मंदार मंजिरी - पहिला सर

भिन्न भिन्न वेळी भिन्न भिन्न मासिकात छापलेली अशी कांही आणि आजपर्यंत मुळींच कोठेहीं न छापलेली कवी विद्याधर वामन भिडे यांची कांही निवडक काव्ये.


(संस्कृतात “दृष्टान्त” हा शब्द दोन अर्थानी योजला जातो, तसा तो मराठीतही योजला जातो. विंबप्रतिबिंबभावाने दोन वाक्यांत साम्य उक्त असते, तेव्हां दृष्टान्त होतो. त्याच अर्थाने हा शब्द साहित्यशास्त्रांत योजला जातो. व्यवहारांत “दृष्टान्त” हा शब्द दाखला किंवा उदाहरण ह्या अर्थानें योजला जातो. दुसरा अर्थ पहिल्या अर्थांपेक्षा पुष्कळच पटींनी अधिक व्यापक आहे. कारण, त्यांत पारिभाषिक अर्थाचा दृष्टान्त, प्रतिवस्तूपमा, अर्थान्तरन्यास, ह्या अलंकारांचाही अंतर्भाव होऊं शकतो.
“दृष्टान्तमाला” ह्यां नावांत “दृष्टान्त” हा शब्द आम्ही दुसर्‍या अर्थानें योजिला आहे.)

वृत्त आर्या.
स्वार्थचि साधायास्तव दाखवि नर आदर, प्रणय, भक्ती ।
पोषी मेषा सौंडिक तृण चारुनि त्यास मृदु यथाशक्ती ॥१॥
पुष्कळही निर्बल नर काहींही कार्य करुं न शकतात ।
अगणित तारे असतां तम निरसी चंद्र एकचि नभांत ॥२॥
गुण असुनि अंगि होतो न तयाचा आश्रयाविण विकास ।
पारदे असल्यावांचुनि दर्पणता ये न काचफलकास ॥३॥
अपुलेच होति बांधव जगिं आपुलियाच हेतु नाशास ।
गज इतर गजां द्याया दास्य झटे होउनी मनुजदास ॥४॥
जें वस्तुं जातिसुंदर संस्कारापेक्षा तें न जगतात ।
नचि मौक्तिकास घर्षण शाणेवरि हरिकास देतात ॥५॥
एकी केल्यावाचुनि नर पावति ह्या जगीं नचि बलास ।
तृण संहते होओनिच रोधूं शकतें प्रचंडहि गजास ॥६॥
वैयक्तिकगुणसंहित सर्वांगी पूर्ण करि समाजास ।
गिरि चढति अंध पंगू साहाय्य करोनि एकमेकांस ॥७॥
शोभति सार्‍या वस्तू असल्या जर उचित आपुल्या स्थानीं ।
अंजन सौंदर्याची वृध्दि करी लोचनीं, मुखीं हानी ॥८॥
बलहेतु जो निजाश्रय त्याचा अवलंब संकट निवारी ।
स्वस्थानीं नक असे तो उन्मत्त द्विपास हो भारी ॥९॥
अपरिचित स्थानीं जो जाई त्याचें समस्त बल विरतें ।
स्वस्थानच्युत नका श्वानहि ओढूनि नेइ फरफर तें ॥१०॥
जो नर गुणवंत तो सार्‍या शोभतो अहो! स्थानीं ।
झळके मणि, शिरिं, भाली, कंठी, वक्ष:स्थलीं, तसा कानी ॥११॥
येणारा जो उत्सव तो सौख्यप्रद असे, आलेला ।
उदयीं सुख जैसा विधु तैसा तो दे न अस्तवेलेला ॥१२॥
उत्कर्ष गुणांचा जो तो न टिके, पावतो विलयतूर्ण ।
एका मासामध्यें एकचि दिन चंद्र पाहिजे पूर्ण ॥१३॥
किंप्रभुच्या भाटांचा सांगा कोण न करील उपहास? ।
तो म्हणजे मूर्ख सुरभि जो म्हणतो कर्णिकार कुसुमास ॥१४॥
खोट्या गुणा प्रशंसुनि कोण न होई तिरस्कृतिस पात्र? ।
त्यातें मूर्ख म्हणे जन जो उष्ट्राचें म्हणे सुभग गात्र ॥१५॥
एकहि समर्थ जो तो बहु निर्वायी नरां असे भारी ।
अगणितपारावतगण एका श्येना कधीं न संहारी ॥१६॥
मोठ्या अधिकारावर चढला जो नीच तो सदा नीच ।
वाघ्या झाला पाग्या तरि सोडी येळकोट न कधींच ॥१७॥
जो स्वाभिमानविरहित तो दास्याच्या सुखें स्थितित जाय ।
परवशता आनंदे स्वीकारी गज, कधीं न मृगराय ॥१८॥
आलें दारिद्रय तरी मानी अधम न कधीं करील कृती ।
झाला क्षुधाकुल तरी नाहीं खाणार तृण मृगाधिपती ॥१९॥
आकस्मिक घनलाभें येतो तत्काल माद नीचातें ।
सरसी पर्जन्यानें फुंगता सेतूस वाहवुनि नेते ॥२०॥
दारिद्र्यें वा विभवे सन्मन न खचे उडे नचि अहो तें ।
अब्धिजल न रवितापें पर्जन्य वा उणें अधिक होतें ॥२१॥
बालपणीं जी सरणी लागे बालास ती पुढें टिकते ।
वळवूं आपण तैसे मृदु कोमल झाड सहज तें लवतें ॥२२॥
ज्याच्या पाशी साधन सामग्री विपुल तो करि याश्चा ।
वापीरक्षक जाइ न तृषितहि शोधा कधीं तडागांच्या ॥२३॥
अभिजनयुत, गुणगणयुत संगविशेषेच वंदिजे नर हो ।
तुंबीफलविरहित जो तो वीणादंड जनिं न आदृत हो ॥२४॥
न्यायप्रियचि महीपति शकतात प्रकृतिरंजन कराया ।
भगवद्गीतांवाचुनि चित्तास समर्थ कोण शम द्याय? ॥२५॥
वंशजही, गुणयुतही संगविशेषच मान नर लाहे ।
वीणादंड कुठेतरि तुंबीफलहीन पडुनि गृहिं राह ॥२६॥
अर्थ न कळला तरिहि संतर्पी सुकविभणति कर्णाला ।
आघाणन न घडुनही सुखवी नयनांस मालतीमाला ॥२७॥
कोण न दंडा पावे जो परदाराभिलाषपाप करी? ।
सीतेसि हरुनि रावण रामशेरें मरण पावला समरीं ॥२८॥
संतत अध्ययनानें बुध्दी निर्वीय शीघ्र होत असे ।
मौवी सोडिती धन्वी ज्या समयिं शरासनास काम नसे ॥२९॥
कष्ट सहन केल्याविण येती न कधीं मनोरथ फळाला ।
क्षीरोदधिमथनानें अमृताचा लाभ निर्जरा झाला ॥३०॥
उपदेशग्रहण करूं धीमान शके, शके न जो जड तो ।
घर्षण शाणेवरती मृत्पिंड सहों न, हीरकचि शकतो ॥३१॥
खल सासूय म्हणोनिच दोषचि शोधी, तया न गुण दिसती ।
व्रण कावळा हुडकितो, मधुर फळें कंद त्यास नच रुचती ॥३२॥
सारज्ञचि काव्याचा सह्रदयतेनें करूं शके अर्थ ।
सहकारपल्लवीची घ्याया रुचि पिकचि केवल समर्थ ॥३३॥
बहिरंगातें पाहुनि जाणार्‍या अंतरंग येत नसे ।
वृंदावन बाहेरुनि रम्य दिसे, आंत अति कडू विषसें ॥३४॥
साना उपयोगाला येई, मोठा तसा न येइ कधीं ।
कूपचि तृष्णाशांती करितो तैसी न थोरही जलधी ॥३५॥
प्रौढ दशा मनुजाला येइ तसा होइ तन्मतिविकास ।
पाहतसों कीं येतो बहु जीर्ण अशाच चंदना वास ॥३६॥
उत्पत्तिस्थानावर गुण अवलंबूनि वस्तुचा नसतो ।
अमृताला गरलाला देई जो जन्म जलधि एकच तो ॥३७॥
रिपुपक्षीयासचि जन योजिति रिपुचा करावया घात ।
कंटक काढायला कंटक ह्या साधनास घेतात ॥३८॥
आकार असो मोठा, तो मानाला पात्र, गुणचि असे ।
गंगा सानी असतां जन वंदिति तिज, न जान्हवीस तसे ॥३९॥
दु:खामागुनि आलें सुख तें वाटे मनास सुखतरसें ।
कटु औषध प्याल्यावर जलही जिव्हेस हो सशर्करसें ॥४०॥
जो निंदी साधूला उपहासा तोचि पात्र होइ जनीं ।
आकाशावरि थुंकी टाकी त्याच्याच ती पडे वदनीं ॥४१॥
खळ बाहेरुनि भेसुर, आंतहि तैसाच, आंत न निराळा ।
किति कोळसा उगाळा, बाहेर तसाच आंत तो काळा ॥४२॥
अतिपरिचययोगानें सद्वस्तुहि हो अनादरा पात्र ।
गंगातटिं राहे तो गंगाजलिं विमल करि मलिन गात्रा ॥४३॥
पापाचरणें दूषित झाला त्या जन न मान देतात ।
जें काचपात्र फुटलें तें हातांत न कुणीहि धरितात ॥४४॥
रसिकासच काव्याचें माधुर्य कळे, कळे न इतराला ।
कर्णाला सुखद असे किन्नरगायन, असे न नयनाला ॥४५॥
होउनि सहाय दोघे दुष्करही कार्य सहज करितात ।
असि तीक्ष्ण रिपु न मारी जर त्या पेलवाया स्नसे हात ॥४६॥
वृध्दाची युक्ति जुळुनि युवशक्तीशी करी महाकार्य ।
श्रीरामदासबोधें झाला शिवबा परास अनिवार्य ॥४७॥
नृप उन्नतेच्छ सोडी प्रियतम वस्तु प्रजाहितासाठीं ।
जनहितिं कन्या वोपनि पडलें शर्यातिच्या सुकृत गाठीं ॥४८॥
ग्रामीणीची ग्रामीं मति उच्चस्थिता सजो, पुरीं घसरे ।
सरडा धावो लघु परि सरडयाची धाव कुंपणास सरे ॥४९॥

श्लोक
खल त्रास देई सदा सज्जनाला तरी तो खलाच्या करी भावुकाला ।
अयोमुद्गर स्पर्श फोडावयाला झटो, स्पर्श हेमत्व दे मुद्गराला ॥५०॥
विभवहानि असह्य महाजना, लघुचिया सलते नचि ती मना ।
गिरिवरोनि पडोनि मरे करी, परि पडे कृमि अक्षत भूवरी ॥५१॥
त्रयस्थ पक्षद्वरमर्म जाणे म्हणोनि त्यातें पुसती शहाणे ।
भूमध्यरेषेवरि जो असेल ताराकटाहद्वेय त्या दिसेल ॥५२॥
देशकार्यरत वीर जो तया किम्प्रभू न लव वाटवी भया ।
काय घाबरवि सांग वारण केसरीस जई जुंपतें रण ॥५३॥
संतोष चिंतामणि ज्यास लाधे तयास दारिद्रय कधीं न बाधे ।
उपानहाची जुळवील सोय तयास चर्मावृत्त भूमि होय ॥५४॥
पंडिते जरी बोधिला खल साधु हो न तो, बोध निष्फल ।
मेघ वर्षला कातळावरी, लाभ होतसे कायासा तरी? ॥५५॥
साधू न हो खल कधीं खलसंगतींत पाहोनि सद्गुण अहो । खल हो विनीत ।
आमोद देई अपुला सुम, मृत्तिकेचें, तीचा परन्तु लवही नचि वास घे तें ॥५६॥
सर दृष्टांतमालेचा अर्पितो पहिला जना
मी विद्याधर, तो त्यांच्या आनंदप्रद हो मना ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP