शाहीर हैबती - देवास प्रार्थना

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.



दिनजनतारक सुखदाई । ए पंढरपुरची आई ॥
विठ्ठला विषयलोभ मायाजाळीं । पडलों बहुत जंजाळी ॥
संसारदुःखाची जाळी । गुंतलों जसा मीन जळीं ॥
कामानळ हृदय जाळी । अंधार गडद तम जाळी ॥
चाल -
याविषयीं मनीं जरी धरिसी । तरी यांतुनि पार करिसी ।
उद्धरसी अवघड कांहीं । घातली दृढ मिठी पायीं ॥१॥
हरि तारिलेंसी बहुताला । तें ठाऊक आहे संताला ॥
मी बुडतों या वक्ताला । मज काढि धरूनि हाताला ॥
मजविषयीं आळस चित्ताला । आग लागो या संचिताला ॥
चाल -
तस्मात थोर प्रारब्ध । त्यानें तुज केलें स्तब्ध ।
ही वाटे मज नवलाई । सर्वोत्तम शेषशायी ॥२॥
चांडाळ पापी उद्धरले । हें माझें हृदयीं भरलें ॥
मजविषयीं कठिणपण धरलें । तरि काय देवपण उरलें ॥
नामानें पर्वत तरले । तें ब्रीद आज काय हरलें ॥
चाल -
परब्रह्म भगवंत । तुजहूनि कोण आहे बळिवंत ।
किती गे अंत पाहसी विठाई । कटिवर गण आले ठायीं ॥३॥
तुजवीण पंढरीराया । आहे कोण दुजा ताराया ॥
करूनिया कर कृपाछाया । दे मजला निजपदीं ठाया ॥
नुरवी सकळ हा भ्रम वाया । पुनरावृत्ति न लगे काया ॥
चाल -
लडिवाळ तुझा मी तान्हा । पाजी प्रेमप्रिति पान्हा ।
वत्साप्रति जसि गाई । म्हणवुनि स्तुती हैबती गाई ॥४॥


स्वहित करून घ्या मनुजा कर्म असे नडवी ।
स्वहित करावें परन्तु योग जन अडवी ।
मुक्तिबंधन करावें परंतु मोह माया गडवी ।
कवि हैबती म्हणे मायेचा फासा कोण सोडवी ।


मूळ आधीं ओंकार बिंदु युक्त करा श्रवण ।
शब्द चक्र बीज प्रचिती घ्या संमतिला लावुन ॥ध्रु०॥
नसें नामरूप ब्रह्मनिरामय हा ज्याचा गुण ।
शुद्ध ब्रह्मीं ‘ ब्रह्म मी ’ ऐसें झालें स्फुरण ।
‘ अहं ब्रह्म ’ म्हणतांची ओंकार झाला त्यापासून ।
तोचि पहा ओंकार पंच प्रकार दीर्घ पूर्ण ।
भेदअभेदाविरहित सर्वगत तो भगवान् ।
“ एकमेकाद्वितीयं ब्रह्म ” तैसी आहे ठेवण ॥१॥
प्रथम तारक ज्ञात्वा रजोगुण ब्रह्मा अकार ।
द्वितीयं इंद्र कवच तो सत्वगुणी विष्णू उकार ।
तृतीयं कुंडलाकार रुद्र तमोगुणी देव मकार ।
अर्धचंद्र तोच चतुर्थ अभिदान त्यास ईश्वर ।
पंचम बिंदु तोच सदाशिव साराचें सार ।
सोहं ब्रह्म जे प्रणव पंच देवाचा हा ओंकार ।
“ ऊर्ध्वमूल मधः शाखा ” वृक्ष ‘ उष्वा ’ आंत त्रिभूवन ॥२॥
स्थूल देह ऋग्वेद वैखरी त्रिकूट ते विधिचें ।
मात्रा रहस्य ऐका स्थूळ तें आहे जागृतिचें ।
लिंग देह यजुर्वेद मध्यमा श्रीहाट विष्णुचे ।
दीर्घ शून्य मातृका हें विवरण श्रीहाटस्थळिंचें ।
पश्यंति सामवेद कारण गोल्हाट रुद्राचें ।
मातृका सुफलित नेत्रीं स्थान सुषुप्तीचें ।
त्यवरते त्यापरते त्याची धर आठवण ॥३॥
औटपीट हा सोमेश्वर तो आले चौथेस्थानीं ।
तो महा कारण देह अर्ध मात्रा आहे ते भुवनीं ।
वेद अथर्वण परावाचा ही आहे ते ठिकाणीं ।
तेथें दिव्य सुंदरी म्हणति जीस तुर्या कामिनी ।
पंच बिंदु सदाशिव भ्रमर गुंफा स्थानीं ।
अनिर्वाच्य तें परात्पर ज्ञान देह उन्मनी ।
अगाध महिमा तेथें त्रैलोक्याची सांठवण ।
कविराज हैबति सदोदित नाथांचें करी ध्यान ॥४॥


नरदेहसाधन
योनि लक्ष चौर्‍यांशी फिरतां । एकदां या नरदेहा आला ।
येथें जरी साधन घडेना । तरी जन्म व्यर्थची झाला ।
सर्व देहांमध्यें उत्तम नरदेह । जाणपणा अंगीं असतां ।
ममता माया मोह भ्रमीं । लागुनी भ्रम पडला वेडा नसतां ।
अंश ब्रह्मींचा असुनी तरी । प्रपंचाची जडली आस्ता ।
क्षणिक अशाश्वत सत्य वाटलें । म्हणुनी चुकला सगळा रस्ता ।
सोहं सोहं विसरुनी धरलें । कोहं शब्द को मार्गाला ॥ध्रु०॥
‘ मनुष्याणां सहस्रेषु ’ यापरी आहे गीतावाणी ।
सहस्रमनुष्यांमधि साधन करणार विरळा प्राणी ।
तया सहस्रामधें निवडला लक्ष जयाचें हरिभजनीं ।
भजनी नर सहस्रांत निवडला युक्तिवान ब्रह्मज्ञानी ।
ब्रह्मज्ञान वेगळें घरोघर चाहुलीवर भुकनेवाला ॥ध्रु०॥
‘ कश्चिद्देहांतर सिद्धिः ’ या सहस्र ब्रह्मज्ञानियांमध्यें कळला ।
‘ यततामपि सिद्धानां ’ सहस्र सिद्धि एक हरिकडे वळला ।
सिद्धिपुरुष नेमधारी जो का हरिस्मरणीं नाहीं चळला ॥१॥
‘ कश्चिन्मां ’ भजनीचें तत्त्व नाकळे यदर्थि अडकळला ।
जिव्हाळा नाहीं तरी मग काय करावें भजनाला ।
व्याप्तितत्त्वता तत्त्व जाणता तोचि हरिस्वरूपीं स्थिरला ॥२॥
त्यानें ओळख मागील धरली ज्योतिरूप ज्योतिंत जिरला ।
जन्म सफळ लवणाचा पुतळा जळामध्यें जैसा विरला ।
म्हणे हैबति धन्य तोचि अक्षय्य पदीं नाहीं सरला ॥३॥
प्रसन्न नाथ महाराज मति देतसे कवनाला - कवित्वाला ।
तेथें जरी साधन घडेना तरी जन्म व्यर्थचि गेला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP