मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक १४१ ते १५०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक १४१ ते १५०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा, वेदांनी ज्याची महती गायली आहे, सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो.


षण्मुख: षण्मुखभ्राता षट्‌-शक्ति-परिवारित: ।
षड्वैरिवर्गविध्वंसी षड्‌-ऊर्मि-भय-भञ्जन: ॥१४१॥
८७५) षण्मुख---सहा शास्त्रे ज्याच्या मुखात आहेत असा. न्याय-व्याकरण-वेदान्त-योग-सांख्य आणि पूर्वमीमांसा ही सहा शास्त्रे होत.
८७६) षण्मुखभ्राता---षडानन कार्तिकेयाचा मोठा भाऊ. षड्‌ म्हणजे सहा आणि आनन म्हणजे मुख. कार्तिकेयाला सहा मुखे होती म्हणून तो षडानन. षण्मुख.
८७७) षटशक्तिपरिवारित---परा-ज्ञान-इच्छा-क्रिया-कुण्डलिनी-मातृका किंवा ऋद्धी-सिद्धी-कान्ती-मदनावती-मद्रदवा-द्राविणी या शक्ती ज्याच्या भोवती आहेत असा.
८७८) षडवैरिवर्गविध्वंसी---काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर या षडरिपूंचा विध्वंस करणारा.
८७९) षडूर्मिभयभञ्जन---भूक-तहान-शोक-मोह-वार्धक्य आणि मृत्यु या सहा ऊर्मीपासून वाटणार्‍या भयाचा नाश करणारा.
षटतर्कदूर: षट्कर्मनिरत: षडरसाश्रय: ।
सप्त-पाताल-चरण: सप्तद्वीप-ऊरुमण्ड्ल: ॥१४२॥
८८०) षटतर्कदूर ;--- जल्प-वितंडा इत्यादी सहा तर्कांपासून दूर किंवा सहा दर्शनात कथित तर्कांपासून दूर असणारा. मन्त्रतर्क, यन्त्रतर्क, तन्त्रतर्क, प्रयोगतर्के, अणुतर्क, न्यायतर्क या सहाही प्रकारच्या तर्कांपासून दूर असणारा.
८८१) षटकर्मनिरत---यजन-याजन-अध्ययन-अध्यापन-दान व प्रतिग्रह या सहा कर्मात तत्पर असणारा.
८८२) षडरसाश्रय---मधुर-अम्ल-लवण-कटु-कषाय आणि तिक्त या सहा रसांचा आश्रय असणारा.
८८३) सप्तपातालचरण---तल-अतल-वितल-सुतल-रसातल-महातल व पाताल हे सप्त पाताल ज्याचे चरण आहेत असा.
८८४) सप्तद्वीपोरूमण्डल---जम्बू-कुश-वृक्ष-शाल्मली-क्रौंच-शाक आणि पुष्कर ही सप्तद्वीपे (द्वीप = बेट) ज्याच्या मांडयाच आहेत.
सप्त-स्वर्लोक-मुकुट: सप्त-सप्ति-वरप्रद: ।
सप्ताङ्गगराज्यसुखद: सप्तर्षिगणमण्डित: ॥१४३॥
८८५) सप्तस्वर्लोकमुकुट---भू:-भुव:-स्व:-मह:-जन-तप:-सत्यम्‌ नामक सप्तस्वर्गच ज्याचा मुकुट आहे.
८८६) सप्तसप्तिवरप्रद---सप्ति म्हणजे घोडा. सात घोडे ज्याच्या रथाला आहेत तो सूर्य म्हणून सप्तसप्ति म्हणजे सूर्य. सूर्याला वर देणारा.
८८७) सप्ताङ्गराज्यसुखद---स्वामी-अमात्य-राष्ट्र-दुर्ग-कोश-सेना आणि मित्र या सात अंगांनी युक्त अशा राज्याचे सुख प्रदान करणारा किंवा अग्निहोत्र, श्रद्धा, वषट्‌कार, व्रत, तप, दक्षिणा व अभीष्ट ही वैदिक यज्ञक्रियेची सप्त अंगे. यांचे सुख देणारा.
८८८) सप्तर्षिगणमण्डित---सप्तर्षिगणांनी शोभित. कश्यप-अत्री-भरद्वाज-विश्वामित्र-गौतम-जमदग्नी आणि वसिष्ठ हे सप्तर्षी होत.
सप्तछन्दोनिधि: सप्तहोता सप्तस्वराश्रय: ।
सप्ताब्धि-केलिकासार: सप्तमातृनिषेवित: ॥१४४॥
८८९) सप्तछन्दोनिधि---वैदिक काळच्या छंदात एकाक्षरी छंदापासून १०४ अक्षरी छंदांपर्यंत अनेक प्रकार आहेत. त्यातील सात प्रमुख आहेत ते असे - गायत्री-उष्णिक-अनुष्टुभ्‌-बृहती-पंक्ती-त्रिष्टुभ्‌ व जगती या  सात छंदांचे आश्रयस्थान.
८९०) सप्तहोता---होता म्हणजे ऋग्वेदवेत्ता. होता-उद्‌गाता-प्रतिप्रस्थाता-उन्नेता-पोता-प्रतिहर्ता-नेष्टा यांना सप्तहोतार: म्हणतात. तत्स्वरूप.
८९१) सप्तस्वराश्रय---षड्‌ज-ऋषभ-गान्धार-मध्यम-पंचम-धैवत-निषाद या सप्तस्वरांचा आधार.
८९२) सप्ताब्धिकेलिकासार---सात समुद्र हे ज्याची क्रीडासरोवरे आहेत असा. शास्त्रात लवणाब्धि-इक्षुसागार-सुरार्णव-आज्यसागर-दधिसागर-क्षीरसागर-स्वादुजल असे सप्तसागर वर्णिले आहेत. अब्धि म्हणजे सागर. तसेच घराच्या अंगणात खेळण्यसाठी बनविलेल्या तलावास केलि-कासार म्हणतात. कासार म्हणजे तलाव. सरोवर. ही सर्व ज्याच्या क्रीडेची ठिकाणे आहेत.
८९३) सप्तमातृनिषेवित---ब्राह्मी-कौमारी-वैष्णवी-वाराही-ऐन्द्राणी-माहेश्वरी-चामुण्डा या सात देवतांना सप्तमातृका म्हणतात. या सप्तमातृकांद्वारा सेवित.
सप्तछन्दोमोदमद: सप्तछन्दो-मखप्रभु: ।
अष्टमूर्ति-ध्येयमूर्ति: अष्ट-प्रकृतिकारणम्‌ ॥१४५॥
८९४) सप्तछन्दोमोदमद---पथ्य संज्ञक छंदांमुळे होणार्‍या आनंदाने मत्त म्हणजे वेदपठणाने प्रमुदित होणारा.
८९५) सप्तछन्दोमखप्रभु---मख म्हणजे यज्ञ सप्तछन्दांच्या यज्ञाचा स्वामी.
८९६) अष्टमूर्तिध्येयमूर्ति---अष्टमूर्ती शिवाची ध्येयमूर्ती असणारा. शर्व-भव-रुद्र-उग्र-भीम-पशुपती-ईशान आणि महादेव या शिवदेवतेच्या आठ मूर्ती आठ तत्त्वांमध्ये अधिष्ठित आहेत. (वायुपुराण) जल, अग्नि, यज्ञकर्ता, चंद्र, सूर्य, आकाश, पृथ्वी व वायू याही शिवाच्या आठ मूर्ती मानल्या जातात.
८९७) अष्टप्रकृतिकारणम्‌---पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश-मन-बुद्धी-अहंकार या आठ प्रकृतींच्या उत्पत्तीचे कारण.
अष्टाङ्गयोगफलभू: अष्टपत्र-अम्बुजासन: ।
अष्ट-शक्ति-समृद्ध-श्री: अष्ट-ऐश्वर्य-प्रदायक: ॥१४६॥
८९८) अष्टाङगयोगफलभू---यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार-ध्यान-धारणा आणि समाधि या आठ अंगाने युक्त योगाचे चित्तवृत्तिनिरोधरूप फल देणारा.
८९९) अष्टपत्राम्बुजासन---अष्टदल कमलासनावर विराजमान.
९००) अष्टशक्तिसमृद्धश्री---तीव्रा-ज्वालिनी-नन्दा-भोगदा-कामदायिनी-उग्रा-तेजोवती व स्त्या या अष्टशक्तींच्या योगाने ज्याची संपत्ती समृद्ध झाली आहे. कमळाच्या आठ दलात असलेल्या या शक्तींनी सेवित असा.
९०१) अष्टैश्वर्यप्रदायक---दासदासी-नोकरचाकर-पुत्र-बंधुवर्ग-वास्तू-वाहन-धन आणि धान्य ही आठ ऐश्वर्य प्रदान करणारा. किंवा अष्टसिद्धींचे ऐश्वर्य प्रदान करणारा.
अष्टपीठ-उपपीठ-श्री: अष्टमातृसमावृत: ।
अष्ट-भैरव-सेव्य: अष्ट-वसु-वन्द्य: अष्टमूर्तिभूत्‌ ॥१४७॥
९०२) अष्टपीठोपपीठश्री---अष्टपीठे व उपपीठे यांच्या समृद्धीने युक्त.
९०३) अष्टमातृसमावृत---सप्तमातृका व महालक्ष्मी यांनी आवरणदेवता रूपात ज्याला वेढले आहे असा.
९०४) अष्टभैरवसेव्य---बटुकादी अष्टभैरवांकडून सेवित. बटुक. शंकर, भूत, त्रिनेत्र, त्रिपुरान्तक, वरद, पर्वतवास व शुभ्रवर्ण हे अष्टभैरव.
९०५) अष्टवसुवन्द्य---आप-ध्रुव-सोम-धर-अनिल-अनल-प्रत्यूष आणि प्रभास या आठ वसूंना कन्दनीय असणारा.
९०६) अष्टमूर्तिभृत्‌---आठ मूर्ति (रूपे) धारण करणारा. पृथ्वी, आप, तेज, वाय़ू, आकाश, सूर्य, चंद्र आणि यजमान या आठ रूपात प्रकटणार्‍या श्रीशंकरांना शास्त्र अष्टमूर्ती म्हणजे किंवा (बिन्द्‌वादिसहजान्त:स्थब्रह्मरूपोऽष्टमूर्तिभृत्‌)
अष्टचक्र-स्फुरन्‌-मूर्ति: अष्टद्रव्य-हवि:-प्रिय: ।
नवनागासन-अध्यासी नवनिधि-अनुशासिता ॥१४८॥
९०७) अष्टचक्रस्फुरन्मूर्ति---अष्टचक्र यन्त्रात प्रकाशमानस्वरूप असणारा.
९०८) अष्टद्रव्यहवि:प्रिय---काळे तीळ, पोहे, केळी, मोदक, पांढरे तील, खोबरे आणि तूप ही हविर्द्रव्ये ज्याला प्रिय आहेत असा.
९०९) नवनागासनअध्यासी---अनंत-वासुकी-तक्षक-कर्कोटक-पद्य-महापद्य-शंख-कुलिक आणि धृतराष्ट या नवनागांच्या आसनावर बसलेला.
९१०) नवनिधिअनुशासित---महापद्य-पद्य-शङ्ख-मकर-कश्यप-मुकुन्द-कुन्द-नील-खर्व अथवा हय-गज-रथ-दुर्ग-भाण्डार-अग्नी-रत्न-धान्य-प्रमदा या नवनिधींचा शास्ता.
नवद्वार-पुर-आधार: नव-आधार-निकेतन: ।
नवनारायण-स्तुत्य: नवदुर्गा-निषेवित: ॥१४९॥
९११) नवद्वारपुराधार---नऊद्वारे असलेले पुर म्हणजे शरीर. दोन कान, दोन डोळे, दोन नाकपुडया, दोन गुह्यद्वारे आणि तोंड या नऊ द्वारे असलेल्या देहाचा आधार.
९१२) नवाधारनिकेतन---कुलाकुत-सहस्रार-मूलाधार-स्वाधिष्ठान-मणिपूर-अनाहत-विशुद्धी-आज्ञा आणि लम्बिका या नऊ आधारात निवास करणारा.
९१३) नवनारायणस्तुत्य---धर्म-आदि-अनन्त-बदरी-रूप-शंकर-सुंदर-लक्ष्मी आणि साध्यनारायण या नऊ नारायणांकडुन ज्याची स्तुती केली जाते असा.
९१४) नवदुर्गानिषेवित---शैलपुत्री-ब्रह्मचारिणी-चन्द्रघण्टा-कूष्माण्डा-स्कन्दमाता-कात्यायनी-कालरात्रि-महागौरी आणि सिद्धीदात्री या नवदुर्गांकडून सेवित.
नवनाथमहानाथ: नवनागविभूषण: ।
नवरत्नविचित्राङ्ग: नवशक्तिशिरोद्‌धृत: ॥१५०॥
९१५) नवनाथमहानाथ---ज्ञान-प्रकाश-सत्य-आनन्द-विमर्श-स्वभाव-सुभग-प्रतिभ आणि पूर्ण नवनाथांचा महानाथ.
९१६) नवनागविभूषण---नवनागांना अलंकाररूपाने धारण करणारा.
९१७) नवरत्नविचित्राङ्ग :---- हिरा-माणिक-पाचू-गोमेद-मोती-इन्द्रनील-पुष्कराज-पोवळे आणि वैडूर्य या नवरत्नांनी ज्याचे अंग सशोभित झाले आहे.
९१८) वनशक्तिशिरोद्‌धृत---नशक्तींणा ज्याने अपल्या शिरावर धारण केले आहे. धर्मशक्ती. दानशक्ती. मंत्रशक्ती ज्ञानशक्ती, अर्थशक्ती, कामशाक्ती, युद्धशक्ती, व्यायामशक्ती व भोजनशक्तींनी किंवा तीव्रा, ज्वालिनी, मोहिनी, भोगदायिनी, द्राविणी कामिनी, अजिता, नित्या, विलासिनी या शक्तींनी शिरी धारण केलेला.

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP