मंदार मंजिरी - काककाणता

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


कथानक.
श्रीमद्वाल्मीकिकृत रामायणाच्या अयोध्याकांडात सर्ग ९५ आणि ९६ ह्यांच्या दरम्यान जो प्रक्षिप्त सर्ग आहे, त्यांतील ३४ ते ५७ ह्या श्लोकांचा आधार घेऊन आम्ही पुढील कृति केली आहे.
श्री रामचंद्र वनवासांत असतां एके समयीं एका कावळ्यानें सीतेला उपद्रव दिला, म्हणून त्याला द्ण्ड करावयासाठी श्रीरामचंद्राने त्याचेवर ईषीकास्त्र सोडिले. तेणेंकरून त्याचा एक डोळा फुटून त्याला काणता (म्ह. एकाक्षता) आली. हा मजकूर पुढील कवितेंत ग्रंथित केला आहे.

वृत्त अनुष्टुभ्
ससोदर सहस्त्रीक चित्रकूटीं रघूद्वह ।
राहे मुनिमनीं जैसा शम वेदस्मृतींसह॥१॥
हीं तिघें राहिलीं तेथें हर्षनिर्भर मानसें ।
पीडाकार असें काहीं तेथें होत तयां नसे ॥२॥
एकदा लक्ष्मणें शुध्द बाणांहीं दश मारिले ।
भोजना मृग आणोनी जानकीप्रत अर्पिले ॥३॥
आहारपरिणामानें तिणें तत्मांस रांधिलें ।
मग रामें यथाचार भूतातें भाग वोपिले ॥४॥
सानुजें मग तें रामें सुपक्कामिष भक्षिले ।
स्वादिष्ट मिष्ट तें खाद्य सीतेनें मग सेविलें ॥५॥
भक्षणास्तव जें मांस रांधिले नव्हतें असें ।
वाळाया आतपीं सीता ठेवोनी रक्षणा बसे ॥६॥
मांसलोभें तिथें आला कोणी किंकाक सत्वर ।
धूर्त जैसा परद्रव्यजिघृक्षेनें पटच्चर ॥७॥
परि मांसाहुनि तया सीता हृद्यतरा गमे ।
तियेचें देहलावण्य देखतां बहु तो रमे ॥८॥
कोठें साध्वी दुराघर्षा? कोठें तो क्षुद्र वायस? ।
शिरस्थ मणि सर्पाचा तो काढूं करि मानस ॥९॥
भुलला पाहुनी भारी तीच्या मृदुल विग्रहा ।
तीच्या शिरीं करीं स्कंधी बसे निस्त्रप काक हा ॥१०॥
चंचुघर्षण धृष्टत्वें करी तो तदुर:स्थलीं ।
न सोडी त्या सुगात्रीला जरी ती त्यास हाकली ॥११॥
सीतार:स्थलि तो चंचू काकाचा दिसला तसा ।
हरिदंष्ट्रास्पर्शिकर भिल्लाचा दिसतो तसा ॥१२॥
बोचोनि नखचंचूनीं, उडवोनि स्वपक्षती ।
काकें आयसिलें नाना प्रकारें तिजला अती ॥१३॥
मृदुंगी भीरू अबला पीडीनें फार कावली ।
बहु यत्न तिणें केले परी मुक्त न जाहली ॥१४॥
इकडे इकडे सीता पळाली भयविव्हला ।
परि तो तिज सोडीना, तिच्या मागुनि धावला ॥१५॥
धावे तन्वी, पळे, लोळे, ओरडे, आरडे, रडे ।
परी निर्लज्ज दुष्टात्मा जाई तोहि तिच्याकडे ॥१६॥
ह्या काकवर्तनें रामचित्त कोपें तदा भरे ।
पति कोण शके पाहों स्त्रीघर्षण असें परें? ॥१७॥
अवनिस्था शरैषीका रामें उचलिली करीं ।
अभिमंत्रुनि ती केली जाया सिध्द खगावरी ॥१८॥
याकाचन शरैषीका वीर्य अद्भुत ती वरी ।
वीरें स्थापियला रामें वीर्यवन्मंत्र तीवरी ॥१९॥
ईषीका ती वीर्यवती धावली त्या खगावर ।
पुढें तो चालला भीत तीहि मागुनि सत्वर ॥२०॥
अन्य होतें तिथें काक तयांनी हा उपेक्षिला ।
व्यसनीं पडला सांगा स्वजनें कोण रक्षिला ॥२१॥
वेगवान मानिला वायु, वात्या अधिक मानिली ।
शरसंत्रस्त काकानें वात्याही दूर सारिली ॥२२॥
काकवेगानुसारें तो अनुपृष्ठ निघे शर ।
राममंत्रबलक्षिप्तो त्या शरा काय दुष्कर ॥२३॥
शरानुसृत तो काक स्वदेसंसिक्त जाहला ।
श्रमला, भागला, भ्याला, तापला, अनुतापला ॥२४॥
चुकवाया शरा काक जवें पळत सूटला ।
तो त्या रामशरव्याजें यमदण्डचि वाटला ॥२५॥
सूं सूं ध्वनि करोनी तो काकामागुनि चालिला ।
बोधीत कीं परस्त्रीचा काम दंडार्ह मानिला ॥२६॥
उडे काक पुढें वेगें, धावे मागुनि तो शर ।
काकवेगा न साहोनी तो धावे जणुं सत्वर ॥२७॥
त्रैलोक्यीं हिंडला काक, परी मुक्ति न पावला ।
न पाहे तो शरैषीकेपासुनी रक्षणस्थला ॥२८॥
जाओ वनीं, उडो शैलीं, चढो वा तो नभ:स्थली ।
शरैषिका तयामागें तच्छायेपरि चाललो ॥२९॥
तयाला न त्रिभुवनीं मिळालें आश्रयस्थल ।
अगत्या तो पुन्हा आला रामापाशींच दुर्बल ॥३०॥
रामा तो शरणा काक येओनी तत्पदीं शिर- ।
ठेवोनी वदला ऐसें धरोनी मानुषी गिरा ॥३१॥
“शरणं त्वां प्रपन्नोऽस्मि मां त्रायख सतां वर ।
इमां शीघ्रं शरषीकां दयालो प्रतिसंहर” ॥३२॥
ह्या वचा ऐकुनी राम वदला शरणागता ।
“अमोघा मंत्रसामर्थ्ये ईषिका जाणं तत्वतां ॥३३॥
काहीं तरी तुझी हानी केल्याविण शमे न ती ।
मत्पदावरि केली ती व्यर्था तव असे नेती ॥३४॥
ईषीकेचें तोचि वीर्य जाण क्षम हरावया ।
जो शीतत्व कृशानूतें द्यावया शक्त गा! वया ॥३५॥
जर व्हावे तुला प्राण एक अंग त्यजावया- ।
सिध्द हो; हानि होओ दे; मान्य हो मद्वचास या” ॥३६॥
ऐकोनियां रामवच यापरी निग्रहोदित ।
काक तो बोलिला ऐसें विप्रतीसारकर्षिते ॥३७॥
“प्रिय हे मजला प्राण तध्दानी नचि साहवे ।
सोडितों एक मी नेत्र कीं एकानेहिं पाहवे ॥३८॥
एका नेत्रांतिल मला तारका अपरीं अहा ।
न्यावया शक्ति दे रामा, पुरवीं मम काम हा” ॥३९॥
“तथास्तु” म्हणतां रामें शरैषीका जवें पडे- ।
काकैकनेत्रांत; फुटे तें तया काणता जडे ॥४०॥
काणत्वें टळले आज प्राणांवरील सांकडे ।
म्हणोनी हर्षला काक पायां रामाचिया पडे ॥४१॥
मग तेथोनि तो काक गेला स्वसदनाप्रती ।
सीताहि पतिसामर्थ्यें मानसीं हर्षली अती ॥४२॥
अर्पिलें कवन “काककाणता”
तें लहो बुधजनांत मान्यता ।
वामनात्मज कवीहि हा लहो
शांति सौख्यपद निर्मला अहो ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP