मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
नग्नप्रच्छादन व पाथेयश्राद्ध

नग्नप्रच्छादन व पाथेयश्राद्ध

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


नग्नप्रच्छादन श्राद्ध

नग्नप्रेताचें आच्छादन करण्यासाठी हें श्राद्ध नवश्राद्धांप्रमाणेंच करितात. मात्र यथाशक्ति वस्त्र, आंथरूण, पांघरूण, तेल, सोनें, रुपें इत्यादि धातु व जोडे, दर्भबटूस देतात.

पाथेयश्राद्ध

पाथेय म्हणजे प्रवासांतील अन्नसामुग्री. त्याबद्दल हें श्राद्ध आहे. कर्त्यानें स्नान व आचमन करून प्राणायाम करावा व देशकालाचा उच्चार करून अपसव्य करावें; व ‘ अमुक गोत्राच्या अमुक नांवाच्या प्रेतास ( मृतास ), मनुष्यलोकापासून प्रेतलोकीं सुखानें प्रवास व्हावा, यासाठीं पाथेय श्राद्ध करितों ’ असा संकल्प करावा; बाकी सर्व ‘ नवश्राद्धा ’ प्रमाणें करावें.
नंतर वाळत घातलेलीं वस्त्रें नेसावीं व दिवसा दहन केलें असल्यास नक्षत्रदर्शन झाल्यावर, व रात्रीं दहन केलें असल्यास सूर्योदय झाल्यावर, कर्त्यास पुढें करून, त्यामागून बाल, तरुण, वृद्ध या क्रमानें घरीं जावें. व दारांत लिंबाची पानें चावून थुंकावी. हात - पाय धुवून आचमन करावें. आणि पाषाण, अग्नि, गोमय ( शेण ), तांदूळ, तीळ, पाणी, दूर्वा, बैल आणि पांढर्‍या मोहर्‍या, यांपैकीं शक्य त्या जिनसांस स्पर्श करून, पडवीच्या उंबरठ्यावर पाय देऊन घरांत जावें. ‘ नंतर एका शिंक्यावर पाणी व दुसर्‍या शिंक्यावर दूध नव्या बोळक्यांत ठेवून ‘ हे प्रेता, येथें स्नान कर व हें ( दूध ) पी. ’ असें म्हणावें. या दिवशीं अन्न विकत घेऊन अगर मित्राकडून आणवून खावें. मांस, मिष्टान्न, दूध, मीठ वगैरे खाऊं नये. हविष्यान्न ( तांदूळ, गहूं, वगैरे ) खावें. कर्त्यानें जेवणाचे वेळी तूपभात घेऊन घरावर किंवा जेवणाचे जागेजवळ तो प्रेताला द्यावा. दहा दिवसपर्यंत जेवणाची जागा बदलूं नये. लिहिणे, मौज - मजा करणें, उंच जागेवर बसणें, उंची कपडे घालणें, अभ्यंगस्नान, स्त्रीसंग इत्यादि कृत्यें करूं नयेत. रात्रीं एकटेंच गवतावर ( चटईवर ) निजावें. हे नियम लहान मुलें, म्हातारे व रोगी यांस लागू नाहींत.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP