मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
तेरावे दिवसांची क्रिया

तेरावे दिवसांची क्रिया

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


निधनशान्ति :- कर्त्यानें प्रथम अभ्यंग स्नान करावें, व आचमन प्राणायामादि देशकालाचा उच्चार करून ‘ माझ्या व माझ्या परिवाराच्या सर्व अरिष्टांची शांति होऊन क्षेम व आयुष्य वाढावें व परमेश्वराची कृपा व्हावी यासाठीं निधनशान्ति करितों. ’ असा संकल्प करावा. व गणेश पूजन व स्वस्तिवाचन यथाविधि करून, शान्तिसूक्तें व निधनसूक्तें म्हणावी. शान्तिसूक्तें शान्तिपाठांतील म्हणावीं; निधन सुक्तें :-
“ द्युलोक आणि भूलोक ह्यांनीं आमच्या प्रार्थनेकडे प्रथम लक्ष्य द्यावें, म्हणून मी त्याचें स्तवन करितों. व सुंदर कांतीनें युक्त असलेल्या दैदीप्यमान् अग्नीनें इकडे येत असतां आमच्या कामना परिपूर्ण कराव्या म्हणून मी त्याचेंही स्तवन करितों. हे अश्विनहो, तुमच्या स्तुतिकर्त्यानें तुम्हांस सोमरस अर्पण केला असतां, ज्या आपल्या भक्तजनरक्षक सामर्थ्यांनीं तुम्हीं त्यास आपल्या वैभवाचे भागीदार करितां, तीं सामर्थ्यें घेऊन तुम्हीं येथें या. ” “ भक्तजनांची तुम्हाला आठवण होऊन तुम्ही त्यांनां आपलें औदार्य दाखविण्यास प्रवृत्त व्हावें म्हणून ते तुम्हांस सोमरस अर्पण करीत, तुमच्या काय काय आज्ञा बाहेर पडतात त्याची जणुकाय वाटच पाहात, तुमच्या रथाभोंवती एकएकटे तिष्ठत बसलेले आहेत. हे अश्विनहो, भक्तजनांनां त्यांचें अभीष्ट प्राप्त व्हावें म्हणून त्यांची बुद्धि, ज्या आपल्या भक्तजनरक्षक सामर्थ्यांनीं तुम्ही उचित कर्माचे ठिकाणी निमग्न करितां, त्या सामर्थ्यांसह तुम्हीं या. ” “ दिव्य अमृतामुळें तुम्हांस उत्साह येत असल्या कारणानें ह्या सर्व लोकांवर तुम्ही अधिकार, चालवीत राहिलां आहां. हे शूर अश्विन हो, ज्या आपल्या रक्षक समर्थ्यांनी कधी न विणार्‍या गाईला ही भरपूर दूध आणलें, तीं सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्हीं येथें या ” “ चोहींकडे परिभ्रमण करणारा, व दोन मातां पासून जन्म पावलेला, असा पुरुष ज्या तुमच्या रक्षक सामर्थ्यामुळें स्वपुत्राच्या पराक्रमाच्या साह्यानें शीघ्रगामी ठरून शोभा पावत आहे, व ज्या सामर्थ्याचे योगानें त्रिमन्तु प्रज्ञावान् होण्यास समर्थ झाला, ती आपलीं सामर्थ्यें बरोबर घेऊन, हे अश्विन हो तुम्ही येथें या. ” “ ज्या तुमच्या रक्षक सामर्थ्यामुळें तुम्ही बंधनांत पडलेल्या व पाशांत सापडलेल्या रेभ व वंदन यांच्या दृष्टीस प्रकाश पडावा म्हणून उदकांतून बाहेर काढलें, व ज्यांच्या योगानें चिन्तनांत निमग्न असणार्‍या कण्वाचें तुम्ही संरक्षण केलें, तीं आपलीं सामर्थ्यें बरोबर घेऊन, हे अश्विन हो, तुम्ही येथें या. ” ( ऋ. १-७-३३)
“ अंतक चालतां चालतां थकून गेला असतां ज्या आपल्या रक्षक सामर्थ्यामुळें तुम्हीं त्यास हुशारी आणली, दुःखितास दुःख विमुक्त करणार्‍या सामर्थ्यामुळें मृत्यूचे अंगीं उत्साह उत्पन्न केला, व ज्यांचे योगानें तुम्हीं कर्कन्धु व वय्य तरतरी आणली, तीं सामर्थ्यें बरोबर घेऊन हे अश्विनहो, तुम्ही येथें या. ” “ ज्या रक्षक सामर्थ्यानें तुम्ही शुचन्तीला द्रव्यानें भरलेलें गृह अर्पण केलें , ज्याचे योगानें तुम्ही दाहक तापही अग्नीला सोसतां येईल इतका सौम्य केला, व ज्याचे योगानें तुम्ही पृश्निपु आणि पुरुकुत्स ह्यांचें संरक्षण केलें, तीं आपलीं सामर्थ्यें बरोबर घेऊन, हे अश्विन हो, तुम्ही येथें या. ” “ हे बलवान् अश्विन हो, ज्या रक्षक सामर्थ्यानें तुम्ही अंध व पंगु असलेल्या परावृजाला पाहण्याची शक्ति दिली, व ज्याचे योगानें तुम्हीं हिंसक प्राण्याच्या भक्ष्यस्थानीं पडलेल्या लावी पक्षिणीस सोडविलें, तीं सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे या. ” “ हे जरारहित अश्विन हो, ज्या आपल्या रक्षक सामर्थ्यामुळें तुम्ही माधुर्ययुक्त नद्यांस पूर आणला, वसिष्ठाची भरभराट केली, व ज्याचे योगानें कुत्स, श्रुतर्य आणि नर्य यांचें संरक्षण केलें, ती आपलीं सामर्थ्यें बरोबर घेऊन इकडे या. ” “ अथर्व्याच्या कुळांतील धनवान् विश्पलेचा ज्या रक्षक सामर्थ्यामुळें तुम्हीं युद्धांत हजारों माणसें लढत असतां त्यांतूनही बचाव केला, आणि तुमच्यावर प्रेम करणार्‍या अश्वकुलांतील वंशाचें तुम्हीं रक्षण केलें, तीं आपली सामर्थ्ये बरोबर घेऊन तुम्ही इकडे या ” (ऋ. १-७-३४).
“ हे उदार अश्विन हो, ज्या रक्षक सामर्थ्यामुळें औशिज्याच्या कुळांत जन्म पावलेल्या दीर्घश्रवा नांवाच्या व्यापार्‍यासाठीं मधुर जलाची वृष्टि केली, व ज्याचे योगानें तुमची स्तुति करणार्‍या कक्षिवानाचें तुह्मीं रक्षण केलें, ती आपलीं सामर्थ्ये बरोबर घेऊन इकडे या. ” “ हे अश्विन हो, रक्षक अशा ज्या आपल्या सामर्थ्यामुळें तुम्हीं रसानदीला वाहवून पूर आणिला, ज्याच्यामुळें तुम्हीं अश्व नसलेल्या रथासही विजयी करण्याकरितां त्याचा बचाव केला, आणि ज्यामुळें विशोक धेनु घेऊन जाण्यास समर्थ झाला, तीं तुमचीं सामर्थ्यें बरोबर घेऊन तुम्ही इकडे या. ” “ हे अश्विन हो, रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें तुम्हांस फार दूरच्या प्रदेशांत सूर्याचे सभोंवती फिरतां येतें, ज्यांच्यामुळें मांधाता भूमीचें स्वामित्व मिळविण्याच्या प्रयत्नांत असतां तुम्हीं ज्याचें रक्षण केलें, आणि ज्यांच्या योगानें विद्वान् भारद्वाजाचेंही परिपालन केलें, तीं तुमचीं सामर्थ्ये बरोबर घेऊन इकडे या ” “ हे अश्विन हो, रक्षक अशा ज्या सामर्थ्यामुळें शंबराचा वध करण्याचे प्रसंगीं या श्रेष्ठ अतिथिग्वाचें, कशोजूचे व दिवोदासाचें तुम्हीं रक्षण केलें, व ज्यांचे योगानें शत्रूंच्या पुराचा भेद करीत असतां तुम्ही त्रसदस्यूचा बचाव केला, ती तुमचीं सामर्थ्ये बरोबर घेऊन इकडे या. ” “ हे अश्विन हो, रक्षक अशा ज्या सामर्थ्यामुळें सोमरसाचें अतिशय पान करणार्‍या वम्रास उपस्तुतास, व पत्नीचा लाभ करून घेणार्‍या कलीस सन्मान प्राप्त करून देतां, व ज्याचे योगानें व्यश्व व पृथि ह्यांचे रक्षण केलें, तीं तुमची सामर्थ्यें बरोबर घेऊन तुह्मीं इकडे या. ” (ऋ. १-७-३५)
“ हे शूर अश्विन हो, रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें तुम्ही प्राचीनकाळीं, शयुx अत्रि व मनु ह्यांची भरभराट व्हावी अशी इच्छा धारण केली, आणि ज्याचे योगानें तुम्ही स्यूमरश्मी करितां बाण सोडले, तीं तुमची सामर्थ्यें घेऊन इकडे या. ” “ हे अश्विनहो, रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें पैठर्वा हा आपला मार्ग करीत असतां आपल्या शरीराच्या भव्यतेमुळें, इन्धनानें प्रज्वलित केलेल्या अग्नीप्रमाणें देदीप्यमान् दिसला, आणि ज्यांच्या योगानें मोठमोठ्या युद्धांमध्येंही तुम्ही शर्याताचें रक्षण केलें, ती सामर्थ्यें बरोबर घेऊन इकडे या, ” “ हे अश्विनहो, रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें तुम्हीं अंगिरसाच्या स्तुतीनें संतोष पावलां, व जेथें गाइंचा समुदाय कोंडून ठेविला होत,अ अशा गुहेमध्यें सर्वांच्या पुधें होऊन शिरलां, आणि ज्याच्या योगानें तुम्हीं शूर मनुला अन्नसामग्री देऊन त्याचें रक्षण केलें, तीं तुमची सामर्थ्यें घेऊन इकडे या. ” “ हे अश्विनहो, रक्षक अशा ज्या तुमच्या सामर्थ्यामुळें तुम्हीं विमदास भार्या मिळवून दिली, ज्यांच्यामुळें ताम्रवर्ण धेनूस तुम्ही आज्ञा मानावयास शिकविलें, व ज्याच्यामुळें तुम्ही सुदेव्याला सुदामाकडे घेऊन आलां, त्या तुमच्या सामर्थ्यासह तुम्हीं इकडे या. ” “ हे अश्विनहो, संरक्षक जशा ज्या सामर्थ्यामुळें तुम्ही हवि अर्पण करणार्‍या भक्तांस कल्याणप्रद होतां, ज्याच्या योगानें तुम्ही भुज्यु आणि अध्रिगु यांचे संरक्षण करितां, व ज्यांच्यामुळें तुम्ही उत्तम हवि देणार्‍या ऋतस्तुभेला सौख्यामध्यें ठेवितां, ती तुमचीं सामर्थ्यें बरोबर घेऊन इकडे या. ” (ऋ. १-७-३६).
“ हे अश्विनहो, ज्या आपल्या संरक्षक सामर्थ्यांनीं तुम्हीं शरसंधानप्रसंगीं कृशानृची वाहवा करविली, ज्याचे योगानें तुम्हीं त्या तरुण पुरुषाचा अश्व वेगानें धांवत असतां त्यांचें संरक्षण केलें, व ज्याचे योगानें तुम्ही भ्रमरांनां त्यांस आवडता मध आणून देतां, तीं आपलीं सामर्थ्यें बरोबर घेऊन इकडे या, ” “ हे अश्विनहो, ज्या आपल्या रक्षक सामर्थ्यांनीं तुम्ही धेनूंच्या प्राप्तीकरितां युद्ध करणार्‍या त्या वीराचा, युद्धांत संतति व भूमि मिळवून देऊन उत्कर्ष करविला आणि ज्याचे योगानें तुम्ही रथ व अश्व यांचें रक्षण करितां, तीं आपलीं सामर्थ्ये बरोबर घेऊन इकडे या. ” “ हे अश्विनहो, ज्या आपल्या रक्षक सामर्थ्यामुळें तुम्हीं आर्जुनीचा पुत्र कुत्स व त्याच प्रमाणें तुर्वीति व दभीति यांचें रक्षण केलें, व ज्याचे योगानें तुम्हीं ध्वसन्ति व पुरुवन्ति यांचेंही परिपालन केलें, तीं आपली रक्षक सामर्थ्ये बरोबर घेऊन इकडे या ” “ हे शत्रूंचा नाश करणार्‍या पराक्रमी अश्विनी देवांनों, आह्मांवर कृपाळू होऊन आमची स्तुति व प्रार्थना सफळ करा. सूर्याची प्रभा फांकली नाहीं तोंच आमच्या संरक्षणासाठीं मी तुमचा धांवा करीत आहें; या साठी आम्हांस सामर्थ्य अर्पण करून आमची भरभराट करा. ” “ हे अश्विनहो, आमच्या सौख्यांत कधीं खंड पडूं न देतां रात्रंदिवस आमचें संरक्षण करा ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र आणि वरुण आणि त्याचप्रमाणें आदिति, सिंधु, पृथिवी व द्युलोक यांचेंही अनुमोदन असो. ” (ऋ.१-७-३७)
“ हे उदकांनो, तुम्ही परत या. दुसरीकडे जाऊं नका. धनासाहवर्तमान आमच्यावर अभिषेक करा. हे अग्निसह सोमा, तुमचें स्तवन करणारांस तुम्ही नित्य वस्त्रप्रावरण देतां तसें तुम्ही आम्हांस धन द्या. ” “ त्या उदकांस मागें फिरवा, त्यांनां ताब्यांत ठेवा. इंद्र त्यांचें नियमन करो, व अग्नि त्यांनां आमचे जवळ घेऊन येवो. ” “ तीं उदकें परत येवोत, व या यजमानाचे ठायी वृद्धि पावोत हे अग्नि, त्यांना येथेंच धरून ठेव, आणि जें जें कांहीं धन आहे तें तें येथेंच राहो. ” “ गाईचा गोठा ओळखणें, रानांत चरणें, इकडे तिकडे फिरणें, या सर्व गोष्टींचें ज्ञान मला होवो. आणि त्यांच्या गोवाळ्याचें ज्ञानही मला होवो. ” “ जो गाई चुकल्या तर त्यांस शोधून घेऊन येतो, तसेंच त्यांजबरोबर जाऊन त्यांनां चारतो, त्या इकडे तिकडे फिरतांना व घरीं येतानां त्यांजबरोबर राहतो, तो गुराखी परत येवो. ” “ हे इंद्रा, आमच्याकडे तोंड कर, व आम्हाला गाई दे. तूं दिलेल्या चिरंजीव गाईपासून आमचें पोषण होवो. ” “ हे हविर्भाग सेवन करणार्‍या देवांनों, दूध, तूप इत्यादि पदार्थ मी तुम्हां सर्वांस अर्पण करितों; यासाठीं तुम्ही आम्हांस पुष्कळ गाई व धन द्या. ” “ गाईनों, पृथ्वीच्या चारी दिशांकडून तुम्हीं परत या. हे इंद्रा, तूं त्यांस परत आण. ” (ऋ.७-७-१)
“ हे अग्नि, आमच्या मंगल मनाची तुझ्या स्तवनाकडे योजना कर. पृथ्वी, आकाश, दिशा, उदक व विजा चोहोंकडून आमचें रक्षण करोत. ”
हीं सूक्तें म्हटल्यावर ब्राह्मणांनीं यजमानास “ तुमच्या गह्रीं सर्व अरिष्टांचीं शांति असो. ” असा आशिर्वाद दिल्यावर यजमानानें ‘ तथास्तु ’ असें म्हणावें. नंतर स्थापन केलेल्या कलशांतून पाणी घेऊन ‘ समुद्र ज्येष्ठा ’ इ० मंत्रांनीं यजमानास अभिषेक करावा. अभिषेकानंतर यजमानानें नवीन वस्त्रें परिधान करावी. आणि अशुभनिवृत्ति होऊन चंदन आदिकरून भोग घेण्याचा अधिकार प्राप्त होण्यासाठीं चंदन, फुलें, फळें, विडा व गुळ यांची दानें करावी; आणि इष्टदेवता, कुलदेवता व ग्रामदेवता यांस नमस्कार करून, देवतांचें विसर्जन करून, ब्राह्मण व आप्तइष्टांसह भोजन करावें. गंध लावून विडा खावा, व ब्राह्मणांस भूयसी दक्षिणा द्यावी; व आचार्यास वस्त्रें व दक्षिणा देऊन संतुष्ट करावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP