मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
अग्निप्रज्वलन ( अग्नि पेटविणें )

अग्निप्रज्वलन ( अग्नि पेटविणें )

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


‘ मी मांसभक्षक अग्नीस दूर पाठवून देतों. पाप नाहीसें करणारा हा अग्नि यमराजाच्या लोकाप्रत जावो; आणि हा दुसरा प्रसिद्ध असा जातवेद नांवाचा अग्नि देवांकडे हविर्भाव नेवो. ’ (ऋग्वेद ७-६-२१) या मंत्रानें पुरुषाचे मस्तकाचे बाजूस, व स्त्रीचे पायांचे बाजूस अग्नि पेटवून वस्त्राचे पदरानें -
“ मनास व शरीरास सुख देणारे, सुगंधित, त्वचा, मांस, अस्थि यांस सौख्य देणारे, असे हे ( मंद ) वायु मार्गांत अनुकूल होऊन तुजवर वाहोत. व ते तुला साधुपुरुषांचे लोकांस नेवोत. ”
“ ही अक्षय वाहणारीं मधुर उदकें तुला या लोकीं, अंतरिक्षांत व स्वर्गांत सुखी करोत. ” या मंत्रांनीं चितेस वारा घालावा. नंतर प्रेत जळत असतां “ ज्या पुरातन मार्गांनी आमचे पूर्वज गेले त्या मार्गांनीं तूं जा. तेथें गेल्यावर तेजस्वी यम व वरुण हे दोन्ही राजे, जे अमृतान्नाचा उपभोग घेतात ते तुला दिसतील. ”
“ यम व वरुण हे दोन्ही राजे आहुतीनें आनंद पावतांना तुला दिसतील. यज्ञाच्या सांगतेनें तूं आकाशांत पितरांशी मिळून जा. ”
“ उत्तम स्वर्गांत आपल्या पितरांनां, यमाला व कृतपुण्याला तूं भेट, पातकाचा त्याग करून आपल्या घरी जा, आणि तेजस्वी शरीर धारण कर. ” (ऋग्वेद ७-६-१५) “ हे अग्नि, तूं ह्याला ( प्रेताला ) संपूर्णरीतीनें जाळूं नको, व ह्याचा संताप करूं नको. याची त्वचा अथवा शरीर अस्ताव्यस्त टाकुं नको. हे जातवेद अग्नि, तूं ह्याला पक्क करून पितरांकडे पाठीव. ”
“ हे जातवेद अग्नि, जेव्हां तूं याला पक्क करशील तेव्हां त्याला पितरांच्या स्वाधीन कर. जेव्हां याचा जीव पितृलोकाला पोहोंचेल तेव्हां तो देवांच्या स्वाधीन होईल. ”
“ तुझ्या नेत्रांतील तेज सूर्यांत मिळो, आत्मा वायूंत मिळो; तूं आपल्या सुकृतास अनुसरून स्वर्गास जा, अगर पृथिवीवर रहा. तुला पाण्यांत राहणें बरे वाटेल तर पाण्यांत रहा; अथवा वनस्पतीमध्यें आपले अवयव तद्रूप करून रहा. ”
‘ जन्ममरणरहित असा जो याचा अंश ( आत्मा ) आहे, त्याला तूं तुझ्या उष्णतेनें तापीव; तसेंच तुझ्या शोचि व अर्चि नांवाच्या ज्वाला त्याला तापवोत. तूं तुझ्या सुखदायक अवयवांनीं याला पुण्यलोकाप्रत घेऊन जा. ’
‘ हे अग्नि, ह्याचें तुझ्यामध्यें स्वधायुक्त मंत्रांनीं हवन केलें आहे. यासाठी त्याची पितरांकडे जाण्याकरितां सुटका कर. हे जातवेद, याचा अवशिष्ट भाग आयुष्मान् होवो, व त्यास दिव्य देह प्राप्त होवो. ’
‘ हे प्रेता, तुझ्या देहाला जर कावळा, मुंगी, साप अथवा श्वापदें यांनी इजा केली असेल, तर हा सर्वभक्षक अग्नि तुझा देह दोषरहित करो; तसेंच ब्राह्मणांत ( यज्ञांत ) ज्यानें प्रवेश केला आहे, असा सोमरस तुला शुद्ध करो. ’ (ऋ. ७-६-२०).
‘ ज्याचे पशू कधींही नष्ट होत नाहींत व जो ज्ञानी असून जगताएं रक्षण करतो, असा पूषा देव तुला उत्तम लोकाप्रत नेवो ! आणि पितरांच्या स्वाधीन करो ! तसेंच अग्नि तुला पूर्ण ज्ञानवान् अशा देवांच्या स्वाधीन करो ! ’
‘ सर्वव्यापी वायु तुझें रक्षण करो; पूषा देव उत्तम मार्गांतून पुढें जाऊन तुझें रक्षण करो. ज्या ठिकाणीं पुण्यवान् लोक जाऊन राहिले आहेत, त्या ठिकाणीं तुला सवितादेव नेऊन ठेवो. ’
‘ पूषा देव या सर्व दिशा चांगल्या रीतीनें जाणतो; तो आम्हांला ( प्रेताला ) सुरक्षित मार्गानें नेवो. कल्याणप्रद, दीप्तिमान्, सर्व वीरांनीं युक्त, तत्पर व ज्ञानी असा जो पूषा देव तो आमच्या पुढें चालो. ’ (ऋ. ७-६-२३)
‘ पूषा म्हणजे पोषक असा जो सूर्य तो अंतरिक्षांतीक मार्गांच्या केंद्रस्थानीं आहे; त्याचप्रमाणें तो, स्वर्ग व भूमि, जी एकमेकांत अत्यंत प्रेम करितात, त्यांनां अनुलक्षून यजमानानें केलेलें कर्म जाणणारा आहे. तसेंच तो नेहमीं जात असतो व परत येत असतो. ’
‘ हे पृथिवी, याला त्रास न देतां याचा प्राण व पाठीव; यास सुख होईल अशा रीतीनें सदयतेनें वागीव; आई ज्याप्रमाणें मुलाला आपल्या पदराखालीं झांकून घेते, त्याप्रमाणें तूं याला झांकून घे. ’
‘ मातीच्या हजारों कणांनीं उंच झालेली ही पृथ्वी याच्यावर चांगल्या प्रकारें राहो. हे कण सर्वदा त्याचें घरच होवोत; तसेंच त्यावर तुपाची धार धरून सर्वदा त्याचें आश्रयस्थान होवोत. ’
‘ मी तुझ्यावर माती टाकून झांकण घालतों. मला कांहीं इजा न होवो. या ( अस्थि ) पात्राला पितर धारण करोत, व या ठिकाणीं यम तुझ्यासाठीं घर करो. ’ (ऋ. ७-६-२८).
‘ सोमरस कित्येक पितरांकडे वाहत जातो ( म्ह० कित्येक पितर सोमरस पितात ); कित्येक तुपाचें सेवन करतात; ज्यांच्याकडे मध वाहत जातो, त्यांच्याकडेच तूं जा. ’
‘ ज्यांनीं तप केलें आहे, आणि तपाच्या सामर्थ्यामुळें ज्यांचा कोणी अनादर करूं शकत नाहीं, व जे स्वर्गाला गेले आहेत, त्या पितरांकडे तूं जा. ’
‘ जे शूर वीर युद्धांमध्यें लढून धारातीर्थीं पडतात व जे यज्ञ करून विपुल दक्षणा देतात, त्यांच्याकडे तूं जा. ’
‘ हे यमा, जे पूर्वीचे तपस्वी पितर सत्य जाणणारे, सत्य बोलणारे, व सत्याची वृद्धि करणारे आहेत, त्यांच्याकडे याला घेऊन जा. ’
‘ हे यमा, जे तपस्वी ऋषि तपापासून उत्पन्न होऊन हजारों लोकांचे नेते झाले आहेत, व ज्ञाते आहेत, तसेंच जे सूर्याचेंही रक्षण करितात, त्यांच्याकडे याला घेऊन जा. ’ (ऋ.८-८-१२).
ज्यांचें नाक मोठें असून जे शक्तिमान् असल्यामुळें, लोकांचे मागें लागतात व प्राण हरण करून संतोष पावतात, ते दोन यमदूत पुनः आज येथें कल्याणप्रद असे प्राण आम्हांस देवोत, कीं, ज्यामुळें आम्ही सूर्यास पाहूं. ’ ( ऋ. ७-६-१६).
या मंत्रांनी तीळ टाकून नंतर कर्त्यानें डाव्या खांद्यावर पाण्यानें भरलेला मातीचा घडा घेऊन श्मशानांतील लहानसा न फुटलेला व गुळगुळीत असा दगड घेऊन घड्याचे पृष्ठभागाला लहानसें भोंक पाडावें व प्रेताचे पायापासून आरंभ करून, प्रेतास उलटी प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालतांना “ वातास्ते वांतु० ” व “ इमा आपो मधुमत्यो० ” हे मंत्र म्हणावे ( अर्थ पृ. १५ पहा. ) व पुन्हा दुसरें भोंक पाडून पूर्ववत् मंत्र म्हणत प्रदक्षिणा करावी आणि तिसरें भोंक पाडून मंत्र म्हणत तिसरी प्रदक्षिणा करावी. नंतर प्रेताचे मस्तकाचे बाजूस येऊन दक्षिणेस तोंड करून उभें रहावें व मागें न पाहतां, कर्त्यानें खांद्यावरील घडा मागल्यामागें सोडून देऊन फोडावा व अश्मा हातांतच ठेवावा.
नंतर - “ हे पुरुष, मृत पितरांपासून मागें फिरोत; आज हा आमचा यज्ञ ( पितृमेध ) कल्याणप्रद होवो; दीर्घायुषी असे आम्ही आनंदानें आपापलें काम करण्यासाठीं ( नाचणें, हंसणें वगैरेसाठीं ) घरी जाऊं ” (ऋ. ७-६-२६).
या मंत्रानें सव्य प्रदक्षिणा करून मागें न पाहतां सर्वांनी, वयानें लहान असतील त्यांनीं पुढें, व वडिलांनीं मागें, अशा रीतीनें कर्त्याचे मागोमाग स्नानास जलाशयावर जावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP