मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक १११ ते १२०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक १११ ते १२०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा, वेदांनी ज्याची महती गायली आहे, सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो.


वामदेव: विश्वनेता वज्रिविघ्ननिवारण: ।
विश्वबन्धन-विष्कम्भ-आधार: विश्वेश्वरप्रभु: ॥१११॥
६२४) वामदेव---सर्वाङ्गसुंदर देवता. मनोहर. आकर्षक. वामदेवरूप.
६२५) विश्वनेता---विश्वाचा अधिनायक.
६२६) वज्रिवज्रनिवारण---वज्रि म्हणजे इन्द्र. इन्द्राच्या विघ्नांचे निवारण करणारा.
६२७) विश्वबन्धनविष्कम्भआधार---विश्वउभारणीसाठी आवश्यक तेवढा व्यापक प्रदेश म्हणजे विष्कंभ. विश्वाला गवसणी म्हणजे विश्वबंधन. त्यालाही आधार असणारा.
६२८) विश्वेश्वरप्रभु---ब्रह्माण्डे व त्यांच्या अधिपतींचाही प्रभू.
शब्दब्रह्म शमप्राप्य: शम्भुशक्तिगणेश्वर: ।
शास्ता शिखाग्रनिलय: शरण्य: शिखरीश्वर: ॥११२॥
६२९) शब्दब्रह्म---परावाणीच्याही अतीत. नादरूपधारी.
६३०) शमप्राप्य---मनोनिग्रहाने प्राप्त करण्यासारखा.
६३१) शम्भुशक्तिगणेश्वर---शैव आणि शाक्त समुदायांचा (गणांचा) ईश्वर, स्वामी.
६३२) शास्ता---शास्ता नामक केरळदेशीय देवतास्वरूप किंवा शासनकर्ता.
६३३) शिखाग्रनिलय---शास्ता नामक देवतेच्या शिखेमध्ये (शिखा म्हणजे शेंडी किंवा केस) परमात्मा स्थित आहे. तत्स्वरूप.
६३४) शरण्य---शरणार्थीचे रक्षण करणारा. ज्याला शरण जावे असा.
६३५) शिखरीश्वर---पर्वतांचा ईश्वर जो हिमालय. तत्स्वरूप.
षडऋतु-कुसुम-स्रग्वी षडाधार: षडक्षर: ।
संसारवैद्य: सर्वज्ञ: सर्व-भेषज-भेषजम्‌ ॥११३॥
६३६) षडऋतुकुसुमस्रग्वी---वसंत-ग्रीष्म-वर्षा-शरद-हेमंत आणि शिशिर या सहाही ऋतूत फुलणार्‍या पुष्णांची स्रग्‌ म्हणजे माळ धारण करणारा.
६३७) षडाधार---शरीरातील मूलाधार-स्वाधिष्ठान-मणिपूर-अनाहत-विशुद्धी आणि आज्ञा या षट्‌चक्रांचा आधार असलेला.
६३८) षडक्षर--- ‘गणेशाय नम: ।’ अशा षडक्षर मन्त्रस्वरूपात असणारा. ‘डे वर्मयुग्वक्रतुण्डरूप: षडक्षर:’।
६३९) संसारवैद्य---भवरोगांचा नाश करणारा.
६४०) सर्वज्ञ---सर्व काही जाणणारा.
६४१) सर्वभेषजभेषजम्‌---भेषज म्हणजे औषध. सर्व औषधांचे औषध असणारा. सर्व रोगांचे औषध जे पीयूष म्हणजे अमृत. त्या अमृताचाही दोषनिवारक.
सृष्टि-स्थिति-लयक्रीड: सुरकुञ्जरभेदन: ।
सिन्दूरित-महाकुम्भ: सत्‌-असत्‌-व्यक्तिदायक: ॥११४॥
६४२) सृष्टिस्थितिलयक्रीड---सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय ही ज्याची क्रीडा आहे.
६४३) सुरकुञ्जरभेदन---सुर म्हणजे देव. कुञ्जर म्हणजे हत्ती. देवांच्या ह्त्तींचे मर्दन करणारा. दानवांकडून पूजित होऊन देवश्वेष्ठांमध्ये भेद निर्माण करणार्‍या देवराजाचा भेदक.
६४४) सिन्दूरितमहाकुम्भ---ज्याच्या मोठया कुम्भस्थळावर (मस्तकावर) शेंदूर माखला आहे.
६४५) सदसद्‌व्यक्तिदायक---सत्‌ व असत्‌ यांना व्यक्तपणा देणारा. किंवा भक्तांना सद्सद्‌विवेकबुद्धी देणारा.
साक्षी समुद्रमथन: स्वसंवेद्य: स्वदक्षिण: ।
स्वतन्त्र: सत्यसंकल्प: सामगानरत: सुखी ॥११५॥
६४६) साक्षी---तटस्थ किंवा विश्वाला साक्षात्‌ पाहणारा. कोणाचीही कोणतीही गोष्ट त्याच्यापासून लपून राहत नाही.
६४७) समुद्रमथन---समुद्रमंथनप्रसंगी देवतांकडून सर्वप्रथम पूजला गेलेला. किंवा समुद्रमंथन करणारा.
६४८) स्वसंवेद्य---स्वयंज्योतिस्वरूप. स्वत:च स्वत:ला जाणणारा.
६४९) स्वदक्षिण---स्वयंसमर्थ, स्वत: दक्षिणा देणारा.
६५०) स्वतन्त्र---कोणाच्याही तन्त्राने न चालणारा. स्वत:च्या तंत्राने चालणारा.
६५१) सत्यसंकल्प---कधीही व्यर्थ न होणार्‍या संकल्पाने युक्त.
६५२) सामगानरत---सामगानात रमणारा. अमोघकल्पनांमधून सत्यसंकल्प म्हणून गायला जाणारा.
६५३) सुखी---सुखाचा अनुभव घेऊन दुसर्‍यांना सुख देणारा. ज्याच्याकडे सुख आहे असा. त्यामुळेच तो ते भक्तांना देऊ शकतो.
हंस: हस्तिपिशाचि-ईश: हवनं हव्य-कव्यभुक्‌ ।
हव्य: हुतप्रिय: हर्ष: ह्रल्लेखा-मन्त्र-मध्यग: ॥११६॥
६५४) हंस---हंस म्हणजे सूर्य. सूर्यरूप असलेला. यतिविशेषस्वरूप. हंसरूप परमात्मा. सोऽहं हाच हंस असणारा.
६५५) हस्तिपिशाचीश---हस्तिपिशाचिनीच्या नवाक्षर मन्त्राची (‘ॐ गं गणपतये नम:।’) देवता.
६५६) हवनम्‌---आहुतिस्वरूप.
६५७) हव्य-कव्यभुक्‌---हव्य किंवा हविर्दव्य म्हणजे देवांचे अन्न. कव्य म्हणजे पितरांना देण्याचे अन्न. भुक्‌ म्हणजे खाणारा. हव्य आणि कव्य खाणारा.
६५८) हव्य---हविर्द्रव्यरूप.
६५९) हुतप्रिय---आहुतीत दिली जाणारी द्रव्ये ज्याला प्रिय आहेत असा.
६६०) हृल्लेखामन्त्रमध्यग---आकाश, अग्नी, ईकार व बिन्दुरूप या प्रकारचे बीज ह्रल्लेखा म्हणून तन्त्रराज तन्त्रात वर्णिले आहे. ‘ह्नीं’ हे ते बीज. त्याचा वाचक. ‘ह्नीं’ नामक बीजाक्षरात असणारा.
क्षेत्राधिप: क्षमाभर्ता क्षमापरपरायण: ।
क्षिप्र-क्षेमकर: क्षेमानन्द: क्षोणीसुरद्रुम: ॥११७॥
६६२) क्षेत्राधिप---तीर्थक्षेत्रांचा स्वामी. क्षेत्र म्हणजे देह. देहाचा स्वामी.
६६३) क्षमाभर्ता---पृथ्वी (क्षमा) किंवा सहनशीलता धारण करणारा.
६६४) क्षमापरपरायण---क्षमाशील मुनींना प्राप्त होणारा.
६६५) क्षिप्रक्षेमकर---क्षिप्र म्हणजे त्वरित. क्षेम म्हणजे कल्याण. त्वरित कल्याण करणारा.
६६६) क्षेमानन्द---कल्याण आणि आनन्दस्वरूप. सांसारिक आणि पारमार्थिक आनंद देणारा.
६६७) क्षोणीसुरद्रुम---क्षोणी म्हणजे पृथ्वी आणि सुरद्रुम म्हणजे कल्पवृक्ष. पृथ्वीवरील कल्पवृक्ष असणारा.
धर्मप्रद: अर्थद: कामदाता सौभाग्यवर्धन: ।
विद्याप्रद: विभवद: भुक्तिमुक्तिफलप्रद: ॥११८॥
६६८) धर्मप्रद---भक्तांना धारणात्मक धर्म प्रदान करणारा.
६६९) अर्थद---चतुर्विध पुरुषार्थांपैकी (धर्म-अर्थ-काम-मोक्ष) द्वितीय पुरुषार्थाची सिद्धी देणारा.
६७०) कामदाता---तृतीय पुरुषार्थसिद्धी देणारा. इच्छा पूर्ण करणारा.
६७१) सौभाग्यवर्धन---कुटुम्बाचे सौभाग्य उजळवणारा.
६७२) विद्याप्रद---विद्या देणारा.
६७३) विभवद---ज्ञानसंपत्ती देणारा.
६७४) भुक्तिमुक्तिफलप्रद---भोग आणि मोक्ष ही फले देणारा.
आभिरूप्यकर: वीरश्रीप्रद: विजयप्रद: ।
सर्ववश्यकर: गर्भदोषहा पुत्रपौत्रद: ॥११९॥
६७५) आभिरूप्यकर---विद्वत्ता आणि सौंदर्य प्रदान करणारा.
६७६) वीरश्रीप्रद---भक्तांना वीरोचित (वीर + उचित) वैभव देणारा.
६७७) विजयप्रद---विजय प्राप्त करून देणारा.
६७८) सर्ववश्यकर---भक्तांना सर्व काही वश करून देणारा.
६७९) गर्भदोषहा---गर्भदोष दूर करणारा.
६८०) पुत्रपौत्रद---पुत्रपौत्र देणारा. पौत्र म्हणजे नातू
मेधाद: कीर्तिद: शोकहारी दौर्भाग्यनाशन: ।
प्रतिवादि-मुखस्तम्भ: रुष्टिचित्तप्रसादन: ॥१२०॥
६८१) मेधाद---मेधा म्हणजे बुद्धिची धारणाशक्ती. ती शक्ती प्रदान करणारा.
६८२) कीर्तिद---कीर्ती प्रदान करणारा.
६८३) शोकहारी---ज्ञानदान करून शोक-दु:ख हरण करणारा.
६८४) दौर्भाग्यनाशन---दुर्भाग्याचा नाश करणारा. स्त्रीदौर्भाग्यनाशक.
६८५) प्रतिवादि-मुखस्तम्भ---प्रतिकूल बोलणार्‍या दुष्टांचे मुख बंद करणारा.
६८६) रुष्टिचित्तप्रसादन---क्रोधित झालेल्यांचे चित्त प्रसन्न करणारा. स्नेहयुक्त करणारा. सेवकांवर रागावणार्‍या राजांचे चित्त अनुकूल करवून त्यांच्याविषयी प्रेम निर्माण करणारा. रुष्टियुक्त चित्ताला प्रसन्न करणारा.

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP