मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक ६१ ते ७०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक ६१ ते ७०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा , वेदांनी ज्याची महती गायली आहे , सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो .


अजिता - अर्चित - पादाब्ज : नित्या - नित्य - अवतंसित : ।

विलासिनी - कृत - उल्लास : शौण्डीसौन्दर्य - मण्डित : ॥६१॥

३१८ ) अजितार्चितपादाब्ज --- अपराजिता शक्तीने ज्याची चरणकमळे पूजली आहेत .

३१९ ) नित्यानित्यावतंसित --- नित्याशक्तीला ज्याचे चरणकमळ सदैव कर्णभूषणांप्रमाणे आहेत .

३२० ) विलासिनीकृतोल्लास --- विलासिनी शक्तीनेजो उल्लसित राहतो .

३२१ ) शौण्डीसौंदर्यमण्डित --- शौण्डी नामक शक्तीच्या सौंदर्याने जो मण्डित ( भूषित ) झाला आहे .

अनन्ता - अनन्तसुखद : सुमङ्गलसुमङ्गल : ।

इच्छाशक्ति - ज्ञानशक्ति - क्रियाशक्ति निषेवित : ॥६२॥

३२२ ) अनन्तानन्तसुखद --- अनन्ता नामक शक्तीला अनन्त सुख देणारा .

३२३ ) सुमङ्गलसुमङ्गल --- सुमङ्गल पीठ ज्याच्या मुळे मंगलमय होते .

३२४ ) इच्छाशक्तिज्ञानशक्तिक्रियाशक्तिनिषेवित --- इच्छाशक्ती - ज्ञानशक्ती - क्रियाशक्ती या तीनही शक्ती ज्याची सेवा करतात .

सुभगा - संश्रित - पद : ललिता - ललिता - आश्रय : ।

कामिनी - कामन : काममालिनी - केलि - लालित : ॥६३॥

३२५ ) सुभगासंश्रितपद --- सुभगा नावाच्या शक्तीने ज्याच्या चरणकमळांचा आश्रय घेतला आहे .

३२६ ) ललिताललिताश्रय --- जो ललितादेवीचे मनोहर आश्रयस्थान आहे .

३२७ ) कामिनीकामन --- कामिनी या शक्तिदेवतेची इच्छा पूर्ण करणारा .

३२८ ) काममालिनीकेलिलालित --- काममालिनी शक्तीच्या केलि म्हणजे क्रीडांनी प्रसन्न राहणारा .

सरस्वती - आश्रय : गौरीनन्दन : श्रीनिकेतन : ।

गुरुगुप्तपद : वाचासिद्ध : वागीश्वरीपति : ॥६४॥

३२९ ) सरस्वत्याश्रय --- सरस्वती म्हणजे वाक्‌देवतेचा आश्रय असणारा .

३३० ) गौरीनन्दन --- पार्वती देवीस आनन्द प्रदान करणारा .

३११ ) श्रीनिकेतन --- श्री म्हणजे लक्ष्मी . निकेतन म्हणजे निवासस्थान . जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे .

३३२ ) गुरुगुप्तपद --- गणकाचार्यादी समस्त गुरूंनी चरणी दृढ आलिंगन दिल्यामुळे ज्याचे चरण झाकले गेले आहेत .

३३३ ) वाचासिद्ध --- ज्याची वाणी सिद्ध आहे . म्हणजे तो बोलेल त्याप्रमाणे घडते .

३३४ ) वागीश्वरीपति --- भाषेची देवता ( वाक्‌ + ईश्वरी = वागीश्वरी ) सरस्वती अथवा बुद्धिदेवता यांचा स्वामी .

नलिनी - कामुक : वामाराम : ज्येष्ठामनोरम : ।

रौद्रीमुद्रित - पादाब्ज : हुम्बीज : तुङ्गशक्तिक : ॥६५॥

३३५ ) नलिनीकामुक --- नलिनीनाम शक्तीचा वल्लभ .

३३६ ) वामाराम --- वामा नामक शक्तीचा विसावा असलेला किंवा वामा नामक शक्ती ज्याची प्रिया आहे .

३३७ ) ज्येष्ठामनोरम --- ज्येष्ठा नामक शक्ती ज्याची मनोरमा प्रिया आहे असा .

३३८ ) रौद्रीमुद्रितपादाब्ज --- रौद्री नामक शक्तीने ज्याचे चरणकमळ आपल्या ओंजळीत बद्ध केले आहेत .

३३९ ) हुम्बीज ---‘ हुम्‌ ’ हे ज्याचे बीज आहे . ‘ वक्रतुण्डाय हुम्‌ ’ या षडाक्षरी मंत्राचा अन्तिम वर्ण जो ‘ हुम्‌ ’ आहे तोच समस्त पुरुषार्थाचे कारणबीज आहे . त्यामुळे भगवान गणपती ‘ हुम्बीज ’ या नावाने प्रसिद्ध आहे .

३४० ) तुङ्गशक्तिक ---‘ तुङ्ग ’ ही ज्याची शक्ती आहे .

विश्वादि - जनन - त्राण : स्वाहाशक्ति : सकीलक : ।

अमृत - अब्धि - कृत - आवास : मद - घूर्णित - लोचन : ॥६६॥

३४१ ) विश्वादिजननत्राण --- विश्वाचा आदि जो हिरण्यगर्भ याचा जन्म व पालन ज्याच्याकडून होते तो . विश्वादिकांच्या उत्पत्तीचा त्राण ;

३४२ ) स्वाहाशक्ति --- जो साक्षात्‌ स्वाहाशक्ती आहे . स्वाहा म्हणजे सुवहा . ज्या शक्तिद्वारा देवतांप्रत प्रार्थना पोहोचविल्या जातात ती स्वाहाशक्ती .

३४३ ) सकीलक --- कीलक हा मंत्रशास्त्रातील एक विधी आहे . ( कीलक म्हणजे खिळा . खिळ्याने वस्तू पक्की करावी तसा कीलकाद्वारे मंत्र पक्का , स्थिर होतो .) जो कीलकाने युक्त आहे असा .

३४४ ) अमृताब्धिकृतावास --- अमृतसागरात ज्याचा निवास आहे असा . अमृतपाना रमलेला .

३४५ ) मदघूर्णितलोचन --- गंडस्थळातून झरणार्‍या मदाने ज्याचे नेत्र धुंद ( चंचल ) झाले आहेत .

उच्छिष्टगण : उच्छिष्टगणेश : गणनायक : ।

सार्वकालिकसंसिद्धि : नित्यशैव : दिगम्बर : ॥६७॥

३४६ ) उच्छिष्टगण --- ज्याचे गण उत्कृष्ट आणि शिष्ट ( शिष्ट म्हणजे सुसंस्कृत , विद्वान्‌ ) आहेत .

३४७ ) उच्छिष्टगणेश --- उत्कृष्ट आणि शिष्ट गणांवर ज्याची सत्ता चालते असा . तंत्रमार्गातले वामाचारी लोक या गणपतीची आराधना करतात . उच्छिष्ट गणपतिपंथाचे अनुयायी जातीपातींचा भेद मानीत नाहीत . ‘ मद्य ’ व ‘ मैथुन ’ हे दोन ‘ म ’ कार या पंथात विहित आहेत . या पंथाचे लोक कपाळावर लाल टिळा लावतात . ( श्रीविद्यार्णवतंत्र )

३४८ ) गणनायक --- समस्त गणांचा नायक .

३४९ ) सार्वकालिकसंसिद्धि --- ज्याच्या सिद्धी सार्वकालिक , त्रिकालाबाधित आहेत .

३५० ) नित्यशैव --- सदैव कल्याणाचेच ( शिव ) चिन्तन करणारा . नित्य शिवाचेच चिंतन करणारा .

३५१ ) दिगंबर --- दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा .

अनपाय : अनन्तदृष्टि : अप्रमेय : अजरामर : ।

अनानिल : अप्रतिरथ : हि अच्युत : अमृतम्‌ अक्षरम्‌ ॥६८॥

३५२ ) अनपाय --- अपायरहित . अविनाशी . अपाय म्हणजे नाश , संकट या गोष्टींपासून रहित असणारा .

३५३ ) अनन्तदृष्टि --- दृष्टीचा संबंध ज्ञानाशी येतो . ज्याची ज्ञानदृष्टी अमर्याद , असीम आहे . ज्याच्या ज्ञानदृष्टीला अन्तच नाही असा .

३५४ ) अप्रमेय --- प्रमेय म्हणजे प्रमाणांचा विषय किंवा सिद्ध करण्याची गोष्ट . विषय हे इंद्रियगम्य असतात . जो इंद्रियगम्य नाही असा तो . ज्याला इंद्रियांनी जाणता येत नाही .

३५५ ) अजरामर --- अजर + अमर = अजरामर : - जरा म्हणजे वृद्धत्व . ज्याला वृद्धपणा नाही व अमर म्हणजे मृत्यूही नाही असा .

३५६ ) अनाविल --- आविल म्हणजे दूषित . अनाविल म्हणजे अत्यंत शुद्ध .

३५७ ) अप्रतिरथ --- प्रतिरथ म्हणजे तुल्यबल प्रतिस्पर्धी . ज्याला कोणीही तुल्यबल प्रतिस्पर्धी नाही असा .

३५८ ) अच्युत --- च्युत होणे म्हणजे मूळ स्थानावरून खाली येणे . अच्युत म्हणजे जो आपल्या मूळ स्थानापासून कधीही ढळला नाही . ज्याचे कधीही अध : पतन होत नाही .

३५९ ) अमृतम्‌ --- मृत्यूच्याही पलीकडे असणारा . मोक्षरूप .

३६० ) अक्षरम्‌ --- क्षर म्हणजे कमी होणे , अक्षर म्हणजे कमी होणे , झिजणे हे विकार ज्याला नाहीत असा . अविनाशी .

अप्रतर्क्य : अक्षय : अजेय : अनाधार : अनामय : अमल : ।

अमोघसिद्धि : अद्वैतम्‌ अघोर : अप्रमितानन : ॥६९॥

३६१ ) अप्रतर्क्य --- ज्याच्याविषयी काहीही तर्क करता येत नाही . तर्काने अगम्य .

३६२ ) अक्षय --- ज्याला क्षय नाही असा क्षयरहित . अविनाशी .

३६३ ) अजेय --- अजिंक्य . ज्याला जिंकता येत नाही .

३६४ ) अनाधार --- ज्याला कोणाचाही , कसलाही आधार लागत नाही . आधारशून्य .

३६५ ) अनामय --- जो निरोगी आहे , सुदृढ आणि निकोप आहे .

३६६ ) अमल --- जो शुद्ध , दोषरहित आहे . विकाररूपी मल नसणारा .

३६७ ) अमोघसिद्धि --- ज्याच्या सिद्धी कधीही निष्फळ ठरत नाहीत . ज्याच्याजवळ अव्यय सिद्धी आहेत .

३६८ ) अद्वैतम्‌ --- प्रपंचरून द्वैताच्या जो अतीत म्हणजे पलीकडे आहे .

३६९ ) अघोर --- भयानक नसलेला , सौम्य .

३७० ) अप्रमितानन --- अप्रमित म्हणजे मोजता न येणारे . आनन म्हणजे मुख ज्याची असंख्य मुखे आहेत .

अनाकार : अब्धि - भूमि - अग्नि - बलघ्न : अव्यक्तलक्षण : ।

आधारपीठ : आधार : आधार - आधेय - वर्जित : ॥७०॥

३७१ ) अनाकार --- आकाररहित - कोणत्याही मर्यादेत न बसणारा . निराकार .

३७२ ) अब्धिभूम्यग्निबलघ्न --- क्लेदन म्हणजे भिजविणे हे अब्धि म्हणजे जलाचे बल होय . स्तम्भन म्हणजे स्तब्धता , प्रतिबंध , नियमन हे भूमी म्हणजे पृथ्वीचे बल आणि दहन म्हणजे जाळणे हे अग्नीचे बल होय . ही बले निष्प्रभ करणारा .

३७३ ) अव्यक्तलक्षण --- मानवाच्या बहिर्मुखबुद्धिने ज्याच्या स्वरूपलक्षण तथा तटस्थ लक्षणाची अभिव्यक्ती होत नाही असा बाह्यलक्षणांनी ज्याची ओळख होत नाही . जो स्व - रूप लक्षण आहे .

३७४ ) आधारपीठ --- विश्वादी समस्त तत्त्वांचे आधारस्थान असणारा . पृथ्वीपासून शिवापर्यंत छत्तीस आधारभूत तत्त्वांचाही ( शिव - शक्ती - सदाशिव - ईश्वर - शुद्धविद्या - माया - विद्या ( अविद्या )- कला - राग - काल - नियती - जीव - प्रकृती - मन - बुद्धी - अहंकार - श्रोत्र - त्वक्‌ ( त्वचा )- चक्षु - जिह्वा - घ्राण - वाक्‌ - पाणी ( हात )- पाद ( चरण )- पायु ( गुदद्वार )- उपस्थ ( जननेंद्रिये ) शब्द - स्पर्श - रूप - रस - गंध - आकाश - वायू - तेज - जल आणि पृथ्वी ही आधारभूत तत्त्वे आहेत .) आधार असणारा .

३७५ ) आधार --- अनंतकोटी ब्रह्माण्डांचा आधार स्थान असणारा . अ = विष्णू आणि आ = ब्रह्मा यांना धारण करणारा .

३७६ ) आधाराधेयवर्जित --- आधार - आधेय भावरहित , अद्वैतस्वरूप .

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP