मंदार मंजिरी - चित्रचातुरी

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


कथानक.
शुचि आणि रुचि ह्या नावांच्या दोन चितार्‍यांमध्ये कौशल्य श्रेष्ठतर कोणाचें, ह्या बाबतींत वादविवाद झाला. परस्परांनी परस्परांच्या चित्रांतील दोष काढले, आणि आपआपली कारागिरी अधिक आहे, असें प्रत्येक म्हणूं लागला. शेवटीं असें ठरले कीं श्रेष्ठतरत्वाचा निर्णय करण्यासाठी प्रत्येकानें एक एक चित्र तयार करावें व ज्याचें चित्र उत्कृष्ठ ठरेल, तोच उत्कृष्ठ चित्रकार समजावा. शुचीनें एक द्रक्षांचा घोंस काढिला. तो इतका हुबेहुब साधला होता कीं तो खरा समजून पक्षी त्यावर चोंची मारूं लागले. रुचीनें भिंतीवर एक पडदा काढिला. तोहि इतका उत्तम साधला होता की, त्याला शुचि देखील फसला. शुचीच्या चित्रास निर्बुध्द पक्षी फसले, परंतु रुचीच्या चित्रास शुचिही, - ज्याला चित्रकलेचे पूर्ण ज्ञान होतें,- तोहि फसला. हयावरून रुचीची कारागिरी श्रेष्ठतर ठरली. हा विषय ह्या काव्यांत आहे.
चित्रचातुरी म्हणजे चित्रें काढण्याचे बाबतींत कौशल्य.

वृत्त दोहा किंवा दोहरा.
पूर्वि चितारी मणिपुरी होते दोन रहात ।
चित्रालेखनिं त्यांचिया परि ते अति निष्णात ॥१॥
त्यांची न सरी, कोणिहि शकले पवायास ।
मग सरशींचे बोलणें वायां गोष्ट कशास? ॥२॥
चित्रें काढुनि विकुनि तीं पैसा ते मिळवीत ।
त्यांची होती हीच हो निर्वाहाची रीत ॥३॥
प्रमाणशुध्दा तत्कृती, रंगांनीं अति गोड ।
सारे जन वाखाणिती, कीं तींत नसे खोड ॥४॥
मत्सरही त्यांच्या कृती बघतां जाइ जिरून ।
कीं त्या भिन्ना नोव्हत्या सत्य निसर्गाहून ॥५॥
एकहि ऐसें नोव्हतें गृह त्या मणिनगरांत ।
शोभादायक नोव्हतीं त्यांची चित्रें ज्यांत ॥६॥
चित्रें त्यांची टांगलीं होतीं राजगृहांत ।
सद्वस्तूचा सर्वदा गौरव होइ दहांत ॥७॥
देवांच्याही आलयीं तच्चित्रें बहुसाल ।
शोभत होतीं सर्वदा सुंदर भव्य विशाल ॥८॥
मानव, पशु, वैसारण, द्विजे, किंवा त्रिदिवेश ।
काढियले जे जे तयीं, दोष तयात न लेश ॥९॥
त्यांणी आकृति काढिल्या त्या सार्‍या रमणीय ।
परमवधिला पोचलें नैपुण शुध्द तदीया ॥१०॥
त्यांच्या चित्रांतिल नद्या, पर्वत, पारावार ।
वृक्ष, अरण्यें गव्हरें, दिसलें सुंदर फार ॥११॥
विस्तर राहों; एकदा पाहों नदिचा कांठ- ।
गेले, तेथें जाहली त्या दोघांची गांठ ॥१२॥
तेथ तयांची भाषणें त्या समयास रसाल ।
जीं झाली, तीं ऐकुनि जन हो प्रमुदित व्हाल ॥१३॥
चित्रकला हा तेधवां होता विषय तदीय ।
त्यावर त्यांचें बोलणें, झालें अति रमणीय ॥१४॥
मत्सर नव्हता भाषणीं, होता शुध्द विनोद ।
तो ऐकियला तूमच्या भरिल मनीं आमोद ॥१५॥
एकेकानें आपुलें वर्णुनि नैपुण फार ।
दुसर्‍याची कृति निंदिली देउनियां आधार ॥१६॥
रुचिनें शुचिच्या दाविली आलेख्यांत उणीव ।
मान्य करीना ती शुची, दावी रोष अतीव ॥१७॥
शुचिनेंही रुचिच्या कृती निंदियल्या अतिमात्र ।
पुष्कळ दावुनियां स्थळें जीं दोषाला पात्र ॥१८॥
वदला रूचिला तो शुचि निंदात्मक वचनास ।
वचन परी तें झोंबले रुचिच्या नैव मनास ॥१९॥
“प्रमाणशुध्दा एकही स्वत्कृति नैव दिसेल ।
वर्णयोजना सृष्टीच्या वस्तूशीं न जुळेल ॥२०॥
मजेपक्षां आलेखनीं त्वकौशल्य न थोर ।
मोरोपेक्षां नर्तनीं अधिक नसे लांडोर” ॥२१॥
शुचिचें हें वच ऐकुनी रुचि वदला हे बोल ।
“मित्रा, तव हें बोलणें मजला गमतें फोल ॥२२॥
माझ्या आलेख्यांतला सत्य असे अनुभाव ।
अनादराला त्यांचिया न बुधांस मिळे ठाव ॥२३॥
चित्ताकर्षक एकही मित्रा, त्वत्कृति दाव ।
एकाही त्वत्कृतिमधें शुध्द नसे अनुभाव ॥२४॥
दोष नसो त्वत्कृतिमधें, मधुर न त्यांत उठाव ।
भुलवि मना जें चित्र तें एक तरी तव दाव ॥२५॥
मत्कृतींपुढतीं त्वत्कृति एकहि पळ न टिकेल ।
स्पर्धा शुध्द घृतासवें करिल कधींहि न तेल” ॥२६॥
शुचिला रुचिवच जाहलें मान्य न हें लवलेश ।
म्हणुनि वदे तो, “गा रुचे, नेणसि मम उद्देश ॥२७॥
रुचि वदला शुचिला पुन्हा, शुचिही रुचिला फार ।
क्रमें क्रमें हें जाहलें संभाषण अनिवार ॥२८॥
बहु झाल्यावरि वाद हा वदला रुचि हे माते ।
व्यर्थ कशाला वाद हा अर्थ न अल्प जयांत? ॥२९॥
मदधिक तूं किंवा सख्या, त्वदधिक मी हा वाद ।
ऐसा चालुनि आपणां होइल बहुत विषाद ॥३०॥
ठरवायास्तव आपुलें नैपुण चित्रांतील ।
सुचते मजला युक्ति ही; निर्णय तीच करील ॥३१॥
एक चित्र मी काढितो;  काढीं तूंही एक ।
नैपुण्याचा आपुल्या तेणें होउ विवेक ॥३२॥
मान्या झाली युक्ति ही शुचिच्या फार मनास ।
सरला तत्क्षणिं वाद तो नव्ह्ता अंत जयास ॥३३॥
ठरलें कीं, दावावया पटुतेचा अतिरेक ।
चित्रें काढावीं तयीं एकेकानें एक ॥३४॥
चित्रें तीं अमक्या दिनीं व्हावीं दोन्ही पूर्ण ।
हें ते ठरवुनि चालते झाले स्वगृहा तूर्ण ॥३५॥
शुचिनें घेउनि काळजी, वेंचुनि पाटव सर्व ।
चित्र काढिलें व्हावया गर्व रुचीचा खर्व ॥३६॥
ठरल्या दिवसा जाहलें चित्र शुचीचें पूर्ण ।
हें गृहभित्तिस लाविलें बाहेर तयें तूर्ण ॥३७॥
चित्र तिथें तें देखुनी, झाला हर्ष तयास ।
मग गर्वानें रुचिचिया गेला तो सदनास ॥३८॥
वदला यापरि शुचि तया, “झालें आहे पूर्ण- ।
मच्चित्र, पहायास तें चल मत्सदना तूर्णं ॥३९॥
मच्चित्र बघाया रुचे, ये माझ्या सदनास ।
व्हावें त्वां मन्नैपुणा देखुनि माझा दास ॥४०॥
मच्चित्रांतिल दावितों ये तुजला कौशल्य ।
तें बघतां त्वन्मानसा वेधिल मत्सरशल्य ॥४१॥
रुचि गेला शुचिच्या गृहा मग देखाया चित्र ।
शुचिनें मार्गीं वर्णिले निज कौशल्य विचित्र ॥४२॥
गृहास दोघे पोचतां शुचि वदला मित्रास ।
“आपण दोघे ये बसूं लपुनी या स्थानास” ॥४३॥
तेथें बसल्यावरि वदे शुचि मित्रा हे बोल ।
“गृहभित्तीवरि माझिया पाहुनि चित्रा डोल ॥४४॥
माध्वीकांचा देख तो गोंडस घोस रसाल ।
वर्णाची जुळणी पहा सलक्ष्य किंचित्काल ॥४५॥
हिरव्या वर्णावरिल तो वर्ण पहा रे श्वेत ।
वद येतें हे त्वन्मना किंवा नाही येत? ॥४६॥
छायेची बघ चातुरी, कीं फलकावचांतून- ।
दिसतो थबथबला फलाभ्यंतरि सुरस अनून ॥४७॥
घोस पहा तो निमुळता, शाखा, पर्णें नीट ।
मित्रा, बघ तो बारका पर्णावरचा कीट ॥४८॥
सत्य निसर्गातीला जसा माध्वीकांचा वृंद ।
तसाच मच्चित्रांतला दे न कुणा आनंद?” ॥४९॥
बोलत असतां हें शुची, आला शुकसमुदाय ।
तो माध्वीकांच्याकडे रसलोभानें जाय ॥५०॥
प्रत्येकानें चंचुचा घोसावरि आघात- ।
केला लोभानें अहो खाया रस जो त्यांत ॥५१॥
त्या घोसांत न बिंदुही रस ते शुक लाहून- ।
नैराश्यें आल्या पथें गेले शीघ्र निघून ॥५२॥
गर्वानें फुगला शुची दावूनि चमत्कार ।
रुचिला वदला, “गा सख्या, म्हण हें पाटव फार ॥५३॥
माध्वीकांचा घोस हा चित्रालिखित मदीय- ।
भुलवी पक्ष्यांची मनें कीं तो अति रमणीय ॥५४॥
चित्रकलानैपुण्य जें ते म्हणतों मीं हेंच ।
माझें पाहुनि चित्र हें उतरावी तव रेंच ॥५५॥
शुचिचें वच हें ऐकुनि वदला रुचि हें त्यास ।
“माझेंही बघ चित्र तूं, ये रे मत्सदनास ॥५६॥
गेले दोघे तेथुनी रुचिच्या मग सदनास ।
मग शुचिला वदला रुची “बघ ये मच्चित्रास ॥५७॥
या मार्गानें चल पुढें, मी येतों मागून ।
चित्र पहा तूं एकला लक्ष्य शुचि लावून” ॥५८॥
शुचि पुढतीं मग चालला, रुचिचित्र पहायास ।
त्याच्या मार्गी जवनिका दिसली एक तयास ॥५९॥
असेल तीच्या पलिकडे चित्र असें समजून ।
जाऊं लागे आंत तो तीतें सरकावून ॥६०॥
बोटांनी ती जवनिका पार्श्वी सारायास- ।
शुचिनें केला कर पुढें, घाई झाली त्यास ॥६१॥
तों भिंतीवरि तन्नखें खरडुनि त्या समयास- ।
कर्कश झाला ध्वनि, तयें विस्मित केलें त्यास ॥६२॥
होता रुचि मागें उभा तोही स्मित करि मंद ।
फसला शुचि हें पाहुनि झाला त्या आनंद ॥६३॥
शुचिही झाला तेधवां सत्रप किंचित्काल ।
मग वदला मित्रांस हें, “त्वत्कौशल्य विशाल ॥६४॥
माझ्या चित्रें फसविलें बुध्दिविहीन विहंग ।
माध्वीकांचा घोंस ते देखुनि झाले दंग ॥६५॥
परि मी ज्ञानी एवढा चित्रकलानिष्णात- ।
त्वच्चित्रानें फसविलों, खोटी, हे नचि मात ॥६६॥
घड्या, दोर, मळ सुरकुत्या, सुंदर ह्या अतिबेल ।
तव ही देखुनि जवनिका कोण न नर तोषेल ॥६७॥
मदधिक मित्रा! शतगुणें अससी चित्रकलेंत ।
चित्रकलादेवीस तूं क्रीडाहेतुनिकेत ॥६८॥
आजपासुनी तूं मला गुरुसा अतिमहनीय ।
आजपासुनी तुजपुढें सरला गर्व मदीय ॥६९॥
लोह जणों मत्पाटव, त्वत्पाटव जणुं हेम ।
तव कोप नसो मजवरी संतत राहो प्रेम ॥७०॥
ऐसें वोलुनि आपुल्या गेला शुचि सदनास ।
रुचिगुरुलाभें जाहला मोठा हर्ष तयास ॥७१॥
शुचिरुचिचित्रांचा पुरीं लोकांना वृत्तांन्त- ।
कळला तेव्हां जाहले सारे दृष्ट नितान्त ॥७२॥
रुचिची देखुनि जवनिका लोकांना आनंद- ।
झाला, जैसा हो पिका पाहुनिया माकंद ॥७३॥
परि होता हा जवनिकादर्शनभव आनंद- ।
शुचिनिर्मत्सरतोद्भवानंदाहुनि तो मंद ॥७४॥
शुचिची वृत्ती आदरा, मत्सर द्या सोडून ।
म्हणजे जन हो ह्या जगीं व्हाल भवें नचि दून ॥७५॥
“मत्सर सोडा,” हा जना करि विद्याधर बोध ।
ह्या बोधाहुनि नाढळे उत्तम करितां शोध ॥७६॥

श्लोक
पटूपदासि जशि कञ्जमाधुरी,
सज्जनासि तशि चित्रचातुरी- ।
आवडो, अमलशांतिसंयुत-
हा निरंतर असो उमासुत ॥७७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP