मंदार मंजिरी - स्मारकाचा उपयोग

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


कुंभारवाडयांत फिरावयाला गेलो; तिथें देखियली विशाला- ।
म्यां मूर्ति एके स्थलिं गर्दभाची, सभोवतीं आवलि चित्रकांची ॥१॥
झाला मला मूर्ति बघोन हर्ष कीं तींत होता पटुताप्रकर्ष ।
प्रमाणशुध्दवयवांमुळें ती आश्चर्यहेतू मम होय चेती ॥२॥
थापोनि माती चिकणी प्रयासें केली अशी गर्दभमूर्ति भासे ।
तया पशूचे अति लंब कर्ण, नवाम्बुदश्याम तदीय वर्ण ॥३॥
ही मूर्ति केव्हां, कवणें कशास केली बहू घेउनियां श्रमास- ।
हा प्रश्नही उद्भवला मनांत मी मूर्तिं तेथें असतां पहात ॥४॥
शिला तदा म्यां अवलोकियेली जी तेथ होती दृढ रोवियेली ।
तत्पृष्ठभागावरि एक लेख होता, विशालाक्षर तो सुरेख ॥५॥
हा लेख वाचोनि मदन्तराची पृच्छा निमाली मग एकदाची ।
कीं स्पष्ट तेणें मजला कळालें ह्या मूर्तिचें स्थापन केविं झालें ॥६॥
लेखांत ह्या वर्णसमुच्चयानें निर्देशिला अर्थ जसा धन्यानें ।
तसाच मी सर्व जनां वदेन, अपूर्णतासंभव हा न एन ॥७॥
“हें स्मारक प्राज्यतमें प्रयासें केलें असें म्यां सुकुमारदासें ।
होता पशू तो प्रिय फार मातें, संमान हा योग्य असे तयातें ॥८॥
होते तयाचे जरि लांब पाय, त्यांणीं मला बोलविलें न हाय” ॥९॥
होत्या तयाच्या अतिसौम्य लाथा, माझा तयांनी दुखला न माथा ।
असो अती कर्णकठोर शब्द अन्या खरांचा जणुं काय अब्द ।
मृदुंगनादाहुनि गोड हयाचा होता ध्वनी कोमल, सौम्य साचा” ॥१०॥
लेखाचिया नांव अधस्तलास होतें धन्याचें “सुकुमारदास” ।
तयेंच हें स्मारक बांधियले होतें असें त्यावरि बोधियलें ॥११॥
हसें मला वाचुनि लेख आलें, मच्चितही कौतुकविध्द झालें ।
अशी गुणग्राहकता जगांत नसे धन्याची; न असत्य मात ॥१२॥
निमग्न मी स्मारकचिन्तनांत होओनि ठेलों कुतुकें पहात ।
कुंभार कोणी इतुक्यांत आला घेओनियां कुम्भ तया स्थलाला ॥१३॥
तयास मी “हा सुकुमारदास होता कुठें स्मारक हें कशास? ।
केव्हां? किती लावुनियां धनास केलें तयें?” हें पुशिलें सहास ॥१४॥
ऐकूनि हा प्रश्न मला म्हणाला कुंभार तो, “मी कथितों तुम्हाला ।
केलें जयें स्मारक हें तयाला होता मतिभ्रंश उदग्र झाला ॥१५॥
ज्याची तुम्हां मूर्ति दिसे विशाल होता जनां कष्टद सर्व काल ।
होता अती द्वाड, अती चुकार, तयें धन्या दु:ख दिलें अपार ॥१६॥
तयें धन्याच्या तनयास लाथा मारोनि केला प्रविदीर्ण मथा ।
गेला अकालींच यमालयाला लोटोनि दु:खमधिं तो जनाला ॥१७॥
तद्गर्जना कर्णकठोर भारी झाली सदा स्वापविभंगकारी ।
असंख्य त्यानें घट फोडियेले आम्ही श्रमें जे बहुसाल केले ॥१८॥
तो द्वाड, तो दुष्ट पशू मरावा, दु:खौघ तेणें अमुचा सरावा ।
असें सदा इच्छियेंले जनानें, की दु:ख त्यानें दिधलें न सानें ॥१९॥
एके दिनी हा खर कुंभभारा घेओनि पृष्ठीं सजला विहारा ।
तो नाचला, बागडला, वळाला क्षैणक ठेला, उठला, पळाला ॥२०॥
क्षणोक्षणीं हे दिसले निराळे त्या गर्दभाचे अनिवार चाळे ।
वासोनियां लांब पुढें मुखास प्रवृत्त झाला, मग गावयास ॥२१॥
गंधर्व मी, मदध्वनि गोड फार, मी जाणतों गायनशास्त्रसार ।
असा जणों गर्व खरास झाला, तो थांबविना निज गायनाला ॥२२॥
केला धन्यानें लुगडप्रहार हे थांबवायास्तव चारचार ।
न थांबले, वृध्दिस पावले ते, कृशानु आज्यें अतिवले चेते ॥२३॥
गेले धन्याचे श्रम सर्व वाया झटे जरी तो खर आळवाया ।
प्रदर्शन प्रेक्षणयोग्य होतें, पहावयाला जन कां न यो तें? ॥२४॥
गांवातलें सर्वहि लोक आले, बघोनि हें तांडव फार घाले ।
लोंकाचिया विस्तृत मंडलांत केले खरें पात महा निपात ॥२५॥
उड्या खराच्या अतिउंच हो! त्या, उच्चैश्रव्यालाहि असाध्य होत्या ।
अकुंठहेषाध्वनिही मुखानें करीत होता भरला सुखानें ॥२६॥
हें चालतां नृत्य असें विचित्र खणी क्षिती तत्खुर कीं खनित्र ।
रज:कणांनीं भरिलें नभास, बघोनि झाले सगळ सहास ॥२७॥
हें चालतां नृत्य अशा प्रकारें पृष्ठस्थ झाले घट भग्न सारे ।
सोसे न संधात तयां प्रचंड, झालें तयांचे तिलकल्प खंड ॥२८॥
उद्दाम तो गर्दभ नाचतांना हसें मुळीं नावरलें जनांना ।
करीत हें नृत्य पुढें निघाला हा गर्दभ क्षिप्र नदीतटाला ॥२९॥
लत्ताप्रहारें जन रुग्ण झाले, समस्तही हास्य तदा निमालें ।
असो; पुढें नृत्यभरांत गर्तासंक्रात मेला बहुदु:खकर्ता ॥३०॥
नाहीं असा एकहि कुम्भकार जो हर्षला तन्मृतिनें न फार ।
पीडा समग्रा टळली जनांची, विमुक्त झाले जन एकदाची ॥३१॥
सुखावला किंतु धनी न त्याचा, आला तयाला झटका पिशाचा ।
पिटोनि डोकें रडला सदैव म्हणोनि, ‘हा हा! मम काय दैव ॥३२॥द
अशा प्रकारें दिन पाचं गेलें, शोके तयाला नचि सोडियलें ।
पुढें तयें स्मारक चिंतिलें हें, धनार्थ केले श्रम फार देहें ॥३३॥
घरोघरीं जाउनि वित्त त्यानें संपादिले वाढतम श्रमानें ।
निर्बंन्ध त्यानें अतिमात्र केला, देओनि आम्ही घन टाळियेला ॥३४॥
त्यांतील काहीं सुकुमारदासें संस्थापिलें गुप्त गृहांत भासे ।
त्यांतील काहीं धन ओपियेलें, गंजागृह्स्वामिस तृप्त केलें ॥३५॥
पुढें खरस्मारक शेषवित्तें करावया मृण्मय हृष्ट चित्तें ।
सुदूरददेशाहुनि मूर्तिकार पाचारिला तो विनवून फार ॥३६॥
मूर्ती तयाच्या करवीं प्रयासें ही निर्मियेली सुकुमारदासें ।
एकाच न स्मारक हें खराचें, हें स्मारक प्रौढ खरद्वयाचें ॥३७॥
ह्या स्मारकाविषयिंचा सगळा प्रकार ।
जो देखिला, परिशिला स्थलिं ह्या ससार ।
विद्याधरें सरळ तो कथिला जनांस,
तो त्यांचिया प्रचुरबोधद हो मनास ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP