खंड ६ - अध्याय २०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ देवेश भ्रुशुंडीस प्रार्थिती । मयूरेशाचें देवालय वर्णावें प्रीती । गर्भागार तैसे गणेशरूप आम्हांप्रती । विशद करून सांगावें ॥१॥
भ्रुशुंडी तेव्हां त्यांस सांगत । जें जें आश्चर्यकारक असत । मायारूप तें मयूरक ज्ञात । गणनाथाचें रूप तेंची ॥२॥
दिव धातू क्रीडर्थक । गणेश माया क्रीडापर एक । त्याचें जें रूप तें प्रतीक । देवागार नामें ख्यात ॥३॥
जैसा शुक्रशोणितसंभव । गर्भ जन्मतो हा अनुभव । दोघांचें एकत्व होऊन उद्‍भव । द्वंद्वरूप त्याच्या होत ॥४॥
माया मायिक यांच्या योगें होत । स्वानंदाचा अवतार ज्ञात । गर्भाभार तेंचि प्रख्यात । जाणिती । रहस्य योगिश्रेष्ठ ॥५॥
त्या महात्म्याची वसती । स्वानंदलोकीं निश्चिती । तोच मूर्तिरूप होऊन । दाखवी जगतीं । रूप आपलें उत्तराभिमुख ॥६॥
हें जें सर्व रहस्य कथिलें । तें पूर्णपणें जाणून चांगलें । महेशांनो जरी सेविलें । तरी सर्व इच्छित पावाल ॥७॥
देवेश म्हणती हें क्षेत्र असत । समग्र गणेशरूप युक्त । तेथ विशेषें देव विप्रादिक राहत । कैसें त्यांचें जीवन चाले ॥८॥
ते शौच मूत्र विसर्जन कोठें करिती । स्त्रीसंगही कैसा भोगिती । पुत्रपौत्रांची जन्मरीती । दुर्घट तेथें हें सारें ॥९॥
भ्रुशुंडी तेव्हां सांगत । साक्षात्‍ गणेश्वराचा हा योगमय देह उक्त । त्यास न बाधा कदापि होत । मृतरूप हयास ना कधीं ॥१०॥
लोकांच्या उपकारास्तव । जल पृथ्वी आदिक अभिनव । रचिलें सर्वसामान्य जग सर्व । तेथ निवासें तैं लाभे ॥११॥
गणेश सर्व योगांचा अधिपति । गणेशस्वरूपीं विक्रिया न जगतीं । योगरूपांत नर न मरती । आकार न संभवती गाणेशांत ॥१२॥
तैसेंचि क्षेत्रवासी नरादि करित । मलमूत्रादि विसर्जन सतत । तें देवादींत न बाधत । ऐसें रहस्य जाणावें ॥१३॥
अंगुष्ठमात्र रूपें वसत । क्षेत्रवासी देव विप्रादि समस्त । मयूर तन्मय क्षेत्र ज्ञात । दिव्यचक्षूनें साधकासी ॥१४॥
परी तें मानवासी मृन्मय । त्याचा दोष तेथ न होय । तथापि मृन्मयक्षेत्रीं । नियममय । गर्भागार शुद्ध ठेवावें ॥१५॥
मलमूलत्रादि दोषयुक्त । तें न करावें कदापि जनांत । धर्मयुत शुद्ध स्वरूपें भक्त । पूजिती त्या मयूरेश्वरासी ॥१६॥
जरी पथभ्रष्टत्वपणें वागत । कोणी मयूरक्षेत्रांत । तरी उग्र यातना त्यास देत । नग्नभैरव क्रोधानें ॥१७॥
देवेश विचारिती भ्रुशुंडीप्रत । जो मानव पापकर्में करित । राहून मयूरक्षेत्रांत । त्यास यातना कोणत्या होता ॥१८॥
तैं सर्व आम्हां सांगावें । कोणत्या पुण्यें लाभावें । मयूरक्षेत्र पुण्य स्वभावें । सांगा द्वारयात्रा संन्याशाची ॥१९॥
भ्रुशुंडी इतिहास पुरातन । सांगे तयांसी होण्या संशयहीन । देवागारांत द्विज एक शोभन । अत्रिगोत्रज देवानीक ॥२०॥
तो स्वधर्में नित्य सेवित । गणनायकासी पुनीत । देवविप्र अतिथींस पूजित । क्षेत्रयात्रापरायण ॥२१॥
ऐसा बहुत काळ गेला । तो विप्रही वृद्ध झाला । परी नित्य यात्रा न विसरला । करण्या धर्मधारक तो ॥२२॥
एके दिनीं ज्वरें पीडित । अजीर्ण होऊन संत्रस्त । तैसाच पूजनास तो जात । महायशांनो मयूरेशाच्या ॥२३॥
गणेशास पूजून करित । नित्ययात्रा विप्र श्रद्धायुक्त । तेव्हां अपानवायू सरत । वातपीडेमुळें त्याच्या ॥२४॥
जोर करून तो आवरित । यात्रा सोडून घरीं जाण्या उद्युक्त । त्वरायुक्त अति दुःखित । परी गर्भागारींच काय घडलें ॥२५॥
अजीर्णदोषें अतिसारपीडित । तो विप्र मलत्याग करी गर्भागारांत । त्यायोगें होऊन अति दुःखित । स्नान करी तदनंतर ॥२६॥
हळुवार गतीनें गृहीं परतत । चित्तीं दाटला शोक बहुत । माझ्याकडून अघटित । कृत्य आज हें घडलें असे ॥२७॥
महामूर्ख मी मंदिरात । गर्भागारीं मलत्याग करित । त्या पापानें कोणती गत । होईल माझी तें कळेना ॥२८॥
तदनंतर स्वल्प काळांत । रोगग्रस्त तो विप्र मृत । देवानीक नावाच्या क्षेत्रांत । भैरवदूत त्यास नेती ॥२९॥
त्यास बांधून ताडिती । भैरवाकडे घेऊन जाती । त्यास पाहून भैरव दरडाविती । सांग विप्रा हें कां तूं केलेंस ? ॥३०॥
तूं रोगयुक्त व्याधियुक्त । गर्भागारीं कां गेलास अपुनीत । त्या पापाचें फळ दुश्चित्त । महादुष्टा भोगी अतां ॥३१॥
साक्षात्‍ गणपतीच्या स्थानांत । गर्भागारीं जाऊन । मलपात । त्याच्या मस्तकासमीप उन्मत्त । तूं केलेंस हें अधम कृत्य ॥३२॥
आम्हीं त्यानंतर सुगंधी जल । शिंपडून धुतलें तें स्थळ । तूं गर्भागार विष्ठायुक्त करून । खल तैसाचि बाहेर गेलासी ॥३३॥
ऐसें बोलून दाखवित । क्रूररूप त्या ब्राह्मणाप्रत । देवानीक तैं भैरवरूप पाहत । तैं मूर्च्छा येऊन झणीं पडला ॥३४॥
तेव्हां त्यास करून अ। सावधान । अग्निचक्रांत टाकून । नग्नभैरव तैसे दूत रागवून । भाजती त्या विप्रासी ॥३५॥
हाहाकार तो करित । करुण स्वरें आक्रंदत । भैरवांचा अग्नि असत । कोटी पटीनें अधिक उग्र ॥३६॥
यमाग्नीहून भयंकर असत । त्यास स्पर्श करण्या धजत । ऐसा कोण प्राणी जगांत । अति दारुण यातना त्या ॥३७॥
शंभर वर्षें त्या खाईत । तो ब्राह्मण दाहयुक्त । राहिला परी न मरत । मायाप्रभावें भैरवाच्या ॥३८॥
भैरव त्यासी पकडित । दारुण दुःख त्यास देत । त्या यातना शब्दातीत । टाकिती हिमगिरी गुहेंत नंतर ॥३९॥
तो ब्राह्मणाधम त्या शीतल गुहेंत । जाहला अत्यंत शीतपीडित । शंभर वर्षें तेथ वसत । तदनंतर टाकिती रौरव नरकीं ॥४०॥
तेथ रौद्र जंतू त्यास चावती । कोटि विंचवासम वेदना देती । ऐसी शंभर वर्षें पीडा त्या प्रती । झोपविती तापल्या शिळेवर ॥४१॥
तेथ शंभर वर्षें यातना भोगित । नंतर जन्मे पिशाचयोनींत । अन्नवस्त्रजलहीन हिंडत । ब्राह्मण तो सर्वत्र ॥४२॥
अपवित्र नरांसी पाहन । तैं त्याच्या देहीं शिरत । शास्त्रमंत्रजल प्रोक्षित । वैदिक द्विज तैं बाहेर पडे ॥४३॥
त्या मंत्रजळानें ताडित । तो नंतर इतस्ततः भटकत । ऐसीं शंभर वर्षें उलटत । तेव्हां भैरव त्यास आणवी ॥४४॥  
त्यास म्हणे हितवचन । देवानीका तूं केलें पाप महान । यात्रार्थ गर्भमंदिरीं जाऊन । अशक्त होऊन केलास मलत्याग ॥४५॥
त्या पापास्तव पांचशें वर्षें यातना । दुःख भोगिलें ब्राह्मणा । आता पूर्व भक्तीमुळें देवराणा । गणप तुज क्षमा करील ॥४६॥
त्याच्याकडे आता जाई । ब्रह्मभूत तूं होई । देवेशहो ऐसें हें वृत्त प्रत्ययीं । अस्थानीं मलत्यागें महद‍भय ॥४७॥
जरी स्वाधीन देह असून । गर्भालयीं करी मलत्याग जाणून । तोही नर यातना पूर्ण । भोगील पांचशें वर्षांची ॥४८॥
हें ऐकून नर त्रासयुक्त । जो ऐश्या प्रसगीं घडत । परी मलत्याग गर्भालयीं न करित । त्यास मिळे सद्‍गति ॥४९॥
ऐशापरी त्या ब्राह्मणाप्रत । क्रूर भैरव यातना देत । येऊन महद्‍ दुःख अंतीं करित । ब्रह्मभूत तयासी ॥५०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते मलत्यागयातनाकथनं नाम विंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पनमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP