शाहीर हैबती - चुडा कटाव

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


गोकुळामध्यें कृष्ण नांदतो बहु आनंदानें । मातेच्या उसन्या
साठीं देवानें घेतलें लहानपण ।
वैराळाचें रूप घेऊनी निघाले भगवान । कौंसाच्या गांवांत
जाऊनी देवांनीं केला मुक्काम ।
चुडा भरा बायांनो, आवघ्या जडितांचं लेणं । मिळून नगरच्या
नारी चुड्य़ाचें करती खंडण ।
उघड उघड पेटारा तुझा दाव सोनेरी । एका एका चुड्याचें
मोल तुम्ही सांगा खरोखरी ।
सव्वा लाख सोने टक्के ऐक सुंदरी । कोठें सूर्याचें तेज पडलें त्या
चुड्य़ावरी ।
शाक शाक पेटारा चुडा तुझा मोलाचा भारी । आम्ही
गरीब गवळ्याच्या सुना दुबळ्या संसारीं ।
तुझा चुडा लेईल ती भाग्याची नार । भाग्याची
नार कमळजा कौंसाची थोर ।
तशीच खबर गेली कमळजेच्या वाड्यास । कोण देशीचा
वैराळ आला आपल्या नगरास ।
जा गं जा गं दासिंनो घेऊन यावे वैराळासी । सवें आणावें
वैराळासी चुडा मी भरतें मनगटासी ।
चाल -
कमळजेचा शब्द ऐकला । हुडकुं लागल्या वैराळाला ।
उभा होतां माणिक चौकाला । बोलती त्याला घराकडे चला ।
पुढें दासी मागे वैराळ आणले वाड्यासी ।
उठून तिनें चंदनाचा पाट टाकला बसायासी ।
कोण गांव कोण नांव, कुठले रहिवासी ।
तुझे सारखा भाचा माझा नांदे गोकुळासी ।
नाहीं गांव नाहीं ठाव आम्ही मुलुखाचे रहिवासी ।
चुडा भराया आम्ही हिंडतो दाही देशीं ।
उघड उघड तुझा पेटारा दाव सोनेरी । एका एका
चुड्याचें मोल तुम्ही सांगा खरोखरी ।
सव्वा लक्ष सोनें टक्के ऐक सुन्दरी । कोठें सुर्याचें
तेज पडलें त्या चुड्यावरी ।
तेव्हा कमळजेनें हात दिला देवाचे हाताशीं । देवाचे
हातासी चुडा मी भरतें मनगटाशीं ।
चाल -
देवानें फिरविली माव, लाविली कळ त्या मनगटाशी ।
घाबरी नार तेव्हां बोले वैराळाशीं ।
आरे आरे वैराळा, चुडा तूं माझा सैल कर । चुडा
सैल कर मनगटीं लागली कळ फार ।
जा गं जा गं दासींनो आणा कुणी विळा खिळा सुरी ।
चुडा कापण्याचें खङ्ग माझें राहिलें घरीं ।
उठून तांतडी कमळजा गेली पतीच्या महालासी ।
उशाखालचें खङ्ग आणुन दिलें वैराळासी ।
अहो अहो मामी जावुन सांगा मामासी । गोकुळचा मी ।
कृष्ण देव आलों युद्धासी ।
अहो अहो महाराज, तुम्हांशीं काळझोप आली ।
उशाखालचें खङ्ग चोरी भाच्याने केली ।
कौंस गडबडून उठून त्यानें पाहिलें कृष्णाला ।
पाहुन देवाचें मुख कौंस चिंतागती झाला ।
अरे अरे भाच्या तू नको मारू मजला ।
तुझ्या घरचा बंदी होऊनी राहीन दरवाज्याला ।
कौंस जेव्हां पळूं लागला हाक मारून उभा केला ।
एका हातानें शीर उडविलें पडलें चरणीला ।
तसेंच शीर घेऊनी गेले बंदीशाळेला ।
कृष्ण ओवाळीता शीर त्यानें ठेवलें आरतीला ।
एकुलता एक बंधु त्वा कैसा मारीला ।
सहा मुलें मारलीं तुझीं तेव्हां कष्टी नाहीं झाली ।
एका शिरासाठीं आई तूं घाबरली ।
ऐसा वैरी मारिता दोष नाहीं जननी ।
कवि हैबति म्हणे आनंद झाला गोकुळ अंगणी ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP