति प्रियरुप आत्मा । तो नामरुपाविरहित रे ! ।
होउनियां अनुभव ऐसा । हरिभजनीं रत अद्भुत रे ! ॥१॥
जाळिलें संचित समुळीं । ज्ञानाग्नीमाजी निगुती ।
क्रियमाणपूर्णप्रवाहें । विधिपूर्वक कर्में घडती ।
निर्हेतुक निरहंकारें । ब्रह्मार्पण सहजचि होती ।
प्रारब्ध कलेवर भोगी । साक्षी हा ईश्वरमूर्ती ॥२॥
अहिकुंडलवत् तनु पाहतां । संतोष विस्मय न वसे ।
मृत्तिकेवरि कुल्लालें । घट कोठुनि आणीलासे ? ।
तैसें या विद्वद्वर्या । स्वरुपाविण आन न भासे ।
रंगला या निजरंगीं । निरतीशय सदनिं विलासे ॥३॥

पद २७ वें
स्वानंदें उन्मत्त रे ! तो योगी ॥ध्रुवपद.॥
देहबुद्धीवरि नाहिंच साधू । देहीं देहातीत रे ! ॥तो योगी०॥१॥
रामरसीं मन उन्मन होउनि । अखंड डुल्लत रे ! ॥तो योगी०॥२॥
निजरंगीं निःसंग निरामय । ब्रह्म सदोदित रे ! ॥तो योगी०॥३॥

पद २८ वें
फिरोनियां काय वण वण वण ॥ध्रुवपद.॥
गोड दिसे बहू रंग जनाप्रति । अंतरिं उद्वस वन वन वन ॥फिरो०॥१॥
तीर्थ तपें बहु केलीं जरी ते । जागति षड्रिपु दण दण दण ॥फिरो०॥२॥
पूर्णरंगपदीं शांति नये जरी । कामज्वरें तनु फण फण फण ॥फिरो०॥३॥

पद २९ वें
सावध सावध सावध मनुजा ! । निजरूपिं सावध रे ! ॥ध्रुवपद.॥
हिताहित मन न विचारिसि कां ? । झांकुनि नेत्र सदा ।
कामकर्दमीं लोळसि निशिदिनिं । मानुनि सौख्यमदा ।
वीज लऊनि सरे सुख तेंवी । वेगिं घडे आपदा ।
इंद्रियग्राम विराम पडे मग । बोलसि राम कदा ? ॥सावध०॥१॥
सिंह जळीं प्रतिबिंब विलोकुनि । निरखुनि देत बुडी ।
हंस गगनिंच्या तारा उदकीं । घालित तेथ उडी ।
मूढ कसा मृग नाभि उपेक्षुनि । हिंडत बुद्धि कुडी ? ।
तेंवि सखा हरि सांडुनियां दुरि । फिरसी देशधडी ॥सावध०॥२॥
इंद्रजाल मृगतोय तसें जग । दंभरसें विलसे ।
स्वप्निं दिसे गज मत्त तुरंगम । संभ्रम तेंवि दिसे ।
क्रूर भवार्णविं कर्णधार गुरु । आन उपाय नसे ।
पूर्णरंग निज रामपदीं मग । दुर्गम काय असें ? ॥सावध०॥३॥

पद ३० वें
आम्ही नमुं त्याला नमुं त्याला । उपाधि नाहीं ज्याला ॥ध्रुवपद.॥
संशय उरला नाहीं । अवघा ब्रह्मचि झाला पाहीं ॥आह्मी०॥१॥
स्वयंभु मुळिंचा आहे । द्वैतपणासि गिळूनि राहे ॥आह्मी०॥२॥
समूळ अवघें हरलें । पूर्ण निर्गुण जयासि कळलें ॥आह्मी०॥३॥
रंगनाथ गुरु पाहे । त्याचा अनुभव दुसरा नोहे ॥आह्मी०॥४॥

पद ३१ वें
राममय वृत्ती झाली आतां काय उणें ।
अहंकार दग्ध झाला स्वात्मसुख घेणें ॥ध्रुवपद.॥
ज्ञानदीप लावुनि ज्योती तिमिरनाश केला ।
मजमाजी पहातांची स्वप्रकाश झाला ॥राममय०॥१॥
जीव शिव ऐक्य झालें जग ब्रह्म दीसे ।
पशुपक्षी नानायाती एकाकार भासे ॥राममय०॥२॥
बोली बोलुनि मुनी गेले आतां काय बोलूं ? ।
पूर्ण सेजेवरी आम्हीं रंगीं रंगुनि डोलूं ॥राममय०॥३॥

पद ३२ वें
रंगीं रंगवि बाप अनुरंगा । टाका मायामोहाच्या संगा ॥ध्रुवपद.॥
ब्रह्मरसाची भट्टी उतरावी । स्वानुभवठसें ठसवावी ॥रंगीं०॥१॥
रंगीं रंगतां बहुत व्हावें धीट । शांतिवस्त्र नेसावें चोखट ॥रंगीं०॥२॥
रंगीं रंगनाथ रंगले कैसें ? । ज्योती ज्योत मिळुनि जाय जैसें ॥रंगीं०॥३॥

पद ३३ वें
तोंवरि तळमळ रे ! तळमळ रे ! । नाहीं भक्तीबळ रे ! ॥ध्रुवपद.॥
विवेक जागा करिना ।जोंवरि शांति जिवीं दृढ धरिना ॥तोंवरि०॥१॥
उदंड करितां कर्म । चुकला परब्रह्मिंचें वर्म ॥तोंवरि०॥२॥
रंगनाथगुरुपायीं । जोंवरि मन हें मुरलें नाहीं ॥तोंवरि०॥३॥

पद ३४ वें
चित्उदधि निजरंग । भासे जगदाकार तरंग. ॥ध्रुवपद.॥
माया मृगजळ शाश्वत नसतां । धांवति जेंवि कुरंग ॥भासे०॥१॥
दृग्भ्रमयोगें रज्जु न जाणे । वाटे तीव्र भुजंग ॥भासे०॥२॥
पुत्रकलतगणगोत्रमित्रधन । गज रथ धेनु तुरंग ॥भासे०॥३॥
सहज पूर्ण निजरंगीं रंगुनी । होय सहज भवभंग ॥भासे०॥४॥

पद ३५ वें
भुलला रे ! भुलला रे ! प्राणी भुलला या आभासा रे ! ।
आत्मकळा न कळे भ्रमला नर व्यर्थ पराक्रम गेला रे ! ॥ध्रुवपद.॥
श्रुतिपरायण शास्त्रसुभाषित उत्तम पंडित झाला रे ! ।
योगकळा सकळा अनुलक्षित वायु समग्रहि प्याला रे ! ।
भूतभविष्य गमे, समयीं यमनियमहि वश्य तयाला रे ! ॥आत्म०॥१॥
आचरला तप, सर्वहि उत्तर दक्षिण मानस केलें रे ! ।
योग क्रिया विधितें विधिपूर्वक मंत्राराधन झालें रे ! ।
आगम साधुनि शक्ति उपासुनि वैदिक सिद्धिस नेलें रे ! ॥आत्म०॥२॥
आसन घालुनि अंतरिक्ष रविमंडळ भेदुनि राहे रे ! ।
बोधक शक्ति बृहस्पतिसदृश, विक्रम शक्र न साहे रे ! ।
साधक बाधक सर्व सुचे पुरुषार्थहि त्रैविध पाहे रे ! ॥आत्म०॥३॥
क्रूरपणें आति आचरला कळिकाळहि दृष्टिस नाणी रे ! ।
शूरपणें अमरावति जिंकुनि सत्वर अमृत आणी रे ! ।
वाक्य वृथा न वदे सहसा विधि सभ्य अनश्रुत वाणी रे ! ॥आत्म०॥४॥
नित्यानित्य विचार विलोकुनि शुद्ध विराग धरावा रे ! ।
भावबळें गुरुराजपदांबुजिं आश्रय पूर्ण करावा रे ! ।
रंग अभंगचि जनिं निज निश्चय मीपण हेत हरावा रे ! ।
नेति मुखें श्रुति येथुनि तन्मयशब्दीं निशब्द वरावा रे ! ॥आत्म०॥५॥

पद ३६ वें
देखा नाथ गोपाळा । जगमो ॥ध्रुवपद.॥
कलयुग म्या ने ले अवतार । आपरूप अविनाशी ।
चारो मुक्ती सेवा करिती । होकार उनकी दासी ।
घटपर घटमों आप रमे हें । आप गुरु आप चेला ॥जगमो०॥१॥
जोग जुगतमें हमेसा खेले । झूटे घरमे झूले ।
छह अठरांका बिचार लेकर । पंडत होकर डूले ।
......................... सब । संतनमों नाथ रंगेला ॥जगमो०॥२॥
रंगनाथ जन गुरु बनले । आप दुजा नहि कोई ।
अंदर बाहिर भजले भाई । रूप रेखा नाहीं ।
गुरुनामका धोंशा बाजे । निरगुन खेल खेला ॥जगमो०॥३॥


N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP