मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
पहिल्या दिवसाची क्रिया

पहिल्या दिवसाची क्रिया

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


दहा दिवसपर्यंतची क्रिया, गांवाबाहेर ( शक्य असेल तर नदी अगर तलावाचे जवळ ) जाऊन करावी. कर्त्यानें स्नान करून नवीन ओली वस्त्रें व उत्तरीय धारण करून दक्षिणाभिमुख बसावें व अपसव्यानें देशकालाचा उच्चार करून, ‘ मृताचें प्रेतत्व जाऊन उत्तम लोकप्राप्ति व्हावी ’ एतदर्थ प्रथम दिवसाचें कृत्य करितों; असा संकल्प करावा व नवीन तांब्याचे भांड्यांत पसाभर तांदळांचा भात करावा; व पुन्हा, प्रेतास झालेल्या दाहजनित तापाच्या शांतीसाठीं मृत्तिकास्नान करितों असा संकल्प करावा.
नंतर “ हे पृथिवी, तूं आम्हांवर संतुष्ट हो. तूं कोणाचा नाश होऊं देत नाहीस; सर्वांचा समावेश तूं करतेस. आम्हांस अतिशय सौख्य दे. ” (ऋ. १-२-२६).
या मंत्रानें शुद्ध माती हातांत घेऊन, “ अंधकारानें व्याप्त अशा मार्गांत पुनः पुनः फिरत राहणारा, देवां - मनुष्यांनां जागृत करणारा, सर्व भुवनांचें अवलोकन करणारा, असा हा सविता देव सोन्याच्या रथांत बसून आमच्याकडे येत आहे. ” (ऋ. १-३-६).
या मंत्रानें ती सूर्यास दाखवावी. व “ ज्यास हजारों मस्तकें, डोळे व पाय आहेत, असा तो विराट पुरुष सर्व विश्व व्यापून दहा आंगळे उरला आहे. ” (ऋ. ७-४-१७).
या मंत्रानें माती मस्तकास लावाली, आणि “ आतां मी तुझ्या प्रत्येक अवयवांतून, प्रत्येक केशापासून व प्रत्येक सांघ्यापासून, किंवाहुना सर्व शरीरापासून रोगाला नाहींसा करून टाकतों. ” (ऋ. ८-८-२१).
या मंत्रानें सर्वांगास मृत्तिका लावावी, नंतर स्नान व आचमन करावें. याप्रमाणें आणखी दोन वेळ मृत्तिकास्नान करावें. नंतर आचमन करून दर्भावर अश्मा ठेवून, प्रेताची तृषा शमन होण्यासाठी त्यावर तिलोदकांजली द्यावी.
नंतर फिरून स्नान व आचमन करून, तीळ, तूप, मध, साखर व दूध यांणीं मिश्रित भाताचा मोठा पिंड करून मस्तक उत्पन्न होण्यासाठीं दर्भावर तो पिंड द्यावा. व त्यावर पितृतीर्थानें तिलोदक द्यावें; व पंचोपचार पूजा करावी, व शेवटीं श्रीविष्णूची प्रार्थना ‘ ज्यास जन्म - मरण नाहीं, ज्याच्या हातांत शंख, चक्र, गदा आहे, ज्याचे कमलासारखे नेत्र आहेत, असा जो शाश्वत देव तो, हे प्रेता, तुला मोक्ष देवो; ’ याप्रमाणें प्रार्थना करावी. तसेंच ‘ हा तिलोदकयुक्त पिंड तुझी वृद्धि करो. ’ असें म्हणावें. नंतर पिंड पाण्यांत टाकून स्नान व आचमन करावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP