मंदार मंजिरी - विसंवाद

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


मनुष्याच्या वर्तनावरून आणि भाषणावरून त्याचे विचार किंवा हेतु जाणतां येत नाहीत, असा ह्या काव्याचा मथितार्थ आहे.
वर्तनांत वचनांत नरांचें आपणास न कळे मन त्याचें ।
त्यांवरी भरवसून नसावें, तीं सदा फसवितीं समजावें ॥१॥
सव्य वाम दिसतें मुकुरांत होइ रूपपरिवृत्ति तयांत ।
तत्व हें नरपरीक्षणें लागे, प्राज्ञ तें स्मरुनि संतत वागे ॥२॥
बाह्य वर्तनि न हेतु दिसेल, जो करी  तदवलंब फसेल ।
चित्तिं हेतु असतो अति गूढ, वर्तनें ठकविजे अतिमूढ ॥३॥
भिन्न हेतु करवी कृति एक, एकही करवि हेतु अनेक ।
हेतु जाणुनि कृती न कळेल, हेतु वा न कृतिनें समजेल ॥४॥
शौर्य जे प्रकटिती समरांत शूर ते न सगळे असतात ।
प्रेरिती विविध हेतु तयांस हें विचारुनि कळेल तुम्हांस ॥५॥
रोगपीडित मनुष्य मराया आहवीं ढकलितो निज काया ।
प्रेरितें विमल धैर्य न त्यास, प्रेरि रोगचि तयास सयास ॥६॥
कीं गृहांतील निरर्थक तंटे, कीं तनूभव अविद्य करंटे ।
कीं त्रपारहित जाररत स्त्री पाठवी करुनि त्या रणिं शस्त्री ॥७॥
जे उदार असती दिसण्यांत त उदार सगळे न मनांत ।
आपणा कृपण लोक म्हणेल हें तयां भय असें अतिवेल ॥८॥
पुत्रमृत्युभव घोर विरक्ति तन्मनांतिल हरी धनभक्ति ।
यामुळें कधिं कधिं निजवित देइ तो, जरि उदार न चित्त ॥९॥
मान हालवुनि गोड वदे तो घोर दु:ख मनुजाप्रति देतो ।
जें प्रमाण मधुरोक्तिस लावूं तन्मनोवृजिंनि तें सम पावूं ॥१०॥
अश्रु ढाळि नर तो न दयाळू, जो कृपा करिल तो न कृपालू ।
ती दया परिणमे बुवपातीं, स्वार्थसाधननिमित्त कृपा ती ॥११॥
दावितो हितपरत्व वचांत तोच गुप्त कृतिनें करि पात ।
प्रेम दावि वचनीं स्ववयस्यीं, योजि तत्पतनयुक्ति रहस्यीं ॥१२॥
तो न नम्र शिर जो नमवील, नम्रता लपवि वंचन शील ।
वागला जरिहि नम्रपणानें पूर्ण तध्ददय अत्याभिमानें ॥१३॥
ताठ जो बहु असेल समाजीं तो म्हणेल धनिका नर ‘हां जी’ ।
निर्धनासहचि ताठपणा तो, श्रीसुतासह लयाप्रति जातो ॥१४॥
श्रीसुतां खुलवि जो नमनानें निधर्नां छळि अशंक मनानें ।
नम्रतापुरुषतासमवाय विस्मयें मन भरील न काय? ॥१५॥
नीतिचा करिल जो उपदेश त्यास नीतिपर मानिल देश ।
किंतु तध्ददयिं नीति न थोर जेविं धूलि भुवि जों बहु वारें ॥१६॥
नीतिचा मिरवि जो नर डौल तो अनीतिसदनीं प्रिय मौल ।
वर्तनीं रहसि नीति झुगारी साधुपीडानिं तया सुख भारी ॥१७॥
कार्य सिध्द अपुलें नर व्हाया शत्रुला स्तवि तया फसवाया ।
भक्तिमूलक नसे स्तुति जाणा, हेतुला स्तुतिचिया मनिं आणा ॥१८॥
द्वेष चित्तगतही लपवाया शत्रुला स्तवि, पडे नर पायां ।
हेतु वंचन तया स्तवनाचा, चित्तिं न स्तुति वदे जरि वाचा ॥१९॥
निंदनी असति हेतु अनेक, झाकि निंदन हि भक्त्यतिरेक ।
द्वेष गुप्त करवी स्तुति जेवीं मित्नताहि भुवि निंदन तेवीं ॥२०॥
निंदन नर जनीं स्ववरिष्ठ हें खरें धरिति त्यांस अरिष्ट ।
निंदन स्फुट जना फसवाया, स्नेह गुप्त नचि ये वळखाया ॥२१॥
डौल जे करिती सभ्यपणाचा, जे न बोलति जनांत कुवाचा ।
ते खरे नसति सभ्य न शिष्ट, तत्समागम नयास अनिष्ट ॥२२॥
दाविती रसिकता जगतांत ते अविद्य बहुधा असतात ।
ग्रंथ त्यांस न कळे, लवमात्र, डौल ते मिरविती अतिमात्रा ॥२३॥
जे अविद्य रसिकत्वविहीन ते सदा करिति डौल नवीन ।
डौल पाहुनि फसे जन मूढ, कां न हो रसिकतायश रूढ ॥२४॥
न्यायसूर्ति झळके नर लोकीं स्त्रीस तो रडवि लोटुनि शोकीं ।
वोपितो स्वगणिकेप्रति वित्त, स्त्री निजागणि तदीय न चित्त ॥२५॥
श्मश्रु नित्य करवूनि वरिष्ठा पूजिती छळिती तेचि कनिष्ठा ।
त्यांस ताठ मृदु वा म्हणवेना, जो म्हणेल करि तो स्थिर ऐना ॥२६॥
उच्च जो पदिं असे नर त्याला अन्य उच्चपदिं हो खर भाला ।
मानि तो सुजनपात करोनी लोक मद्यश सुखाविल दोनी ॥२७॥
जो चढे पुरुष उच्च पदास तो खरोखर असे विभुदास ।
उच्चता नर विभुस्तुतिगानें लाहतो, जरि तयीं गुण साने ॥२८॥
जो बघों पुरुष उच्चपदीं तो उच्च आपण असें म्हणवीतो ।
लोकही म्हणति उच्च तयास नेणतां अधम तध्ददयास ॥२९॥
व्यावहारिक अशा विभवानें मंडितास भजती जन मानें ।
वैभवांकित असे व्यवहारीं तो स्तुतीस न सदा अधिकारी ॥३०॥
उच्च वृत्ति करि उच्च नरास, स्थान उच्च न, न वा धनरास ।
तत्व मूढ जन हें उमजेना, त्यास काचमणिभेद कळेना ॥३१॥
उच्च दे न पद उच्च गुणातें, स्थान नीच करि नीच न त्यातें ।
उच्चता अवचता गुणयोगें येतसे, कधिं न ती पदभोगें ॥३२॥
नित्य उच्चपदिं नीच नरास पाहतो; उचित ज्यां उपहास ।
हेमपंजरिं अधिष्ठित काक हासवी न कवणासि वराक । ॥३३॥
ग्रंथनामगणती शिकतो तो श्रेष्ठ उच्च जनदृष्टिस होतो ।
पंडितत्व अतिविस्तृत त्यांचें हें मत प्रकट होइ जनांचें ॥३४॥
ग्रंथसारलवगंध नसून, ग्रंथनामगणनाच करून ।
पंडितत्वयश मेळवितात उच्च ते पदिं सुखें चढतात ॥३५॥
रम्य सुंदर असे मुख ज्यांचें, बोलती सुरस जे प्रिय वाचे ।
शीघ्र ते चढति उच्चपदाला, मार्ग सर्व उघडेच तयांला ॥३६॥
रम्य देखुनि फसे मुख लोक, बाहुली बघुनि ज्यापरि तोक ।
रम्य ज्यास मुख देइल दैव त्यास उच्चपद, कीर्ति सदैव ॥३७॥
वावदूक वदतो मृदु गोड, नीतिची करुनि सुंदर फोड ।
शब्दडंबर जना ठकवीतें, गर्ह्य वस्तु शुचिसें दिसवीतें ॥३८॥
वावदूक अति गर्हित तत्वें आचरूनि फसवी कुशलत्वें ।
नीतिशी निज अनीति करीतो, साधुनीतिहि अनीतीपरी तो ॥३९॥
वावदूक करि सज्जनघात, स्वर्गिं तो अजि दिसेल सुखांत ।
वावदूक हरि सज्जनवित्ता, रक्षणश्रम तदीय न चित्ता ॥४०॥
वावदूक करि सज्जनहत्या, ती घडे स्व अवनार्थ अगत्या ।
ताडि साधुस म्हणे मम शौर्य, कौशल स्फुट म्हणे मम चौर्य ॥४१॥
साधुचा बुडवुनी अधिकार तो म्हणे मम तयीं उपकार ।
घोर दु:ख अधिकारनिमित्त दु:ख भोगिल तदीय न चित्त ॥४२॥
चाटितो विभुमुखोद्गत लाला, साधितो अपुलिया कुशलाला ।
कृत्यं हें अति विनिंद्य खरे हो, वावदूकवचिं वंद्य ठरे हो ॥४३॥
वावदूक न करी व्यभिचार, काम सृष्टिनियमोत्क्ष विकार ।
तो करी सुजनकीर्त्यपहार नाम त्याप्रति विनोद असार ॥४४॥
वावदूकमुखनिर्गतशब्दडंबर ध्वनि करी जणुं अब्द ।
हा ध्वनी हरि विवेक जनाचा, थोर सत्य महिमा वचनाचा ॥४५॥
मित्रहो वचनपाटवशक्ति कार्यं तें करि न जें हरिभक्ति ।
शक्ति नाश करि ही खलहस्तीं नाश मत्त करि ज्यापरि हस्ती ॥४६॥
ग्रंथलेखन तुला श्रमवील तें त्यजूनि सुख मेळविशील ।
बोध हा मृदुवचें करणारे ते हितेच्छु नसती जन सारे ॥४७॥
कीर्तिनें झळकला स्वकनिस्ष्ठ साहतो न स्वलवृत्ति वरिष्ठ ।
यामुळें करि तया उपदेश तन्मनांत हितबुध्दि न लेश ॥४८॥
ग्रंथ ज्यांस समजे नचि सार्थ तो विनिंदित अहो नरसार्थ ।
ग्रंथ निंद्य नसतो लवमात्र, निंदनास नरसार्थचि पात्र ॥४९॥
बाह्यरूप बघुनी न भुला हो, कीं न या प्रखर संकट लाहो ।
नीच सत्तम शिका वळखाया, सत्परीक्षण न होइल वाया ॥५०॥
जना विसंवाद समर्पिला असा,
करो तयांच्या परितष्टु मानसां ।
उमात्मजा जो वितरो मलाशम,
दुजी न अंत:करणीं स्पृहा मम ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP