खंड ६ - अध्याय ७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । अन्यशक्ति आदिशक्तीस प्रार्थिती । भ्रुशुंडिचरित्र संतुष्ट चित्तीं । आतां सांग आम्हांप्रती । मुनिदेवांचा संवाद ॥१॥
ज्या सौख्यद संवादांत । विघ्नेश्वराचें ज्ञान असत । अमल जें गाती सतत । गणेशसायुज्य लाभण्यासी ॥२॥
आदिशक्ति त्यांस सांगत । ऐका कथानक पुरावृत्त । सर्व पापहर जें पुण्ययुक्त । सर्वसिद्धिप्रदायक्र ॥३॥
भ्रुशुंडीचें ऐकून वचन । शंकरादी देव प्रसन्न । विचारिती प्रणास करून । कोण हा गणेश्वर देव ॥४॥
स्वामी सांगा हें वृत्त । कोण हा देव नरकुंजररूप । त्याचें ज्ञान आम्हांप्रत । सांगा कैसा चित्तचालक तो ॥५॥
भ्रुशुंडी तेव्हां त्यास सांगत । गकार संयोगयुक्त । ण कार अयोगात्मक ज्ञात । त्यांचा स्वामी गणेश्वर ॥६॥
गणेश हें अविनाशी पद । वेदांत ख्यात असे विशद । त्याचें मस्तक जाणा सुखद । मायाविरचित सुंदर ॥७॥
हें सर्व विश्व नाशिवंत । तोच त्याचा देह असत । कंठाखालीं त्याच्या विलसत । त्यांच्या योगे गजानन ॥८॥
चतुःपदार्थरूप असत । त्याचे बाहु प्रख्यात । त्यायोगें चतुर्भुज ज्ञात । गणेश पहावा सर्वत्र ॥९॥
जीवात्मा परमात्मा असत । पाय त्याचे पुनीत । द्विपद गणराज प्रख्यात । वेदवादांत देवांनो ॥१०॥
त्याच्या उदरांतून उत्पन्न । जगद्‍ब्रह्म तें महान । म्हणून लंबोदर नामाभिधान । गणेश्वराचें ख्यात असे ॥११॥
गणेशाची मायासिद्धि ख्यात । भ्रांतिदा वामांगापासून जन्मत । योगरूपिणी ती कीर्तित । दक्षिणांगातून बुद्धि ॥१२॥
पंचचित्तमयी साक्षात । भ्रांतिधरा निःसृत । ज्ञानरूपिणी ती यात । त्यांचा स्वामी गणेशान ॥१३॥
योगशांतिमय होत । भक्तवात्सल्यें देहधारी जगांत । तोच ज्ञानगम्य असत । समर्थ तुमच्या कार्यसिद्धीस ॥१४॥
त्याचें करा तुम्हीं भजन । त्यानें सर्व शुभ होऊन । तुमचें दूर होईल अज्ञान । तें ऐकतां हर्ष देवांस ॥१५॥
ते विस्मितचित्त प्रणाम करून । भ्रुशुंडीस म्हणती वचन । तूं साक्षात गजानन । शुंडादंडें विभूषित ॥१६॥
आमचा आद्य गुरु बोधदाता । तूंच आमचा उद्धर्ता । तुझ्या उपदेशे तत्त्वतां । गणेशार्थ ज्ञात झाला ॥१७॥
महायोग्य त्याचे भक्त । विचक्षण आम्ही विनत । झालो आतां आम्हांप्रत । सांग भजनाचें माहात्म्य ॥१८॥
त्या स्थानाचें महिमान । मंत्रादिविधियुक्त पावन । भ्रुशुंडि सांगे त्यांस वचन । महेश्वरांनो ऐका आतां ॥१९॥
पूर्वी समाधिभावें तुम्ही समस्त । भेदाभेदविहीन ब्रह्मांत । तन्मयत्व पावला होतात । परी आतां विसर पडला ॥२०॥
सांप्रत दंडकारण्य़ांत । असे गणेशक्षेत्र विख्यात । स्वानंद नामक पुनीत । तेथें तुम्हीं तप आचरा ॥२१॥
जैसी ह्रदयांत पाहिलीत । तैसी मूर्ति रचा साक्षात । तिची पूजा विधानें सतत । करिता सिद्धि लाभेल ॥२२॥
ऐसें सांगून भ्रुशुंडी थांबत । महायोगी गणेशध्यानरत । गणेशभक्तराजेंद्रा विचारित । तेव्हां ते पंचदेव पुनः ॥२३॥
प्रलय होता समुपस्थित । कोठें असे तें क्षेत्र अद्‍भुत । त्याचें माहात्म्य काय असत । योगींद्रश्रेष्ठा तें सांगा ॥२४॥
तेथ गणेशाची मूर्ति । पूर्वी कोणी स्थापिली होती । भूमिवरी अवतरला गणपति । कोणत्या कारणें तें सांगा ॥२५॥
तेथ विघ्नेश्वरास सेवून । नर पावले सिद्धि महान । त्याचें सर्व महिमान । सर्वज्ञ महामुने सांगावें ॥२६॥
गणनाथ साक्षात । तुं गुरु सांगत । म्हणोनी आम्ही तुझें शिष्य समस्त । हितार्थ आम्हां उपदेश द्यावा ॥२७॥
त्यांचें वचन ऐकून । भ्रुशुंडी पुनरपि बोले वचन । गाणपत्य विचारज्ञ । सर्वशास्त्रार्थ तत्त्ववेत्ता ॥२८॥
गणेशाचें क्षेत्र त्रिविध कीर्तित । त्याचे भेदमीं सांगत । ते एंका एकचित्त । पंचदेवांनो तुम्हीं ॥२९॥
स्वर्गांत शंभुगृहांत । पाताळीं शेषमंदिरांत । मृत्युलोकीं मयुरेशक्षेत्रांत । विघ्नपतीचें क्षेत्र असे ॥३०॥
त्यांतील भूमिग क्षेत्र ख्यात । कर्मंप्रसिद्धयर्थ शाश्वत । वर्णन करीन त्याचें सांप्रत । ब्रह्माकार त्या क्षेत्राचें ॥३१॥
प्रकृति सर्वरूपा असत । पुरुष तो आत्मसंज्ञ ज्ञात । त्यांचा संयोग होतां त्या भावाप्रत । स्वानंद ऐसें म्हणतात ॥३२॥
स्वसंवेद्य योगानें प्राप्त । मानवा तो आनंद होत । तेंच गणराजाचें क्षेत्र पुनीत । भूतलावरी जाणावें ॥३३॥
तेथेंच गणेश साक्षात । योगवाचक संस्थित । त्यानें स्वमायेनें रचिलें अमित । ब्रह्मदायक हें क्षेत्र ॥३४॥
त्याचें रूप निजानंद । वर्णन करूंया विशद । वाणीचें सामर्थ्य न फलप्रद । सर्व क्षेत्रांचा संगम हा ॥३५॥
ऐसें हें क्षेत्र उत्तम । त्या क्षेंत्रापासून अभिराम । चतुर्विध रूप सजविलें मनोरम । गणेशानें स्वमायेनें ॥३६॥
स्वेच्छेनें खेळ म्हणून । त्याच्या पश्चिमांगापासून । असद्रप ब्रह्मशक्तिमय महान । निःसृत झालें नंतर ॥३७॥
तें स्वभावें द्विधा होत । रवि भोगमयी ख्यात । काम सर्वप्रमोहक ज्ञात । त्या उभयतांच्या संगमें ॥३८॥
जो भोग भोगी भोषता । तेच द्वार ऐसी वार्ता । सर्व जनांच्या ह्रदयी तत्त्वतां । रति सहा जी उत्पन्न होते ॥३९॥
त्या रतीनें मोहितचित्त । तें विषयांत रत । भ्रममाण सदा होत । तेथ चालक रूप पुरुष असे ॥४०॥
तो पुरुष ‘ काम ’ असत । जनांस नाना कार्यांत । प्रवृत्त करी तो जगांत । ऐसें रहस्य जाणावें ॥४१॥
भोग तेव्हां भोक्त मोहहीन । ज्याच्या ह्रदयीं पावन । तेव्हां शाक्त ब्रह्म असद्वाचक लाभून । धन्य त्याचें जीवन ॥४२॥
त्या द्वारानें साधित । विघ्नेश्वराची संगत । म्हणून देवेद्रांनो त्या क्षेत्राप्रत । द्वार ऐसें शास्त्र म्हणे ॥४३॥
गणेशाच्या उत्तरांगातून । स्वभावें सौर ब्रह्म उत्पन्न । तें सदासत्यवाचक महान । देवसत्तमांनो कथितें झाले ॥४४॥
तें ज्ञानकर्म भेदें होत । द्विधाभूत । जगतांत । गणराजाच्या इच्छेनें सतत । त्याचें वर्णन ऐका पुढें ॥४५॥
कर्माधार सर्व जगत । कर्म सृष्टमात्रास प्रेरित । अंती कर्मानुसार जन्म लाभत । शास्त्रांत तन्मयत्वें हो ॥४६॥
आधारात्मक भावें स्थित । परा धरणी कर्मरूप असत । महामाया संज्ञा ख्यात । सुर्याची जी भामिनी ॥४७॥
वराह ज्ञानरूप सतत । निःसंगभावें ज्ञात । कर्मजातीत जरी राहत । तरी तोच रतिवाचक ॥४८॥
कोणी कर्मयोगयुत । कोणी ज्ञानपरायण असत । दोन्ही भावांत यंत्रित । भटकती मोहसंयुत ते ॥४९॥
कर्मांचा मोह त्यांतून । तैसा जो ज्ञानमोह सोडून । त्यांच्या योगें अमृतब्रह्म शोभन । प्राप्त करावें रविवाचक ॥५०॥
अथवा सौरमार्गें लाभव । भक्तमुख्यांनो तें जगांत । तें द्वाररूप गणपाचें ख्यात । ऐसे देवही जाणावें ॥५१॥
ज्या द्वारानें योगींद्र जाती । सदा ह्या गणनायकाप्रती । त्यास उत्तरांग म्हणती । विशेषें ऐसें पंडितजन ॥५२॥
नंतर गणेश्वराच्या पूर्वांगांतून । निःसृत ब्रह्मानंदमय पूर्ण । समभाग प्रकाशक शोभन । वैष्णवब्रह्म समरूप ॥५३॥
सत्य असत्यात्मकांत । समरूपेण संस्थित । सर्वमान्य तें द्विविध होत । विष्णु-लक्ष्मी रूपानें ॥५४॥
लक्ष्मी शोभात्मिका ख्यात । यशप्रदा विशेषें असत । द्विविधा या शोभेनें युक्त । तिचें ऐसें रहस्य जाणावें ॥५५॥
लक्ष्मीची समता न दिसत । देवसत्तमांनो जगांत । शोभा ती परम माया ज्ञात । बुधजनांच्या मतें सदा ॥५६॥
जेथ लक्ष्मी वसत । तेथेंचि सर्व यश प्रतिष्ठित । भुक्तिमुक्तिमयी साक्षात । लक्ष्मी सर्वत्र म्हणतात ॥५७॥
तिचा चालकरूप व्यवस्थित । विष्णु तो सदा साम्यांत । आनंदभुक विशेषें होत । द्वंद्वमायाधारक तो ॥५८॥
त्यांच्या योगें समकार । ब्रह्म वेदवचन ऐसे थोर । आनंदवाचक ते विप्र । वैष्णव सदा प्राप्त करिती ॥५९॥
गणेश प्राप्तीस्तव असत । देवांनो दार आनंदधारक ख्यात । तेंच गणेशक्षेत्राचें पूर्वांग वर्णित । अव्यक्त ब्रह्म दक्षिणांगापासून ॥६०॥
तें नेति कर्तृत्वें नेति रूप असत । तेंच शांकर ब्रह्म असत । सहज जें सर्वसंभत । मायेनें तें द्विधाभूत ॥६१॥
नरनारी स्वभावें वर्तत । स्वेच्छारूपा पार्वती ज्ञात । महामाया ती साक्षात । कथन करिती बुधजन ॥६२॥
आपुल्या इच्छेनें ती त्रिविध सुजित । मोहविहीन शंकर असत । तो शैव भक्तांस्तव स्वाधीन वर्तत । चतुर्थब्रह्म त्यास म्हणत ॥६३॥
त्यांच्या योगें ब्रह्म अव्यक्त । ऐसें बुधजन सांगत । तें दक्षिणांगद्वार वर्णित । त्यानें लाभे गणनायक ॥६४॥
चारांच्या संयोगें होत । स्वानंद जो स्वसंवेद्य योगें वर्तत । योगियांसी होत प्राप्त । तेंच स्वानंदवाचक क्षेत्र असे ॥६५॥
गणेशाचें हें क्षेत्र । चार द्वारांनीं युक्त सर्वत्र । सर्वसिद्धिप्रद पवित्र । असें ग्रंथ सांगताती ॥६६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे षष्ठे खंडे विकटचरिते स्वानंदक्षेत्रस्वरूपवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः समाप्त । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP