मंदार मंजिरी - ऐश्वर्यचलता

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


ऐहिक वैभव शाश्वत टिकणारें नसतें म्हणून ऐहिक वैभवाच्या पाठीस न लागतां सन्मार्गानें चाला, म्हणजे तुम्हाला शांति आणि सुख ह्यांचा लाभ होईल, असा बोध ह्या काव्यांत केला आहे. ऐश्वर्य ह्म० वैभव, चलता ह्म० चंचलपणा.
वृत्त वंशस्थ.
अनेक झाले नृपती जगांत या न ये जयांची गणती करावया ।
अनेक त्यांनी रिपु थोर जेणिले, स्वकीय राज्य प्रतिमल्ल मांडिले ॥१॥
विलास त्यांनी बहुसाल भोगिले, स्वकीय ऐश्वर्य जगास दाविलें ।
गळे नरांचे गतसंख्य कापिले, प्रचंड दोदंड बला प्रकाशिलें ॥२॥
तयीं नमस्कार असंख्य घेतले, जणों नमस्कार सुखार्थ चेतले ।
खुशामते ते जुळवूनि भोवतीं स्तुतिध्वनि प्राशुनि तोषले अती ॥३॥
परंतु सद्दी सरतांच ते बली बलिष्ठ शत्रूपति जाहले बली ।
जुन्या प्रभूंच्या स्थलिं हे प्रभू नवे विराजले उज्ज्वलवीर्यवैभवें ॥४॥
नवे तदा हे प्रभु फार गाजले, नव्या प्रभूंचे बहु पोमे माजले ।
जगीं जुन्यांचें मग नांव लोपलें, समस्त ऐश्वर्य तदीय सोपलें ॥५॥
नव्या प्रभूतें जन लागले नमूं खुशामत्यांची जुळली नवी चमू ।
जनें नव्यांचे स्तुतिवाद गायिलें, असे विपर्यास विचित्र चालिले ॥६॥
सुखें तयांनी बहुसाल भोगिलीं, सुखार्थ त्यांची तनु काय निर्मिली ।
विलास केले दिविदृश्यवैभवें धनें प्रजापीडनकर्मसंभवे ॥७॥
सरोनि सद्दी प्रभु हेहि नूतन विलोपले, विस्मरले तयां जन ।
मरोनि गेले प्रभु ते बलोध्दत, मरोनि गेले रिपु तत्पदीं नत ॥८॥
विलास त्यांचे सरले मदोद्भव, धनाढय त्यांचे सरले महोत्सव ।
प्रचंड त्यांची भवनें विलोपेलीं, नवीन आलीं मग त्यांचिया स्थलीं ॥९॥
नवीन येतां प्रभु राज्यशासनीं जुन्या प्रभूंची नुरली स्मृतां जनीं ।
नवीन झाली सगळीच पध्दती, नवीन राज्यावरि थारल्या मती ॥१०॥
मरोनि गेले प्रभु हे पुढें नवे, विलोपलीं नूतन राज्यवैभवें ।
नवीन येतां प्रभु लोपले जुने, अदृश्य झाले जणुं काय जादुने ॥११॥
अशा क्रमानें प्रभु मेदिनीवरी असंख्य झाले, अमृता न वैखरी ।
असंख्य राज्यें विलयास पावलीं, गणी तयांची नर कोण आवली? ॥१२॥
तदाप्त, मित्र, प्रिय, बंधुबांधव, पतद्रहस्थित्यनुकारि मानव- ।
लयास गेले, मग अन्य मंडली तशीच जन्मूनि लयास पावली ॥१३॥
जुने जुने भूप मरोनि लोपलें, नवे नवे तद्विभवास पावले ।
नवे नवे हेहि लयांस पावलें जगीं न तन्नाम न वीर्य थारलें ॥१४॥
तरंग एकास दुजा पुढें वळी, दुजास वा जेंवि तिजा क्रमें जळीं ।
नवें जुन्यांस प्रभु तेविं लोटिती, नव्यांस ह्या अन्य नवे, वंदू किती?
तरंग जैसे पुढच्याच मागले, तयांस ते जे जन्म पावले ।
तसे महीपास महीप लोटिती, अनंत सांगू क्रम हा तुम्हां किती? ॥१६॥
प्रचंड राज्यें विलयास पावलीं, नदीजलें सागरिं काय धावलीं? ।
जनांस नांवेहि न आज ठाउकीं असोनि तीं शत्रूमनांसि बाउ कीं ॥१७॥
न राजधानीस्थलही बघों शकों, कथाच तद्गेहविभादिंची नको ।
नसे जगीं शाश्वत राज्यवैभव, म्हणे तया बुदबुद सुज्ञ मानव ॥१८॥
जिथें न थारा प्रभुच्याहि वैभवा, जिथें नसे शाश्वत नाम रूप वा ।
तिथें असों आपण काय पामर? धनाधिकारोत्सुक हो न अंतरे ॥१९॥
कशास जोडा धन दास्यवृत्तिनें न जें टिके शाश्वत आत्मशक्तिनें? ।
कशास घाला धनिकाचिया गृहा असंख्य खेटे? धन तुच्छ निस्पृहा ॥२०॥
तुम्हांस मागा अधिकार लोभवी? शके न तारूं क्षण जो तुम्हा भवीं ।
तुम्हांस कां तो अधिकार जो मना अनीतिला प्रेरुनि देइ यातना? ॥२१॥
उगा नमस्कारसुखार्थ भाळतां, कशास शुष्कस्तुतिवाद ऐकतां? ।
धनें वृथा, तो अधिकार निष्फल, नरास अंतीं करितात विव्हल ॥२२॥
गृहामध्ये ज्या अजि एक नांदतो तिथें उद्यां येउनि अन्य राहतो ।
तिजा रहाया परवा तिथेंच ये, वृथा गृहप्रेम कसें म्हणां नये? ॥२३॥
धनें पिता कष्ट करोनि मेळवी, सुखांत तीं बालिश पुत्र घालवी ।
असेव्य ऐशा विषयांत रंगतो, सुखें मनें तो परिणामिं भंगतो ॥२४॥
अशेष ऐश्वर्य अतीव नश्वर, तया तुम्ही त्याज्य गणा निरंतर ।
मनोवचोवर्तनशौच दे सुख, तया असावें मनुजें सन्मुखें ॥२५॥
म्हणोनि हा बोध तुम्हांस मी करीं, नसो गृहीं प्रेम, धनीं न किंकरी ।
नयार्थ चाला नयमार्ग, शांतितें लहा, जरी आज न येइ अंति तें ॥२६॥
खरेपणानें व्यवहार चालवा, धनाधिकारादि तुम्हां मिळो न वा ।
खरेपणानें स्थिर शांति लाभते, धनाधिकारोद्भव सौख्य शुष्क तें ॥२७॥
जगीं असत्य व्यवहार चालतां जळे कवी लोपुनि सर्व शांतता ।
परंतु शांति स्थिर उद्भवे मनीं खरेपणाच्या स्वचरित्रचिंतनीं ॥२८॥
“ऐश्वर्यचलता” नाम काव्य वामननंदने ।
रचिलें सानुलें त्यातें आदरावें सदा जनें ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP