मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक १२१ ते १३०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक १२१ ते १३०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा, वेदांनी ज्याची महती गायली आहे, सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो.


पर-अभिचारशमन: दु:ख-भञ्जनकारक: ।
लव: त्रुटि: कला काष्ठा निमेष: तत्पर: क्षण: ॥१२१॥
६८७) पराभिचारशमन---अभिचार म्हणजे जारणमरणादि दुष्टकर्मे. शत्रूंच्या अभिचारांचे शमन करणारा.
६८८) दुःख-भञ्जनकारक---सर्व दुःखांचे भञ्जन करणारा. दुःख दूर करणारा.
(यापुढे नामक्रमांक ७०८ पर्यंत कालपरिमाणांची नावे येतात. ते ते नामरूप असलेला गजानन असे आता वर्णन येते.) (मालाच्या सूक्ष्म विभागांची संख्या आणि त्यांचे परस्परांशी प्रमाण यांच्याबाबतीत मतवैचित्र्य आढळते. नमुन्यादाखल भागवत ३.११.३-१० मधील कोष्टक देत आहोत.)
(कालाचे) २ परमाणू = १ अणू  ३ निमेष = १ क्षण
३ अणू = १ त्रसरेणू           ५ क्षण = १ काष्ठा
३ त्रसरेणू = १ त्रुटी         १५ काष्ठा = १ लघु
१०० त्रुती = १ वेध         १५ लघु = १ नाडिका (घटका)
३ वेध = १ लव             २ नाडिका = १ मुहूर्त
३ लव = १ निमेष         ३० मुहूर्त = १ अहोरात्र
६८९) लव---सूक्ष्म कालस्वरूप. लव म्हणजे एका कमलपत्रास सूक्ष्म सुईने छिद्र करण्यास लाग्णारा वेळ.
६९०) त्रुटि---एक हजार लवांची एक त्रुटी होते. त्रुटीकालस्वरूप.
६९१) कला---तीस काष्ठांची एक कला होते. कलास्वरूप.
६९२) काष्ठा---अठरा निमेषांची एक काष्ठा होते. काष्ठास्वरुप.
६९३) निमेष---तीस तत्परांचा एक निमेष. निमेषस्वरूप.
६९४) तत्पर---शंभर त्रुटींचा एक तत्पर होतो. तत्परस्वरूप.
६९५) क्षण---तीस कलांचा एक क्षण होतो. क्षणस्वरूप.
घटी मुहूर्तं प्रहर: दिवा नक्तम्‌ अहर्निशम्‌ ।
पक्ष: मास: अयनं वर्षं युगं कल्प: महालय: ॥१२२॥
६९६) घटी---सहा क्षणजनितकालस्वरूप.
६९७) मुहूर्तम्‌---दोन घटीजनितकालस्वरूप.
६९८) प्रहर---चार मुहूर्तजनितकालस्वरूप.
६९९) दिवा---सूर्योदयापासून चार प्रहरजनितकालस्वरूप.
७००) नक्तम्‌---सूर्यास्तापासून चार प्रहरजनितकालस्वरूप.
७०१) अहर्निशम्‌---सूर्योदयापासून आठ प्रहर. (पूर्वाह्व - प्रात:काल, माध्याह्न, अपराह्न, सायंकाल (दिवसाचे ४ प्रहर) आणि प्रदोष - रजनीमुख, निशीथ त्रियाम, उषा (ब्राह्ममुहूर्त) (हे रात्रीचे ४ प्रहर)-(तत्त्वनिजविवेक) प्रहर जनित कालस्वरूप दिवसरात्र.
७०२) पक्ष---पंधरा दिवसरात्रजनितकालस्वरूप.
७०३) मास---दोन पक्षजनितकालस्वरूप.
७०४) अयनम्‌---सहा मासजनितकालस्वरूप. (दक्षिणायन-उत्तरायणस्वरूप)
७०५) वर्षम्‌---दोन अयनजनितकालस्वरूप.
७०६) युगम---तीनशेसाठ मानव वर्ष = १ दिव्यवर्ष. बारा हजार दिव्यवर्ष = चतुर्युग (कृत-त्रेता-द्वापार-कली-या प्रत्येक युगाचा काल निराळा) समजला जातो तो खालीलप्रमाणे. युगस्वरूप असणारा.
कृत - १७,२८,००० वर्षे
त्रेता - १२,९६,००० वर्षे
द्वापर - ८,६४,००० वर्षे
कली - ४,३२,००० वर्षे
ही चार युगे मिळून एक ‘पर्याय’ होतो. असे १००० पर्याय म्हणजे ब्रहम्याचा एक दिवस.
७०७) कल्प---एक हजार चतुर्युग = एक कल्प = ब्रहम्याचा एक दिवस.
७०८) महालय---ब्रह्मदेवाची शंभर वर्षे भरल्यावर होणारा ब्रह्मदेवासह विश्वाचा पूर्ण नाश म्हणजे एक महाप्रलय. असा सर्वकालस्वरूप असणारा गणराज. (सूक्ष्मकालापासून महाकालस्वरूप असणारा तो गणपती)
राशि: तारा तिथि: योग: वार: करणम्‌ अंशकम्‌ ।
लग्नं होरा कालचक्रं मेरु: सप्तर्षय: ध्रुव: ॥१२३॥
७०९) राशि:---मेष आदी बारा मेष-वृषभ-मिथून-कर्क-सिंह-कन्या-तूळ-वृश्चिक-धनु-मकर-कुंभ आणि मीन या १२ राशी) राशिस्वरूप.
७१०) तारा---सत्तावीस (आश्विनी-भरणी-कृत्तिका-रोहिणी-मृग-आर्द्रा-पुनर्वसू-पुष्य-आश्लेषा-मघा-पूर्वा-उत्तरा-हस्त-चित्रा-स्वाती-विशाखा-अनुराधा-ज्येष्ठा-मूळ-पूर्वाषाढा-उत्तराषाढा-श्रवण-धनिष्ठा-शततारका-पूर्वाभाद्रपदा-उत्तराभाद्रपदा-रेवती) नक्षत्रस्वरूप.
७११) तिथि---तिथिरूप. (१५तिथी = शुक्लपक्ष आणि कृष्णपक्ष) (प्रतिपदा-द्वितीया-तृतीया-चतुर्थी-पंचमी-षष्ठी-सप्तमी-अष्टमी-नवमी-दशमी-एकादशी-द्वादशी-त्रयोदशी-चतुर्दशी-पौर्णिमा आणि अमावस्या) चन्द्राच्या पंधरा कलाही तोच.
७१२) योग---विष्कंभादि (खगोलाचे सत्तावीस भाग, ज्यांवरून चंद्र-सूर्याचे अक्षांश-रेखांश मोजतात. त्यास योग म्हणतात. २७ योग - विष्कंभ-प्रीती-आयुष्यमान्‌-सौभाग्य-शोभन-अतिगंड-सुकर्मा-धृती-शूल-गंड-वृद्धी-ध्रुव-व्याघात-हर्षण-वज्र-सिद्धी-व्यतिपात-वरीया-परिघ-शिव-सिद्ध-साध्य-शुभ-शुक्ल-ब्रह्म-ऐंद्र आणि वैधृती (ज्योतिषसार) सत्तावीस योग आणि तिथि-वार-नक्षत्र संयोगाने होणारे अन्य योग अमृतसिद्धी, आनंदादी स्वरूप.
७१३) वार---सात वारस्वरूप. (रविवार-सोमावर-मंगळवार-बुधवार-गुरुवार-शुक्रवार-शनिवार)
७१४) करणम्‌---बव, बालव इ. करणरूप. बव. बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज, विष्टि, किंस्तुघ्न, नाग, चतुष्पाद आणि शकुनि असे ११ करण.
७१५) अंशकम्‌---अंशस्वरूप. राशीचा तिसावा भाग. आकाशमंडलाचा ३६० वा भाग म्हणजे अंश.
७१६) लग्नम्---मेष आदी राशींचा उदयकाल तत्स्वरूप.
७१७) होरा---लग्नार्धस्वरूप.
७१८) कालचक्रम्‌---कालचक्रस्वरूप. अनुकूल किंवा प्रतिकूल स्थित्यंतरे ज्याच्यामुळे येतात ते कालचक्र. शिशुमार = चक्रस्वरूप काळाचे फेरते चाक. त्यामुळे अनुकूल व प्रतिकूल स्थित्यंतरे घडून येतात. तत्स्वरूप.
७१९) मेरू---सुवर्णमय पर्वततत्स्वरूप.
७२०) सप्तर्षय---सप्तर्षिस्वरूप. (अंगिरा, अत्रि, वसिष्ठा, कश्चप, मरीची, पुलह व क्रतु)
७२१) ध्रुव---ध्रुवस्वरूप. शाश्वत, अढळ, अच्युत.
राहु: मन्द: कवि: जीव: बुध: भौम: शशी रवि: ।
काल: सृष्टि: स्थिति: विश्वं स्थावरं जंगमं च यत्‌ ॥१२४॥
७२२) राहु---राहुग्रहस्वरूप.
७२३) मन्द---शनैश्चर म्हणजेच शनिग्रहस्वरूप.
७२४) कवि---शुक्रग्रहस्वरूप.
७२५) जीव---बृहस्पति (ग्रुरू) ग्रहस्वरूप.
७२६) बुध---बुधग्रहस्वरूप.
७२७) भौम---भूमिपुत्र मंगळग्रहस्वरूप.
७२८) शशी---चन्द्रग्रहस्वरूप.
७२९) रवि---सूर्यस्वरूप.
७३०) काल---जगाचा संहार करणारा कालस्वरूप.
७३१) सृष्टि---सृष्टिस्वरूप.
७३२) स्थिति---पालनकर्तारूप.
७३३) विश्वं स्थावरं जंगमं च---स्थावर-जंगम विश्वरूप. चराचर जगद्रूप.
भू: आप: अग्नि: मरुत्‌ व्योम अहंकृति: प्रकृति: पुमान्‌ ।
ब्रह्मा विष्णु: शिव: रुद्र: ईश: शक्ति: सदाशिव: ॥१२५॥
७३४) भू---पृथ्वीरूप.
७३५) आप---जलरूप.
७३६) अग्नि---अग्निरूप.
७३७) मरुत्‌---वायुरूप.
७३८) व्योम---आकाशरूप.
७३९) अहंकृति---अहंकारस्वरूप.
७४०) प्रकृति---प्रकृतिरूप.
७४१) पुमान्‌---पुरुषरूप.
७४२) ब्रह्मा---सृष्टिकर्तास्वरूप.
७४३) विष्णु---विष्णुस्वरूप.
७४४) शिव---संहारकर्तारूप. अघोर-तत्पुरुष-ईशान-सद्योजात-वामदेवरूप. (शिवाची संहाररूपे)
७४५) रुद्र---रुद्रस्वरूप. अकरा रुद्र-कपाली-पिङ्गल-भीम-विरूपाक्ष-विलोहित-शास्ता-अनैकपात्‌-अहिर्बुध्न्य-शंभु-चण्ड-भगरूप.
७४६) ईश---शिवस्वरूप. ईश्वर.
७४७) शक्ति---शक्तिस्वरूप. ईश्वराची शक्ती.
७४८) सदाशिव---सदाकल्याणस्वरूप.
त्रिदशा. पितर: सिद्धा: यक्षा रक्षांसि किन्नरा: ।
साध्या: विद्याधरा: भूता: मनुष्या: पशव: खगा: ॥१२६॥
७४९) त्रिदशा---ज्यांना बाल्य-कौमार्य आणि तारुण्य या तीनच दशा असतात ते देव (त्रिदशा:) देवांना माणसांसारखी वार्धक्य ही चवथी दशा नसते. देवस्वरूप असा.
७५०) पितर---पितरस्वरूप.
७५१) सिद्धा---सिद्धस्वरूप.
७५२) यक्षा---यक्षस्वरूप.
७५३) रक्षांसि---राक्षसस्वरूप.
७५४) किन्नरा---किन्नरसमुदायस्वरूप.
७५५) साध्या---साध्यगणस्वरूप.
७५६) विद्याधरा---विद्याधरगणस्वरूप.
७५७) भूता---भूतगणस्वरूप.
४५८) मनुष्या---मनुष्यसमुदायरूप.
७५९) पशव---पशुगणसमुदायरूप.
७६०) खगा---पक्षिगणसमुदायस्वरूप.
समुद्रा: सरित: शैला: भूतं भव्यं भवोद्‌भव: ।
साङख्यं पातञ्जलं योग: पुराणानि श्रुति: स्मृति: ॥१२७॥
७६१) समुद्रा---विभिन्नसमुद्रस्वरूप.
७६२) सरित---नदीसमुद्रायस्वरूप.
७६३) शैला---पर्वतगणस्वरूप.
७६४) भूतम्‌---भूतकाळरुप.
७६५) भव्यम्‌---भविष्यकाळरूप.
७६६) भवोद्‌भव---जगदुत्पत्तीचे कारण.
७६७) साङ्ख्यम्‌---कपिलमुनि प्रवर्तित सांख्यदर्शनस्वरूप.
७६८) पातञ्जलम्‌---पतञ्जलिप्रोक्त योगसूत्ररूप.
७६९) योग---शेषप्रणीत सामसूत्रनिदान नावाचे योगदर्शनस्वरूप.
७७०) पुराणानि---वेदव्यासविरचित अठरा पुराणे व अठरा उपपुराणस्वरूप. पुराणानि - ब्रह्म-पद्म-विष्णू-शिव-लिङ्ग-गरुड-नारद-भागवत-अग्नि-स्कन्द-भविष्य-ब्रह्मवैवर्त-मार्कण्डेय-वामन-वराह-मत्स्य-कूर्म आणि ब्रह्माण्ड ही १८ महापुराणे व सनत्सुजातीय-नरसिंह-शिवधर्म-विष्णुधर्मोत्तर-वाय़ू-कालिका-गणेश-वरुण-दुर्वासोक्त-औशनस-कापिल-माहेश्वर-सौर-भार्गव-मारीच-सांब-पराशर आणि देवीभागवत ही अठरा उपपुराणे  तत्स्वरूप.
७७१) श्रुति---चतुर्वेदस्वरूप (ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद-सामवेद-अथर्ववेद)
७७२) स्मृति---मन्वादिस्मृतिस्वरूप. स्मृति: -मनू-अत्री-विष्णू-हारीत-याज्ञवल्क्य-उशना-अंगिरा-यम-आपस्तंब-संवर्त-कात्यायन-बृहस्पती-पराशर-व्यास-शंख-लिखित-दक्ष-गौतम-शातातप-वसिष्ठ हे स्मृतिकार होत.
वेदाङगानि सदाचार: मीमांसा न्यायविस्तर: ।
आयुर्वेद: धनुर्वेद: गान्धर्वं काव्यनाटकम्‌ ॥१२८॥
७७३) वेदाङ्गानि---शिक्षा-कल्प-व्याकरण-निरुक्त-छंद-ज्योतिष ग्रंथांना वेदाङ्गे किंवा षडंगे म्हणतात. वेदांगस्वरूप.
७७४) सदाचार---सदाचार संग्रहात्मक ग्रन्थरूप.
७७५) मीमांसा---‘मीमांसा’ या शब्दाचा नेमका अर्थ म्हणजे साधकबाधक चर्चा. ‘संबंधनिश्चिती.’ एखाद्या शब्दाचा किंवा वाक्याचा अर्थ निश्चित करताना व त्याचा इतर शब्दांशी अथवा वाक्यांशी असणारा संबंध निश्चित करताना जो विचार करावा लागतो व जो तर्कवाद स्वीकारावा लागतो, त्याला ‘मीमांसा’ म्हणतात. मीमांसाशास्त्राची प्रवृत्ती श्रुतींचा (वेदांचा) सम्यगर्थ (योग्य अर्थ) समजून घेण्याकरिता झाली आहे. सङ्कर्षसंहिता षोडशाध्यायी, (जैमिनीवे १६ अध्यायात मीमांसादर्शनाची सूत्ररचना केली आहे. पहिल्या १२ अध्यायांना ‘द्वादशलक्षणी’ असे म्हणतात. तर पुढील ४ अध्यायांना ‘संकर्षण कांड’ किंवा ‘देवताकांड’ म्हणतात.) भक्तिमीमांसा, ब्रह्ममीमांसारूप.
७७६) न्यायविस्तर---कणाद आणि गौतम मुनीप्रणीत न्यायदर्शनरूप.
७७७) आयुर्वेद---ऋग्वेदाचा उपवेदरूप.
७७८) धनुर्वेद---यजुर्वेदाचा उपवेदरूप.
७७९) गान्धर्वम्‌ :---- गान्धर्ववेद सामवेदाचा उपवेदरूप.
७८०) काव्यनाटकम्‌---श्राव्यकाव्य आणि दृश्यनाटकरूप. या शब्दाने दृश्य व श्राव्य यांचे ग्रहण करावयाचे आहे. दृश्याचे २८ प्रकार - शब्दरचनांवरून २८ बाबी दृग्गोचर होतात - अनुप्रास-यमक-श्लेष-चित्र-उपमा-उत्प्रेक्षा-अपह्नुती-रूपक-अनन्वय-व्यतिरेक-दृष्टान्त-अर्थान्तरन्यास-अन्योक्ति-अतिशयोक्ती-स्वभावोक्ती-सम-विषम-सहोक्ती-पर्यायोक्ती-व्याजस्तुती-प्रश्न-विरोध-सार-दीपक-असङ्गती-विभावना-विशेषीक्ती व कथावस्तू.
श्राव्याचे ८ प्रकार - हंस-कांस्य-मेघ-ढक्का (शुभ)-काक-वीणा-गर्दभ-पाषाणध्वनी (अशुभ) रूपकाचे १० प्रकार - नाटक - प्रकरण - भाण - व्यायोग - समवकार - डिम - ईहामृग - अंक - वीथी व प्रहसन असा काव्यनाटकरूप.
वैखानसं भागवतं सात्वतं पाञ्चरात्रकम्‌ ।
शैवं पाशुपतं कालामुखं भैरवशासनम्‌ ॥१२९॥
७८१) वैखानसम्‌---विष्णुप्रोक्त वैखानस (वानप्रस्थ) तन्त्ररूप.
७८२) भागवतम्‌---व्यासप्रोक्त वैष्णवशास्त्ररूप.
७८३) सात्वतम्‌---सप्तर्षीप्रणीत सात्वततन्त्रस्वरूप.
७८४) पाञ्चरात्रकम्‌---पाञ्चरात्र आगमस्वरूप
(वैखानस-भागवत-सात्वत-पाञ्चरात्र ही चार वैष्णव तन्त्रे आहेत.)
७८५) शैवम्‌---
७८६) पाशुपतम्‌---
७८७) कालामुखम्‌ :----
७८८) भैरवशासनम्‌---
वरील चार शैवतन्त्रे आहेत. असा शैवतन्त्ररूप असणारा.

शाक्तं वैनायकं सौरं जैनम्‌ आर्हतसंहिता ।
सत्‌ असत्‌ व्यक्तम्‌ अव्यक्तं सचेतनम्‌ अचेतनम्‌ ॥१३०॥
७८९) शाक्त---शाक्ततन्त्रस्वरूप.
७९०) वैनायक---गाणपत्य तंत्रस्वरूप.
७९१) सौर---सौरतंत्रस्वरूप.
७९२) जैनम्‌---जैनतंत्रस्वरूप. जैनदर्शन.
७९३) आर्हतसंहिता---जैन ग्रन्थ.
७९४) सत्‌---कारण रूपात स्थित.
७९५) असत्‌---कार्यरूपात स्थित.
७९६) व्यक्तम्‌---कार्याच्या ठिकाणी कारण व्यक्तस्वरूपात असणे. व्यक्तरूपात असणारा. ज्ञानेन्द्रिय-ग्राह्य.
७९७) अव्यक्तम्‌---कारणरूपात असणारा. ज्ञानेन्द्रियांना अग्राह्य.
७९८) सचेतनम्‌---प्राणिमात्रादिक तसेच सजीवसृष्टीरूपात असणारा.
७९९) अचेतनम्‌---निर्जीव - जडरूपात असणारा.

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP