शाहीर हैबती - सहदेव भाडळी

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


अमावस्येवरून धारणेचें फळ.
अमावास्येचें फळ तुम्हां सांगतें सहदेवा ।
भाडळीचा दाखला ग्रंथांवई तो शोधावा ॥ध्रु०॥
रविवारीं हो आली अमावस तरी धान्य स्वस्त होय ।
राजा प्रजेसी सुख उपजे आनंदांत राहे ॥१॥
सोमवारीं आली अवस जरी उत्तम ती आहे ।
सत्कर्मीं वर्तावें धारण महाग न होये ॥२॥
मंगळवारीं आल्या अवस दुःख होत आहे ।
काळ पडेल म्हणवोनी उपजे चित्तामधिं भय ॥३॥
बुधवारीं ती अवस येतां शांति सुख जाय ।
सर्व जिवासी क्लेश न होती धान्य सवंग होय ॥४॥
गुरुवारची अवस मोठी सदा सुख पाहे ।
प्रपंचाची नको काळजी धान्य स्वस्त होय ॥५॥
शुक्रवारची अवस मध्य्म सर्व फळ पावे ।
कण मिळती बहुत परंतु रोग वृद्धि होय ॥६॥
शनिवारीं आली अवस ती नाशक होय ।
धारण महाग होईल जिवासी पीडा न साहे ॥७॥
अवस आणि संक्रांत जरी एकेवारीं होय ।
धान्य महाग होईल जिवाला पीडा बहु आहे ।
ऐसें फळ हें एक महिना प्राप्त तें होय ।
भाडळीचें सांगणें हैबती मुखें गात आहे ।
ज्योतिषांतील हेतु कळविला लटिका न मानावा ।
भांडळीचा दाखला ग्रंथातरी तो शोधावा ॥८॥


घबाड मुहूर्त
घबाड महूर्त केव्हां येतो ओळख सांग त्याची ।
बोले भाडली सहदेवासी खुणा ज्योतिषाची ॥ध्रु०॥
सूर्य नक्षत्रापासून दिवस नक्षत्र मोजावे ।
तिप्पट करुनि तिथी मिळवुनी सातें भागावें ॥१॥
तीन शेष राहतां घबाड आलें जाणावें ।
मध्यावरती येतां कायी सत्वर निघावें ॥२॥
सर्व कार्या लाभकारक अवश्य घ्यावें ।
ऐसे मुहूर्तीं गमन करितां सुख संपत पावें ॥३॥
म्हणे भाडळी सहदेवासीं घबाड साधावें ।
सांगे हैबती याचे दाखले ग्रंथातरिं पहावें ।
उत्तर मुहूर्त तुजला कथिला प्राप्ती यशाची ।
बोले भाडळी सहदेवासी खुणा ज्योतिषाची ॥४॥


तिथींविषयीं शुभाशुभ फळें
भाडळी सांगे सत्यवचन हे सहदेवालागीं ।
तिथि ज्ञान परियेस तयाचें गुण एके वेगीं ॥ध्रु०॥
प्रतिपदा ती उत्तम आहे कायी योजावी ।
द्वितिया आहे कार्यसाधिनी आवश्य घ्यावी ॥१॥
तृतीया तैशी क्षेमारोग्य प्राप्तिस्तव पाहावी ।
चतुर्थी आहे पीडादायक तिजला त्यागावी ॥२॥
पंचमी तर लक्ष्मीकारक यश सदा दावी ।
षष्ठी पाहतां कष्टी करिते ती तर नसावी ॥३॥
सप्तमी ही सखी आदर सत्कार घ्यावी ।
अष्टमी तर व्याधी उपजे क्लेश भोगावी ॥४॥
नवमी मंठी नाशकारक तिजला सोडावी ।
दशमी आहे हितकारक न टाकावी ॥५॥
एकादशी ती उत्तम आहे कधीं न सोडावी ।
द्वादशी ती प्राणघातकी द्रव्याला हरवी ॥६॥
त्रयोदशी ही कार्यासिद्धि कामीं योजावी ।
चतुर्दशी पौर्णिमा वाईट सदा दुःख दावी ॥७॥
अमावस्या ही मोठी क्रोधी कार्या नसावी ।
ज्योतिषाच्या पोरा सत्वर टाकोनियां द्यावी ॥८॥
कवि हैबती म्हणे तिथि त्या पहा अंतरंगीं ।
तिथि ज्ञान परियेस तयाचे गुण एके वेगीं ॥९॥


यमघंट योग
( लावणी )
यमघंट हा योग त्यावर कार्य तें नोहे ।
बोले भाडळी सहदेवासी ज्योतिषांत पाहे ॥ध्रु०॥
रविवारीं त्या मघा आल्यावर शुभ कार्य नोहे ।
नारदाची नारदी झाली शोधुनिया पाहे ॥१॥
सोमवारीं आल्या विशाखा काय झालें आहे ।
दुर्योधनाचे मांडीवरती भीमगदा घाय ॥२॥
मंगळवारीं येती आर्द्रा दुःख प्रपत होय ।
चंद्रासी तो कलंक लागल आद्य पि आहे ॥३॥
बुधवारीं हें मूळ आलें तरी घातक तें पाहे ।
भस्मासुराचें भस्म झालें कांहीं न राहे ॥४॥
शुक्रवारीं कृत्तिका असतां दुःख भोगिताहे ।
तेवेळीं मारिला कीचक एक मुष्टिघायें ॥५॥
शुक्रवार अनुराधा असतां टाकुनिया जाय ।
इंद्रजिताचा घात झाला रामायणिं पाहें ॥६॥
शनिवारीं तो हस्त येईल तरी मोठें विघ्न होय ।
यमपाशाचें दुःख भोगिलें तो मार्कंडेय ॥७॥
यमघंटावर गमन मरेल करितां तो पाहे ।
गृहप्रवेश होतां त्याचा कुलक्षय होय ॥८॥
देवादिक स्थापितां मरणा कारण तें आहे ।
जन्मल बालक तरि तें मरूनिया जाय ॥९॥
कवि हैबती गातो गुण वानितो भाडळी ।
ज्योतिषामधीं पहा दाखले मेडंगमताचे ॥१०॥ ( मिळवणी )


मृत्युयोग
( लावणी )
भाडळी सांगे ऐक सहदेवा माझी ही गोष्ट ।
वर्ज करों कार्यासी मृत्युयोग सांगतसे स्पष्ट ॥ध्रु०॥
रविवारी अनुराधा सीता रावणानें नेली ॥
सहा महिन बंदीत असतां वश नाहीं झाली ॥
चंद्रवारीं उत्तराषाढा द्रौपदिला हरैविली ॥
वस्त्रें हरण केली हरीनें लज्जा रक्षिला ॥
मंगळवारीं शततारका विश्वा मत्रें छळिलें ॥
तारामति हरिचंद्र दोघें नीचासी विकलीं ॥
बुधवारीं अश्विनी नळाची दमयंती पाडिली ॥
कष्ट सोसले बहुत ती तर दैवाला भ्याली ॥
गुरुवारीं मृग आला ते दिनिं अभिमन्यू पडला ॥
यास्तव पार्था दुःख जाहले भीमहि घाबरला ॥
शुक्रवार स्वातीला राजधर्म राज्य हरला ॥
द्यूत खेळतां पण लाविला राज्यासी मुकला ॥
शनिवारीं तो हस्त लक्ष्मणा शक्ति लागली ॥
मारूतीसी बहुकष्ट झाले वल्ली आणविली ॥
असे कुयोग असतां कार्या गेले बहु योगी ॥
कार्य न होतां परत आले हैबतिची सांगी ॥भाडळी सांगे॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP