मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक १५१ ते १६०

श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक १५१ ते १६०

श्लोक १५१ ते १६०विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा, वेदांनी ज्याची महती गायली आहे, सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो.


दशात्मक: दशभुज: दश-दिक्‌पति-वन्दित: ।
दश-अध्याय: दशप्राण: दशेन्द्रिय-नियामक: ॥१५१॥
९१९) दशात्मक---दशदिशात व्यापक. दशदिशास्वरूप.
९२०) दशभुज---दहा भुजा असणारा. (कृतयुग अवतार)
९२१) दशदिक्‌पतिवन्दित---पूर्व दिशेचा पति (स्वामी) इन्द्र, आग्नेयीचा अग्नी, दक्षिणेचा यम, नैऋत्येचा निऋति, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा वाय़ू, उत्तरेचा सोम, ईशान्येचा ईश्वर, ऊर्ध्व दिशेचा ब्रह्मा, अधो दिशेचा अनन्त अशा दहा दिशांच्या स्वामींना वन्दनीय असणारा.
९२२) दशाध्याय---ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद-अथर्ववेद हे चार वेद व त्यांची षडंगे शिक्षा-कल्प-व्याकरण-छन्द-ज्योतिष आणि निरुक्त यांचा अध्येता.
९२३) दशप्राण---प्राण-अपान-व्यान-समान-उदान हे पंचप्राण व नाग-कूर्म-कृकल-देवदत्त आणि धनंजय हे उपप्राण-स्वरूप असणारा.
९२४) दशेन्द्रियनियामक---कान-नाक-डोळे-जीभ-त्वचा ही पंचज्ञानेन्द्रिये व हात-पाय-वाणी-पायु आणि उपस्थ ही पंचकर्मेन्द्रिये यांच्यावर नियंत्रण ठेवणारा.
दशाक्षरमहामन्त्र: दश-आशा-व्यापि-विग्रह: ।
एकादश-आदिभि:-रुद्रै:-स्तुत: एकादशाक्षर: ॥१५२॥
९२५) दशाक्षरमहामन्त्र---‘ॐ हस्तिपिशाचिनी हुं स्वाहा ।’ हा दशाक्षरमहामन्त्र, या मन्त्राची देवता हस्तिपिशाचिनी असून तिचा ईश श्रीगणेश आहे. हा दशाक्षरमहामन्त्रस्वरूप असणारा.
९२६) दशाशाव्यापिविग्रह---दश आशा म्हणजे द्श दिशा व्यापून उरणारा ज्याचा विग्रह म्हणजे देह आहे असा.
९२७) एकादशादिभीरुद्रै:स्तुत :--­- अकार रुद्र म्हणजेच कपाली, पिङ्गल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजैकपात्‌, अहिर्बुध्न्य, शम्भू, चण्ड आणि भग हे ज्यांमध्ये प्रमुख आहेत अशा रुद्रांकडून प्रशंसिला गेलेला.
९२८) एकादशाक्षर---अकरा अक्षरी मन्त्रस्वरूप.
द्वादश-उद्दण्ड-दो:-दण्ड:, द्वादशान्त-निकेतन:।
त्रयोदशभिदा-भिन्न-विश्वेदेव-अधिदैवतम्‌ ॥१५३॥
९२९) द्वादशोद्दण्डदोर्दण्ड---दो: म्हणजे बाहू. बारा उद्दंड बाहुभुजांनी युक्त.
९३०) द्वादशान्तनिकेतन---ललाटापासून वर ब्रह्मरंध्रापर्यंतचे स्थानास ‘द्वादशान्तं’ असे म्हणतात. तेथे निवास करणारा.
९३१) त्रयोदशभिदाभिन्नविश्वेदेवाधिदैवतम्‌---तेरा भेदांनी भिन्न झालेल्या विश्वेदेवांची (वसु, सत्य, क्रतु. दक्ष, कालकाम, धृति, कुरू, पुरूरवा, माद्रय, कुरज, मनुजा, रोचिष्मत्‌) अधिदेवता.
चतुर्दश-इन्द्रवरद: चतुर्दश-मनुप्रभु: ।
चतुर्दशादिविद्याढय: चतुर्दशजगत्‌-प्रभु: ॥१५४॥
९३२) चतुर्दशेन्द्रवरद---यज्ञ-विभू-सत्यसेन-हरी-वैकुण्ठ-अजित-वामन-सार्वभौम-ऋषभ-विष्वक्सेन-धर्मसेतू-सुदामा-योगेश्वर आणि बुहद्‌भानु या १४ इन्द्रांना वर देणारा.
९३३) चतुर्दशमनुप्रभु---स्वायंभुव, स्वारोचिष, उत्तममनू, तामसमणू, रैवत, चाक्षुष, वैवस्तव, सावर्णी दक्षसावर्णी, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, देवसावर्णी, इंद्रसावर्णी या चौदा मनूंचा स्वामी.
९३४) चतुर्दशादिविद्याढय---४ वेद, ६ वेदांगे, न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र मिळून चोदा मूळ विद्यांनी संपन्न असलेला.
९३५) चतुर्दशजगत्‌प्रभु---भू:भुवादी सप्त ऊर्ध्वलोक आणि अतलवितलादी सप्त पाताल लोक या चौदा भुवनांचा (जगतांचा) स्वामी.
सामपञ्चदश: पञ्चदशी-शीतांशु-निर्मल: ।
षोडश-आधार-निलय: षोडश-स्वर-मातृक: ॥१५५॥
९३६) सामपञ्चदश---पंधरा स्तोममंत्र आणि चार आज्यस्तोत्र हे सामयुक्त होऊन गणपतिस्वरूप होतात म्हणून गणपती या नावाने ते प्रसिद्ध आहेत.
९३७) पञ्चदशीशीतांशुनिर्मल---शीतांशु म्हणजे ज्याचे किरण शीत आहेत असा चन्द्र. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शांत आणि निर्मळ असणारा.
९३८) षोडशआधारनिलय---मानवी शरीरातील जीवनकार्य चालविणारी १६ आधारस्थाने आहेत.
१)पादांगुष्ठाधार २)मूलाधार ३)गुदाधार ४)मेढ्राधार ५)उड्डियानाधार ६)नाभ्याधार ७)हृदयाधार ८)कण्ठाधार ९)घंटिकाधार १०)तत्त्वाधार ११) जिह्वामूलाधार १२)ऊर्ध्वदन्तमूलाधार १३) नासाग्राधार १४) भ्रूमध्याधार १५)ललाटाधार १६)ब्रह्मरंध्राधार या षोडश आधारांचे आश्रयस्थान असणारा.
९३९) षोडश-स्वर-मातृक---षोडशस्वरस्वरूप. नासिकेतून वाहणारा वायू इडा, पिङ्गला व सुषुम्ना अशा तीन नाडयांतून वाहतो व त्यात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही अशी ५ तत्त्वे विशिष्ट क्रम धरून चालतात, याप्रमाणे १५ प्रकारे होणार्‍या वायुसंचारास ‘स्वर’ अशी संज्ञा आहे. या पंधरांचा आधार असणारा श्रीगणेश हा १६ वा आधार आहे.
षोडशान्तपदावास: षोडशेन्दुकलात्मक: ।
कलासप्तदशी सप्तदश: सप्तदशाक्षर: ॥१५६॥
९४०) षोडशान्तपदावास---ब्रह्मारन्ध्रांतर्गत कमलकर्णिका व त्याचेवरील भागास षोडशान्त असे म्हणतात. तेथे निवास करणारा म्हणजेच उन्मनीप्रमाणे विराजमान असा.
९४१) षोडशेन्दुकलात्मक---अमृता-मानदा-पूषा-तुष्टि-पुष्टि-रति-धृति-शशिनी-चन्द्रिका-कान्ति-ज्योत्स्ना-श्री-प्रीति-अङ्गदा-पूर्णा व पूर्णामृता या सोळा चन्द्रकलास्वरूप.
९४२) कलासप्तदशी---‘त्रिपुरागमा’ मध्ये वर्णित बोधिनीसंज्ञक त्रयोदशाक्षर तुर्यविद्यास्वरूप प्रसिद्ध सप्तदशीनामक कलास्वरूप.
९४३) सप्तदश---सामयुक्त सप्तदशस्तोमस्वरूप.
९४४) सप्तदशाक्षर---वषट्‌ २+ औश्रावय ४+यज २+अस्तु श्रौषट ४+ये यजामहे५ याप्रमाणे सतरा अक्षरयुक्त मन्त्राने यज्ञात आहुती ग्रहण करणारा.
अष्टादशद्वीपपति: अष्टादशपुराणकृत्‌ ।
अष्टादश-औषधीसृष्टि: अष्टादशविधि: स्मृत: ॥१५७॥
९४५) अष्टादशद्वीपपति---जम्बू आदी सात द्वीपे व सिंहल आदी अकरा उपद्वीपे (द्वीप = बेट) मिळून अठरा द्वीपसमूहांचा स्वामी. जम्बू,  प्लक्ष, कुश, क्रौंच, शाक, शाल्मली, पुष्कर ही सात द्वीपे आणि स्वर्णप्रस्थ, चन्द्रशुक्ल, आवर्तन, रमणक, मन्दर, हरिण, पाञ्चजन्य, सिंहल, मरू, मणी आणि मानस ही ११ उपद्वीपे मिळून १८ द्वीपे.
९५६) अष्टादशपुराणकृत्‌---अठरा पुराणांचा कर्ता व्यासरूप. (नाम क्र. ७७० मध्ये १८ पुराणांची नावे आहेत.)
९४७) अष्टादशौषधीसृष्टि---औषधी म्हणजे वनस्पती. तांदूळ-गहू-सातू-ज्वारी-बाजरी-मूग-(यव) जव किंवा सातू-उडीद-सावे-हरभरा-तूर आणि राळे ही बारा मुख्य़ धान्ये व तीळ, कोद्रू, नाचणी, वरई, कुळीथ, वाटाणे ही सहा उपधान्ये यांचा निर्माता.
९४८) अष्टादशविधि---विधि म्हणजे मीमांसाशास्त्रात सांगितलेले प्रयोग-विनियोग या दोन उपप्रकारात विभागलेली नऊ प्रकारची वेदवाक्यावरून कर्मव्यवस्था. अप्राप्तप्रापक-वर्णोत्पादनरूप-अभावरूप-नियम-अतिदेश-अधिकार-अंतरंग-बहिरंग-सावकाश-निरवकाश-विशेष आगम-लोप-नियोग-अपूर्व-अंग-प्रयोग-परिसंख्या हे अठरा विधि होत. तत्स्वरूप.
अष्टादश-लिपि-व्यष्टि-समष्टि-ज्ञान-कोविद: ।
एकविंश: पुमान्‌ एकविंशति-अङ्गुलिपल्लव: ॥१५८॥
९४९) अष्टादशलिपिव्यष्टिसमष्टिज्ञानकोविद---नागरी-द्राविडी-यवनानी-ब्रह्मी-खरोष्ठी-सड्ख्या-चक्र-यक्ष-गन्धर्व-किन्नर-नाग-माहेश्वर-चीन-हूण-विमिश्रित-देव-आन्ध्र-असुर या अठरा लिपी व्यष्टि लिपी आहेत तर इतर अनेक समष्ट लिपी. या सर्व लिपींचे ज्ञान असणारा. लिपीज्ञानकुशल असणारा (कोविद-कुशल)
९५०) एकविंश: पुमान्‌---पाच ज्ञानेन्द्रिये-पाच कमेंन्द्रिये-पाच तन्मात्रा-पात्र कोश या वीस तत्त्वांशिवाय एकविसावे तत्त्व आत्मा. ऐतरेय उपनिषदात आत्म्याला हा शब्द योजला आहे.
९५१) एकविंशत्यङगुलिपल्लव---हाताची दहा, पायाची दहा व एक सोंड मिळून एकवीस बोटे (पल्लव) धारण करणारा.
चतुर्विंशतितत्त्वात्मा पञ्चविंश-आख्य-पूरुष: ।
सप्तविंशति-तारेश: सप्तविंशति-योग-कृत्‌ ॥१५९॥
९५२) चतुर्विंशतितत्त्वात्मा---पंचज्ञानेन्द्रिये, पंचकर्मेन्द्रिये, पंचप्राण, पंचमहाभूते, मन, प्रकृती, महत‌ आणि अहंकार या चोवीस तत्त्वांचा आत्मा.
९५३) पञ्चविंशाख्यपूरुष---चोवीस तत्त्वांपलीकडचा पंचविसावा पुरुष.
९५४) सप्तविंशतितारेश---अश्विनी-भरणी-कृत्तिका-रोहिणी-मृग-आर्द्रा-पुनर्वसू-पुष्य-आश्लेषा-मघा-पूर्वा-उत्तरा-हस्त-चित्रा-स्वाती-विशाखा-अनुराधा-ज्येष्ठा-मूळ-पूर्वाषाढा-उत्तराषाढा-श्रवण-धनिष्ठा-शततारका-पूर्वाभाद्रपदा-उत्तरभाद्रपदा-रेवती या सत्तावीस नक्षत्रसमूहांचा ईश्वर.
९५५) सप्तविंशतियोगकृत्‌---विष्कंभ-प्रीति-आयुष्यमान्‌-सौभाग्य-शोभन-अतिगंड-सुकर्मा-धृति-शूल-गंड-वृद्धि-ध्रुव-व्याघात-हर्षण-वज्र-सिद्धि-व्यतिपात-वरीया-परिघ-शिव-सिद्ध-साध्य-शुभ-शुक्ल-ब्रह्मा-ऐन्द्र आणि वैधृति हे खगोलाचे सत्तावीस भाग. ज्यांवरून चन्द्र-सूर्याचे अक्षांश-रेखांश मोजतात. त्यास ‘योग’ म्हणतात. त्या योगांचा कर्ता.
द्वात्रिंशद्‌-भैरव-अधीश: चतुस्त्रिंशत्‌-महाह्नद: ।
षट्‌त्रिंशत्‌-तत्त्व-सम्भूति: अष्टाविंशत्‌-कलातनु: ॥१६०॥
९५६) द्वात्रिंशत्‌भैरवाधीश :--- अस्तिताङ्ग-रुरू--चण्ड-क्रोध-उन्मत्त--कपाली-भीषण आणि संहार हे एक भैरवाष्टक, उग्रभैरव, अङ्गभैरव, अघोरभैरव, भीमभैरव, विजयभैरव, रक्तभैरव आणि स्वर्णाकर्षणभैरव हे दुसरे भैरवाष्टक. मन्थान. खचक्र, फट्‌कार, एकात्मानन्द, रविभक्षण, अचल, नभोणिर्मल, डमरभास्कर हे तिसरे भैरवाष्टक. अग्नी, यमजिह्न. एकपाद, काल, कराल, भीम, हाटकेश, त्रिपुरान्तक हे चवथे भैरवाष्टक. अशा ४ भैरवाष्टकांचा अधिपती.
९५७) चतुस्त्रिंशत्‌महाह्नद :--- ह्नद म्हणजे डोह, खोल तले. १)बिन्दुसरोवर - सिद्धपुर, गुजराथ) २)पम्पासरोवर (कर्नाटक), ३)नारायणसरोवर (कच्छ), ४)पुष्करसरोवर (राजस्थान) ५) मानससरोवर (चीन-तिबेट) ६)रेवासरोवर (पंजाब) ७)नैनीतात ८)भीमताल (हिमाचल प्र्देश) ९)ब्रह्मसरोवर (सन्निहितसर) १०)स्थाण्वीसरोवर (पंजाब) ११)पाराशर (द्वैपायन) (पंजाब) १२)प्रेमसरोवर (मथुर) १३)गोपालसर (राजस्थान) १४)नागतीर्थ (अबू) १५)रामकुण्डसर १६)अल्पा १७)शर्मिष्ठा १८)विश्वामित्र १९)निष्पाप २०)पिण्डारक २१)भालकुण्ड २२)मानस २३)गोमती (सर्व गुजराथ) २४)सीतासर (बिहार) २५)बाणगङ्गा २६)पद्मालय २७)लोणार (सूर्य महाराष्ट्र) २८) बिन्दू (उडीसा-भुवनेश्वर) २९)माधवतीर्थ ३०)शिवतीर्थ (दोन्ही रामेश्वर) ३१) महामघम्‌ (कुम्भकोणम्‌) ३२)धर्मपुष्करिणी (रामनाद) ३३)स्वामिपुष्करिणी (तिरूपती) ३४)हेमपुष्करिणी चिदंबरम्‌ असा महासरोवरस्वरूप.
९५८) षटत्रिंशत्तत्त्वसम्भूति :--- शिवादी ३६ तत्त्वांच्या उत्पत्तीचे कारण, २४ सांख्य तत्त्वे + काल, नियती, कला, विद्या, राग, अशुक्रमाया, प्रकृती माया अशी सात मिश्र तत्त्वे + शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर, शुद्ध विद्या अशी पाच शुद्ध तत्त्वे मिळून एकूण छत्तीस तत्त्वे होत.
९५९) अष्टत्रिंशत्‌कलातनु :--- अग्नीच्या १० + सूर्याच्या १२ + चन्द्राच्या १६ कला मिळून अडतीस कला हेच ज्याचे शरीर आहे असा. धूम्रा-नीलवर्णा-कपिला-विस्फुलिंङ्गिनी-ज्वाला-हैमवती-कव्यवाहिनी-हव्यवाहिनी-रौद्री व संकर्षिणी या दहा अग्नीच्या कला. जालिनी-कीरणी-दाहिनी-दीपिनी-द्योतनी-तेजनी-विद्या-मोहिनी-जीतनी-शंखिनी-प्रकाशिनी आणि दीपकलिका या सूर्य़ाच्या १२ कला. शंखिनी-पद्मिनी-लक्ष्मणी-कामिनी-पोषिणी-पष्टिवर्धनी-आल्हादिनी-अश्वपदिनी-व्यापिनी-प्रमोदिनी-मोहिनी-प्रभा-श्रीवर्धिनी-वेधवर्धनी-विकाशिनि आणि शोभिनी या चन्द्राच्या षोडश कला होत.

N/A

References : N/A
Last Updated : April 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP