TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
आत्म्यावर अध्यारोप

वेदांत काव्यलहरी - आत्म्यावर अध्यारोप

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


आत्म्यावर अध्यारोप, सच्चिदानंदपदविवरण
आत्म्यावरि जग भ्रांती; देश, दिशा, काल, कर्म यायोगें ॥
जग नामरूप मिळुनी झालें, मिथ्याच वस्तुसंयोगें ॥१॥
नसलीच वस्तु अपुल्या अस्तित्वाची करीतसे सिद्धी ॥
कारण सत्यत्वानें बघणाराची असे भ्रमित बुद्धी ॥२॥
देश, दिशा, कालादी यांचे अस्तित्व तें खरें काय ? ॥
नाहीं मुळांत, ऐसा निर्णय हो; जों विचार करुं जाय ॥३॥
देश विचारालागीं, घेऊं या मुंबई उदाहरण ॥
चल जाऊ मुंबइला, ही आली, शोधुनी तिला आण ॥४॥
म्हणशिल हीच नव्हे कां, मोहमयी मुंबई अजब मोठी ॥
अज्ञ असे मी, माझी एवि दिशाभूल करुं नको खोटी ॥५॥
ठेवुनि बोट कुठे तरि, दाखव “हीं मुंबई” मला ऐसी ॥
त्याविण न कळे मजला, काशाला मुंबई असे म्हणशी ॥६॥
बोटानें दाखविसी तें तरि, मज भुवन दिसतसे भव्य ॥
मुंबइ कशास म्हणशी, दाखवि सोडोनि सव्य अपसव्य ॥७॥
भव्य भुवन म्हणजेची नाहींना मुंबई खरें सांग ॥
दाखविशी बोटानें ती वस्तू अन्य दिसतसे चांग ॥८॥
मोटार, ट्राम तारा, रूळ, पशू, मनुज मुंबई काय ? ॥
जरि हे मुंबई नाहिंत, हारपुनी मुंबई कुठें जाय ॥९॥
आतां दिशा खरी कीं काय, बघूं या विचार करकरुन ॥
तीही असत्य ठरते, “आपण करुं तीच पूर्व” रे जाण ॥१०॥
पार शनीचा स्थावर, पश्चिम एकास पूर्व दुसर्‍याला ॥
यांतून काय खरें वद, भिन्न दिशा भेद पाहणार्‍याला ॥११॥
काल न दाखविता ये “हा अमका वर्तमान काल “असा ॥
कारण पळापळानें, पळत असे काळ, नीर ओघ जसा ॥१२॥
“हा काल” म्हणाया जों जावें, तितुक्यांत तो बने भूत ॥
पुढलें भविष्य ये ना दाखविता, वर्तमानही नसत ॥१३॥
भूत तरी गेलेला काल, भविष्यहि कुणा न दिसणार ॥
आहोंत वर्तमानीं, यास तरी सांग काय आधार ॥१४॥
म्हणशी “काळ बदलला आतांचा, म्हणुनि सर्व घोटाळा” ॥
सत्यांश यांत नाहीं, पूर्वीचा काळ तोच या वेळा ॥१५॥
त्रेतायुगांत जैसा सूर्य, तसा आज उगवतो नित्य ॥
काळ बदलला नाहीं, “तूंच बदललास” हे असे सत्य ॥१६॥
देश, दिशा, कालासी नाहीं अस्तित्व, हें जसें ठरलें ॥
कर्माची तीच गती, कर्ल्याहुनि भिन्न नाहि जें केलें ॥१७॥
कर्मारंभ तसाची कर्मसमाप्ती असेच कर्त्यांत ॥
कर्ताच कर्मरूपें, प्रगट करी आपुलेंच अस्तित्व ॥१८॥
आतां रूपविषय घ्या, ठेवावें बोट रूप तेथ नसे ॥
जे म्हणशी तेच नसे, नेती नेतीती ब्रह्म सत्य असे ॥१९॥
नाम नसे बाळाला, आला जन्मास तो जये वेळा ॥
मन माने ते करिती नामकरण त्यास ताळ ना मेळ ॥२०॥
एकचि गणपतरावा, दादा बाबा कुणी ह्मणे काका ॥
सर्वासी ‘ओ’ देई, सांग खरा यांतुनी कवण लटका ॥२१॥
म्हणशिल अनेक वस्तूसंयोगें, वस्तु एक पूर्ण बने ॥
संयोग खरा नाहीं, निश्चित त्यासी वियोगही घडणें ॥२२॥
य़ास्तव देश, दिशा, तो काल, तसे कर्म, नाम, रुपाला ॥
घालुनि वजा उरे जें, तेच तुझें रूप आत्मया बाळा ॥२३॥
सत्‌ ब्रह्म, जागन्मिंथ्या, जीव असे ब्रह्म, हाच वेदान्त ॥
याहुनि सिद्धांत नसे दुसरा, जरि कोटि शोधिले ग्रंथ ॥२४॥
जग केवळ नच मिथ्या, नच केवळ सत्य, मिश्र दोघांचें ॥
मिथ्या सत्य मिळोनी जग झालें, कार्य प्रकृति पुरुषाचें ॥२५॥
सत-चित्‌-आंद असे पुरुष, तसी नामरूप ती प्रकृती ॥
हें गुणपंचक दिसती, अधिक कमी पाहतां सकल जगती ॥२६॥
जग नाहींचा प्रत्यय, त्याचा “आहे अभाव”, ये ऐसा ॥
“काहिंच नाहीं” हेची रूप जगाचें, न जाणशी कैसा ॥२७॥
नाहीं असे न कांहीं, आहेचा जो अभाव, “अस्तित्व” ॥
आहे नाहीं रूपें, स्फुरतो आत्माच हें असे तत्व ॥२८॥
मुंबइ आहे म्हणजे, नाहीं जें सर्वहि तुला दिसलें ॥
तारा, समुद्रा, गाडया, ट्राम, सडक, मनुज आणखी असलें ॥२९॥
हे सर्व वजा जातां, कांहिं नसे हीच मुंबई जाण ॥
कांहिं नसेचें असणें सद्रूपें हेंचि रे प्रभूस्फुरण ॥३०॥
घट आहे, पट आहे, शुभ अशुभादीक द्वैत आहे रे ॥
आहेपणेंच, प्रभुचें आहे अस्तित्व, सर्व ठायि स्फुरे ॥३१॥
आहेचें ज्ञान जसें, नाहींचें ज्ञान एकरूप असे ॥
आहे नाहीं त्याहुनि तत्साक्षी ब्रह्म एकची विलसे ॥३२॥
आतां चित्‌पद पाहूं, गणपतरावांत कोठ ते आहे ॥
गणपतराव कुणाला म्हणती, शोधोनिया जरा पाहे ॥३३॥
गणपतरावास कुणी बाळा, दादा कुणी म्हणे बाबा ॥
बाळा म्हणणार खपे, बाळाही तो खपे अहा तोबा ! ॥३४॥
बंधूभगिनी खपले, दादा म्हणणार कोणही नुरला ॥
दादा तयासवेंची खपला, परि गपणती नसे मेला ॥३५॥
मुलगा मुलगी मेली, बाबाही वारला तयाच सवे ॥
गणपतराव न मेला, बाबा दादाहि तो कुणीच नव्हे ॥३६॥
दादा बाबादि मरे, गणपतरावचि उरे अतां साचा ॥
गणपतरावास गमे आतां, “मी देह औट हातांचा” ॥३७॥
गणपतरावहि खपला, म्हणती जन हा उदार उपकारी ॥
होता; परंतु गेला ! झाली वाईट गोष्ट ही भारी ॥३८॥
गणपतराव तरी तो, शरिरानें स्वस्थ तेथ पडलेला ॥
गेला कां मग म्हणती जन हे, आहे न कां म्हणति त्याला ॥३९॥
“गेला हो गेला पति मम, माझी होय गत अतां कैशी” ॥
मांडीवर गणपतिचें शव घेउनि, पत्नी कां रडे ऐसी ॥४०॥
देह जशाचा तैसा पूर्वीचा, काय त्यांत न्यून असे ॥
म्हणुनी गेला म्हणती, कारण चैतन्य एक त्यांत नसे ॥४१॥
उघड नसे कां आतां, चैतन्यासीच गणपती म्हणती ॥
चिद्रूप गणपतीचें रूप खरें, ज्ञानही तया वदती ॥४२॥
मी चित्‌स्वरूप ऐसें, सद्रूपा कळुनि होइ आनंद ॥
सत्‌चित्त आनंद परी एकचि, नाहीं तयांत तिळ भेद ॥४३॥
पांढुरकेपण, मृदुता, गंध मिळुनि तीन एक कापूर ॥
एकापासुनि दुसरे, भिन्न न ये काढतां, जरी चतुर ॥४४॥
सत्‌ तेच असे चित्पद्‌ आनंदहि तेच सच्चिदानंद ॥
नांवें तीन निराळीं एकच बस्तूस, नच परी भेद ॥४५॥
सर्वत्र सर्व जगतीं, भरला तो एक सच्चिदानंद ॥
कोठें सत्‌, कोठें तें सत्‌-चित्‌, कोठे प्रतीत तीन पद ॥४६॥
तम तेथें सत, सत्‌-चित्‌ द्दश्य जिथें ती रजोगुणी वृत्ती ॥
सत्‌ चित्‌ आनंद दिसे सत्वगुणीं; वृत्तीभेद हे असती ॥४७॥
जगमिथ्या, ब्रम्ह असे सत्य  असे चर्चिलेच सिद्धांत ॥
जीवचि ब्रम्ह कसा तो, विषय अतां घेउं या विचारांत ॥४८॥
किंचिज्ञ, अल्पशक्ती जीव दिसे, सर्व शक्ति सर्वज्ञ ॥
ब्रह्म तरी; मग कैसें दोघांचें ऐक्य, शंकितो अज्ञ ॥४९॥
स्वरुपाचा भेद नसे हा, आहे भेद तो उपाधीचा ॥
जीव परब्रह्माची जात परी एक, भेद तो कैचा ॥५०॥
मुंगींत जीव जैसा, हत्तीचा जीव, दोन एक असे ॥
गज तो मोठा म्हणुनी त्याच्या जीवास, शिव म्हणो कैसें ॥५१॥
मुंगीत अल्पशक्ती, हत्तीची ती प्रचंड जरि शक्ती ॥
जीवांत भेद नाहीं; भेद उपाधींत जाण ही युक्ती ॥५२॥
जरि तैलबिंदु पडला एका पेल्यांत, तोच हौदांत ॥
पाण्याचा व्याप तसा पसरे, वद दोष काय तेलंत ॥५३॥
थोर उपाघी महिमा, मूळाचें विकृत दाखवी रूप ॥
अरसे विविध तयामधि एकचि मुख सान, थोर, विद्रूप ॥५४॥
अरशामुळें जरी हे द्दश्य विविध, तोंड बदल्लें काय ? ॥
एकचि ब्रह्म तसें ते, विविध उपाधींत वेगळे होय ? ॥५५॥
अज्ञान उपाधीनें, जीव दिसे अल्प, तोच शिव थोर ॥
ज्ञान उपाधीयोगें, झाला सर्वज्ञ, नच नवल फार ॥५६॥
अनुकूल स्थिति येतां, जीवचि तो ब्रह्म संशयो नाहीं ॥
हें ज्ञान विश्चयानें ठसतां, वेदान्त संपला पाहीं ॥५७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-17T20:55:34.7470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अघळणें, अघाळणें

  • v t  Shake about in water (a cloth) in order to rinse or wash. 
RANDOM WORD

Did you know?

’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय? असे कोणते मंत्र आहेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.