मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
प्रेमाबाईकृत पदें

प्रेमाबाईकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
गडे हो ! कृष्ण गडी अपुला । यमुनाडोडीं बुडाला ॥ध्रुवपद.॥
कालिया डसेल कृष्णाला । होइल विषबाधा हरिला ।
हाका मारिल अपुल्याला । तुह्मी तरी स्वस्थपणें बसलां ।
अतां कोण सोडविल रे ! त्याला ॥यमुना०॥१॥
गाई त्याविण हंबरती । वासरें स्तनपान न करिती ।
यापरि गोप सर्व रडती । मुखानें कृष्ण कृष्ण म्हणती ।
अतां काय भेटेल अपुल्याला ॥यमुना०॥२॥
यशोदा पुसेल जरि हरिला । सांगों काय तरी तिजला ? ।
नंद ह्मणेल त्वां नेला । हलधर मारिल तो मजला ।
अतां काय जावें गोकुळाला ॥यमुना०॥३॥
दहिं दुध लोणीं म्यां हरिलें । हरीला ताक बळें दिधलें ।
येइना ह्मणोनि करिं धरिलें । वृक्षा बळकट बांधीलें ।
म्हणोनि तो मजवर रुसला ॥यमुना०॥४॥
पेंदा धांवुनिया आला । बळकट कृष्णाला डसला ।
त्याचे पाठीवरि बसला । ओझें झालें बहु त्याला ।
म्हणुनि तो पळत पळत आला । भेटला प्रेमाबाईला ।
गडे हो कृष्ण गडी अपुला ॥यमुना०॥५॥

पद २ रें
गडे हो ! कृष्ण गडी अपुला । राजा मथुरेचा झाला ॥ध्रुवपद.॥
टाकुनि काळा कांबळा । कांसे पीतांबर कसला ।
टाकुन मयूरपिच्छाला । जडित मुगुट घातला ।
अतां काय ओळखिल अपुल्याला ॥राजा०॥१॥
काढिली गुंजाची दाटी । घातला कौस्तुभ श्रीकंठीं ।
टाकुनि मुरली वेताटी । हातिं घे आयुधें गोमटीं ।
अतां काय बागुलभय त्याला ॥राजा०॥२॥
गोधनें चारूं विसरला । आतां तो नृपामधें शिरला ।
नारिनें उरीं धरुनि चुरला । अतां तो कुब्जेनें वरिला ।
देतसे निजपद प्रेमेला ॥राजा०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP