मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
महत्व

उच्छिष्ट गणेश - महत्व

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा, वेदांनी ज्याची महती गायली आहे, सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो.


तंत्रमार्गातील वामाचारी लोक या गणपतीची आराधना करतात. उच्छिष्ट गणपतिपंथाचे अनुयायी जातीपातींचा भेद मानीत नाहीत. मद्य व मैथुन हे दोन ‘म’ कार या पंथात विहित आहेत. या पंथाचे लोक कपाळावर लाल टिळा लावतात.
उच्छिष्ट-गणेश सहस्रनामात ‘सदा-क्षीब:’ (सदामत्त:), ‘मदिरा-अरुण-लोचन:’ ‘रतिप्रिय:’ अशा प्रकारची नामे दिसतात.
उत्तर आम्नायात त्याच्या प्रतिमेचे लेखन पुढीलप्रमाणे सांगितले आहे. पद्मासन घातलेला, उन्मत्त, त्रिलोचन, रक्तवर्ण व चतुर्भुज, चार हातात अनुक्रमे पाश, अंकुश, मोदकपात्र व दन्त धारण करणारा असा उच्छिष्ट गणेश राखावा.
दुसरा पर्याय असा-श्वेतार्क किंवा मर्कतीकाष्ठ यांच्या मुळाची अंगुष्ठमात्र प्रतिमा करावी किंवा रक्तपद्मासनावर बसून चाप, बाण, धनुष्याची दोरी व अंकुश ही चार आयुधे चार हातात धारण करणारा व नग्नशक्तीशी रतिक्रीडा करणारा अशी याची प्रतिमा करावी. याचा मंत्र श्रीविद्यार्णवतंत्रात पुढीलप्रमाणे दिला आहे -
‘ॐ नमो भगवते एकदंष्ट्राय हस्तिमुखाय, लम्बोदराय, उच्छिष्टमहात्मने आं क्रीं र्‍हीं गं घे घे स्वाहा ।’
गुह्यसहस्रनामस्तोत्राची देवताही उच्छिष्ट गणेश आहे. याच्या ध्यान स्तोत्रातही ‘विवस्त्रपत्न्यां सुरतप्रवृत्तम्‌’ असे वर्णन येते. या स्तोत्रात या गणेशाचे ‘मपञ्चक-निषेवित:’ असे नाव येते. हे पाच ‘म’ म्हणजे मद्य-मांस-मत्स्य-मुद्रा व मैथुन हे होत. या गोष्टी दर्शविणारी ‘मांसाशी’,‘वारुणीमत्त’, ‘मत्स्यभुक्‌’, ‘मैथुनप्रिय:’ अशासारखी नावे या सहस्रनामात दिसतात. जी सर्वसामान्य भक्तांना आश्चर्यचकित करतात. त्यासाठी तंत्रशास्त्राची थोडीशी तोंडओळख होणे जरूर आहे, तांत्रिक किंवा शाक्तदर्शन हे एक प्रौढ व गंभीर दर्शन आहे. शाक्तमत हे सरहस्य जाणून घेतल्यास त्यांची निंदानालस्ती करता येणार नाही. वामाचारी लोकांचे साधनेच्या नावाखाली चालणारे विषयविलास व बीभत्स आचार ही शाक्तसाधनेची प्रकृति नसून विकृती आहे.
पंच‘म’कार ही एक उच्च कोटीची साधना आहे ती अशी -
‘मद्य’ म्हणजे ब्रह्मरंध्रात असलेल्या सहस्रदलातील सुधा (अमृत) होय.
‘मांस’ म्हणजे पाप-पुण्यरूपी पशूला ज्ञानशस्त्राने मारून ब्रह्मरंध्रात लीन होणे.
‘मत्स्य’ म्हणजे इडा आणि पिंगला या दोन नाडयातले श्वास आणि उच्छ्‌वास हे दोन वायू होत. त्यांना सुषुम्ना नाडीत नेणे ही मत्स्यसाधना होय.
‘मुद्रा’ म्हणजे सत्संग करणे होय. आणि
‘मैथुन’ म्हणजे शिवाशी कुंडलिनीचे मीलन होय.
तात्पर्य पंच‘म’कारांचा संबंध बाह्म वस्तू किंवा क्रिया यांच्याशी नसून तो अंतर्यामाशी आहे.
पण कालांतराने पंच‘म’कारांचे हे उदात्त स्वरुप लुप्त झाले. शाक्त उपासनेला भोंदू आणि विषयलोलुप लोकांनी विकृत रूप दिले. त्यामुळे शाक्तमार्गाविषयी विचारी लोकात तिरस्कार निर्माण झाला. स्वार्थी आणि विषयी लोकांच्या हाती ही साधना गेली म्हणजे तिची कशी आणि किती अधोगती होते. याचे उदाहरण म्हणजे शाक्तपंथ होय.
‘तनु विस्तारे’ या विस्तारार्थक धातूपासून तंत्र शब्द बनला. ज्याच्याद्वारे अध्यात्मज्ञानाचा किंवा तत्त्वज्ञानाचा विस्तार केला जातो. ते ‘तंत्रशास्त्र’ होय.
तनोति विपुलान्‌ अर्थान्‌ तत्त्वमन्त्र-समन्वितान्‌ ।
त्राणं च कुरुते यस्मात्‌ तन्त्रम्‌ इति अभिधीयते ॥
म्हणजे तत्त्व आणि मंत्र यांनी युक्त अशा व्यापक अर्थाचा विस्तार करणारे आणि (साधकांचेसाधनेच्या द्वारे) रक्षण करणारे जे शास्त्र त्याला तंत्र असे नाव आहे.
देवतेच्या रूप-गुण-कर्मांचे चिंतन-मनन, देवताविषयक मंत्रांचा उपदेश, मंत्रांची यंत्रात संयोजना, तसेच पटल, पद्धती, कवच, सहस्रनाम व स्तोत्र ही पंचांग उपासना यांची माहिती ज्यात दिलेली असते, त्याला तंत्र म्हणतात. तंत्राला     ‘आगम’ असे दुसरे नाव आहे. तंत्रसाधनेने आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित केल्यावर ‘आगम’ शब्द हळूहळू तंत्रांना लावला जाऊ लागला. मग तंत्रे ही ‘अगम’ ठरली आणि वेदांना ‘निगम’ ही संज्ञा प्राप्त झाली. कलिग्रस्त माणसाच्या कल्याणासाठी शंकराने पार्वतीला आगम अर्थात्‌ तंत्रज्ञान उपदेशिले.
युगपरत्वे मनुष्याचे आचार भिन्न होता किंवा होणे युक्त असते. कृतयुगातला आचार श्रुति-उक्त होता. त्रेतायुगात तो स्मृति-उक्त झाला. द्वापरयुगात पुराणोक्त आचाराला महत्त्व मिळाले तर कलियुगात आगमकथित आचार हाच योग्य मानला पाहिजे असे कुलार्णवतंत्रात म्हटले आहे.
तंत्रशास्त्रात तंत्रांचे पुढील तीन विभाग सांगितले आहेत -
१. आगम - सुष्टी, प्रलय, देवतापूजा, पुरश्चरण, षट्‌कर्मसाधन व चतुर्विध ध्यानयोग यांचे वर्णन असलेल्या ग्रंथांना ‘आगम’ ग्रंथ महणतात.
२. यामल - सृष्टतत्त्व, ज्योतिष, नित्यकृत्य, क्रम, सूत्र, वर्णभेद व युगधर्म यांचा विचार ज्यात केला आहे त्या ग्रंथांना ‘यामल’ म्हणतात.
३. तंत्र - सृष्टि, लय, मंत्र-यंत्र निर्णय. तीर्थ, आश्रमधर्म, कल्प, ज्योतिष, व्रत, शौचाशौच, स्त्रीपुरुषलक्षण, राज-दान-युगधर्म, व्यवहार, अध्यात्म, स्नानविधि, भू-भूतशुद्धी, प्राणायाम, न्यास, जप, तर्पण, पूजा, दीक्षा, अभिषेक, प्रायश्चित्त, चक्रपूजा, मुद्रा इ. गोष्टींचे वर्णन ज्या ग्रंथात आहे त्यांना ‘तंत्र’ म्हणतात. तंत्राचे वैशिष्टय क्रिया हे आहे. वैदिक ग्रंथात निर्दिष्ट केलेल्या ज्ञानाचे क्रियात्मक रूप प्रकट करणे, हा तंत्राचा उद्देश आहे. तंत्राचे आगम हे दुसरे नावही वैदिक परंपरेत तंत्राचे बाहेरून आगमन झाल्याचे सूचित करते.
स्कंद पुराणात शंकराच्या मुखाने एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘वेद, आगम व पुराण यांचे तत्त्व मनाला मोह उत्पन्न करणारे आहे. अतएव हे गुप्त राखावे. तंत्रशास्त्र हे अगणित लोकाचारांचे, लोकपूजित देवतांचे व लोकप्रचलित रहस्यमय अनुष्ठानांचे परिणत रूप आहे.’
बहुतेक तंत्रग्रंथ शिवपार्वतींच्या संवादातूनच निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी पार्वती वक्त्री आणि शिव हा श्रोता आहे. तर काही ठिकाणी शिव वक्ता व पार्वती श्रोता आहे. शैवशाक्त तंत्रांप्रमाणेच वैष्णव, सौर, गाणपत्य या संप्रदायांचीही तंत्रे आहेत.
गाणपत्य तंत्रांत महागणपती, विरिगणपती, शक्तिगणपती, विद्यागणपती, हरिद्रागणेश, उच्छिष्टगणेश, लक्ष्मीविनायक, हेरम्ब, वक्रतुण्ड, एकदन्त, महोदर, गजानन, लंबोदर, विकट व विघ्नराज ही गणपतीची रूपे उपास्य ठरली आहेत (मेरुतंत्रप्रकाश). यातली काही रूपे अभिचारकर्मासाठी उपासिली जातात. यापैकी कित्येक गणपती त्यांच्या स्त्रियांसह रतिक्रीडेच्या अवस्थेत असतात.
चिनी विद्वान्‌ भारतात आले, नालंदासारख्या विद्यापीठात शिकले आणि त्यांनी बौद्ध धर्माबरोबर भारतीय संस्कृती आणि गणेश यांना आदराने चीनमध्ये नेले. चीनमध्ये आणि जपानमध्ये गणेशाला कांगितेन म्हणतात. गजमुख असलेल्या स्त्री-पुरुष प्रतिमा एकमेकांना द्वढालिंगन देत आहेत, असे या मूर्तीचे स्वरूप आहे. ही मूर्ती म्हणजे गणेश आणि आणि त्याची शक्ती यांची जी ध्याने तंत्रशास्त्रात वर्णन केली आहेत, त्याचेच एक स्वरूप आहे. या वाममार्गाच्या उपासनेचा संप्रदाय चिनी सम्राट्‌ चेनत्सुंगने आज्ञापत्र काढून बंद केला.

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP