शाहीर हैबती - सिमंतक मणी

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


सिमंतक मणी - भागवतावरील
( चढ )
तुम्ही शीघ्र कविराज कळेना बुद्धिचा अंत ।
कवन करितां शास्त्रयुक्त लावुनिया दृष्टांत ॥ध्रु०॥
प्रतीसूर्य दुसरा सिमंतक मणी तेजवान ।
त्यावर भास्कर कंठी शोभे अति प्रकाशमान ।
रविपासुन घेतला हिरावुन सत्राजित भुपानं ।
पुढें जांबुवंता अंद्दण दे श्रीभगवान ।
हें कथानुसंधान आहे भागवती साद्यंत ॥१॥
मणी आधी जातीचा किती आहे सांगा वजनाला ।
किती तोळे किती शेर अर्थ आणावा ध्यानाला ।
सोनें देत नऊ भार ठाऊके लहान थोराला ।
भार कशाला म्हणती पाहा याचा अनुमानाला ।
कशी आहे मोजणी करावा याचा सिद्धांत ॥२॥
आधीं ठरवावें वजन काय तें एका भागचें ।
प्रमाण त्याचें कसें श्लोक बोलावे शास्त्राचे ।
नऊ भाराचें सुवर्ण झालें किती आकाराचे ।
कळव कुशलता आतां ज्ञान कैसे कविमताचें ।
शोध करा ग्रंथांत जाणता सर्व आदि अंत ॥३॥
सिमंतकाचा प्रश्न पुसला तुम्ही ज्ञाते म्हणून ।
ज्ञानवंत बैसले ऐकतील तुम्ही बोलावी खूण ।
उत्तर केल्याविण गासील तर अब्रूला उण ।
कवि हबतीला आह नाथकृपा पूर्ण ।
वेदांताचा अर्थ उघडा कथितो सिद्धांत ॥४॥

या कवनामध्यें हैबतीच्या स्वतःच्या कवित्वचा निरहंकारी अभिमान व्यक्त होतो. भागवतातील अनुसंधान देऊन प्रश्न विचारण्याचा एक नवा धाटी कवनांत उघड झालेली आहे.

१५
सिमंतक मणी
( उत्तर )
मणी सिमंतक नित्य देतसें सुवर्ण नऊ भार ।
भार कशाला म्हणती याचा ऐका निर्धार ॥ध्रु०॥
ग्रंथी मासा पंच गुंज आणि आठ व्यवहारासी ।
दहा माशांचा कर्ष एक ऐसें म्हणती त्यासी ।
चार कर्ष पळ एकवीस म्हणती पळ विसासी ।
पांच विसीची तुळा, तुळा शतभार एक ज्यासी ।
याप्रमाणें नऊ भार देतसे सोनें साचार ॥१॥
पळास मासे चाळीस आठशे एकवीस जाण ।
एक तुळा ते मासे सहस्र चार परिमाण ।
चार लक्ष भाराचें माएं गणतीचे पाहाण ।
आतां सांगतों तोळे आणी मण शेराचा मान ।
पहावें याचें प्रमाण गणती खरा गुणाकार ॥२॥
तोळे तेहतीस सहस्र तिनसे तेहतीस गणतीस ।
तोळे होवून मासे राहिले चारच बाकीस ।
शेर जाण तेराशे वर अठ्यांसी मोजणीस ।
श्रेर जमा होऊन राहिले तोळे एकवीस ।
मग साडेचवतीस बाकी आठ शेरच विचार ॥३॥
एकंदर सांगतों जमाबंदी एक भाराची ।
दिड खडी मण साडेचार पावणेनऊ शेराची ।
तोळे सवातीन वरता मासा बेरीज नेमाची ।
कवि हैबती म्हणे गणित हे लिलावती साची ।
प्रसन्न नाथ महाराज पूर्ण आहे त्याचा आधार ॥४॥

१६
( चढ )
चतुर ज्ञानी सभे बैसले तुम्ही येऊन ।
अज्ञ बाळ मी प्रश्न पुसतों तुम्हांलागून ॥ध्रु०॥
कौरवांनीं द्रौपदीला छळली कोणा वेळेला ।
कोण वार तिथी होती सांगून द्या मजला ।
विराट नगरी कीचक मेला काय कारण त्याला ।
कोणता योग वार झाला त्याचा मरणाला ।
रुक्मिणीपायीं शिशूपाल तो रणीं पडून ॥१॥
सीतेसाठीं रावणानें भिक्षा मागितली ।
शंकराचेसाठीं पार्वती भिल्लीण झाली ।
कोणता वार तिथी तेव्हां आली ।
पुतना मावशी हरिनें शोशून स्वर्गीं पोचविली ।
गौतम शापें अहिल्या शिळा गेली होऊन ॥२॥
कवि हैबती म्हणे तुम्हांला द्यावें उत्तर ।
हात जोडुनी प्रार्थना माझी तुम्हां वारंवार ।
रामायण भागवताचा घेऊनी आधार ।
सांगा कवि तुम्ही सुज्ञ बैसला याचा विचार ।
हीच विनंती माझी तुम्हांला होऊनिया लीन ॥३॥

पुराणांतील निरनिराळ्या घटना ज्या वेळीं झाल्या त्या वेळीं कोणता वार, तिथि, व योग होता हें नेमकें सांगा, असा प्रश्न हैबती करीत आहे. हैबतीचें ज्ञान किती खोल होतें, हें यावरून समजतें. याचें उत्तर हैबतीला खात्रीनें माहीत असेल. परंतु तें उत्तराचें कवन मिळालेलें नाहीं.

१७
( चढ )
वाल्मीकी रामायणावरून श्रीधर टीखाकार ।
रामविजय प्राकृत संस्कृत मूळचा आधार ॥ध्रु०॥
तीनशें योजनें त्रिकोनी बेट आहे लंका ।
तेथील राजा रावण त्याचा त्रिभुवनी डंका ।
तेहतीस कोटी देव बदीला कोण गणतीलार का ? ।
कांचनमय तें गाव काय द्रव्याची आशका ।
सबळ हुडे शाहानव आणि सहस्र चार ।
त्यावर चढले कपी वीर गरजती जयजयकार ॥१॥
येका वानरा आंगीं सांग किती गणती गेमाची ।
जागोजागीं किती करावी गणती नेमाची ।
किती सिरा किती सटीवर किती बेरीज पुच्छाची ।
चौणयावर किती मोजणी किती आहे तोडाचा ।
जमा एक शरिराची बेरीज करून साच्यार ।
मग एकंदर सांग पद्म आठराचा आकार ॥३॥
येक बुरुज किती उंच रुंद घरे फरे मोजावा ।
किती हात गज किती तसु किती गणती लावाया ।
किती बुरुज थोरले धाकटे किती शोध लावा ।
दोन हुड्यांमधीं अंतर किती हात किती तसु पाहावा ।
आधीं काट गिरदीची मोजणी करून निर्धार ।
मग बुरूज वाटणी नीट बसावी ताळेवार ॥३॥
ज्या वेळीं वैश्वणपुरी निर्मिली ब्रह्म नें ।
ते वेळीचा धडा ग्रं वर्णिला वाल्मिकानं ।
करून पहा चौकशी ग्रंथीचा लावा टिकान ।
उत्तर केल्याविन गासील तर तुजला आहे आन ।
कविराज हैबति भेद गातो शास्त्र आधार ।
प्रसन्न नाथ महाराज मति कवितेसी देणार ॥४॥

१८
( चढ )
ब्रिद डफावर लाऊन फिरतां कवि आडवा होऊन अडवील ।
त्या वेळीं जर शब्द सुचेना तर कुत्र्यावाणी बडवील ॥ध्रु०॥
घरांत आपल्या ब्रिद लावले गाण्याची चढली गुंगी ।
उदंड आला राग तरी का पर्वतास उचलीन मुंगी ।
भैरी ससाण्यावर त्या चालून गेल्या चिमण्याच्या चुगी ।
दाहावीस त्यानें लोळविल्या, तूरासीच आली पुंगी ।
शास्त्रसंमतीविण बोलतां कुणी तरी अक्कल घडवील ॥त्या॥
एक पाहिला नर चरण ना कर कांहीं नाहीं त्यासी ।
कुटुंब त्याला नसतां कन्यारूप वेती झाली खासी ।
त्या कन्येस कोणी पतकरेना गर्भित झाली अनायासी ।
तिजपासून कन्या उद्भवली बहूत चांगली गुणरासी ।
तिच्या अंगीं फार करामत मेरू पहाड बगलत दडवील ॥त्या॥
त्या नारीला भ्रतार नसतां पुत्र एक तिजला झाला ।
पुत्र प्रतापी महा पराक्रमी एक अक्षर नांवाला ।
च्यार सिरें त्या नरास कन्या सोळा मग झाल्या त्याला ।
आणिक त्याला पस्तीस वर त्या आला प्रत्ययाला ।
त्यामध्यें एक होती सुलक्षण कैकाला अक्कल पढवील ॥त्या॥
प्रथम कोणता नर, त्या कन्या दोन कोण त्या कविराज ।
सोळा कन्या पस्तिस वर त्या तीन सांग सोडून लाज ।
कविराज हैबती सवाई प्रसन्न नाथ धनी महाराज ।
सबळ मती कवितेसी देतो अक्षरवटी जडणी जडवील ॥त्या॥

१९
( उत्तर  )
ऐकुन घ्यावें उत्तर आतां निर्णय कथितों शास्त्राचा ।
चतुर ज्ञान संपन्न बैसला आन्वय पाहावा अर्थाचा ॥ध्रु०॥
नर म्हणण्याचा भाव वृथा तो ब्रह्मची ते निर्विकार ।
कन्या झाली अहं ध्वनी ते माया देवि सोहंकार ।
ते पति नसता गर्भिण झाल्या कन्या व्याली सुकुमार ।
ते गुण माया असे बोलती शास्त्रांतरी ते कविकार ।
मेरुसारखे दाविल दडविल अंतच नाहीं करण्याचा ॥च॥
पतिविणा ते पुत्र जन्मली ओंकारची म्हणती त्याला ।
शिरें च्यारही कशीं तयाचीं तुम्हीं आणावें ध्यानाला ॥
तिन गुण आणि माया चवथी सह्रीर नाहीं शून्याला ।
शून्य ब्रह्म तें आदी अंतीं चार शिरें त्या चौघाला ।
पांच मिळून ओंकार एकाक्षरी नाव अर्थ बहु त्याचा ॥च॥
ओंकारापासून कन्या सोळा आकारी झाल्या निर्माण ।
पुढें झाल्या पस्तीस ऐसे वाटणिचें परिमाण ।
आदी माया ते मूळची आरधी साडे बावणावी पहावी ।
तिचें सुलक्षण आहे सर्वांमधीं सर्वावर तिचें ठाण ।
बावनाला तिच चेष्टवी शब्द मायिना कवणाचा ॥च॥
अर्थ आहे प्रश्नाचा होसाचा समजून घ्यावें चित्तासी ।
पंचकर्ण सिद्धांत दाखला वेदांत आहे त्यासी ।
ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ निवडला अतर नाहीं रती ज्यासी ।
कविराज हैबती कवन करी शास्त्रमत दृष्टांतासी ।
प्रसन्न नाथ निरंजन समयोचित मति दे शुभवाची ॥च॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP