मंदार मंजिरी - कवीचा आनंद

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


दहा हजार वर्षांपूर्वी मानवी प्राणाच्या सुखाचें दु:खाशी जें प्रमाण होतें, तेम हल्लींच्या ज्ञानाचे वाढलेलें नाहीं, असा ह्या काव्यांत पूर्वपक्ष केला आहे. कोणी उत्तर पक्ष केल्यास तो अर्थात इष्ठच आहे.
साधा भोळा सरळ असतो मर्त्य अज्ञान फार,
तो चित्ताचे प्रकट करितो स्पष्ट सार विकार ।
त्याच्या संगीं जन न फसतो, तो सदा एकरूप,
ऐसें साधेपण बघुनिया साधु हर्षें अमूप ॥१॥
ज्ञानापेक्षां सुखकर असें वस्तु नाहीं जगातं,
ऐशी ऐकों श्रवणमधुरा बोलली नित्य मात ।
देखों किंतु प्रतिदिन नरध्वंसाचा पसारा-
ज्ञाने वाढे, मग न असुखा कां वदा ज्ञान थारा ॥२॥
झाली धन्वन्तरि खरी आजकालीं चढाई,
झालें वृध्दिंगमित अगदज्ञान ऐशी बढाई- ।
ऐकों येई निशिदिनिं, परी मृत्यु वैद्या टळेना,
देखों विश्वीं अनवरत ती वाढते रोगसेना ॥३॥
ज्या ज्ञानानें अनिश करिजे शाठ्यवृत्तिप्रसार,
ज्या ज्ञानानें दुरितकरणीं शक्ति वाढे अपार ।
ज्या ज्ञानानें हृदय न कळे, सत्य वा चित्तगूढ,
त्या ज्ञानाला स्तविल नर तो कां म्हणावा मूढ? ॥४॥
ज्या ज्ञानानें दुरितविलयें शुध्दि मर्त्यास यावी,
ज्या ज्ञानानें सकल मनुजें देवता मेळवावी,
त्या ज्ञानें कां मदनमिलता पावतो मत्य सर्व,
त्या ज्ञानें का वद करुनिया राहतो चित्तिं गर्व? ॥५॥
ज्या ज्ञानानें भर शमयुता मर्त्यसौख्यीं पडावीं,
जेणें व्हावी सकल अवनी संयुता स्नेहभावी ।
त्या ज्ञानें हो नर कुटिल कां? क्रूर कां? मत्सरीं कां?
सांगा ज्ञान प्रकट करि कां दुर्गुणांच्या अनीका? ॥६॥
अन्यायाला, कुटिल कृतिला, न्यायसारल्यारूप-
द्याया ज्ञानें निशिदिनिं बघों शक्ति येई अमूप ।
ज्या ज्ञानाचें शुचि नरसुखें वाढलिशीं न पाहों
त्या ज्ञानाची उगचि महती वर्णिती लोक कां हो? ॥७॥
ज्या ज्ञानानें शुचि ऋत लपविजे, सोडिजे मर्त्य सांग,
ज्या ज्ञानानें अमृत नविजे, दंडिजे जो अनाग ।
ज्या ज्ञानानें अनय नयसा निस्त्रपें दाखवीजे,
त्या ज्ञानानें मनुजसुख कीं ह्या जगीं वाढविजे ॥८॥
जो जो विद्वद्वर म्हणवितो ह्या जगीं आपणास
तो तो देखों चतुर असतो चित्त झाकावयास ।
बाह्याचारीं शुचितम अशी मित्रता दाखवून
तो कौशल्यें धन यश हरी, दैत्य तो, नैव ऊन ॥९॥
कां कांघावा, कुटिल करणी, क्रौर्य कार्पण्यकेवा-
वाढे ज्ञानें? वरुनि जरिही शुष्क होतांत खवा ।
ज्ञानाची कां परिणति करी भिन्न रूप स्वरूप?
ज्ञानप्राप्ति प्रचुर हृदया कां करी शौचकूप? ॥१०॥
सत्यें न्याय स्थिर न करिजे, न्याय सैन्यें स्थिरावे,
द्रव्यें किंवा कुटिल वचनें न्याय्यता न्याय पावे ।
जों ह्या लोकीं मनुज न बघे न्याय सत्यप्रतिष्ठ,
तों ज्ञानाचा स्तव नचि करा, आणितें ते अरिष्ट ॥११॥
राज्यें पूर्वीं बहु जिणियलीं राज्यतृष्णाकुलांनी,
होते मूढ प्रभु पशुच ते, त्यांस कोणी न वानी ।
किंतु ज्ञानें पटुतम असे आज होओनि राजे
अन्या देशां जिणिति, वचनीं त्यांचिया शांति गाजे ॥१२॥
पूर्वीं राज्यें बहु बुडविली पार्थिवीं वैभवार्थ,
त्याणीं नानापरि सुखविले कांचनें मित्रसार्थ ।
ज्ञानप्राप्या पटु नृप अतां देशभव्या कराया
स्वातंत्र्याच्या लघु विनिमयें ज्ञान जातात द्याया ॥१३॥
ज्या ज्ञानानें षडरिनिवह्ध्वंस झाला दिसेना,
जेणें उच्चावचविषमता लेशमानें टळेना ।
प्राचीनांची अवमति करायास जें ज्ञानी लावी
त्या ज्ञानाची उगचि महती मानवें काय गावी? ॥१४॥
जें धर्माच्या शिथिल करितें नीतिच्या बंधनातें,
जें कर्तव्ये विसरवि शुंभे आपुलीं मानवातें ।
देशप्रेमप्रसव खुडिते लोकचित्तांतला जें,
त्या ज्ञानासा स्तव परिसतां प्राज्ञ तो फार लाजे ॥१५॥
धिक् त्या ज्ञाना अधिक न करी आपुल्या जें सुखास,
धिक् त्या ज्ञाना पशुपरि करी क्रूर जें मानवास ।
धिक् त्या ज्ञाना पढवि जर तें क्रौर्य, कौटिल्य, दर्प,
धिक् त्या ज्ञाना जर करि नरा तें वृक, व्याघ्र, सर्प ॥१६॥
धिक् त्या ज्ञाना चिरडित असे बंध जें बंधुतेचें,
धिक् त्या ज्ञाना शिकवि मनुजा जें धडे क्रूरतेचे ।
धिक् त्या ज्ञाना पटु करि नरा जें लुटाया परास,
धिक् त्या ज्ञाना नरकसमता देइ जें भूतलास ॥१७॥
स्वस्ति ज्ञाना क्षितिवरि सुखें स्वर्गिचीं जें भरील,
स्वस्ति ज्ञाना निगडित नरा प्रीतिनें जें करील ।
स्वस्ति ज्ञाना करुनि अनघा विश्वबंधुत्ववृध्दी
सार्‍या लोकीं प्रकटिल खर्‍या जें सुखाची समृध्दी ॥१८॥
प्राचीनांचें परिस अमुचें ज्ञानभंडार थोर
ऐशी प्रौढी मिरविल गमे तो बुधा मूर्ख पोर ।
देवत्वाच्या चढविल पदा जें नरा तेंचि मान्य,
तेंचि ग्राह्य, प्रधि गणिल हो निश्चयें ज्ञान, नान्य ॥१९॥
जाऊं याहो दशरतसहस्त्राब्द मागें हटून
आतांपेक्षा लव न अपुलें सौख्य होईल ऊन ।
जैशीं इच्छापरिणतिफलें भोगि सज्ञान आजी,
तैशीं पूर्वी अनुभवियलीं अज्ञलोकें समाजीं ॥२०॥
सुखाचें आज दु:खाशी जें प्रमाण जगीं असे ।
तें ऊन नव्हतें पूर्वीं; न विज्ञान वृथा कसें? ॥२१॥
“विज्ञानव्यर्थता” नाम काव्य वामननंदनें ।
केलें निकष सत्याचा लावावा त्यास सज्जनें ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP