मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक ५१ ते ६०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक ५१ ते ६०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा , वेदांनी ज्याची महती गायली आहे , सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो .


महालक्ष्मीप्रियतम : सिद्धलक्ष्मीमनोरम : ।

रमा - रमेश - पूर्वाङ्ग दक्षिण - उमा - महेश्वर : ॥५१॥

२८० ) महालक्ष्मीप्रियतम --- ही महालक्ष्मी म्हणजे श्रीगणेशाची बुद्धिरूपा पत्नी आहे . महालक्ष्मीस अत्यंत प्रिय असणारा .

२८१ ) सिद्धलक्ष्मीमनोरम --- सिद्धलक्ष्मी ही श्रीगणेशाची दुसरी पत्नी . सिद्धलक्ष्मीला मनोरम वाटणारा .

२८२ ) रमारमेशपूर्वाङ्ग --- रमा = लक्ष्मी . रमेश = विष्णू . हे ज्याच्या पूर्वद्वारावर , धर्मद्वारावर विराजित असतात .

२८३ ) दक्षिणोमामहेश्वर --- उमा - महेश्वर ज्याच्या दक्षिणद्वारावर , अर्थमंडपावर विराजमान असतात .

मही - वराह - वामाङ्ग : रति - कंदर्प - पश्चिम : ।

आमोद - मोद - जनन : सप्रमोद - प्रमोदन : ॥५२॥

२८४ ) महीवराहवामाङ्ग --- पृथ्वी आणि वराह ज्याच्या डाव्या अंगास म्हणजे उत्तरेस विराजमान असतात .

२८५ ) रतिकंदर्पपश्चिम --- रती आणि कामदेव ज्याच्या पश्चिम दिशेस विराजमान असतात .

२८६ ) आमोदमोदजनन --- आमोदप्रमोद इ . अष्ट गाणेशगणांचा जनक किंवा आनंदात अधिक आनंद निर्माण करणारा .

२८७ ) सप्रमोदप्रमोदन --- आनंदी लोकांना अधिक आनंदी करणारा .

समेधित - समृद्धि - श्री : ऋद्धिसिद्धि - प्रवर्तक : ।

दत्त - सौमुख्य - सुमुख : कान्ति - कन्दलित - आश्रय : ॥५३॥

२८८ ) समेधितसमृद्धिश्री --- समृद्धियुक्त लक्ष्मीला संवर्धित करणारा .

२८९ ) ऋद्धिसिद्धिप्रवर्तक --- ऋद्धि व सिद्धि यांचा प्रवर्तक .

२९० ) दत्तसौमुख्यसुमुख --- सुमुखास सुमुखता प्रदान करणारा . समाधानी भक्तास समाधान प्रदान करणारा .

२९१ ) कान्तिकन्दलिताश्रय --- कान्ती म्हणजे शरीरावरील तेज त्यास अंकुरित करणारा .

मदनावती - आश्रित - अङिघ्र : कृत्त - दौर्मुख्य - दुर्मुख : ।

विघ्न - सम्पल्लव - उपघ्न : सेवा - उन्निद्र - मदद्रव : ॥५४॥

२९२ ) मदनावत्यश्रिताङघ्रि --- मदनावती नामक शक्ती ज्याचे पादसेवन करते .

२९३ ) कृत्तदौर्मुख्यदुर्मुख --- दुर्मुखाच्या दुर्मुखतेस दूर करणारा .

२९४ ) विघ्नसम्पल्लवोपघ्न --- विघ्नविस्ताराचा नायनाट करणारा म्हणजेच नवीन विघ्ने आधीच नष्ट करणारा .

२९५ ) सेवोन्निद्रमदद्रव --- मदद्रवा नामक शक्ती आळस झटकून सदैव ज्याच्या सेवेत जागरूक असते अथवा भक्तांच्या सेवेने जागरण झाल्यामुळे जो मदद्रवयुक्त झाला आहे असा .

विघ्नकृत्‌ - निघ्न - चरण : द्राविणीशक्तिसत्कृत : ।

तीव्राप्रसन्ननयन : ज्वालिनी - पालित - एकदृक्‌ ॥५५॥

२९६ ) विघ्नकृनिघ्नचरण --- विघ्न निर्माण करणारा अभक्तसुद्धा ज्याचे चरण दृढ धरून ठेवतो असा .

२९७ ) द्राविणिशक्तिसत्कृत --- द्राविणी नामक शक्तीकडून ज्याचा सम्मान केला जातो .

२९८ ) तीव्राप्रसन्ननयन --- तीव्रा नामक शक्तीमुळे ज्याचे नेत्र प्रसन्न झाले आहेत .

२९९ ) ज्वालिनीपालितैकदृक्‌ --- ज्याची मुख्य दृष्टी ज्वालिनी नामक शक्तीकडून संरक्षित आहे .

मोहिनी - मोहन : भोगदायिनी - कान्ति - मण्डित : ।

कामिनीकान्त - वक्त्रश्री : अधिष्ठितवसुन्धर : ॥५६॥

३०० ) मोहिनीमोहन --- मोहिनीनामक शक्तीलाही मोहित करणारा .

३०१ ) भोगदायिनीकान्तिमण्डित --- भोगदायिनीनामक शक्तीच्या तेजाने मण्डित . ( ज्याची चरणकमले सुशोभित दिसतात .)

३०२ ) कामिनीकान्तवक्त्रश्री --- कामिनी नामक शक्तीच्या सुंदर मुखाची शोभा वाढविणारा . वक्त्र म्हणजे मुख . श्री : - शोभा , सौंदर्य किंवा कामिनी नामक शक्तीच्या मुखावरील शोभास्वरूप असणारा .

३०३ ) अधिष्ठितवसुन्धर --- वसुन्धरेचे म्हणजे पृथ्वीचे अधिष्ठान असणारा .

वसुन्धरा - मदोन्नद्ध - महाशङ्ख - निधिप्रभु : ।

नमत्‌ - वसुमती - मौलिमहापद्म - निधिप्रभु : ॥५७॥

३०४ ) वसुन्धरामदोन्नद्धमहाशङ्खनिधिप्रभु --- वसुन्धरा नामक पत्नीसह आनंदित राहणार्‍या महाशंख नामक निधीचा स्वामी . किंवा वसुन्धरेच्या गर्वास मर्यादा घालणार्‍या महाशंख निधीचा पालक .

३०५ ) नमद्वसुमतीमौलिमहापद्मनिधिप्रभु --- महाशङ्ख आणि महापद्म ही दोन निधिदैवते . अनुक्रमे वसुधारा व वसुमती या त्यांच्या पत्नी , ज्याच्या चरणांवर आपले मस्तक झुकवितात अशा महापद्मनिधीचा स्वामी .

सर्वसद्‌गुरु - संसेव्य : शोचिष्केश - हृदाश्रय : ।

ईशानमूर्धा देवेन्द्रशिख : पवननन्दन : ॥५८॥

३०६ ) सर्वसद्‌गुरूसंसेव्य --- सर्व सद्‌गुरूंकडून ज्याची सेवा , आराधना केली जाते असा .

३०७ ) शोचिष्केशहृदाश्रय --- शोचिष्केश म्हणजे दक्षिण , गार्हपत्य , आहवनीय , सभ्य व आवसथ्य अग्नि ह्या पंचाग्नींच्या हृदयात राहणारा .

३०८ ) ईशानमूर्धा --- ईशान म्हणजे शंकर . शंकर ज्याच्या मस्तकावर आहे असा किंवा भगवान्‌ शंकरालाही जो शिरोधार्य आहे असा . भगवान्‌ शंकरालाही वंदनीय असणारा .

३०९ ) देवेन्द्रशिख --- देनेन्द्र म्हणजे देवांचा राजा इन्द्र . इन्द्र ही ज्याची शिखा म्हणजे शेंडी आहे असा .

३१० ) पवननंदन --- वायूला आनंदित करणारा किंवा ज्याच्या अधिष्ठानावर प्राण आनंद उपभोगतात असा तो .

अग्रप्रत्यग्रनयन : दिव्य - अस्त्राणां प्रयोगवित्‌ ।

ऐरावत - आदि - सर्वाशा - वारण - आवरणप्रिय : ॥५९॥

३११ ) अग्रप्रत्यग्रनयन --- सूक्ष्म व नूतन दृष्टीने युक्त . प्रसन्न , टवटवीत डोळ्यांचा किंवा दोन्ही बाजूस ज्याचे नेत्र दीर्घ आहेत असा .

३१२ ) दिव्यास्त्राणांप्रयोगवित्‌ --- दिव्य अस्त्रांचे प्रयोग जाणणारा .

३१३ ) ऐरावतादिसर्वाशावारणावरणावरणप्रिय --- खेळ खेळताना ऐरावतादि सर्व दिग्गजांना ( आठ दिशांना , ज्यांच्या आधारावर हे सर्व ब्रह्माण्ड स्थिर राहिले आहे असे ऐरावत , पुंडरीक , वामन , कुमुद , अंजन , पुष्पदंत , सार्वभौम आणि सुप्रतीक हे अष्ट दिग्गज आहेत .) झाकून टाकणे ज्याला प्रिय आहे असा .

वज्रादि - अस्त्रपरिवार : गण - चण्ड - समाश्रय : ।

जया - अजया - परिवार : विजया - विजयावह : ॥६०॥

३१४ ) वज्राद्यस्त्रपरिवार --- वज्रादी अस्त्रे हाच ज्याचा परिवार आहे असा किंवा वज्रादी अस्त्र ज्यांच्या हातात आहेत अशा दिक्पालांनी परिवेष्टिट असा . किंवा ज्याचा वज्र इत्यादी अस्त्रांचा परिवार आहे असा .

३१५ ) गणचण्डसमाश्रय --- गणात जे प्रचण्ड आहेत त्यांना आश्रय देणारा .

३१६ ) जयाजयापरिवार --- जया - अजयादी ह्या ज्याचा परिवार आहेत असा . ( जया - विजया - अजया - अपराजिता - तित्या - विलासिनी -" शौण्डी - अनन्ता आणि मङ्गला या नऊ प्राणशक्ती आहेत .)

३१७ ) विजयाविजयावह --- विजया नामक शक्तीस विजय प्रदान करणारा .

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP