मंदार मंजिरी - वेलावेदन

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


[योग्य वेळी योग्य गोष्ट केली पाहिजे असा बोध ह्या गोष्टींत केलेला आहे. वेला म्हणजे योग्य वेळ आणि वेदन म्हणजे ओळखणे.]
गोदावरीच्या तटिं खेळ नाना एके दिनीं बालक खेळतानां ।
दुर्दैवयोगें निसरोनि पाय निमग्न झाला जलिं हाय! हाय!! ॥१॥
केलें तयें यत्न तटास याया, ते किन्तु गेले सगळेच वायां ।
होणार आतां मम जीवनाश म्हणोनि दु:खे रडला हताश ॥२॥
जलोपकंठद्रुममूल त्याला लाधोनि दैव मृत तो न झाला ।
तो राहिला मूळ धरोनि हातीं, जलीं तयाची स्थिति कष्टदा ती ॥३॥
हाका तयानें बहु मारिल्या हो, “माझा नका हो! जन अंत पाहों ।
या, लोक हो, सत्वर येथ, पावा! तारा मला देउनि हात धावा! ॥४॥
जलांत मी वास शकें न साहों, या या, त्वरेंने जन शिघ्र, या हो! ।
कालव्यया व्यर्थ करूं नका हो! जलामधीं मी न शकेंच राहो ॥५॥
आक्रोश ऐसा परिसोनि आला कोणी महापंडित त्या स्थलाला ।
परंतु द्याया कर तो मुलाला हा हंत! हा हंत! न सिध्द झाला ॥६॥
तयास तो बालक पाहतांची साहाय्य दीनस्वरपूर्व याची ।
“बाहेर काढा मजला, चला या! व्हा सिध्द साहाय्य मला कराया ॥७॥
घाला उडी, या जलिं शीघ्र हात, नाही तरी मी मरतों जलात” ।
ऐकोनि तो पंडित याचना ही कठोर दृष्टी वळवोनि पाही ।
न युक्ति बालोध्दरणा करून राहे विलोकीत तटावरून ॥९॥
बोले तया पंडित उग्र ऐसें, “त्वां मौर्ख्य केलें मज सांग कैसें? ।
पोहावया येत तुला नसून आलास कां धार्ष्ट्य इथें करून? ॥१०॥
तूं वाटसी मूर्ख मुला! अतीव, झाला नकोसा तुज काय जीव? ।
आलास केल्याविण कां विचार करावया या स्थलिं तूनं विहार ॥११॥
विचार केल्याविण कोणतेहिं करील जो बालिश कृत्य देही ।
तो देहविध्द्वंस फलास भोगी, सिध्दांत ऐसा कथियात योगी ॥१२॥
तटावरोनी जल पाहिल्याने पोहावया येइल या भ्रमाने ।
घेई उडी जो जलिं तो जलीं न घेई यमाच्या मुखिं बुध्दिहीन ॥१३॥
पोरा! तुवां बालिश कृत्य केलें त्याचेंच ऐंसे फल हें उदलें ।
हें भोग आतां फल पोरटयारे! कीं चित्तिं तूझ्या न विवेक थारे ॥१४॥
पोहावया येत तुला नसून खेळावया इकडे धरून ।
कशास आलास धरून हूप? हा खेळ पोरा तव मृत्युरूप ॥१५॥
आम्रडिताने गुरुतुल्यतेला पोरा! कधीं बालिश सांग गेला ।
सामर्थ्य अंगी नसतां उगाच झटेल तो भोगिल दु:ख साच ॥१६॥
अशक्त जो चेतवितो बलीला तो मूर्ख; तो भोगि विपत्तीला ।
येथें विहारास्तव पातलास; आतां उगा ओरडीसी कशास? ॥१७॥
पोरा, न पोहूं शकतां जलात उडी विहारास्तव घालितात ।
ते मंत्र वा औषधि नेणताच भुजंगपुच्छावरि देति टांच ॥१८॥
भुजंग मंत्रौषधि नेणत्यानें न कोपवावा; शुभ्र होइ यानें ।
नसोनिंया बाण धनुष्य हातीं न शहाणें व्याघ्राविलांत जाती ॥१९॥
कठोर खाया चणकों कधीं न इच्छील तो जो नर दंतहीन ।
जलीं न तो ये विहरावयास पोहावया येत नसे जयास ॥२०॥
अज्ञात जो शब्द कधीं न बोले, अज्ञात रागवरि जो न डोले ।
अज्ञात मार्गी न शिरे अकालीं तो मानिजे पूर्णविवेकशाली ॥२१॥
वकृत्व हें ऐकुनि बाळ गागे, साहाय्य आत्मोध्दरणार्थ मागे ।
रुचेल कैसा मरणोन्मुखास अस्थानबोध? प्रिय तो न त्यास ॥२२॥
म्हणे, “पुरे, बोध करूं नका हो, बाहेर काढा, मरतों उगा हा!
ह्या हात, ओढा मजला तटास, हें याचिंतो, जोडुनि मी करास” ॥२३॥
संल्लाप हा ऐकुनि त्या स्थलाला कोणी अडाणी परि सुज्ञ आला ।
त्याणें उडी घालुनि तत्क्षणास बाहेर तो आणियला तटास ॥२४॥
पित्याकडे बालक पोचविला, आनंद त्याला बहु चाखविला ।
ह्या कालवेत्या पुरुषें; तयाला कृतज्ञ हा तात वदे वचाला ॥२५॥
“ माझ्या मुला वांचविले तुवां रे! दया तुझ्या फार मनांत थारे ।
झाले तुझे हे उपकार थोर, त्वां वाचविला मम आज पोर ॥३६॥
झाला पुनर्जन्मचि मत्सुताचा, विमोक्ष होई न तुझ्या ऋणाचा ।
तथापि ह्या अल्प धनास घे तूं, होओ तुला हें धन सौख्यहेतू ॥२७॥
त्वत्कृत्यमानें धन्य अल्प आहे, नको अव्हेरूं तरि, घे अतां हें” ।
वदोनि ऐसें धन बोपियेले, कृतज्ञतेला बहु दाखवयेलें ॥२८॥
कृतज्ञता यापरि दाखवून निरोपिला तो जनकें नमून ।
गेला गृहा तुष्ट सुवर्णदानें, सत्कृत्य त्याचें स्तविले जनानें ॥२९॥
अप्रासंगिक बोध जो करील तो लोकामधें निंदजे,
साहाय्य द्रुत जो करिल समयीं तो सज्जनें बंदिजे ।
हें लोका कळवावयास्तव कथारूपें अती अल्पसें
‘वेलावेदन’ नाम काव्य रचिलें विद्याधरें हे असें ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP