खंड ६ - अध्याय ४२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ आदिशक्ति अन्यशक्तींस सांगत । विकटें रचिलें नाना भेदयुत । ब्रह्म असद्रूप विविधां नटत । आपुल्या मायाप्रभावें ॥१॥
त्यायोगें नानाविध ब्रह्म । जगेंही नानाविध परम । तीं जीवहीन विशेषें अनुपम । विकटाचें तप आचरती ॥२॥
एकाक्षरविधानें तप करिती । दिव्य वषें सहस्त्रें जातीं । त्यायोगें संतुष्ट गणपति । वरदानार्थ प्रकटला ॥३॥
रथस्थ तो सूर्यरूप प्रकटत । सर्वात्मा सर्वभाव दिसत । तेव्हां जग तें ब्रह्में हर्षित । नमिती त्यास अत्यादरें ॥४॥
त्याच्या दर्शनानें बोधयुक्त । शक्तींनो तो ज्ञानयुक्त । आत्माधार हा विकट असत । सूर्यरूपधर निःसंशय ॥५॥
विकटांत तैसा सूर्यांत । न कोठेंही भेद दिसत । त्यास पूजून प्रणाम करित । स्तोत्रें नानाविध रचिती तदा ॥६॥
नाना ब्रह्में तेथ स्तविती । पुनः पुनः वंदन करिती । विकटासी परेशासी भावभक्ती । नमन करिती भक्तिभावें ॥७॥
सर्व जीवनधारकासी । आत्माकारासी सूर्यासी । भातूसी सप्ताश्वरथस्थितासी । विघ्नेशासी नमन असो ॥८॥
परात्म्यासी हेरंबासी । जगन्नाथासी ब्रह्मनाथासी । संज्ञापतीसी साक्षिरूपासी । साक्षीसी छायानाथा नमन ॥९॥
देवेशासी देवदेवेशासी । अनामयासी नित्यासी । सहस्त्रकरधारकासी । अनंतभेदहीना नमन ॥१०॥
अद्वितीयासी सर्वादीसी । सदा सर्वाधारासी । विश्वमूर्तीसी कर्माधारासी । सर्वांच्या पालका नमन तुला ॥११॥
आदित्यासी परेशासी । परात्परतरासी दिनपतोसी । नाथासी दिनपालासी । अर्यम्णासी नमन असो ॥१२॥
काश्यपासी तेजपतीसी । अनाधारासी वृष्टि चालकासी । किती स्तवन करावें तुजसी । सूर्या जेथ वेद कुंठित ॥१३॥
योगी सतत सर्व आत्माकार । मानिती तुज परात्पर । एकमेव अद्वितीय थोर । वेदवादी वर्णिती तुला ॥१४॥
आम्हीं भिन्न-भावें विलसत । त्यायोनें तूं विकट निश्चित । ऐसी स्तुति करून नमित । ब्रह्में हर्षभरित तयासी ॥१५॥
त्यांस वरतीं उठवून । अर्यसी म्हणे कृपावचन । भक्तवत्सल तो महान । वर मागा ब्रह्मांनो ॥१६॥
मी तुमच्या भक्तीनें बद्ध । मागाल तें देईन विशद । तुम्हीं रचिलेलें हें स्तोत्र सुखद । भुक्तिमुक्तिप्रद सर्वदा ॥१७॥
जें जें इच्छित स्तोत्रपाठक । तें तें मीं देईन निःशंक । ब्रह्मभूयप्रद स्तोत्रपालक । भक्तिवर्धन हें स्तोत्र ॥१८॥
सुर्याचें वचन ऐकतीं । ब्रह्में तेव्हां संतुष्ट होतीं । हर्षभरें तयास म्हणतीं । भक्तियुक्त मनानें ॥१९॥
सुतंष्ट जरी ब्रह्मेशा अससी । जीवन्मुक्त करी आम्हांसी । सर्वभावें  स्वसौख्यासी । आम्हीं प्राप्त करावें ॥२०॥
तुझ्या पदांबुजाची भक्ति । सदैव देई आम्हांप्रती । मायामोहनाशनार्थ जगतीं । योगज्ञान दे परात्परा ॥२१॥
तथास्तु ऐसें सविता म्हणत । त्यांस ज्ञान इच्छित देत । मायामोहनाशार्थ उपदेशित । शांतिप्रद गाणेशयोग ॥२२॥
सूर्य सांगे तयाप्रत । जैं असत्‍ सत्‍ संयोग होत । तेव्हां त्यास योग म्हणत । स्वसंवेद्यात्मक गाकारपर ॥२३॥
स्वस्वरूपेण हीन । हा अयोग ख्यात जाण । णकाराक्षरें वर्णन । वेदांत याचें केलें असे ॥२४॥
त्यांच्या योगें गणेशान । शांतीचा शांतिदाता महान । चित्तांत चिंतामणि पाहून । योगी व्हाल दृढचित्त ॥२५॥
संयोग अयोगरूप जें असत । तें मायामय ज्ञात । त्या मायेच्या विकट भावें तयाप्रत । विकटासी सदा भजा तुम्ही ॥२६॥
स्वस्वब्रह्मांत स्थित । स्वभावज कर्म करित । गणेशार्पणभावें सतत । रहावें तुम्ही आनंदानें ॥२७॥
ऐसें सांगून भानु पावत । अंतर्धान स्वानंदांत । सर्वनायक तो ब्रह्मांप्रत । महादेवींनो या रीतीं ॥२८॥
तदनंतर सन्मुख्य ब्रह्में होत । आपापल्या विधानें युक्त । जीवयुक्त होऊन क्रीडा करित । परस्परांशी सर्वदा ॥२९॥
जैसा सूर्यें उपदेशिला । विकटनाम योग भला । तैसा त्यांनीं साधिला । त्यानें शांत तीं झालीं ॥३०॥
ह्रदयांत चिंतामणीस जाणून । बाह्य कर्में त्यास अर्पून । विकटाचें करिती भजन । ब्रह्यें ऐशीं तीं रमलीं ॥३१॥
ऐसें हें विकटाचें महिमान । सूर्यावताराख्यान शोभन । सांगितलें संक्षेपें पावन । देवींनो तुम्ही भाग्यवंत ॥३२॥
हा सूर्यात्मक विकट ख्यात । त्या महात्म्याचा अवतार पुनीत । सर्वसिद्धिप्रद जगांत । पठनें वाचनें सिद्धिलाभ ॥३३॥
हें अवतार आख्यात । इहलोकीं सुखसाधन । परलोकींही साधन । चिरंतन सुखप्राप्तीचें ॥३४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते सूर्यावतारचरितं नाम द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP