मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|गणपती स्तोत्रे|श्री गणेश स्तोत्र माला|
श्लोक १ ते १०

श्रीगणेशसहस्रनाम - श्लोक १ ते १०

विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा , वेदांनी ज्याची महती गायली आहे , सर्वप्रथम पूजनीय असणार्‍या अशा गणेशाला मी वंदन करितो .


श्रीगणेशाय नम : ।

व्यास उवाच ---

कथं नाम्नां सहस्रं स्वं गणेश उपदिष्टवान्‌ ।

शिवाय तत्‌ मम आचक्ष्व लोकानुग्रह - तत्पर ॥१॥

व्यास म्हणाले --- लोकांवर कृपा करण्यास तत्पर असलेल्या ब्रह्मदेवा , गणपतीने आपल्या एक हजार नावांचा शंकरास कसा उपदेश केला ते मला सांगा .

ब्रह्मोवाच ---

देव एवं पुराराति : पुरत्रय - जय - उद्यमे

अनर्चनाद्‌ गणेशस्य जातो विघ्नाकुल : किल ॥२॥

ब्रह्मदेव म्हणाले - पूर्वी म्हणे पुरांचा शत्रू ( अराति :) असलेले शंकर , त्या असुराची तीनही नगरे जिंकण्याच्या वेळी , गणेशाचे पूजन न केल्यामुळे विघ्नांच्या योगाने अनेक संकटांनी गांजून गेले .

मनसा स : विनिर्धार्य तत : तद्‌ विघ्नकारणम्‌ ।

महागणपतिं भक्त्या समभ्यर्च्य यथाविधि ॥३॥

नंतर विघ्नांचा कारणांविषयी मनात विचार करून , भक्तीने महागणपतीचे यथाविधि पूजन करून ,

विघ्न - प्रशमन - उपायम्‌ अपृच्छत्‌ अपराजित : ।

संतुष्ट : पूजया शम्भो : महागणपति : स्वयम्‌ ॥४॥

दुसर्‍यास अजेय असलेले शंकर विघ्ननाश करण्याचा उपाय त्यास विचारू लागले , शंकरांनी केलेल्या पूजेमुळे संतुष्ट झालेल्या महागणपतीने स्वत : ।

सर्वविघ्नैकहरणं सर्वकामफलप्रदम्‌ ।

तत : तस्मै स्वकं नाम्नां सहस्रम्‌ इदम्‌ अब्रवीत्‌ ॥५॥

सर्व विघ्नांचे निश्चयाने हरण करणारे आणि सर्व कामना पूर्ण करणारे , आपल्या सहस्र नावांचे हे स्तोत्र त्यांना सांगितले ,

श्रीमहागणपति : उवाच :---

ॐ गणेश्वर गणक्रीड : गणनाथ : गणाधिप : ।

एकदन्त : वक्रतुण्ड : गजवक्त्र : महोदर : ॥६॥

१ ) गणेश्वर --- शिवगणांचा ईश्वर म्हणजे अधिपती . मुद्‌गल पुराणात सगुणनिर्गुणाच्या अभेदत्वाचे नाव आहे ‘ गण ’. सगुणात आणि निर्गुणातही ज्याची सत्ता आहे तो ‘ गणेश्वर ’ होय . आकाशादी पंचमहाभूतांच्या समूहाला ‘ गण ’ असे म्हणतात . त्यावर सत्ता असणारा तो ‘ गणेश्वर ’.

२ ) गणक्रीड --- गणेशाचा शिष्य गणक्रीड , गणक्रीडाचा शिष्य विकट , विकटाचा शिष्य विघ्नविनायक हे तीनही गुरू गणेशरूण आहेत . मंत्रारंभी गुरुस्मरण आवश्यक म्हणून गणक्रीडाचे स्मरण अथवा आकाशादी गणात प्रवेश करून त्यांच्यात क्रीडा करणारा .

३ ) गणनाथ --- गणसमूहाचा स्वामी . सगुण - निर्गुणाचा म्हणजेच पर्यायाने दृश्यादृश्य सर्वांचा स्वामी .

४ ) गणाधिप :--- गणांचा अधिप म्हणजे सर्व गणांवर ज्याची अधिसत्ता चालते तो . जगत्‌ जीव आणि ईश्वरांचा समूह ‘ गण ’ नावाने ओळखला जातो त्या गणांचे आधिपत्य करणारा .

५ ) एकदंष्ट्र --- एकच दात राहणं हे गणपतिच्या युद्धातील पराक्रमाचं द्योतक आहे , किंवा एक म्हणजे माया . मायेवर ज्याची सत्ता चालते तो एकदंष्ट्र .

‘ एक ’ शब्द मायावाचक असून तिला सत्ता देणारा जो मायिक पुरुष तो दंष्ट्रावाचक किंवा दंतवाचक समजावा . उपलक्षणार्थरीत्या ती एकत्वाने जाणता येते तर तिला आधारभूत असणारा मायिक जो पुरुष तिला सत्ता देण्याच्या निमित्ताने प्रत्ययास येतो . म्हणून तो दंतवाचक ठरतो . अशा , माया स्वरूप प्रकृती आणि मायिक

स्वरूप पुरुष , या दोघांनाही , स्वेच्छेने खेळविणारा तद्रूप अशा सर्वांच्याच बुद्धीमध्ये राहाणारा आणि त्या प्रकृतिपुरुषाहून पलीकडे असलेल्या महिम्याने कळणारा अशा अर्थी ‘ एकदंष्ट्र ’ नामधारी गणेश .

६ ) वक्रतुण्ड --- वळलेल्या सोंडेचा म्हणून वक्रतुण्ड . ‘ वक्रान्‌ तुण्डयति इति वक्रतुण्ड :’ म्हणजेच दुष्टांचा संहार करतो म्हणून तो वक्रतुण्ड . ज्याचे नराकृति शरीर विश्वरूप म्हणजे मिथ्या मायामय ठरले आहे . त्याहून सर्वथा विरुद्ध विपरीत अतएव वक्र असे जे सत्यरूप ब्रह्म तेच ज्याचे तुण्ड म्हणजे मुखादि - संपन्न शिर ठरलेले आहे , त्या परमात्म्याला ‘ वक्रतुण्ड ’ म्हणतात . सर्वतोपरी विपरीत अतएव विरुद्धवर्ती म्हणजे वक्रस्वरूप असणार्‍या मायाभावांचा , समूळ नाश करणारा तो परमात्माच समर्थ आहे म्हणून त्याला ‘ वक्रतुण्ड ’ म्हणावे . विष्णुने वामनावतार धारण करून बळीच्या यज्ञाचा नाश केला व त्याला पाताळात लोटले . देवराज इन्द्र निश्चिंत झाला . त्या वामनावतारातसुद्धा निष्णूने विदर्भ देशातील अदोषपुरानामक गणेशक्षेत्रामध्ये जाऊन गणेशाची आराधना केली व यज्ञविध्वंसन सामर्थ्य मिळविले . त्याप्रसंगाची साक्ष म्हणून वामनवरद श्रीवक्रतुण्ड म्हणून श्रीगणेश प्रसिद्ध आहे .

७ ) गजवक्त्र --- ज्याचे मुख ह्त्तीचे आहे तो गजवक्त्र . वक्त्र = मुख .

८ ) महोदर --- अनन्तकोटी ब्रह्माण्डे उदरात सामावलेली आहेत . म्हणून ज्याचं उदर मोठं आहे तो महोदर .

लंबोदर : धूम्रवर्ण : विकट : विघ्ननायक : ।

सुमुख : दुर्मुख : बुद्ध : विघ्नराज : गजानन : ॥७॥

९ ) लंबोदर --- ज्याचे पोट ब्रह्माण्डांचे आश्रयस्थान आहे तो . आदिशक्तीने तप करून प्रार्थना केल्यावरून तिच्या ध्यानापासून ‘ लंबोदर ’ नावाचा श्रीगजाननाने अवतार धारण केला . तोच आदिशक्तीचा पुत्र होय . विश्वब्रह्मादी संपूर्ण दृश्यादृश्य वस्तुमात्र ज्याच्या उदरात समाविष्ट आहे , जो परमश्रेष्ठ असल्याने कोणाच्याच उदरात समाविष्ट नाही . असण्याचा संभव नाही , तो लंबोदर असा अर्थ या नावात समजावा . हे समग्र विश्व अर्थात्‌ नानाविध ब्रह्मस्थितीसुद्धा जणू ज्याच्या उदरापासून निर्माण झाल्या आहेत . त्याच्याच सत्ताबलाने समग्र व्यवहार करतात म्हणून त्या त्याच्या उदरामध्येच राहतात व शेवटी तेथेच लीन होतात . अशाप्रकारे अनंत व अपार अशीच ज्याची उदस्थिती लंब म्हणजे विशाल ठरलेली आहे तो ‘ लंबोदर ’ होय .

क्रोधासुरनामक दैत्याच्या नाशासाठी लंबोदर गणेशाचा अवतार झाला असल्याचे मौद्‌गल पुराणाच्या पाचव्या खंडात वर्णिले आहे . श्रीक्षेत्र , गणपतिपुळे . जि . रत्नागिरी हे लंबोदर गणेशाचे क्षेत्र असून पुराणप्रसिद्ध अष्टमहाविनायकांपैकी एक आहे .

१० ) धूम्रवर्ण --- धुरकट रंगाचा किंवा ज्याचे यथार्थरूप सहज कळत नाही असे परमगूढतत्त्व , कलियुगातील अधर्माचरणाचे प्राबल्य ( पाच वर्षांच्या मुलीस मुले होऊ लागणे व सोळा वर्षापर्यंतच आयुष्य असणे , असा प्रकार होईपर्यंत जेव्हा वाढते ) तेव्हा त्याला आळा घालण्याचे सामर्थ्य कोणामध्येच नसते , अधर्म फार वाढतो , देव उपोषित होऊन पीडित होतात आणि गणेशाचे आराधन करतात त्यावेळी त्यांना वर देऊन श्रीगणराजप्रभू धूम्रवर्ण नामक अवतार धारण करतात व कलीचा पराभव करून पूर्वीप्रमाणे धर्मस्थापना करतात . असा हा धूम्रवर्ण अवतार कलिकृत दोषांचा नाश करणारा आहे . अधर्माचरणाचे प्राबल्य वाढते तेव्हा कल्कि अवतार होऊन तो कलीचा पराभव करतो पण ते सुद्धा गणेशाचे आराधन करून . जेव्हा त्याहीपेक्षा अतिशय प्रमाणात कलिवृद्धी होते व कल्कीचेही सामर्थ्य कुंठित होते तेव्हा हा धूम्रवर्ण अवतार होतो . धूम्रवर्ण नावाचा संकेतार्थ असा की ज्याप्रमाणे धुरामध्ये गुरफटलेला पदार्थ दिसत नाही त्याप्रमाणे मायेच्या आवरणापलीकडे व मन आणि वाणीनेही अगम्य असा परब्रह्म परमात्मा असा तो प्रभू ‘ धूम्रवर्ण !’

११ ) विकट --- दुष्टांच्या पारिपत्यासाठी भयंकर रूप धारण करणारा , कट्‌ धातू आवरणवाचक व वर्षाववाचक असल्याचे व्याकरणशास्त्रात वर्णिले आहे . म्हणून माया - आवरण - रहित म्हणजे ‘ विगतकट ’ अथवा स्वानंदसुखाचा वर्षाव करणारा म्हणून विशेषत : कट अशा दोन्ही अर्थी गणराजप्रभूचे स्तवन ‘ विकट ’ नावाने झाले आहे . हा संपूर्ण जगद्‌विलास मायामय व मिथ्या व अशाश्वत आहे . हे सत्यनित्यस्वरूप ब्रह्माच्या परिज्ञानाने होते . परब्रह्य स्वत : मायारहित , माया - आवरण - नाशक व स्वानंदसुखसंपन्न ठरलेला असून , तशा अर्थी त्याला ‘ विकट ’ असे वेदांनी स्तविले आहे .

१२ ) विघ्ननायक --- अभक्तांच्या कार्यात विघ्न उत्पन्न करणार्‍या गणसमूहांचा नायक किंवा विघ्नांवर ज्याचे आधिपत्य आहे असा .

१३ ) सुमुख --- मुख म्हणजे प्रारंभ , ज्याच्यामुळे कार्यारंभ सुंदर व यशस्वी होतो किंवा सुंदर मुख आहे ज्याचे असा तो .

१४ ) दुर्मुख --- मुख म्हणजे ओळख . ज्याची ओळखी किंवा ज्ञान होणे अथवा ज्याला समजून घेणे अतीव कष्टप्रद अर्थात गहन , गूढ आहे असा .

१५ ) बुद्ध --- अविद्यानाशक किंवा पूर्ण ज्ञानी . नित्यबुद्ध .

१६ ) विघ्नराज --- विविध विघ्नांवर ज्याची सत्ता चालते तो . अभिनंदन नावाचा पृथ्वीवरील एक राजा राजधर्माप्रमाणे राज्य करीत असता त्याचे इंद्राबरोबर वैर सुरू झाले . इन्द्राचे देवत्व नाहीसे व्हावे यासाठी इन्द्राचा हविर्भाग न ठेवता त्याने एक यज्ञ सुरू केला . ही हकिकत नारदांकडून इन्द्रास कळली . अखिल विश्वचालक जो भगवान्‌ कालपुरुष याचे यथाविधि आवाहन , स्तवन करून ‘ राजाच्या यज्ञाचा नाश करावा ’ अशी प्रार्थना इंद्राने केली . वरदानबद्ध कालपुरुषाने राजाच्या यज्ञाचा नाश केला ‘ इंद्राहुतीवाचून यज्ञ करणे हे राजाचे कृत्य शासनयोग्य खरे पण तो शासनाधिकार इंद्राचा नव्हे , जगन्नियंत्याचा आहे हे ध्यानात न घेता इंद्राने अहंकाराच्या व क्रोधाच्या भरी पडून विश्वक्षोभकारक कालाच्या साहाय्याने आपण स्वत : च शासन करण्याचे मनात आणले . अर्थात्‌ विश्वनियंत्याच्या अधिकाराचे हे अतिक्रमण इंद्राच्या व विश्वाच्याही नाशास कारणीभूत ठरले . अशा प्रकारे असत्‌रूपाने प्रवृत्त झालेला तो काल म्हणजेच विघ्नासुर . त्याने नाना प्रकारच्या माया योजून सर्वांनाच कर्मभ्रष्ट केले . तेव्हा धर्मशासनाधिकारी वसिष्ठ वगैरे मुनी ब्रह्मदेवांना शरण गेले . तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले , पार्श्वमुनींनी तप केल्यावरून श्री ब्रह्मणस्पती गणेश सांप्रत त्याचा पुत्र झाला आहे . तोच या विघ्नासुराचा नाश करण्यास समर्थ आहे . त्यालाच शरण जा . त्यानंतर सर्व मंडळी पार्श्वांच्या घरी आली त्यांनी विघ्नासुराचा नाश करण्याविषयी श्रीगणराजप्रभूंची प्रार्थना केली . त्याच्या उन्मत्त प्रवृत्तीचा नाश करून त्याला गणराजप्रभूंनी आपल्या स्वाधीन ठेवले . ‘ माझ्या नावाने युक्त असे नाव आपण धारण करावे .’ अशी प्रार्थना विघ्नासुराने केल्यावरून ‘ विघ्नराज - विघ्नेश्वर ’ या नावाने गणेशांची विशेष प्रसिद्धी झाली . स्वत : चे विश्वनियामकत्व कार्य करण्यासाठीही आज्ञाधारक सेवक म्हणून त्या कार्यावर त्या विघ्नरूपाची स्थापना केली . ज्या सत्कर्मामध्ये आधी गणेशपूजा किंवा स्मरण होणार नाही त्या सत्कर्मामध्ये आसुरभावाने तेथील सर्व फळ भोगण्याचा अधिकार विघ्नराजाने विघ्नासुराला देऊ केला . ‘ विघ्नराज ’ हे नाव सुद्धा केवळ सत्तार्थ संकेत - बोधकच समजावे . विघ्न शब्दाचा अर्थ प्रतिबंधसत्ता असा असून समग्र सत्तावानांची सत्ता कुंठित करून टाकण्याचे सामर्थ्य म्हणून ती विघ्न संज्ञा अन्वर्थक समजावी . त्या विघ्नाचा राजा अर्थात्‌ तसे अकुंठित सामर्थ्य धारण करणारा आणि इतर सर्वांचीच सत्ता कुंठित करून टाकणारा असाच तो विघ्नराज जाणावा . त्याची सत्ता मात्र सर्वदा सर्वत्र अकुंठित ठरली आहे . त्याच्या सत्तेला केव्हाही , कोठेही , कसलाही प्रतिबंध कोणीच करू शकत नाही . विघ्नराजनामधारी श्रीगणराजप्रभू शास्त्रोक्तमार्गाने भजन करणार्‍या आपल्या भक्तांना भुक्ती व मुक्ती देतो . त्यांची सर्व प्रकारची विघ्ने हरण करतो . त्याच्या अभक्तांना नाना प्रकारची विघ्ने देत असतो . विष्णु - शिवादी परमेश्वरांच्या भक्तांनाही आपल्या उपास्य देवतांच्या भक्तीपुर्वी गणेशाराधन अवश्य करावे लागते तसे गणेशभक्तांना दुसर्‍या देवांचे आराधन करावे लागत नाही . तोच एकमात्र संपूर्ण अर्थाने भुक्तिमुक्तिप्रदाता ‘ विघ्नराज ’ होय .

देवांनी प्रतिष्ठापना केलेले असे हे विघ्नराज क्षेत्र विजयपुरी येथे निर्माण झाले . आंध्रमधील ही नगरी आता अस्तित्वात नाही . त्याचे अद्यापि संशोधन झालेले नाही .

१७ ) गजानन --- ज्याचे मुख हत्तीचे आहे असा तो . गजमस्तकधारी . ‘ गज ’ म्हणजे निर्गुणस्वरूप ओंकार . हे ज्याचे मस्तक तो ‘ गजानन ’ होय . गजासुर नावाचा दैत्य उत्पन्न झाला . त्याने विष्णुशिवादी सर्वांनाच जिंकून धरून आणले व सांगितले की ‘ दोन्ही हातांनी दोन्ही कान धरून , भूमीवर मस्तक टेकवून नमस्कार करणे , असा विशेष नमस्कार माझ्या पायांजवळ दररोज करीत जा .’ हेतू हा की अशा कृतीने हे सर्वेश्वर देव पूर्णपणे नम्र होऊन यांचे श्रेष्ठपण पूर्ण नष्ट होईल . पण विष्णु आदी देवांना हा नमस्कार सत्त्वहानिकारक व अपमानास्पद वाटला . त्याचवेळी पराशरपुत्र गजाननावतार झाला .

गणेशाचे स्वरूप गजाननाकृति वर्णिले आहे . म्हणजे त्याचे गळ्याखालचे शरीर नररूप असून मस्तकाचा भाग गजाकृति ठरलेला आहे यामधील तात्पर्यार्थ असा की लयोत्पत्तियुक्त असणारा सगुण विलास म्हणजेच समग्र जगत्‌ प्रपंच हाच ज्याचा देह असून , ज्याचे मस्तक निर्गुण ब्रह्मत्व दर्शविणारे आहे अर्थात्‌ सगुण - निर्गुणादि भावांहून व त्यांहून सर्वथा रहित , पलीकडे असणारा परमात्मा तो ‘ गजानन ’ होय . असेच विज्ञानसिद्ध पुरुष म्हणतात .

भीम : प्रमोद : आमोद : सुरानन्द : मदोत्कट : ।

हेरम्ब : शम्बर : शम्भु : लम्बकर्ण : महाबल : ॥८॥

१८ ) भीम --- दृष्टांच्या संहारासाठी भयदायक होणारा .

१९ ) प्रमोद --- इच्छित वस्तू प्राप्त झाल्यानंतर होणारा आनंद म्हणजे प्रमोद . तत्स्वरूप असणारा . भक्तांना प्रमोद देणारा .

२० ) आमोद --- मनाचे संकल्प विकल्प जिथे संपतात त्या निर्विकल्प अवस्थेला आमोद म्हणतात . अशी अवस्था भक्तास प्राप्त करून देणारा .

२१ ) सुरानन्द --- देवांना आनंद देणारा .

२२ ) मदोत्कट --- गण्डस्थळापासून पाझरणार्‍या मदामुळे उत्कट झालेला . किंवा ब्रह्मरसमृत पाझरत असल्यामुळे आत्मसुखात रममाण झालेला .

२३ ) हेरम्ब ---‘ हे ’ म्हणजे जगत्‌ . ‘ रम्ब ’ म्हणजे संचालक . जगत्संचालक . मायामोहामध्ये गढून गेलेले जीवेश्वरादी सर्वजण सर्वथा पराधीन असतात . म्हणून त्यांना दीन म्हणावे . हेरम्ब नावातील ‘ हे ’ पदावरून तो बोध जाणता येतो . तसेच मायिक स्वरूपाच्या ज्या ब्रह्मस्थिती त्या मोहरहित अतएव स्वाधीन व समर्थत्वामुळे त्या ईशरूप असल्या तरी मायामोहित दीनाविषयी अनुकंपा म्हणजे दया त्यांच्या ठिकाणी अवश्य संभवते ! म्हणून ‘ रंब ’ पदाने उल्लेखित अशा त्या पराधीनच ठरतात . थोडक्यात , दीनांना आणि सामर्थ्यवंतांनाही आपल्या इच्छेनुरूप परस्पराधीन करून खेळविणारा परमात्मा तो ‘ हेरंब ’ गणेश होय .

२४ ) शम्बर ---‘ शं ’ म्हणजे कल्याण . ‘ बर ’ मधील ब चा व होतो आणि वर असा शब्द तयार होतो . कल्याणप्रद वर देणारा . किंवा ज्याच्यापाशी श्रेष्ठ सुख असते तो .

२५ ) शम्भु --- ज्याच्यापासून कल्याण किंवा मंगल उत्पन्न होते तो .

२६ ) लम्बकर्ण --- भक्तजनांची आर्त हाक दूरवरूनही ऐकण्याची क्षमता असणारा .

२७ ) महाबल --- शक्तिशाली . सकल शक्तींचे आधारस्थान असलेला . किंवा ज्यांचे बळ महान्‌ आहे असा .

नन्दन : अत्नम्पट : अभीरु : मेघनाद : गणञ्जय : ।

विनायक : विरूपाक्ष : धीरशूर : वरप्रद : ॥९॥

२८ ) नंदन --- आनंददायक

२९ ) अलम्पट ---‘ अलम्‌ ’ म्हणजे परिपूर्ण . ‘ पट ’ म्हणजे वस्त्र . वस्त्रप्रावरणांनी समृद्ध . लम्पट म्हणजे हाव . अलम्पट्त म्हणजे हाव नसणारा . परिपूर्ण . आत्मपूर्ण असणारा . पूर्णकाम असणारा .

३० ) अभीरु --- भयहीन , भयशून्य .

३१ ) मेघनाद --- मेघाप्रमाणे घनगंभीर ज्याचा ध्वनी आहे असा . मेघांना आवाज करायला लावतो तो .

३२ ) गणञ्जय --- शत्रूगणांवर जय मिळविणारा किंवा कामक्रोधादी गणांवर ज्याने जय प्राप्त केला आहे असा . सैन्यातील व्यूहरचना अनायासेन छेदणारा .

३३ ) विनायक --- सर्व देवदेवतांचा नायक किंवा ज्याचा कोणीही नायक नाही , जो सर्वांचा नायक आहे असा . श्रीगजाननांनी स्वर्ग - मृत्यू व पाताळ या तीनही लोकी अवतार घेतलेले आहेत . त्यातील विनायक हा मृत्युलोकस्थाच्या घरी झालेला अवतार . मृत्युलोकवासी मानव , त्यांचा मूळ पुरुष कश्यप महामुनि . त्यांच्या घरी अदितीच्या पोटी ‘ श्रीविनायक ’ अवतार झाला . रौद्रकेतू नावाच्या ब्राह्मणाला देवान्तक आणि नरान्तक असे दोन पुत्र झाले , ते दैत्य प्रकृतीचे असल्यामुळे व शंकराच्या वरप्रसादाने फार मोठे सामर्थ्य मिळवून , समग्र ब्रह्माण्डालाच त्यांनी जिंकल्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी गणेशांना अवतार घ्यावा लागला . त्रिगुणोद्‌भव व त्रिगुणविहारी अशा कोणापासूनच त्यांना भय नव्हते . जो सर्वांचाच नायक - शास्ता आहे आणि ज्याला कोणी नायक नाही अर्थात्‌ स्वतंत्र सत्ताधीश आहे , तो विनायक . तो परंब्रह्म , स्वयंभू व अज आहे आणि विशेषकरून जगदीश्वरांचा व समग्र ब्रह्मस्थितीचाही जो नायक म्हणजे नियंता आहे . त्याच्याच इच्छेने व सत्तेने सर्वांचे सर्व व्यवहार चालत आहेत . निरंकुश म्हणजे सर्वस्वतंत्र सत्ताधारी व स्वेच्छेने सर्व काही देणारा आणि सर्वथा स्वसंवेद्यमहिमास्वरूप असणारा तो ‘ विनायक ’ होय .

३४ ) विरूपाक्ष --- विरूप म्हणजे पाहण्यास कठीण असे अग्नी व सूर्य हेच ज्याचे नेत्र आहेत असा . किंवा सामान्य डोळ्यांना न दिसणारा किंवा ज्ञानरुपी विशेष डोळ्यांनीच ज्याचे स्वरूप कळते असा . ज्याच्या डोळ्यांना रूप नाही असा म्हणजे सर्वसामान्यांसारखे डोळे नसलेला ( म्हणजेच अदृश्य डोळ्यांनी सर्वांना तो पाहतो .)

३५ ) धीरशूर --- परम धैर्यशाली आणि वीर असा . धीरांमध्ये शूर असा .

३६ ) वरप्रद --- भक्तांना वरप्रदान करणारा . सूर्याच्या छायेपासून तामिस्रासुर निर्माण झाला . तो अंधकाररूपी होता . सूर्याच्याच वराने तो अमोघ सामर्थ्यवान्‌ झाला आणि नेहमी सूर्याच्या आड येऊन त्याला आच्छादू लागला . अर्थात्‌ सूर्याचा कारभार चालेनासा झाला . सर्वत्र सारखी रात्रच सुरू झाली . कर्मनाश झाला . सूर्याचा उपायही चालेना . दुःखित झालेल्या सूर्याने गणेशाचे ध्यान करून तप चालविले . गणेशाने वरदान दिले . त्याच्या स्मरणापासूनच एक अवतार धारण केला . तोच ‘ वरप्रद ’ नामा सूर्यपुत्र . गणेशाचा एक अवतार होय . या अवतारातील वरप्रद नावाचा विशेष महत्त्वसूचक अर्थ असा की जो सर्वांनाच वर देतो पण ज्याला कोणीही वरदाता नाही तो ‘ वरप्रद ’.

महागणपति : बुद्धिप्रिय : क्षिप्रप्रसादन : ।

रुद्रप्रिय : गणाध्यक्ष उमापुत्र : अघनाशन : ॥१०॥

३७ ) महागणपति --- मोठयामोठया गणसमूहांवर ज्याची सत्ता आहे असा . गणसमूहांचा पालनकर्ता . समस्त जीवांचे रक्षण करणारा . त्रिपुरासुर नावाचा महाबलाढय दैत्य होऊन गेला . त्याने गणेशांच्या वरदानाने समर्थ होऊन त्रैलोक्याचे राज्य जिंकून घेतले . त्याचा नाश शंकरांकडून होणार ही नियती ठरली होती . शंकरांचे आणि त्याचे तुंबळ युद्ध झाले परंतु शंकर पराभूत झाले . कारण शंकरांकडून मंगलचरणांची नियती सांभाळली गेली नाही . पराक्रमाच्या गर्वात गणेशांचे आराधन न करताच शंकर युद्धासाठी गेले आणि पराभूत झाले . झालेली चूक जेव्हा त्यांना देवर्षी नारदांकडून कळली तेव्हा सावध होऊन पश्चात्तापयुक्त अंत : करणाने शंकरांनी श्रीगणेशांचे आराधन केले व परमसमर्थ विजयी होऊन त्यांनी त्रिपुरासुराचा नाश केला . त्यांनी ज्या ठिकाणी गणेशाचे आराधन केले ते रांजणगाव नामक गाणेशक्षेत्र महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध क्षेत्र आहे . त्यांनी त्या ठिकाणी ‘ महागणपतीची ’ स्थापना केली . हे क्षेत्र पुणे जिल्ह्यात पुणे - नगर मार्गावर पुण्यापासून बेचाळीस कि . मी . वर आहे .

३८ ) बुद्धिप्रिय --- मोक्षबुद्धि ज्याला प्रिय आहे असा .

३९ ) क्षिप्रप्रसादन --- क्षिप्र म्हणजे ताबडतोब , शीघ्र , भक्तावर चटकन प्रसन्न होणारा .

४० ) रुद्रप्रिय --- रुद्रगणानां प्रिय असणारा .

४१ ) गणाध्यक्ष --- विविध गणांचा अध्यक्ष , संचालक . ज्या ३६ तत्त्वांच्या आधारे विश्वनिर्मिती झाली त्या तत्त्वसमूहाचा पालक . ती तत्त्वे अशी - १ . शिव , २ . शक्ती , ३ . सदाशिव , ४ . ईश्वर , ५ . शुद्ध विद्या , ६ . माया , ७ . विद्या ( अविद्या ), ८ . कला , ९ . राग , १० . काल , ११ . नियती , १२ . जीव , १३ . प्रकृति , १४ . मन , १५ . बुद्धी , १६ . अहंकार , १७ . श्रोत्र , १८ . त्वक्‌ . १९ . चक्षू , २० . जिह्वा , २१ . घ्राण , २२ . वाक्‌ , २३ . पाणी ( हात ), २४ . पाद ( चरण ), २५ . पायु ( गुदद्वार ). २६ . उपस्थ ( जननेन्द्रिय ), २७ . शब्द , २८ . स्पर्श , २९ . रूप , ३० . रस , ३१ . गंध , ३२ . आकाश , ३३ . वायू , ३४ . तेज , ३५ . जल आणि ३६ . पृथ्वी . या बाहेरील ‘ परमशिव ’ सदतिसावे तत्त्व होय . दार्शनिकांच्या मतानुसार हे विश्व या ३६ तत्त्वांच्या आधारे बनलेले आहे . ( शैवसिद्धांत )

४२ ) उमापुत्र --- उमा म्हणजे पार्वती . पार्वतीचा पुत्र .

४३ ) अघनाशन ---‘ अघ ’ म्हणजे पाप . पापांचा नाश करणारा , किंवा अघन = अल्पस्वल्प . अशन = खाणे . भक्तांनी दिलेल्या अल्पस्वल्प नैवेद्याने तृप्त होणारा .

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP