मंदार मंजिरी - श्री शारदा

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


[श्री ही संपत्तीची देवता आणि शारदा ही विद्येची देवता. ह्या दोघींच्या सामर्थ्याची तुलना ह्या काव्यांत केली आहे.]
समर्था महीमंडलीं श्री खरी, दुजा वस्तुला ये न तीची सरी ।
जरी शारदा श्रेष्ठ आहे गुणीं तरी श्रीहुनी मानिजे ती उणी ॥१॥
सदा श्रीस लाघे अरुध्दा गती नदी काय वर्षर्तुकालीन ती ।
परी शारदेला मिळेना स्थल, तिचा सर्व ठायीं सदा हो छल ॥२॥
धनें जो असे आढय तज्जल्पना जनें भाविजेतात सत्कल्पना ।
जनीं शारदा पावते तुच्छ्ता जरी तद्वचें पावनें तत्वता ॥३॥
धनें आढ्य तो कर्कशा गी वदे, तया मञ्जुतेचे जन श्रेय दे ।
जरी सूनृता गी वदे शारदा तरी ती तिरस्कार पावे सदा ॥४॥
धनें आढ्य तो वक्रता आदरी, जनीं स्तोत्रे “सारल्य त्यातें भरी”
विपर्यस्त सारल्य वा वक्रता भरी विस्मयें मन्मना तत्वता ॥५॥
जयीं श्री समृध्दा तयाच्या गुणा इयत्त्ता न ऐसें न वाटे कुणा?
कुलीनत्व, पांडित्य, वेद, स्मृती वसे, शास्त्र, विद्या तया संगती ॥६॥
वदो श्री कुठेही असत्या गिरा तिची सत्यता शैलमूलस्थिरा ।
श्रुतीनें, स्मृतीने विरुध्दा जरी तरी श्रीगिरा मानिजे ती खरी ॥७॥
त्रपा श्रीसमृध्दीही दिसेना लव शशाचे शिरी जेविं शृंगोद्भव ।
जरी नग्न होओनि तो नाचला तरी लोक वानी सदा त्याजला ॥८॥
जया श्री कृपादृष्टिने पाहते तयाचेकडे श्रेष्ठता वाहते ।
कितीही असो मूढ मूर्ख तो, जनीं आदरा होतसे पात्र तो ॥९॥
करी वास ऋध्दी जयाचे घरीं तयाचे घरीं सिध्दि पाणी भरी ।
मनीं कोणताही धरो काम तो, बघों नित्य साफल्य तो पावतो ॥१०॥
असे जो धने आढ्य त्याच्या कृती जना ऐकियेल्या करीती कृती ।
जरी सर्वसामान्य त्या तत्वतां तरी पावती त्या जनीं मान्यता ॥११॥
कृपाद्रुष्टीने श्री जयातें बघे तयीं भाविजेतीं न लोकीं अघें ।
जरी तो करी घोर हत्या तरी सदा कौतुके लोक त्याची करी ॥१२॥
धनाढ्याचिया दारुणा दुष्कृती जना पुण्यशीलत्वजा वाटती ।
करो ब्रम्हहत्या, पिओ वारुणी, धजे त्या न निंदावयाला कुणी ॥१३॥
पराची हरो स्त्री धनें आढ्य तो जना क्षम्यता तो सदा वाटतो ।
परस्वा हरो गर्ह्य मार्गें, तया न कोणी सजे मर्त्य निंदावया ॥१४॥
धनाढ्यें सुखे लाच खावा तया उठेना कुणी लोक निंदावया ।
दरिद्रा पचे लाच हें होईना, क्षमा त्यास कोणी कधीं दाविना ॥१५॥
असत्यास सत्यत्व कीजे घनें, असत्यत्व सत्यास त्या साधनें ।
असत्यत्व सत्यत्व कीजे घनें, बडा कीमया मानिजे हा जनें ॥१६॥
धनें आढय जो त्याचिया मस्तरा चढाओढ हा शब्द लागे बरा ।
म्हणे लोक, “तो व्हावया स्वोन्नती झटे; वृत्ति त्याची प्रशस्या अती ॥१७॥
धनें आढ्य तो जारिणापुत्रही सुवंश्यत्व पावे, खरी गोष्ट ही ।
तयीं मिश्रबीजत्व पावे लय; नसे तीर्थतोयीं अघाला भय ॥१८॥
धनें आढ्य तो गालि देई तरी म्हणे लोक “त्याच्या दया अंतरी ।
तयाची क्रुधा पाहिजे न स्थिरा, उद्या शांत होईल तो साजिरा” ॥१९॥
धनें आढय इच्छी घना आणिका, अधाशीपणा दावितो तो निका ।
अधाशीपणा लोक त्याचा म्हणे असे दानकामें, वृथा बोलणें ॥२०॥
मदोन्माद उत्पन्न जी श्री करी तद्न्वेषणेच्छा धरा नांतरी ।
तुम्हा शांतिदा, कामदा, सौख्यदा सदा तीच होईल हो शारदा ॥२१॥
झटां मेळवू शारदेची कृपा करोनी उदंडा प्रयत्ना तपा ।
तुम्ही सौख्य पावाल कीं थोरसें न जे द्यावया श्री समर्था असे ॥२२॥
बहू गांजिलों, ताडिलों, नाडिलों, धनाढ्या खलांही उगा पीडिलो ।
तरी शारदेच्या कृपेने मला सुखाचा बरासा निधी लाभला ॥२३॥
नको श्री, पुरे शारदेची कृपा; उमासूनु टाकील मागें नृपा ।
शमा शारदा शुध्द देई जया तया श्रीकृपा पाहिजे कासया? ॥२४॥
श्रीशारदाकवन वामननन्दनास-
विद्याधरास वितरो शम; नान्य आस ।
लोकांसही सुखद तें नववृत्तरम्य
हो; तद्विचार न नवे, जरि वा अगम्य ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP