खंड ६ - अध्याय ३८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ आदिशक्ति कथा पुढती सांगत । सिंधूचे हेर गृप्तरूपें संचरत । जाणून गुणेशाचा जन्म वृत्तान्त । सिंधूस कथिती सत्वर ते ॥१॥
शक्तींनो हया कालावधींत । आकाशवाणी दैवी होत । सिंधु ऐकून भयभीत । आठवी शब्द ते पुनः पुन्हां ॥२॥
दैत्यनाथा गुणेश त्वरित । ठार करील तुला निश्चित । चराचर करील धर्मयुक्त । त्रिवास सत्य हें जाण ॥३॥
हें ऐकून आकाशवचन । दैत्य पडला मूर्च्छा येऊन । नंतर जाहला सावधान । क्षणभरानें तैं निराश ॥४॥
तो मंदधी शोक करित । दैत्येंद्रास पाठवित । त्या गुणेशा मारण्या झटत । दैत्यनायक सर्वयत्नें ॥५॥
गुप्तरूपें ते सर्व जात । त्रिसंध्या क्षेत्रांत समस्त । नाना मायेचा आश्रय घेत । पशुपक्ष्यांची रूपें घेती ॥६॥
त्याचें कपट जाणून । ठार मारी त्यांस शिवनंदन । शोक करी पार्वती चिंताग्रस्त मन । असंख्य दैत्य पीडा देती ॥७॥
त्या सर्वांसी नित्य मारित । परी दैत्य राजे प्रत्यहीं अयुक्त । माझ्या पुत्रा मारण्या उत्कंठित । काय करतील ते त्यासी ॥८॥
गुणाधीशासी मारतील । या भयानें ती व्याकुळ । साक्षात्‍ ब्रह्मपति विमल । म्हणे पुत्र माझा पूर्ण ब्रह्म ॥९॥
भाग्यहीन प्रभावें यास । होईल का पीडा प्रयास । तेव्हां माया करी गुणेश । मोहिनी घाली पार्वतीसी ॥१०॥
मोहवश देवी मानित । गणेश्वरासी आपुला सुत । त्याचें ब्रह्मरूप विसरत । ऐसा प्रभाव मायेचा ॥११॥
त्या वेळीं मरीची योगी येत । गणपास जो सदैव भजत । म्हणे विघ्नपा दर्शन दे मजप्रत । आकाशवाणी तैं जाहली ॥१२॥
तो महायोगी ती ऐकत । शिवपुत्र झाला गणेश जनांत । त्यास जाऊन भेट त्वरित । त्यानुसार योगी तेथ आला ॥१३॥
हर्षभरें तो तेथ जात । पार्वती त्याचें स्वागत करित । प्रणास करून पूजित । भोजनादिक देतसे ॥१४॥
तदनंतर त्यास प्रार्थित । मुने तूं ब्रह्मभूत साक्षात । माझा आश्रय सोडून सांप्रत । जाऊ नको कोठेही ॥१५॥
तीर्थादिक स्थानाप्रत । गणेशभजनीं तूं रत । जैसा विघ्नहर देव निश्चित । तैसा तूही आम्हांसी ॥१६॥
म्हणून तुज प्रर्थित । राख आता माझा सुत । दैत्यादी समूह सतत । भयंकर सर्वत्र काळासम ॥१७॥
गणेशास मारण्या उद्युक्त । परी ते मृत्यू पावत । आमुचा कुलदेव विघ्नेश असत । यांत संशय कांहीं नसे ॥१८॥
तोच रक्षितो मम सुतास । अन्यथा मृत्यूचें भय त्यास । शंकरें सेविलें गणेशास । तें पुण्य रक्षी माझ्या सुता ॥१९॥
पार्वतीचें ऐकून वचन । महामुनि झाला विनीतमन । ही साक्षात शक्ति भ्रांत होऊन । विघ्नपास सुत मानी ॥२०॥
परी करण्या समाधान । गणेशकवच तिज करी कथन । शंभुसुतास प्रणास करून । स्तुति करून परतला ॥२१॥
तदनंतर जे दैत्यराज येत । म मारण्या गुणेशा उत्कंठित । त्या नानावेषधारकासी वधित । बाळक्रीडा ती तयाची ॥२२॥
एकदा पार्वती प्रातःकाळीं । उठून शिवपूजनीं रत झाली । लिंगमयी मूर्ति केली । ठेविली डाव्या हातावरी ॥२३॥
आवाहन शंकराचें करून । करी तयाचें पूजन । त्या वेळीं गुणेश प्रकटून । म्हणे मजला स्तन्य देई ॥२४॥
पार्वती म्हणे बाळा क्षणभर । देईन स्तन्य धरी धीर । महेशाचें पूजन एकाग्र । प्रथमपूर्ण करितें मीं ॥२५॥
तैं तो सुत तिज विचारित । या लिंगाचें कां पूजन करित । तूं मज सोडून एकचित्त । शंकर काय अधिक देणार ॥२६॥
माते मज दे स्तनपान । त्यागोगें अनंत शिवांचें समाधान । शैलनंदिनी ब्रह्में प्रसन्न । होतील मज तोषवितां ॥२७॥
तथापि पार्वती हांसोन । न दे तयास स्तनपान । तेव्हां क्रोधवश आरक्त नयन । जाहला मयूरेश खरोखर ॥२८॥
तळव्याचा आघात करून । शिवर्लिग भूवरी पाडवून । तें देई दूर लोटून । भग्न जाहलें तें तेव्हां ॥२९॥
शक्तींनो पार्वती अति दुःखित । विकटासी चापट मारित । येऊन क्रोध अत्यंत । गणेश्वरही क्रुद्ध झाला ॥३०॥
आपुल्या मातेस कडकून । चावला तैं गजानन । करांगुली चावून । रक्त काढलें तयानें ॥३१॥
हाहाकार करून रडत । पार्वती तैं गुणेश पळत । तिज त्यागून भयभीत । बाळक्रीडा दाखविली ॥३२॥
जो भयदाता सर्व विश्वाप्रत । तो मातेसी त्या वेळ घाबरत । शैवलिंग भग्न पाहून रडत । प्राणप्रतिष्ठित जें होतें ॥३३॥
पार्वती अतिशोक करित । म्हणे हें शिवहत्येसम दुर्वुत्त । पाप घडलें मज अत्यंत । पतिवधासम हें असे ॥३४॥
हा माझा पुत्र गुणेश वाटत । नरकप्रद मजप्रत । ऐसा पुत्र होऊन होत । जन्म माझा पापिष्ठ ॥३५॥
वांझ जरी राहिलें असतें । तरी तेंही मज गमतें । हा कुलक्षण पुत्र यातें । काय माया लावाची ॥३६॥
याच्यामुळें शिवलिंग भंगलें । पतिवधासम पातक घडलें ॥ आतां गजाननास स्मरून पहिलें । संपवीन माझें जीवन ॥३७॥
दुःखित मी गणेशा ध्याऊन । देहत्याग आतां करीन । विघ्नराजा तुज नमन । तैं घडलें एक आश्चर्य ॥३८॥
गणेशाच्या स्मरणें होत । बुद्धिभेद तिच्या चित्तांस । गणराजा पुत्ररूप पाहत । समीप तेव्हां पार्वती ॥३९॥
एक काठी करीं घेऊन । मारण्या धावें पार्वती उन्मन । परात्पर पुत्रा त्या महान । तोही भीतीचें नाटक करी ॥४०॥
भय पाहून पळून जात । पार्वतीस पाहून तो त्वरित । ती धावून त्यास पकडित । शिवप्रिया पार्वती ॥४१॥
तैं विघ्नेश माया करित । स्वतः शिवमय होत । शंकरास पाहून मोहित । पार्वती जेव्हां दुःखमग्न ॥४२॥
तो शंकररूप गजानन । शैवसुतेसी बोले वचन । मज महेशा मारण्या मन । कां केलेंस प्रिये त्वा ॥४३॥
मज मारण्या काठी हातांत । कां घेतलीस प्रिये रोषांत । त्यास सोडितां पुनरपि घेत । पुत्ररूप गणराज तो ॥४४॥
पार्वती अत्यंत दुःखित । देहत्यागाचा निश्चय करित । पुनरपि पार्वती त्या पुत्रा पाहत । धावें मागुनी मारावया ॥४५॥
भयभीत तो बाळ पळत । देवी त्याचा पाठलाग करित । तो पुत्र जाई वनांत । कर्दमदैत्य तेथ तैं आला ॥४६॥
शैव ब्राह्मणाचें रूप घेऊन । बाळासी म्हणे ओत कृपा दाखवून । बाळा धावसी सांग कारण । रक्षीन तुज मीं निःसंशय ॥४७॥
येथेच थांब क्षणभर । मातेसी न माहित हें स्थान दूर । बाळभावें गुणेशें होकार । तयासी तेव्हां दिधलासे ॥४८॥
त्या कर्दमासुरें बाळ पकडिला । सत्वरीं गिळून टाकिला । सिंधूचा महाशत्रू नष्ट केला । विचारें अति हर्षित ॥४९॥
सर्वं दैत्यांचें भय नष्ट केलें । गुणेशासी मीं ग्रासिलें । तव तेथें जगदंबेचें आगमन झालें । पाठलाग करी ती गुणेशाचा ॥५०॥
त्या शैव ब्राह्मणा म्हणत । स्वामी पाहिला का माझा सुत । कोठें जाहलासे गुप्त । तुमच्याच सन्निध होता तो ॥५१॥
यापुढें पदपंक्ति न दिसत । आलें त्याचा माग काढित । परशु आदि चिन्हें ज्ञात । माझा बाळ कोठें असे ? ॥५२॥
तो द्विज म्हणे शैलजेप्रत । मीं न पाहिला तुझा सुत । शिवाची घेतों शपथ । पाहिला नाहीम पुत्र तुजा ॥५३॥
तदनंतर अति दुःखित । पार्वती स्मरे द्विरदानना चित्तांत । तेव्हां त्या कर्दमाच्या मुखांतून त्वरित । बाहेर पडला गुणेश ॥५४॥
गणनाक बाहेर पडून । मुष्टिघातें करी हनन । तो असुर पडला मरून । महादुष्ट भयंकर ॥५५॥
अठरा योजनें तो पसरला । तैं त्या राक्षसा मृत पाहून झाला । पार्वतीस आनंद आगळा । क्रोध सारा ती विसरली ॥५६॥
पुत्रास घेऊन स्वाश्रमाप्रत । गेली पार्वती स्वगृहांत । तेव्हां पुत्र तिचा लोळत । भूमीवरी गडबडा ॥५७॥
पुनः पुनः जांभया देत । विकटानन बळवंत । त्या बाळाच्या मुखांत । विश्वाचें दर्शनें घडलें तिला ॥५८॥
तें पाहून भयसंकुल । अनंत ब्रह्मांड दर्शनें पाहून विमल । पार्वती पडली धरणीवर अबल । स्वगुरु शंकरातें स्मरे ॥५९॥
आपुल्या इष्ट देवा गणेशा स्मरत । तेथें मोहहीन होत । पार्वती मनीं विचार करित । गणेश देवतो हा पुत्र झाला ॥६०॥
त्यास सोडून लिंगसेवेंत । मूर्खासम मी झालें रत । पतिभावें देहधारी शंकरा देवेशा पूजित । देवभावें गणेशासी ॥६१॥
तें सारें मीं विसरलें । मूढभावें स्तनपान गुणेशा न दिलें । ज्या गुणेशांत स्थित झाले । शंकरादि अनंत देव ॥६२॥
तो तुष्ट होतां संतुष्ट । ते सारे देव होती त्वरित । गणेश ब्रह्मांचा नाथ । तोही संतुष्ट यायोगें ॥६३॥
असे हयास शिवरूप मीं पाहिलें । फसून त्यास पकडलें । तरीही त्याचें सत्यरूप उमजलें । कैसें तें मज समजेना ॥६४॥
आतां यापुढें सर्वभावें भजेंन । पुत्रभावधारी गणेशान । हा पति हा तात ही माता भिन्न । हा पुत्र हा सुह्रद्‍ तैसा ॥६५॥
हा सारा भेद असत्य असत । हा गुणेशचि ब्रह्म विश्वांत । तोचि शांतिप्रद निश्चित । ऐसें ठरवून प्रणास करी ॥६६॥
भक्तिनम्र मान वाकवून । त्या पुत्रासी तोशवून । त्याचें करून स्तवन । आराधना करी ऐसी ॥६७॥
ती ऐसी स्तुति करित । गणेश तैं मोह पाडवित । देवी होऊन संमोहित । विस्मृति तिजला परम झाली ॥६८॥
पुत्रभावें विघ्नेशाचें लालन । गृहकार्यरत देवी करी पालन । तेव्हां शक्ति विचारिती प्रसन्न । गणेश जरी ब्रह्मनायक ॥६९॥
परी तो पुत्रभाव घेंत । बाळक्रीडार्थ उद्युक्त । कां दाखविलें अखिल ब्रह्मांडयुक्त । विश्व त्यानें आपुल्या मुखीं ॥७०॥
शिवरूप कां दाकवित । दाखवून पुनरपि हें अद्‍भुत । लोप कां केला तें समस्त । जाणण्या कुतूहल आमुच्या मनीं ॥७१॥
आदिशक्ति म्हणे वचन । संशय तुमचा दूर करीन । पुत्रभावमय भक्ति ग्रहण । लालस सदा गजानन ॥७२॥
वरदान प्रभावें तपाचें फळ देत । कार्यं करून समस्त । सुरर्षीचें अन्तर्धान पावत । तेव्हां देवीस स्मरण होईल ॥७३॥
गणेश पुत्रभावें आला होता । याचें स्मरण तिज होतां । सुत मानला त्यासी तत्त्वता । हें अज्ञान विश्चित ॥७४॥
पार्वंती ऐसा विचार करील । पुत्रासम राहिला सदनीं विमल । गणेशें दाखविलें स्नेहबळ । ब्रह्मसामर्थ्य तयाचें ॥७५॥
त्याचें माहात्म्य न कळलें । हेंचि आजि कळो आलें । हया विचारें भक्तिभाव झाले । युक्त तिच्या मनांत ॥७६॥
अति भक्तिसंयुक्त । गजाननास ती तैं भजत । म्हणोनि गणराज हें करित । बाळपणीं कौतुक सारें ॥७७॥
ऐशापरी नाना दैत्य वधून । शिवपार्वतीचें करी सेवन । पुत्रभावें त्यास तोषवून । वरदान आपुलें सत्य केलें ॥७८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते बालखेलावर्णनं नामाष्टत्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः
। श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP