खंड ६ - अध्याय २

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल कथा पुढती सांगती । महाकाली मुख्य देवता चित्तीं । पुरातन । ऐकून विस्मितमती ॥ पुनः म्हणती आदिशक्तीस ॥१॥
महामाये सर्व संशयनाशन । कथिलेस तूं रहस्य महान । गणेशयोगांचें ज्ञान सांगून । उपकृत आम्हां केलेंस ॥२॥
काममोहित ज्यांचें चित्त । त्यांस गणेश प्रत्यक्ष न दिसत । जन्मकोटि शतांनीही हें निश्चित । ऐसें तूं आम्हां सांगितलें ॥३॥
जे प्राणी वा देववर वर्तत । गणेश प्राप्तिहीन जगांत । जन्म त्यांचा निष्फल ख्यात । पंडितांच्या मतानुसारें ॥४॥
ज्ञानयुक्त देह लाभून । स्वार्थदायक परी न करिती भजन । गणेशाचें भक्तिहीन । ते अतिमूढ जाणावे ॥५॥
गर्दभासम ते ज्ञात । कारण गणेशज्ञानवर्जित । कामयुक्त स्वभावें त्यजित । गणनायका ते मूढमति ॥६॥
कामाचें चरिद विस्तारें सांप्रत । सांग आदिशक्ते आम्हांप्रत । कामनाशकर उपायही उचित । जेणें ढुंढीचा लाभ होय ॥७॥
तूं आमूची पराकाष्ठा । गुरुरूपा तूं च संस्थिता । विघ्नेश्वर प्रभू आम्हां सत्त्वयुक्तता । देई आम्ही त्यासी सदा भजूं ॥८॥
आदिशक्ति तैं सांगत । विकटावताराची उपासना प्रसस्त । ती करिता काम नष्ट होत । तत्क्षणीं हें सत्य असे ॥९॥
येथ मी इतिहास प्राचीन । सांगतसे जो महान । ज्या योगें कामव्यथाहीन । होतील भक्तजन सर्वदा ॥१०॥
कैलास गिरिवर्यावरी । शंकर एकदा उग्र रूप धरी । स्वेच्छेनें पार्वतीस मोहविण्या अंतरीं । कामना त्याच्या उद्‍भवली ॥११॥
ती शंकरास न पाहत । तैं शोकयुक्त तो होत चित्तांत । त्या वेळीं इंद्र भेटण्या येत । पार्वतीस कैलासीं ॥१२॥
तेथ एक उग्रस्वरूप राक्षस । पडला मघव्याच्या दृष्टीस । त्यास पाहून क्रोधयुक्त । इंद्रें टाकिलें वज्र त्यावरी ॥१३॥
परी तें शिवदेहावरी आपटून । निष्फल झालें बलहीन । शंकरें तैं राग येऊन । अग्नि निर्मिला तृतीय नेत्रीं ॥१४॥
देवपतीस जाळण्या उद्युक्त । अग्नि पाहता बृहस्पतीस स्मरत । त्या योगें इंद्रास समजत । सत्य रूप तें शिवाचें ॥१५॥
तदनंतर करी वंदन । गिरिजानाथानें करी प्रसादन । भयभीत चित्तीं होऊन । चरण पकडी शंकराचे ॥१६॥
अग्निपासून होता रक्षण । इंद्र करी स्तुतिगायन । विविध स्तोत्रें रचून । क्षमा मागे शंकराची ॥१७॥
अज्ञानें जें पातक घडलें । महेश्वरें क्षम्य केलें । अग्नीनें महेशास वंदिलें । शिवांशें जो उत्पन्न झाला ॥१८॥
म्हणे महेश्वरा काय करावें । मीं तें आपण सांगावें । तुझ्या आज्ञेचें पालन बरवें । केलें देवपतीस सोडून ॥१९॥
आता माझें उत्तम कर्म । महेशा सांगा अनुपम । तुझ्या अंशापासून अभिराम । जन्म माझा जाहला ॥२०॥
म्हणोनि निष्फल न व्हावें जीवन । ब्रह्मांड समस्त । ग्रासीन । तुझी आज्ञा मिळतां तत्क्षण । त्वरित सांगा काय करूं ॥२१॥
त्या अग्नीचें वचन ऐकून । शंकर बोले तयास प्रसन्न । तूं राक्षसाकृति भीषण । पड आता समुद्रांत ॥२२॥
तुज कोणी मारण्या न शक्त । महाबळ तूं त्रैलोक्यांत । त्याचा अधिपति होऊन समस्त । धर्माचा लोप करशील ॥२३॥
धर्मध्वजाची वृंदा सुता । गणेशशाप तिज लाभता । जनार्दनहस्ते पातिव्रत्यहीन तत्त्वतां । ती जेव्हां होईल ॥२४॥
पत्नी ती तुझी भ्रष्ट होत । तेव्हां माझ्या चक्रें तूं मरत । त्यानंतर माझ्या देहांत । विलीन होऊन तूं मद्रूप ॥२५॥
होशील ऐसा यात संशय नसत । भीमरूपापासून तूं जन्मलास जगांत । म्हणोनि तैसाच स्वभावें सांप्रत । राक्षसा तूं होशील ॥२६॥
शक्तींनों तेव्हां ऐसें बोलून । महादेवें फेकिला तत्क्षण । कामासुर सागर । जळीं महान । घोष भयंकर तेव्हां झाला ॥२७॥
तदनंतर वरतीं येत । बालक एक तेजयुक्त । ब्रह्मयाच्या जलबीजापासून जन्मत । म्हणोनि जलंधर नाम ठेविलें ॥२८॥
त्याचें मौजीबंधनादि संस्कार । स्वयं करीतसे सागर । कालेनेमि आदिक दैत्य भयंकर । त्याच्या संमीप सदा राह्ती ॥२९॥
पुढें शिवाच्या वरदानें जिंकित । ब्रह्मांडमंडळ तो त्वरित । जालंधर । अमुर मदोन्मत्त । देव झाले वनवासी ॥३०॥
वनांत एका तपश्चर्येंत । वृंदा मग्न होती तिज पाहत । तो जालंधर दानव विवाह करित । तिजसवें गांधर्व विधीनें ॥३१॥
तिच्या सहवासांत रमत । सर्वदा तो दैत्य मायामोहित । त्यास कालगणनेचें भान नसत । वृंदेच्या धुंद समागमे ॥३२॥
तो सारें धरातल करित । कर्महीन प्रयत्नें सतत । यज्ञादि कमें न होत । देवादीस तैं उपवासस घडे ॥३३॥
एकदा नारद योगी जात । भेटण्या त्या असुराप्रत । पूजा सत्कार स्वीकारून म्हणत । नारद असुरनायकासी ॥३४॥
समुद्रपुत्रा तू धन्य जगांत । सर्वरत्नांनी शोभिवंत । परी एक न्य़ून वर्तत । स्त्रीरत्न एक न लाभलें तुला ॥३५॥
पार्वतीसम नारीरत्न नसत । कुठेंही या त्रैलोक्यांत । ती झाली शंकरास प्राप्त । विशेष सौंदर्यखाण ती नारी ॥३६॥
ऐसें बोलून अंतर्धान । महायोगी झाला तत्क्षण । जालंधर कामबाणार्दित मन । चिंतन करी पार्वतीचें ॥३७॥
त्यानें दूत शंकराप्रत । पाठविला त्वरित । निशुंभ तो महाखळ जाऊन सांगत । महादेवासी निरोप ॥३८॥
अरे शंकरा तू नग्न । पार्वती रत्नभूता महान । श्मशान तुझें वसतिस्थान । तुज योग्य नसे पार्वती ॥३९॥
जालंधर सर्वश्रीयुक्त । ब्रह्मांडाधिपति साक्षात । तरी आतां त्यास दे शैलसुतेस । अन्यथा विनाश ओढवून घे ॥४०॥
जरी पार्वतीस न देशील । तरी क्रोधयुक्त जालंधर । मारून तुज तिचें हरण करील । यांत संशय धरूं नको ॥४१॥
त्याचें ऐकून उद्धत वचन । सदाशिव क्रोधें शूल उगारून । त्या निशुंभावें करण्या हनन । झडप घाली तयावरी ॥४२॥
त्या मायेनें भयविव्हाल । पळाला निशुंभ तेथून निर्बल । जालंधरास वृत्तांत दुर्बल । संसदेव निवेदन करी ॥४३॥
निशुंभाचा कळता वृत्तांत । जालंधर रागावला अत्यंत । युद्ध करण्यास जात । सैन्यासह तत्क्षण ॥४४॥
त्यास पाहून महादेव प्रतापवान । विष्णुमुख्यांसह जात उत्कंठित मन । दैत्याधीशाचें करण्या हनन । युद्ध घनघोर करून ॥४५॥
देवदानवांचें युद्ध चालत । परम दारुण वर्णनातीत । एक वर्षभर सतत । तदनंतर दैत्यें काय केलें ॥४६॥
मायेनें मोहविलें त्यानें त्वरित । शंकरास पकडी बाहुपाशांत । एका गुहेंत बंदिस्त । करून ठेवी तयासी ॥४७॥
कालनेमि प्रमुखास रणांत । स्थापिलें लढण्या देवांसहित । मायादी रूप तो धरित । शंकराचें जालंधर ॥४८॥
रूपानें त्या पार्वतीस भेटत । ज्ञानदृष्टीनें ती तें जाणत । महासती विव्हल होत । अंतर्धात जाहली तत्काळ ॥४९॥
हिमगिरीवर जाऊन । महाविष्णूचें करी ध्यान । तो प्रकट होता आरंभापासून । वृत्तान्त त्यास सांगितला ॥५०॥
परवीरहन्ता केशय ऐकून । करी पार्वतीचें सान्त्वन । जालंधराचें रूप घेऊन । गेला वृंदेस मोहविण्या ॥५१॥
जालंधराकृति त्यास पाहत । वृंदा विष्णूस ओळखित । शाप देई महाविष्णूप्रत । म्हणे तूं होई पाषाण ॥५२॥
तेव्हां अतिभययुक्त । विष्णु त्या शापाने संत्रस्त । सिद्धक्षेत्रीं जाऊन पूजित । विघ्नपासि भक्तीनें ॥५३॥
शंकर सावध होत गुहेत । उग्रध्यानें विघ्नपा तोषवित । तेथ गणेश्वर प्रकटत । वर देण्यास तयासी ॥५४॥
त्यास पाहून झाला प्रणित । भक्तिभावें शिव त्यास स्तवित । विविध स्तोत्रें म्हणत । वृत्तान्त सारा कथन करी ॥५५॥
तदनंतर आपुल्या जें करांत । तें सुदर्शन गणेश देत । सदाशिवासी प्रसन्नचित्त । नंतर सांगे तयासी ॥५६॥
मज स्मरूनी युद्धकाळात । हया चक्रानें त्वरित । त्या दानवास मारी जगांत । रक्ष सर्वांसी महादेवा ॥५७॥
तूं विजयी होशील । तुझे बळ बहुत वाढेल । जलंधराचा होईल । विनाश आतां अल्पावधीत ॥५८॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावला तेथें गजानन । चक्र घेऊन गुहेतून । बाहेर आला सुटून ॥५९॥
विष्णु दंडकारण्यांत । पूजी विघ्नेश्वरा विनीत । त्यास प्रत्यक्ष भावें देत । दर्शन तेथें गणेश्वर ॥६०॥
श्रीगणेश त्यास म्हणत । चिंता करुं नको मनांत । मज न स्मरता वृंदेप्रत । गेलास म्हणून शाप मिळाला ॥६१॥
आता तूं मज शरणागत । येथेंच पूर्वीं वरद तुजप्रत । माधवा तुझा अपराध सहन करित । त्यामुळें मी सांप्रत ॥६२॥
तूं शिळारूप होशील । पूर्ण रूपें देवेशा अमल । आपुली आकृती त्यांत घेशील । शाळिग्राम रूपानें ॥६३॥
नर तुज पूजतील जगांत । शिळारूपधरासी भक्तियुक्त । तेथ देवस्वरूपें तेथ सतत । राहशील तूं निःसंशय ॥६४॥
पुनरपि मज हृदयांत ध्याऊन । जलंधर रूप घेऊन । जेव्हां जाशील वृंदेसमीप सकास । तेव्हां ती होईल अधीन तुझ्या ॥६५॥
ऐसें बोलून अंतर्धान । पावले नंतर गजानन । गणपतीचें वरदान लाभून । विष्णु पुनरपि वृंदेप्रत गेला ॥६६॥
ओमिति श्रीमदांत्ये पुराणोनिषदि श्रीमन्मोद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते शिवविष्णोर्वरप्रदानं नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः
। श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP